मन हा आपल्या शरीरातला अवयव आहे का? असा प्रश्न कधीतरी माझ्या डोक्यात येतो. किंवा मन हे इंद्रिय आहे का? ही नेमकी भानगड काय आहे? आणि मुख्य म्हणजे मनासोबत त्याला चिकटलेल्या आठवणी. त्यांचं काय करायचं? शरीरभर पसरलेल्या या मनाला नेमकं कसं शोधून काढायचं? आणि त्यातल्या आठवणी कशा वेगळ्या करायच्या याचा दिवस दिवस विचार केला तरीही काही फायदा होईल असं वाटत नाही.
शरीराच्या कुठल्यातरी भागात असलेलं हे आठवणींचं जाळं डोक्यातल्या उजव्या की डाव्या मेंदूत असेल असंही डोक्यात येतं. पण त्याची नेमकी जागा कुठली हे माझ्यासारख्या कल्पनेत रमणाऱ्या आणि लिहिणाऱ्या माणसाला सापडून काय होणार? फार तर फार त्यावर मी काहीतरी लिहीन आणि स्वतःला चांगलं वाटतं म्हणून एक कप चहा बक्षीस म्हणून घेईन. त्यातच उत्तर आहे असं मानून फुरफुर करत चहाचा आस्वाद घेत पुन्हा आठवणींच्या घनदाट जाळीत गुंफून जाईल.
एकदा एका ऐंशी वर्षांच्या तरुण सरांना काही कामानिमित्तानं भेटायला गेले होते. ते वयस्कर होते तरीही त्यांच्या लहानपणीच्या, तारुण्यातल्या घडामोडी, प्रसंग त्यांना चांगलेच लक्षात होते. त्यांच्या मनातल्या आठवणींच्या भांडवलावर त्यांनी माझ्याशी तब्बल दोन तास गप्पा मारल्या. ते बोलत असताना मधे बोलण्याचं धाडस झालं नाही माझं. पण तिथून निघताना ते शेवटी जे बोलले ते मनात राहिलं.
ते म्हणाले, ”तुला जे सांगितलं त्यातल्या गोष्टी घडून आता चाळीसपेक्षा जास्त वर्षं झाली, तरीही मनाच्या एका कोपऱ्यात या सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. रोजच्या नित्यनेमानं करायच्या गोष्टी एकवेळ लक्षात राहत नाहीत. पण जगून झालेले हे क्षण मात्र अजूनही आठवतात. आयुष्य म्हणजे गंम्मतच आहे.”
मलाही त्यांचं म्हणणं पटलं. त्यांच्याहून लहान असलेली मी, आणि माझ्याहून अधिक उन्हाळे, पावसाळे पाहिलेले ते सर मला आम्ही एकाच नावेचे प्रवासी वाटलो. माणूस मनातली आठवणींची बँक एकाच वेळी क्रेडिट आणि डेबिट करत असतो. कधीकधी ही बँक हॅक होते. पण तरीही मनाच्या एका कप्प्यात बंदिस्त असते. अशी एखादी वेळ येतेच आयुष्यात ज्यात हा कप्पा उघडला जातो.
फक्त वयाच्या फरकानुसार त्यांचा आणि माझा कप्पा आठवणींनी किती भरतो हे काळच ठरवेल. तरीही मनाच्या या राज्यात वास्तव्य करणाऱ्या आठवणी शिळ्या असल्या तरीही त्या कुणाला सांगतांना चांगल्या पक्क्या होतात आणि मनात कायम टवटवीत राहतात.
एखादं लहान मूल पहिल्या उभरत्या वर्षांत जे जे त्याच्या स्मृतीत साठवून ठेवतं ते ते त्याच्या मनात अगदी पक्कं बसतं. त्या आठवणीतून ते जे शिकतं, त्यातून जे अर्थ काढतं त्यावर त्याचं व्यक्तिमत्व घडतं. अर्थात हे काही खूप मोठ्या प्रमाणावर होत नाही. पण आठवणी स्मृतीपटलावर कोरलेल्या राहतात. मग एखादी चांगली आठवण असेल तर तिचा परिणाम हा विधायक होऊ शकतो. आणि जर एखादी नकोशी असेल तर तिचेही अवशेष वर्तमानाच्या संबंधांवर येऊन आदळतात.
मग माणूस तरुण, प्रौढ, आणि म्हातारा होत गेला तरीही या आठवणी त्याच्या जगण्यात येत जात राहतात.. पण मनाच्या नेमक्या कुठल्या भागात या घर करून बसतात हे मात्र विज्ञानाची अवघड भाषा वाचूनही समजत नाही. कदाचित हा आपल्याच शरीरातला एक रासायनिक भाग असावा जो फक्त आहे पण प्रत्यक्षात दिसत वगैरे नाही. तो फक्त जाणवत राहतो अगदी मरेपर्यंत.
मनाच्या या एका भागाचं आकलन करून घेऊन आठवणींचं विश्लेषण करता आलं तर किती बरं होईल असं वाटतं. पण तरीही ही प्रक्रिया तशी गुंतागुंतीची वाटते. तुम्ही कधी केला आहे का विचार? मन आणि आठवणींचा? केला असेल तर मला नक्की सांगा.
*
वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता
चित्रकथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.
मन, आठवणी आणि त्याचा पुढील टप्पा स्वप्न👍
धन्यवाद।
खूप सुंदर लेख.मन प्रत्येक शरीरात असूनही मनाचा ठाव घेणे कठीण आहे.मन आणि मनाच्या कप्प्यात असणाऱ्या आठवणींचे वास्तव्य.एकंदर या गूढ कल्पना,संकल्पनांचा उहापोह अतिशय चांगल्या प्रकारे
आपण या लेखात केला आहे.सुंदर आणि वाचनीय.
आवडला लेख
खूप आभार विजय सर.