कसं पाहू… तूच सांग?

sudesh-ingale-chitrakshare-marathi-prem-kavita-kasa-pahu-tuch-sang

कसं पाहू…
… तूच सांग

एक क्षुल्लक स्त्री म्हणून
एक विपरीत तत्व म्हणून
की मी सोडून
उरलेलं ब्रह्मांड म्हणून

एक जाडा भरडा देह म्हणून
श्वासांचं येतं जातं गीत म्हणून
की कधी न होणाऱ्या उदयाचा
उसवलेला तुकडा म्हणून

मित्र म्हणून,
सवय म्हणून
की उपकृत केलंस
मला म्हणून…

माझ्या आवाजाचं केंद्र म्हणून,
रित्या तासांतला काळ म्हणून
की जस्ट होत असतं
असं म्हणून…

मागलं काही उरलं म्हणून,
येणारं नाही सरलं म्हणून
की तेवढ्यापुरतं
धडकायचं होतं म्हणून

वैशाखातली रात म्हणून,
पूसवातली पुनव म्हणून
की उगाच, रिकामटेकड्या
जिवांचा अट्टाहास म्हणून

सल्ला देणारी बडबड म्हणून,
उपदेशणारी किरकिर म्हणून
की प्रकृतीभर
ऐकणारा कान म्हणून

सगळं देतो सोडून सखे…
… पाहतो नुसता
एकटक

*

वाचा
सुदेश इंगळे यांच्या कविता
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


Website | + posts

मी सुदेश इंगळे. अक्षर मानव प्रकाशनातर्फे माझे 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या मी 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :