नेमकं बैल कोण?

नेमकं बैल कोण?
रोज किमान दहा शेतकरी आत्महत्या होत असलेल्या
कृषिप्रधान देशात
नेमकं बैल कोण?
तो चतुष्पाद प्राणी
की आपण?
सभ्यता, व्यवस्था, समाज
का त्यांचं जू वाहणारे आपण?
खरंच नेमकं बैल कोण?
गायीच्या नावावरून हजारो माणसं
कापली जात असणाऱ्या देशात
नेमकं बैल कोण?
बंद पडल्या गावगाड्याच्या
सामंती जाचाला उकरून बाहेर काढत
व्यवस्थेचं मढं वाहणाऱ्या देशात
नेमकं बैल कोण?
तो चतुष्पाद प्राणी
की आपण?
पशूच्या अगतिकतेचा, लाचारीचा
अनैसर्गिक व्यापार मांडून
आपले सण साजरे करणाऱ्या देशात
नेमकं बैल कोण?
तो चतुष्पाद प्राणी
की आपण?

*

वाचा
सुदेश इंगळे यांच्या कविता
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


Website | + posts

मी सुदेश इंगळे. अक्षर मानव प्रकाशनातर्फे माझे 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या मी 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.

1 Comment

  1. गीतांजलि अविनाश जोशी

    उत्तम विचार प्रवर्तक कविता.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :