Chitrakshare-Bachchu-Kadu-Raj-Mahore-Karyakarta-goshta-creations-saarad-majkur-tiwasa-amaravati-prahar

लै पक्ष हाय नं लै नेते हाय; पण बच्चूभाऊसारखा एकही नाही पायला म्या अजून तरी. मले आठवते, मायं तवा मुबाईल शॉपी सुरू केली होती. तवा मुबाईलचा धंदा लै जोरात चाले. मग काय, मायाकडं पैसे-गिसे बम राये. मग आमचे जिल्हाप्रमुख संजयभाऊ देशमुख तवा बम कार्यक्रम घेत जाय. म्हणजे रक्तदान शिभीर, आरोग्य तपासणी शिभीर, डोयाचं शिभीर म्हणजे लोकायची बिमारी फुकटात तपासणी करून देणे, असं तसं..

मग त्या सर्व कार्यक्रमाची तयारी मायाकडं राहे. मी कार्यक्रमाचं संचालन कराचो. मग पेपरमध्ये बातमी येत जाय. तवा लै हुरूक राये का आता आपलं नाव पेपरात छापुन येते. मग दुसऱ्या दिवशी सकाईच पेपर वाचाले जावो. बातमी वाचली का पेपर विकत घेऊन घरी यायचो. त्यावेळी मग संजूभाऊले फोन करून सांगो, ‘‘भाऊ, बातमी आली आपली.’’
मग संजुभाऊ म्हणे, ‘बरं बरं त्या सर्व बातम्या गोळा कर.’
संजुभाऊने असं सांगितले का वाटे, आपल्याला लै जबाबदारी देतात भाऊ. म्हंजे आपणच त्यायचा विश्वासू जवळचा कार्यकर्ता. मग असं करत करत आमचे जास्त लक्ष दवाखान्यावर रायत जाय. कारण गरीब माणसाचा दवाखाना म्हणजे सरकारी दवाखाना. जिथं कधीच चांगले उपचार नसते. ना गोया भेटत, ना सलाईन. मग एक दिवस संजूभाऊ म्हणे, ‘आपण आंदोलन करू अमरावतीच्या ऑफिसात.’

बस बावा, ठरलं. भाऊ अन्‌ आमचं. आंदोलनाचं नाव होतं, ‘अर्धनग्न आंदोलन!’
म्हणजे फक्त शर्ट काढून सरकारी यंत्रणेचा निषेध म्हणून त्याच्या क्याबीनमध्ये जाऊन ठिय्या मांडणे. त्यायले जवाब मागणे. जोपर्यंत दवाखाना चांगला करत नाही अन्‌ पर्मनंट डाक्टर भेटत नाही, तोपर्यंत बम नारेबाजी करत होतो. मी तवा दिसो लहान; पण आवाजात जोर होता. झाली मागणी मंजूर, लेखी भेटलं त्या साहेबाकडून. मग अजून पेपरात बातम्या आल्या मोठ्या…

तवापासून मनात इतकं नक्कीच असतं का बच्चूभाऊ कवा आंदोलनाची घोषणा करते अन्‌ कवा आंदोलनात जाते. हे मायाच नाही तर ‘प्रहार’च्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असतं. मग ते आंदोलन कोणाच्याही प्रश्नासाठी असो. आंदोलन म्हटलं का जसं काय लढाईला जातोय, असंच आमाले वाटते. लै आतुरता असते.

नागपुरात हिवाळी अधिवेशन भरलं होतं. आर. आर. पाटील गृहमंत्री होते. बच्चूभाऊने घोषणा केली आणि सांगातलं, शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ‘ट्रॅक्टर मोर्चा, चलो नागपूर!’ साऱ्या जिल्ह्यात एकच चर्चा. प्रहारचं आंदोलन म्हणजे लै आक्रमक अन्‌ स्टाईलबाज असते. ते लोकायला लै आवडते. मग त्यायसाटी आमची मीटिंग झाली. त्यात सर्व ठरलं. भाऊ म्हणे, विदर्भातील सर्व कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर घेऊन नागपुरात घुसाचं. नागपूर जाम कराचं. मग सरकारले म्हणायचं, ‘आमच्या मागण्या मंजूर करा, नाही तर आम्ही इथून जात नाही.’
इचार करा, एक ट्रॅक्टर किती लंबा असते. असे ४००-५०० ट्रॅक्टर म्हंजे किती भारी सुचलं असन भाऊले.
मग काय? झाली तयारी. गावागावात पोस्टर लावले. जनजागृती केली आणि ठरलेली तारीख आली. सरकार व पोलीस यंत्रणा अगोदरच धास्ती घेऊन बसली होती, का आता हे काय करते न्‌ काय नाही बुवा. प्रहार म्हटलं का तेवढं तर असतेच. प्रत्येक रोडवरच्या गावात बम नवनवीन पोलीस बंदोबस्त. मी तवा तिवस्यात म्हंजे माया गावात होतो. बच्चूभाऊ त्यांच्या गावातून सर्व कार्यकर्ते व ट्रॅक्टरचा ताफा घेऊन निघाले. नागपूरला तिवसा मार्गे जायला लागते. तवा तर लैच थंडी कडक होती. अन्‌ एवढे मोठे ट्रॅक्टर, त्यात बाया-माणसे शिदोरी घेऊन निघालेले. आंदोलनात एक गाणं असते. बच्चूभाऊच्या आवडीचं. ते आता आमच्या सर्वांच्या आवडीचं झालेलं. ते गाणं म्हणजे, ‘मेरा रंग दे बसंती चोला… मेरा रंग बसंती चोला…’ हे गाणं लागलं का आमच्यात वेगळीच ऊर्जा अंधरून तयार होते.

बम नारेबाजी करत ताफा निघाला हो भाऊ. सोबत जिल्यातील पोलीस अन्‌ त्यांचे मोठाले सायब लोकं. मग काय, वरून सरकारने आदेस दिले का प्रहारचा मोर्चा नागपूर येऊ देऊ नका. तो अडवा. मग आम्हाला समजलं. भाऊचा मोर्चा अडवला. रात्र झाली होती. सकाळपासून निघालेला मोर्चा संध्याकाळी लेहगाव फाटा इथं पोहचला होता. तवा तिथेच अडवला पोलिसांनी. मग आम्हाला कायजी वाटू लागली. भाऊला अटक करेल काय पोलीस म्हणून. सर्व कार्यकर्ते तिथं पोहोचले. बम गर्दी. बम घोषणाबाजी झाली.

बच्चूभाऊने पोलिसांना सांगातलं, ‘आमच्या गाड्या थांबू नका. नाय तर चक्का जाम सुरू करू.’ पोलीस घाबरले. नमले इतक्या विशाल मोर्चापुढं. मग मोर्चा पोचला माया गावात म्हणजे तिवस्यात. तिवसा हायवेवर असल्यानं इथं लोकांपेक्षा जास्त पोलिसच होते त्या दिवशी.

कारण एकच प्रहारचा मोर्चा अडवण्यासाठी मले तेव्हा ठाण्यात बलावलं होतं. चौकशीसाठी. पण मी काय गेलो नाही. मले असं वाटे तवा का, इतका मोठा मोर्चा तिवस्यात येतोय आपल्याला लै तयारी करा लागते. असे करून धावपळ सुरूच होती. शेवटी पोलिसांनी आक्रमक होऊन मोर्चा अडवला. सातरगाव रोडवर असलेल्या विनोदभाऊ थुल यांच्या वीटभट्टीजवळ. रोड तं पूर्ण प्याक झाला होता. एवढे ट्रॅक्टर होते, त्यात पोलिसांचा बंदोबस्त कडक. दोन्हीकडून कोणालाच येऊ देत नवते. तवा रात्रीच्या वेळी सर्व लोकांसाठी जेवण करायला खिचडी व बेसन बनवलं बाजूच्या वावरात. बच्चूभाऊ त्या दिवशी लै थकले होते. वीटभट्टीजवळच ते खाली मातीवर बसले. कार्यकर्त्यांसोबत बसून चर्चा करत आंदोलनाची दुसरी भूमिका म्हणजे गनिमीकावा सांगू लागले. भाऊचं हे सगळ्यात वेगळं रायतं.
वातावरण खूप टाईट झालं होतं. मी भाऊसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलो. सोबत पाण्याची बाटली पन.
भाऊ म्हणे, ‘अबे म्याटा, इथं सारे जण खिचडी बेसन जेवत आहे. मग मी कसा काय दुसरं चांगलं जेवू? जाय घेऊन वापस.’
म्या म्हटलं, ‘ठीक आहे भाऊ. पण हा गुड तरी घ्या तुम्ही. जेवण झालं की तुमी खात असता. मले माहिती आहे.’
मग भाऊ हासले. म्हणे, ‘लै लक्ष ठेवतं बे.’

मग रात्र झाली. थंडी कडक पडली होती. म्या गावातील काही बिचायतमधून ब्लॅंकेट घेऊन गेलो द्यायला, तेव्हा जे म्या पायला डोळ्यानं तर मले रडणं आलं. इतका मोठा माणूस शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी इतकी मोठं मोठी आंदोलनं करतो, ते पण स्वतःचा जीव धोक्यात घालून. कसलीही कायजी न करता. किती जिव्हाळा आहे. गरिबाच्या समस्येबाबत खूप भावनिक होऊन सतत सोबत असणारा हा नेता वीटभट्टीच्या बाजूला एक तळव टाकलेलं, त्यावरच झोपला होता. ते पण स्वतःची ब्लँकेट दुसऱ्या कार्यकर्त्याला देऊन टाकून.

Chitrakshare-Bachchu-Kadu-Raj-Mahore-Karyakarta-goshta-creations-saarad-majkur-tiwasa-amaravati-vidarbha-prahar-ardhanangn-andolan
अर्धनग्न आंदोलन – तिवसा गावातील सकाळ

मी अगोदरच भाऊवर लै प्रेम कराचो. हे पाहून तर अजूनच छाती फुगली. आपला भाऊ आहेच लै खास. मग भाऊच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. ‘सकाळी येतो भाऊ’, असं बोलून निघालो. तवा भाऊ जागीच होते.
मले म्हणे, ‘राज्या…’
म्या म्हटलं, ‘हव भाऊ, बोला.’
भाऊ म्हणे, ‘सकाळी सर्व पेपर घेऊन येशील. आंदोलनची बातमी असेल ते सर्व पेपर. या लोकांसाठी चायचा बंदोबस्त होईल का?’
मी म्हटलं, ‘होऊन जाईन भाऊ.’
मग भाऊ म्हणे, ‘लोक लै हाय नं बे.’
मग मी म्हटलं, ‘असू द्या भाऊ कितीपण. करतो मी…’
भाऊ म्हणे, ‘जाय मग, जमव सायाचाले.’
तेव्हा मी म्हटलं भाऊला, ‘भाऊ, तुमी बोलले म्हणजे देव बोलले…’

(क्रमशः)

*

वाचा
कार्यकर्ता
समाजकारण
कथा

कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी


+ posts

राज माहोरे हे प्रहार संघटनेचे तिवसा तालुका प्रमुख असून गेल्या वीस वर्षांपासून ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते ना. बच्चू कडू यांचे विश्वासू कार्यकर्ते असून सामाजिक व राजकीय उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

10 Comments

  1. Avatar

    होय राज एक बच्चूभाऊसारखे वेगळे रसायन आहे.
    मी प्रत्येक आंदोलनाचा साक्षी आहे.

  2. Avatar

    भारीच भाषा आहे … आवडली .
    आणि अनुभव पण मस्त मांडलाय.

  3. Avatar

    👍👍👍👍

    1. Avatar

      राजू भाऊ खूप छान दोन आंदोलनामध्ये मी स्वतः भाऊंना अनुभवलं सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निस्वार्थपणे लढणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता वंदनीय बच्चुभाऊ ..👌👌👌
      विलास आघाव जिल्हा संघटक
      प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा हिंगोली

    2. Avatar

      उत्तम लिखाण , जिवंत अनुभव ….ऑल दि बेस्ट राज …!

  4. Avatar

    वऱ्हाडी भाषेचा तडका.. लै भारी.

  5. Avatar

    लय भारी भाऊ अपना भिडू बच्चू कडू!!!

  6. Avatar

    खूप छान वैदर्भीय भाषा.
    नेते आणि कार्यकर्ते यांचे अतिशय सुरेख निस्वार्थी नाते.खूप छान लिखाण

  7. Avatar

    अप्रतीम 👌👌👍💐

  8. Avatar

    Bhai..👌👌 khup chan ❤️

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :