मागच्या भागात आपण जोहान्सची ॲडॉल्फ हिटलर या राजकीय नेत्यावर असलेली श्रद्धा पाहिली, नाझी प्रशिक्षण शिबिराला जाण्याची त्याची तळमळ पहिली. (जोहान्सला त्याचे घरचे, मित्र सगळे ‘जोजो’ म्हणत असतात. जोहान्स आता आपलाही मित्र आहे, त्यामुळं इथून पुढं आपण त्याचा उल्लेख ‘जोजो’ असाच करूया.)
प्रशिक्षण शिबिराचं पहिलंच दृश्य: सहभागी झालेले सगळे प्रशिक्षणार्थी उत्साहात धावत आहेत. यांच्यामध्ये जोजोसुद्धा आहे, आणि तोसुद्धा इतरांसारखाच उत्साहात धावत आहे. धावता धावता तो थकतो आणि मध्येच थांबतो. काही वेळ दम खाऊन तो आसपास बघतो तर सगळी मुलं पुढं निघून गेलेली असतात. हे पाहून जोजो पुन्हा धावायला लागतो.
जोजो या प्रसंगात उभा केलाय तसाच आहे. अगदी तंतोतंत. ‘धावणं’ हा काही त्याचा मूळ पिंड नाही; पण तरी तो धावत राहतो. का? तर आसपासचे सगळे धावत आहेत म्हणून… त्याला स्वतःला हे मान्य असो अथवा नसो, त्याच्या स्वतःविषयीच्या अपेक्षा आणि जगण्याविषयीच्या महत्त्वाकांक्षा काहीही असो.. जोजोचं वास्तव रूप हा वरचा प्रसंग दाखवतो तेच आहे.
असा हा जगण्याच्या मूलभूत प्रश्नांमध्ये अडकलेला, संभ्रमाचं ओझं कोवळ्या खांद्यांवर वागवणारा जोजो सतत स्वतःचा शोध घेत राहतो, स्वतःला आपल्या आत न शोधता आजूबाजूच्या माणसांमध्ये शोधत राहतो. तो या शिबिरात आलेला असतो तेसुद्धा स्वतःचा शोध घेत घेतच. तिथं सहभागी झालेली इतर मुलंसुद्धा थोड्याफार फरकानं जोजोच्याच वयाची असतात. मार्चिंग, अडथळ्यांची शर्यत, शस्त्रास्त्रांची ओळख अशा विविध गोष्टींचा समावेश असलेल्या या शिबिराचा मुख्य हेतू हा जोजोसारख्या कोवळ्या मुलांना मन आणि शरीरानं बळकट करणं, हा असतो. कारण वेळ पडल्यास हीच कोवळी मुलं युद्धभूमीवर जाणार असतात, छाव्याच्या काळजानं लढणार असतात आणि प्रसंगी देशाच्या कामी येणार असतात…
शिबिराच्या पहिल्याच दिवशी दिल्या गेलेल्या एका खेळासाठी सगळ्या मुलांना दोन गटांमध्ये विभागलं जातं. पहिला गट शांतपणे चालत येत असताना दुसर्या गटांनं त्यांच्यावर हल्ला करायचा, असा तो खेळ असतो. ठरल्याप्रमाणे हल्ला होतो आणि प्रात्यक्षिक म्हणून सगळी मुलं मोठ्या उत्साहामध्ये इतरांवर तुटून पडतात. आपला गट जिंकावा यासाठी दुसर्या गटाच्या मुलांना मारायला लागतात, चिरडायला लागतात. जोजोला मात्र हेसुद्धा नको होतं. काय करावं ते त्याला उमजत नाही आणि तो सरळ तिथून पळ काढतो. जवळच एका उंच ठिकाणी उभे असलेले तरुण सैनिक जोजोचं हे वागणं बरोबर हेरतात. जणू अशी कमजोर मनाची मुलं हेरण्यासाठीच ते तसे खेळ बघत उभे असतात.
तो दिवस असाच वेगवेगळ्या खेळांमध्ये, सत्रांमध्ये संपतो; पण दुसर्या दिवशी मात्र जोजो त्या तरुण सैनिकांच्या तावडीत सापडतो. त्यांच्यातला एक सैनिक पुढं येतो आणि विचारतो,
‘तुमच्यासमोर शत्रू उभा आहे आणि तुम्ही त्याला जीवे मारणं अपेक्षित आहे. अशावेळी माणसाचा खरोखर जीव घेण्याचं धैर्य तुमच्यापैकी कोणाकोणामध्ये आहे?’
