Amruta-Desarda-Shabdanchi-Savli-Tichyatali-Ti-Chitrakshare-Goshta-Creations-Saarad-Majkur-Marathi-Lekh-unsplash

‘तुला एक प्रश्न विचारू का?’ माझ्यातली ‘ती’ मला असं नेहमी विचारते. स्वतःशी बोलण्याचा हा घाट अनेकजण करत असतील. मलाही स्वतःशी बोलायला, प्रश्न विचारायला आवडतं. जो काही संवाद स्वतःशी होतो त्यात प्रत्येक वेळी नेमकं हाती काय येतं माहीत नाही. पण त्यातून कधीतरी समाधान गवसतं. मन कधी नाराज असेल तर माझ्यातली ती मला हमखास भेटायला येते. अनेक वेळा न बोलावताच येते आणि मनातलं ऐकण्याचा प्रयत्न करते. जाणून घेते. समजून घेते. ही मैत्रीण खूप भावते.

एकदा काय झालं, अशीच मी एकटी काहीतरी करत बसले होते. मन जरा उदास वाटत होतं, तर मनाच्या दाराशी तिनं टकटक केली.
‘येऊ का बोलायला?’ तिनं विचारलं.
‘मला नाही बोलायचं, का आलीस?’ मी तिच्याकडे न पाहता तिला म्हणाले.
‘तू नाराज दिसलीस. वाटलं मला भेटून तुला बरं वाटेल.’ ती म्हणाली.
‘हा. नाराज आहे खरी. पण का ते कळत नाही.’ मी म्हणाले.
‘माझ्याशी बोल. मग तुला छान वाटेल.’ यावर ती म्हणाली.
‘काही नाही. पण साचून गेल्यासारखं होतंय. मन तुंबून गेलं आहे. त्यामुळेच नाराज नाराज वाटत असावं.’ मी तिला म्हणाले.
‘मग जरा बाहेर जा, चालून ये, किंवा काहीतरी काम कर, लिही, किंवा वाचत बस. किंवा काहीतरी खा.’ ती मनाच्या दारातूनच मला सल्ले देऊ लागली.
‘सगळं करून बघितलंय.’ मी जरा डोळे वटारून तिला म्हणाले.

मग दोघींमध्ये जरा शांतता पसरली. ती आणि मी गप्पच राहिलो थोडा वेळ. मी उसासे घेत बेडवर पडून होते, आणि ती माझ्या मनाच्या दाराशी रेंगाळत मला न्याहाळत बसली होती.
‘काय बघतेस?’ मी अखेर विचारलं.
‘काही नाही. तुला बघतेय.’ ती म्हणाली.
‘त्यात काय आहे बघण्यासारखं. तुझ्यासारखीच तर आहे मी.’ तिच्याकडे हसून म्हणाले.
‘नाही हां, तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे खूप. तू काही माझ्यासारखी नाहीस. हे काय मला कळत नाही?’ ती काहीशी नाराजीच्या स्वरात म्हणाली.
‘तेही आहेच म्हणा. तू माझ्यासारखी असलीस तरी माझ्यासारखी नाहीस. पण तू माझ्यातलीच एक आहेस, हे मान्य आहे ना तुला?’ मी प्रश्न केला.
‘हो मान्य आहे. आता बोलशील का काय झालं ते?’ तिनं पुन्हा मुद्द्याला हात घातला.
आता माझा नाईलाज होता. तिच्यापासून काही लपवून ठेवणं किती अवघड आहे याची मला जाणीव झाली. मनात असलेलं सगळं तिला सांगितल्याशिवाय ती काही जाणार नाही हे समजून चुकलं. तिला टाळून उपयोग नाही. तिला काहीतरी सांगावं लागेल, जे तिला पटेल, आणि मग ती प्रश्न न विचारता निघून जाईल. काय करावं ते समजत नव्हतं. पण काहीतरी बोलावं लागणार हे तर खरं होतं.
शेवटी मी तिला आत घेतलं आणि तिला सांगू लागले,
‘काय आहे ना, माझ्यात अनेक प्रश्न आहेत. ज्यांची उत्तरं मला मिळतील की नाही याबद्दल मी साशंक आहे. आता तू जी येतेस, माझ्याशी बोलतेस, मला प्रश्न विचारतेस, हे नेमकं काय आहे? तुझ्याशी बोलून काय होईल? याचा मी विचार करते. माझ्या मनातले विचार, भावना यांच्याकडे जेव्हा पाहते, तेव्हा एक अशी पोकळी दिसते ज्यात फक्त अंधार असतो. तुझी हाक मात्र त्या पोकळीत येते आणि मग कुणीतरी माझ्यासोबत आहे ही जाणीव मला सुखावते. तू जर कायमची माझ्यातून निघून गेलीस तर मी काय करू? त्या मिट्ट काळोखाला कशी सामोरी जाऊ? या भीतीनं मन ग्रासून गेलं आहे म्हणून मी नाराज आहे.’ इतकं बोलून मी थांबले.
हे ऐकून ती हसू लागली. खूप वेळ हसली. मला तिचा जाम राग आला. पण तो मनातच ठेवला. हसण्याचा ओघ संपल्यावर ती मला म्हणाली,
‘हे बघ, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. किमान तू असेपर्यंत मी या जगात आहे, राहीन. तुझ्यानंतर काय याचा मी कधी विचार केलेला नाही आणि करणार पण नाही. तू फक्त माझ्याशी संवादी रहा. संवाद हा माझा आत्मा आहे. तू जर मला प्रश्न विचारले नाहीस, माझी हाक ऐकली नाही, माझ्याशी वाद घातला नाहीस तर मात्र कालांतरानं मी नसेन. आणि मग तुझं काय होईल हे काही सांगायला नकोच. तुला ते चांगलं समजलं असेल. बाकी तू निश्चिंत आणि बिनघोर रहा. नाराजू नकोस. आभाळ वगैरे कोसळलेलं नाही. चिल हो.’ बोलक्या नजरेनं ती म्हणाली.

तिचे शब्द ऐकून जरा मनात फुलपाखरू फडफडलं. तिच्याकडे बघून एक मस्त स्माईल दिली. तिला म्हणाले, ‘थॅंक्स. तुझ्याशी बोलून मोकळं वाटलं. तुझ्याशी असलेला संवाद मी कधी थांबवणार नाही. तू ही माझ्यात यायची कधी बंद करू नकोस.’
‘वेडाताई, मी येतच राहणार. चला. मी निघते. तुला भूक लागली असेल. मलाही लागली आहे. जेवून घे.’
‘हो नक्की. एकदा आपण एकत्र जेवू. धमाल करू.’ मी हसत हसत तिचा निरोप घेतला. तीही मग मनाच्या दाराशी एक खुण उमटवून निघून गेली, पुन्हा पुन्हा येण्यासाठी.

*

वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा

‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता

चित्रकथा


Website | + posts

अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.

4 Comments

  1. Avatar

    अमृता काय विलक्षण लिहिलस.तुझ्यात दडलेली असंख्य पात्र थोडी पाठवून दे,मीही संवाद साधू इच्छितोय.

  2. गीतांजलि अविनाश जोशी

    हा स्वतःचा शोध असाच सुरू राहू दे……

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :