आपण सारे बांधव आणि
भारत माझा देश आहे..
रोजच नव्या भिंती पाहून
हारत माझा देश आहे…
सगळीकडे हजार शिखरे
जिंकत माझा देश आहे..
घरामध्ये भगव्या-हिरव्यात
जळत माझा देश आहे….
तिकडच्या तुकड्यांत बेभान,
पळत माझा देश आहे..
माती आपली विकून सारी
पुसत माझा देश आहे…
भूत वर्तमानात त्रिशंकू
लटकत माझा देश आहे..
भविष्याचं होईल काही तरी
म्हणत माझा देश आहे…
इतिहास भूगोलात स्वतःला
शोधत माझा देश आहे..
तुझ्या-माझ्यातलं देश असणं
विसरत माझा देश आहे…
आपली हवा आपलं पाणी
विकत माझा देश आहे..
जगण्याची प्रगल्भ ढोंगं
पोसत माझा देश आहे…
मी नाळ धरून तरी
हरवत माझा देश आहे..
प्रश्न एक सोबतीला, खरंच
जगत माझा देश आहे?
*
वाचा
सुदेश इंगळे यांच्या कविता
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
मी सुदेश इंगळे. अक्षर मानव प्रकाशनातर्फे माझे 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या मी 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.