समोर उभी आलेली १०-१२-१५ वर्षं वयाची निष्पाप, कोवळी मुलं हा प्रश्न ऐकून एकमेकांकडे पाहायला लागतात. जोजो तर बिचकतोच. ही कल्पनासुद्धा त्याला अस्वस्थ करते. पण तो आसपास बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, बरीचशी मुलं हात वर करून आपल्यात ते धैर्य असल्याचं सांगायला लागलेली असतात. सगळ्या धैर्यवान मुलांमध्ये आपण दुर्बल ठरू नये म्हणून जोजो स्वतःसुद्धा बिचकत बिचकत हात वर करतो. सैनिक पुढं विचारतो,
‘हिटलरच्या सैन्यामध्ये धैर्य नसणाऱ्या सैनिकांसाठी जागा नाही. आपल्याला गरज आहे ती खंबीर सैनिकांची. केवळ एका आदेशावर समोर असेल त्याचा जीव घेण्याची तयारी असणार्या लढवय्या सैन्याची. हे करू शकाल का तुम्ही?’
इतर मुलं धैर्यानं ‘हो’ म्हणतात. याही कल्पनेनं मनोमन अस्वस्थ होणारा जोजो संकोचत, बिचकत का होईना, इतर मुलांच्या ‘हो’ मध्ये आपला ‘हो’ मिसळतो. मग तो सैनिक हेरून बरोबर जोजोलाच प्रश्न टाकतो,
‘जोहान्स, तू घेऊ शकशील असा कोणाचा जीव?’
भेदरलेला जोजो अडखळत होकार देतो. मग त्यांच्यातला एक जण एका पोतड्यातून एक ससा बाहेर काढतो आणि जोजोच्या हातात देतो. जोजो त्या सशाकडे बघतो, त्याला कुशीत घेऊन प्रेमानं कुरवाळतो. तेवढ्यात तो सैनिक सशाची मान पिरगाळून त्याचा जीव घेण्याचा आदेश जोजोला देतो. जोजो या भलत्या आदेशानं चकित होतो. दुसरा एक सैनिक पुढं येतो आणि सहज सल्ला देतो,
“दोन्ही हात त्याच्या मानेभोवती ठेव आणि एक जोरदार पीळ दे. तो ओरडेल कदाचित. तसं झालं तर आपण फक्त आपल्या बुटाचा वापर करायचा आणि त्याला संपवायचं.”
जोजो आणखी घाबरतो. मग सैनिक आणि प्रशिक्षणार्थी मुलं मिळून जोजोचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ‘मार..मार.. मार..’ असा एकच घोष सुरू करतात. तो आवाज वाढत जातो. काय करावं ते न कळून जोजो सरळ सशाला जमिनीवर सोडतो आणि दूर हाकलण्याचा प्रयत्न करतो; पण त्या भेदरलेल्या सशालासुद्धा काय करावं ते कळत नाही. तो जागेवरच अंग आखडून उभा राहतो. तेवढ्यात सैनिक त्याला पटकन उचलतो आणि एका झटक्यात त्याची मान पिरगाळतो. कडकड आवाज होतो. मेलेल्या सशाचं शरीर तो सैनिक पलीकडच्या झाडीत फेकून देतो. यानं वाढलेल्या कुजबुजीतसुद्धा पलीकडं उभ्या असलेल्या मुलींचं फिदीफिदी हसणं तेवढं स्पष्ट ऐकू येत राहतं.
मग तो सैनिक पुन्हा जोजोकडे वळतो आणि त्याला म्हणतो,
‘तू भित्रा आहेस, तुझ्या वडलांसारखा.’
जोजो उत्तर देतो,
‘माझे वडील भित्रे नाहीत, ते इटलीमध्ये लढत आहेत.’
सैनिक ऐकत नाही. सगळे मिळून त्याला चिडवायला लागतात, त्याच्यावर हसायला लागतात. एक जणतर सरळ त्याला ढकलतो आणि खाली पाडतो. दुसरा त्याच्या पायाशी आपला बूट नेतो आणि म्हणतो,
‘भित्र्या सशा, तुझी मानसुद्धा अशीच काडकन मोडावी लागेल असं दिसतंय.’
पुढं काही क्षण आपण जमिनीवर पडलेला जोजो आणि त्याला दाबू पाहणारा नाझी सैनिकाचा काळा बूट बघत राहतो…
ही इमेज मला नेहमी खिळवून ठेवते. जोजो या एका पात्राच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेच्या पलीकडे जाऊन ती खूप काही बोलू पाहते. यातले मनात येणारे ठळक दोन संदर्भ इथं देते.
पहिला संदर्भ म्हणजे नुकतीच अमेरिकेत करण्यात आलेली जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय माणसाची हत्या. ही घटनासुद्धा वंशभेदातूनच घडली होती. दोन्हींमध्ये असणारे फरक अगदी किरकोळ आहेत. तिथं गुडघा होता आणि इथं नाझी सैनिकाचा काळा बूट आहे. तिथं एका वंशाच्या माणसानं दुसर्या वंशाच्या माणसाला चिरडलं होतं आणि इथं एकाच वंशातला एक माणूस दुसर्याला चिरडू पाहत आहे.
जोजो रॅबिटच्या या प्रसंगात ज्या दोन पात्रांमध्ये युद्ध पेटलं आहे त्यातलं एक पात्र आहे नाझी सैनिक. असा सैनिक ज्यानं आपलं जगणं-मरणं नाझी पक्षाच्या नावे केलं आहे. आणि दुसरं पात्र आहे ‘जोजो’. असा जोजो जो युद्धभूमीच्या बरोबर सीमारेषेवर उभा आहे. रेषेच्या या बाजूला जावं की त्या बाजूला या गोंधळात असलेल्या जोजोनं आपल्या बाजूला यावं, हिटलरनं पुकारलेल्या या युद्धामध्ये तनामनानं सामील व्हावं, असं या सैनिकाला वाटत आहे. म्हणूनच तो दमदाटी करत आहे आणि जोजोला चिरडू पाहत आहे.
हा बारीक भेद वगळता दोन्ही केसमध्ये शोषण आहे. दोन्ही केसमध्ये शोषित माणसाची घुसमट आहे. दोन्हींमध्ये हिंसा आहे, भेदभाव आहे. आणि प्रेम भावनेचा अभाव आहे…
दुसरा संदर्भ आहे ‘सिलविया प्लाथ’ या कवयित्रीच्या अतिशय प्रसिद्ध अशा ‘डॅडी’ या कवितेचा.
कवितेच्या ओळी:
You do not do, you do not do,
Any more, black shoe,
In which I have lived like a foot
For thirty years poor and white
Barely daring to breathe or Achoo
जोजोला चिरडू पाहणारा बूट मला हमखास सिल्वियाच्या कवितेतल्या काळ्या बुटाची आठवण करून देतो. कवयित्री तिच्या मनातल्या घुसमटीचं चित्रण करण्यासाठी आपल्यासमोर दोन प्रतिमा उभ्या करते. एक आहे काळा बूट आणि दुसरी आहे त्यामध्ये राहणारा पाय. ती म्हणते की हा पाय त्या बुटामध्ये थोडेथोडके नाही तर गेले ३० वर्षं राहत आहे. तेही सातत्यानं. सतत कोंडून राहिल्यामुळं त्याला श्वास घेता येईना झालाय. घुसमट होतीये त्याची… या दोन प्रतिमांपैकी तो कोंडला गेलेला पाय आहे स्वतः कवयित्री आणि तो काळा बूट आहेत – डॅडी (वडील). या कवितेतला ‘डॅडी’ विविध संदर्भांनी येतो; पण एक महत्वाचा आणि इथं जुळणारा संदर्भ आहे ‘नाझीवाद’.
वयाच्या आठव्या वर्षी वडलांना गमावून बसलेली सिल्विया आणि युद्धाला जातो असं सांगून गेलेल्या आणि कधीही परत न आलेल्या जर्मन सैनिकाचा मुलगा ‘जोजो’ – या दोघांची घुसमट एकमेकांशी नातं सांगणारी आहे.
वडील गेल्यानंतर आयुष्यामध्ये निर्माण झालेली पोकळी जोजो ‘ॲडॉल्फ’च्या मदतीनं भरून काढतो. दोन्ही अर्थानं. म्हणजे ॲडॉल्फ हिटलर या राजकीय नेत्यामध्ये आधार शोधत, शिवाय आपला काल्पनिक मित्र ‘ॲडॉल्फ’ याच्या सहवासात मनाला आलेलं पोरकेपण दूर करत. दोन्हीपैकी कुठल्याही अर्थानं पाहिलं तरी जगाचा संहार करणारा ॲडॉल्फ हिटलर हा चित्रपटामध्ये फक्त मित्र म्हणून नाही तर एक ‘फादर फिगर’ म्हणूनसुद्धा येतो. आणि ही फादर फिगर जेवढी आश्वासक आहे, मित्रवत आहे तेवढीच मनाची घुसमट करणारीसुद्धा आहे.
तर, असा तो जोजो आणि त्याला चिरडू पाहणारा नाझी सैन्याचा काळा बूट – काही क्षण आपल्याला दिसत राहतो. घुसमटलेला, घाबरलेला जोजो त्या सैनिकाला बाजूला सारतो आणि चक्क पळून जातो. सगळी मुलं पाठमोऱ्या जोजोकडे पाहून हसत राहतात, ‘जोजो रॅबिट.. जोजो रॅबिट..’ असं त्याला चिडवत राहतात.
आपण इतर कोणाच्याही एवढे, खुद्द हिटलर एवढेसुद्धा शूर आहोत ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी सतत धडपडत राहणारा जोजो या प्रसंगानं हिरमुसतो. सगळे आपल्याला भित्रा ससा म्हणत आहेत म्हटल्यावर त्याला रडू येतं. तो या मुलांपासून दूर जातो आणि एकटाच झाडीमध्ये बसून रडत राहतो. तेवढ्यात, त्याचा मित्र ‘ॲडॉल्फ’ झाडामागून डोकावतो. ‘ॲडॉल्फ’ त्याच्याकडे प्रेमानं बघतो. त्याच्या नजरेत एका मित्राला आपल्या मित्राविषयी वाटणारी सहानुभूती तर आहेच, शिवाय बापाला आपल्या मुलाविषयी वाटणारी मायासुद्धा आहे. तो जोजोजवळ येऊन बसतो आणि जग काय म्हणतंय त्याकडे लक्ष देऊ नको, असं म्हणत त्याची समजूत घालायला लागतो. तो म्हणतो की जग जरी सशाला भित्रा म्हणत असलं तरी वास्तव हे आहे की ससा भित्रा नसतोच. हे खरंय की तो बिळात राहणारा एक लहानखुरा, साधासुधा प्राणी आहे.. असा प्राणी ज्याला बिळाच्या बाहेर पडायची भीती वाटत असते; पण म्हणून हा ससा बाहेर पडतच नाही असंही नाहीये. आपल्या पिल्लांची भूक भागवता यावी या कर्तव्य भावनेनं ससा बाहेर पडतो, रोज रोज पडत राहतो आणि नित्य नव्या संकटांना भिडत राहतो. बिळाबाहेरचं संपूर्ण जग आपली शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेलं आहे, याची पुरेपूर कल्पना असतानासुद्धा सशाचं बिळाबाहेर पडणं हे भित्रेपणाचं नाही तर धैर्याचं लक्षण आहे. म्हणूनच ससा भित्रा नसून खरं तर एक धैर्यवान प्राणी आहे.
हे ऐकल्यानंतर तर जोजोला उर्मीच येते. आपल्याला मिळालेल्या ‘जोजो रॅबिट’ या नावाच्या तो चक्क प्रेमात पडतो. आणि आपल्याला भित्रा म्हणणार्या सगळ्यांना आपलं खरं रूप दाखवून देऊ या जिद्दीला पेटतो. जोशानं किंचाळत, लढाऊ सैनीकाच्या उर्जेनं धावायला लागतो.
इकडे शिबीर पुढं गेलेलं असतं. शिबिरातला अधिकारी मुलांना हातबॉम्ब कसा वापरायचा, याचं प्रशिक्षण देत असतो. तो वापरताना स्वतःला दुखापत होणार नाही यासाठी काय करायचं ते सांगत असतो. प्रात्यक्षिक म्हणून मध्येच एखादा बॉम्ब फोडून दाखवत असतो.
तेवढ्यात जोजोची जोशपूर्ण किंकाळी कानावर पडते आणि सगळे जण आवाजाच्या दिशेनं बघायला लागतात. आपल्याला दिसते ती फुटलेल्या बॉम्बच्या धुरामध्ये हरवलेली झाडी. पण फक्त काही क्षण. कारण केवळ तेवढ्या क्षणांच्या नंतर आपल्याला दिसतात ते धुकं भेदत धावत येणारे जोजो आणि ऍडॉल्फ!
