वाहत्या प्रवाहाची मानवी गोष्ट!
‘प्रत्येक माणसाच्या आत असं काही असतं, ते पुढं पुढं जात राहतं.. ते फक्त रक्ताच्या नात्यातूनच नाही मिळत, तर ते अनेक धर्मांच्या नात्यांमधून मिळत राहतं..’ हे सांगितलं आहे रंगनाथ पठारे यांनी लिहिलेल्या त्यांच्या ‘सात पाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीत.
इतिहास, भूतकाळ आणि वर्तमान यांचा सखोल अभ्यास करून स्वतःच्या मूळांचा शोध घेणारा कादंबरीचा नायक त्याची गोष्ट सांगतो. तीही दीर्घ. एका कुळाची ही कथा मानवी भाव-भावना, त्यातली व्यर्थता, अर्थता, आर्तता सांगत राहते.
मुळात हे जग, ज्याचा आपण भाग आहोत, ते किती अज्ञात आहे आणि त्या अज्ञाताच्या प्रवासात आपण नेमकं काय करत आहोत याचा शोध प्रत्येक माणूस त्याच्या परीनं करत असतो. माणूस हा प्राणी असूनही तो त्याचा वंश कसा पुढं नेतो आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या खुणा इतिहासात कसा बांधतो, हे समजून घ्यायचं असेल तर ही कादंबरी नक्की वाचली पाहिजे.
पिढ्या घडतात, बिघडतात, तुटतात, फुटतात आणि जुडतातदेखील. माणूस म्हणून आपण उभं राहतो आणि या पृथ्वीवर वर्चस्व गाजवतो. ही पृथ्वी मातृप्रधान आहे. स्त्रीतत्व हे वाहक आहे. तिच्यातून निर्माण होणारे सजीव आणि निर्जिव हे सगळे तिच्यासाठी अर्थात पृथ्वीसाठी फक्त एका प्रवाहाचे काम करतात. ती आहे म्हणून आपण आहोत. या विचारापर्यंत येणारा कादंबरीतला लेखक ‘देवनाथ’ हा वर्तमानातील घडामोडींचं इतिहासातल्या घडामोडींशी नातं स्पष्ट करतो.
स्वतःच्या मूळांचा शोध हा वैश्विक कसा होतो आणि त्याचं कारण स्त्रीतत्व कसं आहे हे लेखक खूप सहजपणे स्पष्ट करून देतात. रोहिणी, आरेना, गीता, उल्फी, आफिया, तुळसाबाई, झमबाई, भीमबाई इत्यादी स्त्रीपात्रांतून हे या कादंबरीत मांडलं आहे.
पृथ्वीवरील विषाणू, जिवाणू हे अमर आहेत असा उल्लेख या कादंबरीत आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत हे विषाणू पृथ्वीवरील संतुलन राखायचं काम करतात. त्यात माणूस हा असा प्राणी आहे, जो त्या विषाणूंच्या विरुद्ध उभा राहून स्वतःला तगवतो. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आणि सध्याच्या न सुटणाऱ्या समस्येत जगाचा चाललेला संघर्ष ही कादंबरी वाचून मनात येत राहतो.
जवळजवळ ८०० पानांची ही कादंबरी म्हणजे अनेक पुराण, परिकथांचा एक रोमांचक अनुभव वाटतो. अर्थात त्यातला ‘शिरपती’ हा मनात खोलवर जातो. त्याच्या आत असलेला मातृत्वाचा गुण पुरुषाच्या पुरुषी वृत्तीला जेव्हा बाजूला सारतो, तेव्हा माणूस म्हणून जगणारा तो एक थोर इसम वाटतो. त्याच्यापासून सुरू झालेली गोष्ट अखेर त्याच्यातून आलेल्या वृत्तीपाशी येऊनच थांबते.
इतिहासाचे कैक संदर्भ वाचताना थोडा पिढ्यांचा गोंधळ होतो. कोण कुणाचा? हे पुढं वाचत राहताना कधी लक्षात राहतं, तर कधी डोक्याला थोडा त्रास द्यावा लागतो. विशेषतः शंभूराव आणि रखमाजीच्या बाबतीत माझं थोडं झालं. अर्थात ही माझ्या बुद्धीची मर्यादा असू शकते. प्रत्येक वाचकाला तसा अनुभव येणार नाही कदाचित.
वाचलेलं मनात मुरत जातं आणि ते कुठल्याही व्यक्ततेत पाझरत जातं. जे पाझरत असतं, ते खूप आनंद देतं. या कादंबरीतून तो खूप मिळतो. मनावर एक दडपण येतं आणि समाधानाची भावनाही येते. लिहिणाऱ्या हातांनी, विचार करणाऱ्या डोक्यांनी आणि निरीक्षण करणाऱ्या डोळ्यांनी ही कादंबरी नक्की वाचली पाहिजे. ती स्वतःत मुरवण्याची ताकद आपल्यात यावी असं वाटतं आणि श्रीपतीसारख्या सरळ आणि तितक्याच हुशार मनाच्या माणसासारखं होता यावं असंही कुठंतरी आतून वाटत राहतं.
नक्की वाचा-
‘सातपाटील कुलवृत्तांत’
लेखक – रंगनाथ पठारे
प्रकाशन – शब्दालय
*
वाचा
पुस्तक परिचय
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.
पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली आहे. अमृता, उत्तम पुस्तक परिचय दिला आहे .
धन्यवाद ताई!
खुप छान पुस्तक परिचय…लवकरच वाचतो…