यंदाचा दुस्काळ लईच कठीन. सारं सुकावलं त्यानी. शेती बी, आन् कसायची उर्मी बी. शेवटचा हांडा अडीश्शे फुटावरून उपासला. थेबनथेंब वाचून वाचून पेलो. दर थेंबाचे तीन हिश्शे केले – येक माझा, येक तिचा आन् येक तिनी लावलेल्या, पार चाळीस साल सांबाळलेल्या मोगऱ्याच्या येलाचा.

तसा सारा ऊनकाळच गेला मरगाळलेला, पन तो दिस जास्तीच व्हता जरा. दिस काय म्हना, रोज यायाचा तसा यतो आन् जायाचा तसा जातो. त्याला काय कळतंय मरगाळ न फिरगाळ! मरगाळलेली असत्यात ती मानसं. मी किती बी लढंल. लढायला भीत नाई. पन ‘ही’ घुमी झाली ना, का मी बी व्हतो घाबराघुबरा. आन् मंग सारा दिस आसा निस्ता मरगाळल्याला जातो.

अशीच भकास दुपार व्हती. ही निस्तीच बसलेली. भीतीच्या खुट्याला टांगलेली इना मांडीत घिऊन. मधीच यखाद तार छेडीत. तिनी तार छेडली का त्येवढ्यापुरतं बरं वाटायचं. ती तसली भकास दुपार बी बोलाया लागल्यावानी वाटायचं. आवाज थांबला का मंग परत घुमी व्हायची दुपार.
मंग तिनी इनेच्या पोकळ भोपळ्यात बोटं घातली आन् त्यात ठुलेले चार म्हयन्यांपूर्वी इकलेल्या हुलग्याचे पैशे काढले. जसं काय पैशे ठुतानाच तिला म्हाईत व्हतं का ही येळ येनारे म्हनून. चुरगाळलेल्या नोटा हातात घिऊन म्हनली, “यंदा जरा लवकरच जाऊ माऊलीकड.” मावलीच्या वढीमागची तिची कारनं तिनी न सांगताच मला कळली.

मी भगवा झेंडा खांद्यावं टाखला. तिनी वाळल्याली तुळस उचालली. मी म्हनलं, ‘र्हाउ दे मोगऱ्याच्या जोडीला. फुटंल पयल्या पावसात फुटली तं.’
तिनी तुळस ठुली. न र्हाऊन वाळलेल्या मोगऱ्याच्या उरल्या-सुरल्या कळ्या त्येवड्या खुडल्या. मुठीत धरल्या. आन् चालाया लागलो आमी तिगं. मी, ही आन् हिच्या मुठीतला मोगरा.

चाकं धावाया लागली. समद निस्तं तापल्यालं. रेल्वइ तापल्याली. हवा तापल्याली. भायेरची जमीन बी तापल्याली. समदं नीस्तं कोरडं कोरडं.
चाळीस सालामागं जवा कळलं व्हतं का हिला मुलबाळ काई व्हनार नाई म्हनून, तवापासून आजपतूर हिनी जिवाच्या पार जपलाय हा मोगऱ्याचा येल. जपलाय का जपला व्हता? जीव घाबराघुबरा झाला निस्ता. हायेच… तिनी लावल्याला, जीवापाड जपल्याला येल हायेच. जिवंत र्हानारच त्यो. निदान त्येवडं तरी टिकावलं पायजे तिच्या नशिबानी तिच्यासाठी. त्या येलावं भिस्तंय, म्हनून तं त्याची मूळं मांगं ठिवून आलोय. घराच्या राखनीला.

आसपास नजर टाखली. कोन कुडलं, तं कोन कुडलं. कोनी कशासाठी घर सोडल्यालं, तं कोन कशासाठी भायेर पडल्यालं… समद्या अनोळखी मानसांच्या गर्दीत ही आपली दाराशी बसल्याली. घूम्यावानी. गरम वारं अंगावर झेलता झेलता कळ्यांनी भरल्याली मूठ नाकाजवळ नेली तिनी. तिच्या सुरकुतल्याल्या हातात कळ्या पार गुदमरत व्हत्या. डोळे तं अजून बी भरल्याले व्हते तिचे. तिचे भरल्याले डोळे पाहून मला हिरीला पानी लागलं तो दिस आठावला. माजे डोळे आशे सहज भरून येत नई, पन त्या दिशी भरून आलथे.
तिनी डोळे भरल्याले पुसले. मी आठवनी पुसल्या. चालत रायलो दोघं. फुडं फुडं, रेल्वईच्या चाकांसंग.

पोचता पोचता पार दिस मावाळला. रात ठेशनावरच काडायची ठरलं. कोरडी भाकर न् कांदा पोटात ढकाललं. आन लवांडलो तिदंच. भगव्या झेंड्याचं पांघरून करून. नेहेमीचा वखत नवथा हा. नेहमी आमी पालखीच्या संग यायचो. या वखताला लवकर आलो. आता पालखी येईस्तोवर आसंच फिरत राहायचं व्हतं वारकरी बनून. जमंल तसं पॉट भरत राहायचं व्हतं. बाकी कशात काई नवतं, पन येक बरं व्हतं इदं. प्यायाला पानी मुबलक व्हतं. आन फुकट बी.

घरून आनल्याले पैशे किती दिस पुरतील? व्हते तवर वापारले. पान्यासारखे. पुरून पुरून. पै पै जपून. पन कदी ना कदी संपनार तर व्हतेच. संपले. आता काय करावं? कुनाकड पैशे मांगावे का काई काम मांगावं? पैशे मांगावे म्हटले तं कुनाकड मांगावे? आपले तं कोन नातेवाईक बी नाइ इदं. आन काम म्हटलं तरी कोन देनार? काही कळत नव्हतं.

मी सहज हिच्याकड पायलं. अशीच रस्त्याच्या कड्याला बसलेली व्हती. घुम्यावानी. तिच्या हातांकड पायलं. मंग मी माजे हात पसारले आन् दोनी हातांकड पायलं. तिचे न माजे मिळून चार हात झालेले. चारी बी हात थकल्याले, सुरकुतल्याले, सालंच्या सालं राबत रायल्याले. सुलट्यानी मातीत, आन् उलट्यानी उन्हात. पन कितीइबी आन् कसंइबी राबावं लागलं तरी मातीतले हात भरल्याले राहत्यात. धान्यानी, नाई तं मातीनी का व्हईना. हे आसलं उपरं जगनं निस्तं रिकामपन आननारं व्हतं. चारी हात रिकामे ठिवनारं व्हतं.
मी माजे हात पाहात रायलो. तळव्याला पडलेल्या घट्टयांच्या मधून रेषा दिसत व्हत्या, त्या पाहात रायलो. हुब्या, आडव्या, तिडव्या, कसल्याच्या कसल्या रेषा. निस्ता गुताडा. पयल्यांदाच पायल्यासारखा वाटला तो गुताडा. याच्या पूर्वी कदी पायल्या नवथा का? याच्या पूर्वी हात बी रिकामे पडले नवथे म्हना कदी. हात रिकामे पडत्यात तवाच जातं लक्ष त्यांच्यावरच्या रेषांकड. मी पसारलेले हात पात व्हतो, त्येवड्यात येक ‘धा’ची नोट यिऊन पडली वंजळीत. कोनी टाखली म्हनून वर पायलं, तं देनारा निघून बी गेल्याला. का टाखली ब्वॉ आसं सांगाया बी थांबला नवथा तो. मी त्याला पाटमुरा पाहात रायलो. तो मांगं वळून बी न पाहता चालत रायला झपाझप.
मी परत हातांकड पायलं. हुब्या-आडव्या रेषांच्या गुताड्यात पडलेल्या नोटेकड पायलं. मनामंदी इचार आला, येका मानसाची येका वखताची सोय झाली…
मंग मी दुसऱ्या वखताची सोय करायला परत हात पसारले.
फुडल्या दिशी मंग त्या दिसाची सोय करायला पसारले.
मातीची वढ आन् मोगऱ्याचा वास व्हताच मनात. आन् खरं सांगायचं तं त्या वढीपायीच हात पसराया लागलो व्हतो.
पन बघता बघता, पैशे मांगता मांगता भीक मांगाया लागलो व्हतो मी. आन् भीक मांगता मांगता भिकारी झालथो मी.