जोजो अधिकार्याच्या जवळ जातो. जोशा-जोशामध्ये त्याच्या हातातला बॉम्ब हिसकावतो. जिंकल्याच्या थाटात पुन्हा धावायला लागतो आणि जोरात तो बॉम्ब दूर फेकतो. बॉम्ब झाडांमधून उडत जातो. दूर असलेल्या एका झाडावर आदळतो आणि उलटा उसळतो. पुन्हा उडत येत तो पडतो तो नेमका जोजोच्या पायाजवळ. आता आपलं काही खरं नाही हे जोजोच्या लक्षात येतं. त्याच्या मागं उभ्या असलेला ऍडॉल्फ ‘ओ शिट!’ असं म्हणतो आणि चक्क तिथून पळ काढतो. धमाका करत तो बॉम्ब तिथंच जोजोच्या पायाच्या जवळ फुटतो.
प्रशिक्षण अधिकारी आणि सहभागी झालेली मुलं हे सगळं बघत असतात. अधिकारी अगदी कोरडेपणानं म्हणतो, ‘हे बघा, हे करणं टाळायचं’.
(एवढ्यानी काही जोजो मरत नाही. फुटलेला बॉम्ब प्रशिक्षणाचा असल्यामुळे कमी तीव्रतेचा असतो. जरासं खचटणं आणि पायाला फ्रॅक्चर वगळता जोजो जिवंत राहतो.. पुढं आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथी बघण्यासाठी.)
प्रत्येक वेळी बघताना नवा भासणारा, प्रत्येक वेळी नवनवे अर्थ देणारा ‘जोजो रॅबिट’ आपल्याला सशाची गोष्ट सांगतो. तो ससा ज्याला कुणीतरी पकडून पोतडीत भरत असतं आणि केवळ कसलं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी म्हणून पोतडीतून बाहेर काढत असतं… तो ससा जो युद्ध खेळणार्या हातांमधून जोजोसारख्या संवेदनशील माणसाच्या कुशीत येऊन पडतो… तो ससा जो जोजोनं खाली सोडल्यानंतर आपण नक्की कुठं जायचं आहे, पळायचं आहे की इथंच थांबायचं आहे या संभ्रमात पुन्हा दुष्ट हातांमध्ये जातो आणि मरण पावतो… तो जोजो नावाचा ससा जो आपल्याला भित्रा म्हणून चिडवल्यामुळं हिरमुसून बसतो… आपण भित्रे नाही, हे लक्षात आल्यानंतर कानात वारं शिरल्यासारखं धावायला लागतो… आणि जोशात येऊन स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून बसतो…
जोजो रॅबिट फक्त ‘जोजो’विषयी नाहीये तर तो जगातल्या प्रत्येकाविषयी आहे. तुमच्या-माझ्याविषयी आहे. कारण, कोव्हिडची साथ बाहेर तोंड वासून उभी असताना कुटुंबासाठी, समाजासाठी, माणसाच्या धोक्यात आलेल्या अस्तित्वासाठी बाहेर पडणारे आपण सगळे या सशापेक्षा कुठं वेगळे आहोत?
*
कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.
Loved it❤🐇🐇
सुंदर विश्लेषण .
एडमंड हुसेर्लच्या विवेचनात आंतरिक क्षितिज आणि बाह्य क्षितिज अश्या संकल्पना आपल्याला दिसतात. त्यामध्ये हुसेर्ल असे म्हणतो की, प्रत्येक अनुभवला स्वतःचे असे एक क्षितिज असते. तुमच्या या विवेचनात तुम्ही जोजो या अनुभवकाच्या क्षितिजाबद्दल बोलत आहात. विश्लेषण उत्तम आहे. अभिनंदन !
चित्रपट पाहिला होता. आवडला होताच. बरेच नवीन संदर्भ भेटले, परत बघावा लागेल. ❣️
अप्रतिम!!! दिग्मूढ होणारा ससा , भेदरलेला जोजो, एका क्षणात मान मुरगळून टाकणारी परिस्थिती, पुन्हा उभारी धरण्याची ऊर्मी……. , हो, सगळं तेच तर आहे! कविता, खूपच सुंदर!!!
अप्रतिम.
खुपच सुंदर आणि वाचनीय.
ससा खरोखरच भित्रा नाही तर अन्न मिळविण्यासाठी रोजच तो संकटांना गृहीत धरून बिळा बाहेर पडत असतो.संवेदनशीलता आणि क्रूरता यांच्या सीमारेषेवर घडणारे कथानक.खूप छान लेखन.
Khup chan.
❤