प्रशांतभूषण आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान
– उदय नारकर
देशाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालय यांचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील श्री. प्रशांत भूषण यांना न्यायालयाने १ रुपयाचा दंड ठोठावत शिक्षा फर्मावली. प्रशांत भूषण यांनी तो दंड भरून न्यायालयाने केलेल्या शिक्षेचा त्यांनी मान राखला. ही शिक्षा करत असतानाच “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये”, याचीही सर्वोच्च न्यायालयाने ग्वाही दिली. न्यायालयाने भूषण यांनी माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती; पण तो “आपल्या सदसद्विवेकाचा आणि न्यायाचा अवमान झाला असता” म्हणून भूषण यांनी माफी मागून शिक्षेतून आपली मान सोडवून घ्यायची आलेली संधी घेतली नाही. “लोकशाही मूल्यांचे संरक्षण” करण्यासाठी सर्व संस्थांची खुली समीक्षा आवश्यक असल्याचेही त्यांनी वारंवार अधोरेखित केले होते. इतकेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्याच चार न्यायाधीशांनी १२ जानेवारी २०१८ रोजीच्या पत्रकार परिषदेत केलेल्या लोकशाहीच्या संकोचाचाही उल्लेख न्यायालयास सादर केलेल्या निवेदनात केला होता. त्या अभूतपूर्व पत्रकार परिषदेचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने या निकालपत्रात केला आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशांत भूषण यांनी आपले वकील श्री. राजीव धवन यांच्याकरवी १ रुपया तातडीने न्यायालयाच्या दप्तरी भरला. त्यांच्यावर भरलेला हा खटला देशातील “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी मैलाचा दगड ठरेल” असाही विश्वास श्री. भूषण यांनी व्यक्त केला.
या खटल्याला कायद्याचे आवरण असले तरी त्यामागील मूळ शक्ती राजकीय मूल्याच्या होत्या, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. कार्यकारी यंत्रणा संविधानाचा अधिक्षेप करत नाही ना, हे पाहण्याची आद्य जबाबदारी न्यायव्यवस्थेची आहे, आणि प्रशांत भूषण हाच आग्रह धरत होते. ही गोष्ट ऍटर्नी जनरल वेणुगोपाल यांनीही न्यायालयाच्या नजरेला आणून दिली होती. भूषण यांनी माफी मागावी, असा न्यायालयाचा आग्रह होता, याचा निर्देश करत ज्येष्ठ वकील श्री. राजीव धवन यांनी भूषण यांना शिक्षा करून “हुतात्मा” करू नका असा इशारा दिला होताच; शिवाय, न्यायालयाने ‘न्यायिक मुत्सद्दीपणा’ दाखवावा अशी अपेक्षाही केली होती.
हा ‘मुत्सद्दीपणा’ दाखवत अखेरीस न्यायालयाने प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड केला. अर्थात, प्रशांत भूषण यांच्या गुन्ह्याचे माप त्यांच्या पदरात टाकण्यास सिध्द असलेल्या न्यायालयाचे मन बदलले ते जनतेच्या वाढत्या “आग्रहा”मुळे. भूषण यांच्यासोबतच आपणही या न्यायालयाच्या ‘तथाकथित’ अवमानात सहभागी होण्याची जणू लाटच उसळू लागली होती. न्यायालयाने या टाळता येण्याजोग्या प्रकरणावर पडदा टाकला, हे बरेच झाले.
अर्थात, एवढ्यावर न्यायालयापुढील समस्या संपल्या असे होत नाही. भूषण यांच्या पाठीशी उभी राहिलेली भारतीय लोकशाहीप्रेमी जनता सीएए/एनआरसी पासून काश्मीरपर्यंतच्या प्रश्नी देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्था भारतीय संविधानाचा मान राखण्याचे अग्निदिव्य पार पाडते की नाही हे मोठ्या औत्सुक्याने पहात राहील.
*
(सदर लेख हा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), महाराष्ट्र राज्य कमिटीचे साप्ताहिक ‘जीवनमार्ग’ यामधून घेतला आहे.
सोमवार, २४ ऑगस्ट २०२० । संपादक: उदय नारकर)
वाचा
जीवनमार्ग
आज दिनांक
कार्यकर्ता
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
‘जीवनमार्ग’ या भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), महाराष्ट्र राज्य कमिटीच्या साप्ताहिकाचे संपादक.