येक येक दिस जड जात व्हता. हिरीच्या पान्यावानी मांगं मांगं वढीत व्हता. आता आमी पायाचे पार तुकडे पडेस्तोवर चालत व्हतो. ‘माऊली माऊली’ म्हनत भीक मांगत व्हतो. चालून चालून दमलो का जवळच्या यखांद्या मंदिरात आसऱ्याला जाऊन बसत व्हतो. मी जरासाक लवांडत व्हतो, ती दिसंल त्या देवाफुडं हात जोडत व्हती. ‘ह्ये सारं संपव बाबा आता’ असा निरोप त्याला धाडीत व्हती.

ऊनकाळ जीव जाळनारा असला तरी येक बरं व्हतं. पानी त्येवढं मुबलक आन् फुकाट व्हतं. लई लई पानी प्यायाचो आमी. गलासातला शेवटचा थेंब नरड्यात पडेस्तोवर प्यायाचो. आन् पिऊन झाल्यावं परतेक टायमाला रिकाम्या झालेल्या गलासाकड पात रायचो. रिकामा गलास पाहून यंदाच्या साली वांझ झालेल्या हिरीची आठवन यायाची.

पानी मिळालं व्हतं, पन भाकरी पार संपली व्हती जिंदगीतून. तिची जागा घेतली व्हती वडापावानी, कदी पाव-शॅम्पलनी, तं कदी मंदिरातल्या प्रसादानी. पन येक हाय. येवढ्या दिसात हिच्या हातांना पुरा आराम मिळाला व्हता. कायम चालनारे हात पयल्यांदीच येवढे शांत झालथे जनू. राबनारे हात आन् जळनारी चुल यांना कदी आराम मिळत असतो व्हय? मिळत असतो म्हना. तवा, जवा घरात कुनी मरतं आन शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून भाकरी यती… आज तिच्या हातांना आराम व्हता… सध्या रोजच तिच्या हातांना आराम व्हता. घरात कुनी मेल्यावानी!

नवीन नवीन आलथो तवा आमची आवस्था रस्त्यावरच्या कुत्र्यावानी व्हती. पन जे शहर रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांना बी आपल्यामदी सामावून घेतं, ते मानसांना कसं दूर लोटल? आमाला बी सामावून घेतलं त्यानी. काई दिसांनी येक जागा सापाडली. निंब नाहीच इदं कुडं, पन येक गुलम्होर सापाडला. त्या झाडाखाली येक पाठ मोडला बाकडा सापाडला. त्या दिसापासून रात जराशीक सुरक्षित वाटाया लागली. आमी दोगं तिदंच झोपाया लागलो.  शहराच्या उबंला. ती बाकड्यावर आन् मी खाली.

यकदा काय झालं, आमाला ‘मोती’ सापाडला. आमच्या हातातला वडापाव पाहून शेपटी हालवत हालवत मांगं मांगं आला त्यो. मी तं दुर्लक्ष केल्थं, पन हिनी हातातला उरला-सुरला वडापाव त्याला खायाला घातला. तवापासून आमचंच व्हवून गेलं त्ये यवढंस्सं पिल्लू! कुटुंबच झालं आमचं. रातचं आमी झोपायचो, आन् दिवसा मोती. हिचं न् मोत्याचं नातं तं कुडल्या जन्माचं व्हतं काई कळतच नाही. दोगं जीव ववाळून टाखायचे यकाम्यकावर. सारखी कुडल्या ना कुडल्या टेन्शनमदी रानारी ती आता जराशीक हसायला लागली व्हती. शांत झोपाया लागली व्हती रातची. जवापासून ती मोत्यात आन् मी तिच्या हसन्यात हरवाया लागलो, तवापासून आमी घरची आठवन बी काढंना झालो.

नाव मोती आसलं तरी मोत्या दिसायचा येकदम माऊलीच्या बुक्क्यावानी. काळ्याकुट्ट पाठीवर तीन ढवळे ठिपके व्हते. मोत्यावानी का मोगऱ्यावानी? ती जिथं जाईल तिथं तिच्या मागं मागं जायाचा तो. पयला वडापाव मोत्याला आन् मंग आमाला. हा नेमच झालथा.
यक दिस तं ही कुना म्होरं हात पसरून सरळ दुधाचं पाकीटच घिऊन आली. म्हनली, “वडापावानी कसं यनार बाळसं?”
झालं! दुसऱ्या दिशी मोत्यानी बी दूद पाकीट उचलून आनलं. ती हासली. उचलून घेतलं त्याला. छातीशी घट्ट धरलं. आन म्हनली, “बाळा अशी चोरी नाइ करायची. मांगुन मिळालं तरच खायाचं. कळलं?”.
त्याला काय कळलं म्हाईत नाई, पन त्यानी परत कदीच तसलं पाकीट उचलून आनलं नाही. दोगांना यकाम्यकाची भाषा बराब्बर कळत व्हती.

ते पाठ मोडलेलं बाकडं आमचं घर व्हतं, आन् फुडचा फुटपात आमच्या घराचं आंगन. आमी घरात बसलो व्हतो, गोष्टी करत. मोत्या आंगनात व्हता, आपल्याच शेपटीशी खेळत.
ही शून्यात बगुन इचार करत म्हनली, “जराशीक कमाई वाढंल का वं? कदी दूद मिळतं तं कदी नाई. वाढीच्या वयात नाई मग कदी प्येनार दुद?”
मी काई उत्तर दिलं नाही. ती पण शांतच.
बराच वेळ.
त्येवड्यात, मोठ्यानं आवाज आला. कुई कुई…
आमी दचकून पायलं. तिनी तं हंबरडाच फोडला. स्पीडब्रेकरवरून जावी, तशी येक गाडी आमच्या मोत्यावरून निघून गेली. गाडीवाला बी निघून गेला. सादं वळूनबी न पाहता.
संपलं सारं. चिखल झाला पार.

शहर आसंच असतंय. न थांबता चालत रानारं. ते जसं हातात धाची नोट टाकुन निघून जातं, तसं चाकाखाली चिरडून बी निघून जातं. मागं वळून बी न बघता.
मीच उठलो. काठीपासून झेंडा अलग केला. उचाललं माह्या मोत्याला. गुंडाळलं. सारं लालेलाल झालं. झेंडा लाल. हात लाल. डोक्यावरच्या गुलम्हॊरावानी.
ती… रडत राहिली, रडत राहिली… आटनारच होती, आटून गेली… हिरीसारखी.
घरावानी वाटाया लागल्याला तो बाकडा, ते शहर आता घर वाटंना झालं. मन रमंना झालं. तिला घरची आठवन आली. घरी जाऊ म्हनली ती. काठी घेतली आन् टेकत टेकत चालाया लागली.

चाकं धावाया लागली परत. उलट्या दिशंला.
धुमशान वेगात धावनारी रेल्वइ सोडली तं बाकी सारं परत शांत झालेलं. ती घुमी. मी घुमा… भरून आलेलं मन, भरून आलेलं आभाळ… आभाळाला, मनाला कुरतडनारी सांज. व्हत्याचं नवथं करनारं सोसाट्याचं वारं. परत यकदा उपाशी रायलेलं पोट, आन् उपाशी मन…

वहिवाट लागली. जुनी वाट, आन् नवी पावलं. वाढत जाणारा अंधार, आन् आधाराला काठी, झेंडा नसलेली.

घर दिसलं. लांबूनच. आपुन कंटाळून निघून जातो, घर हुबंच आसतंय मातीशी इमान राखत.
घर जवळ आलं तसा तिनी श्वास घेतला. हिरीएवढा खोल. ती आडखाळली, चालायची थांबली. वाऱ्याची कोरडी झुळूक आली तसा परत येक श्वास घेतला तिनी. पोटभर. आन् तडक चालाया लागली. झपाझपा.
पाहिलं तं काय, मोगरा निस्ता जिवंतच नवथा.. तं फुलला व्हता चांगला. अंधारात चमकनाऱ्या काजव्यावानी चमकत व्हता. ती परत परत श्वास घेत रायली. झाडाला, त्याच्या टप्पोऱ्या फुलांना कुरवाळत रायली. खरं सांगतो, माजं पॉट भरलं. लई लई भरलं
“अवकाळी सर येऊन गेल्याली दिसतीये…”

चालून चालून थकलो व्हतो. लई लांबचा परवास घडला व्हता. बिसलरीच्या चेम्बाटलेल्या बाटलीतलं पानी पेलो दोगं.
कुलूप उघाडलं. उंबरा ओलांडून आत पाउल टाखलं. धुळीचं पांघरून घेतलेल्या भुईवर लवांडलो. पियाच्या पान्याचा प्रश्न व्हता, खायाचा प्रश्न व्हता.. पन तरीबी जीवाची तगमग न्हवती. तिला तं लवांडल्या लवांडल्या डोळा लागला. घोराया लागली ती. मी बी तिला शांत झोपलेली पाहता पाहता झोपून गेलो. चांगला घोरत आसंल मी बी.
झोपेत काही बाही बरळत व्हती वाटतं ती. “मोत्या मोत्या” म्हनत व्हती.
परत घोरत व्हती. परत बरळत व्हती. “बगा ना ओ… घर गळतंय…”
मी झोपेत. घोरतच आसंल.
तिचं बरळणं चालूच व्हतं वाटतं. “ओ… बगा ना… पानी आला…”
मला झोपेतच गार गार वाटाया लागलं. वल आल्यासारखं.
जाग आली तं तिच्या शेजारी पानी टिपकत व्हतं. कौलातनं गळनारं.
मी खिडकीतनं पायलं. तडक भायेर आलो. तिचा मोगऱ्याचा येल चिंब भिजत व्हता पयल्या पावसात. रात चढली तसा त्याचा वास बी चढत गेलथा. घमघमाट झालथा निस्ता.
तुळस छपराजवळच व्हती. जराशीक आत, जराशीक भायेर. अर्धी वल्ली, अर्धी कोरडी. फुडं व्हऊन तुळशीला पावसात ठीवता ठीवता मीसुद्धा अर्धा वल्ला झालो, अर्धा कोरडा रायलो.
आनखीन फुडं टाकलं येक पाऊल. पुरा भिजलो. भिजत रायलो. चिंब. मोगऱ्याच्या वासात, पयल्या पावसात. डोळ्यांमदून वाहनाऱ्या पावसातसुद्दा.
समदं निस्तं वल्लं वल्लं.

*

वाचा
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कविता


Assistant Professor at | 09372420714 | [email protected] | Website | + posts

अमित सोनावणे फिल्म एडिटर असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मीडिया व कम्युनिकेशन स्टडीज डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.

6 Comments

  1. kavitadatir

    सुख पण ओलं असतं, आणि दु:ख पण. दोन्हींची ओल दाखवलीस. मस्त.

  2. Avatar

    मस्त कथा. 👍💐

  3. Avatar

    अतिशय सुंदर कथा.वाचनीय आणि रंजक.
    ‘ शहर असंच असतं,न थांबता चालत राहणारं ‘ या ओळीत खूप मोठा आषय सामावला आहे.इथे कुणाला कुणाच्या जगण्याशी देणं घेणं नाही.घर ही संकल्पना उठावदार.ओंजळीत दहा रुपये आले तर दुसऱ्याची चिंता.जो दहा रुपये देतो तोही त्याचे कर्तव्य करतो,त्याला मागे बघावे वाटत नाही.वर्णने छान.
    भाषा खूप छान,कथानकाला सजेशी.
    आवडली कथा.

  4. Avatar

    शीर्षक खूप छान

  5. Avatar

    खुप छान कथा. भाषा पण छान

  6. Avatar

    गावाकडील भाषा खुप छान जमली. कथा एकदम मस्त

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :