उन्हाचे चटके बसत होते. तशी आदिलला उन्हाची सवय नाही असं नाही. फोटोग्राफीच्या असाईन्मेंट बऱ्याचदा आऊटडोअरच असतात; पण गावाकडचं आणि त्यातही गाव दुष्काळी असेल तर तिथलं ऊन वेगळंच असतं. तिथं असतात ते लांबच्या लांब रस्ते आणि नजर पोचेल तिथवर दिसणारं माळरान. रस्त्यांवरचं डांबरसुद्धा गरम हवा बाहेर फेकत असतं. अशात ऊन असतं त्यापेक्षा जास्त लागतं अंगाला आणि डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं वाटत राहतं. नको नको वाटतं अगदी.
कोरेगाव फाटा आला तशी आदिलनं गाडी मुख्य रस्त्यावरून खाली घेतली, गावाकडं जाणारी कच्ची वाट धरली आणि निघाला फुफाटा उडवत. फुफाट्यात हरवलेला मशिदीचा पांढरा ठिपका दुरूनच दिसला त्याला. का कोण जाणे, पण मशीद जवळ येताच आदिलनं गाडी थांबवली आणि शूज काढून आत शिरला तो. भगभगीत उन्हातून आल्यामुळं एकदम फ्रिजमध्ये येऊन बसल्यासारखं गार वाटलं त्याला. जुन्या दगडी बांधकामाची मशीद, तिच्या शेजारी भलता वाढलेला कडुनिंबाचा पसारा, त्याच्याभोवतीचा कोने झिजलेला पार.
तो मशिदीत शिरला आणि एक कोपरा धरून बसला. मशीदभर नजर फिरवली आणि त्याला लहानपण आठवलं.
गावभरातली चिल्लीपिल्ली सकाळी लवकरच घराबाहेर पडायची. दिवसभर उनाडक्या मारत हिंडायची. ऊन नको नको म्हणायला लागलं की सगळी गॅंग मशिदीच्या आसऱ्याला यायची. पाराजवळचा भलामोठा रांजण भरलेलाच असायचा. घटाघट पाणी पिऊन तृप्त व्हायची. झाडावर चढ, मशिदीत जा, खिडकीतच जाऊन बस… असं काही वेळ केल्यानंतर मुलं चक्क इथं-तिथं कोपरा धरून झोपी जायची. मुलं झोपली की, मुलांबरोबर धिंगाणा घालणारी मशीदसुद्धा बघता बघता शांत व्हायची. आत्ता आहे एवढीच शांत.
आदिलला डोळे मिटायचा मोह झाला. त्यानं डोळे मिटले. त्याला आणखीनच शांत वाटायला लागलं. दूरवरच्या विजेच्या खांबावर बसलेल्या कोतवालाची शीळ त्याला आणखी स्पष्ट ऐकू येऊ लागली. कुठून कुठून प्रवास करत आलेलं वारं हलकेच कडुनिंबाच्या पसाऱ्यात शिरलेलं त्याला स्पष्ट ऐकू आलं. वारं काही वेळ आतल्या आत खेळलं आणि मग उघड्या खिडकीतून मशिदीत शिरलं. त्याच्या अंगावरून वाहत मशीदभर फिरलं आणि समोरच्या खिडकीतून बाहेर पडलं. तिथून कुठल्या प्रवासावर निघालं होतं वारं, त्याचं त्यालाच माहीत.
वारं जाताच त्याचा गूढ आवाज विरला आणि मशीद शांत झाली, तसा कोतवाल त्याला पुन्हा स्पष्ट ऐकू येऊ लागला. आदिलनं डोळे उघडले आणि झटकन घड्याळात पाहिलं. किती मिनिटं झाली कोणास ठाऊक; पण आपल्याला लहानपणीसारखाच डोळा लागला, हे पाहून त्याला गंमत वाटली. अम्मी वाट बघत असेल, घरी गेलं पाहिजे. तो शूज घालून बाहेर पडला, गाडीला किक मारली आणि ऊन झेलत, धुरळा उडवत निघाला. बघता बघता भलीमोठी मशीद पुन्हा एक बारकासा ठिपका झाली.
फोन वाजला म्हणून आदिलनं गाडी बाजूला घेतली. अम्मीचा फोन होता. त्यानं उचलला,
“कुठवर आला?”
“मस्जिदच्या पुढं, आलोच १५ मिनिटात.”
“आधी विहिरीवर जा. अब्बू असतील तिथं त्यांना घेऊन ये.”
“का सुट्टी आहे का शाळेला?”
“नाही, गाळ काढायचा होता ना विहिरीतला. शाळेतून परस्पर रानातच गेले.”
‘बरं’, म्हणत आदिलनं फोन ठेवला आणि रानाची वाट धरली.
अब्बू आदिलची वाटच बघत होते.
“झाला का गाळ काढून?”
आधीच वैतागलेले अब्बू माझ्या प्रश्नानं आणखीन वैतागले,
“कशाचं काय? सकाळपासनं येतो येतो म्हणतोय ठेकेदार. मी पोहोचलो इथं आन त्यानी टांग मारली.”
‘आलोच’, असं म्हणून अब्बू विहिरीजवळ एक शेड आहे त्यामध्ये गेले. आदिल गाडीवरच बसून राहिला. तेवढ्यात त्याच्या समोरून एक सुगरण उडत गेली आणि विहिरीजवळच्या एका घरट्यावर जाऊन बसली. कसलीशी काडी चोचीत घेऊन आली होती ती, ती काडी त्या घरट्यात जमेल तिथं खोचायला लागली.
“घ्यायची नसतात कामं तर स्पष्ट नाही का नाही म्हणत? खोटीनाटी कारणं पुढं करत राहतात.”
स्वतःशीच बडबड करत अब्बूनी शेडला कुलूप लावलं आणि गाडीवर बसत नेहमीचा प्रश्न विचारला,
“किती दिवस?”
आदिल उत्साहात बोलायला लागला,
“मी म्हटलं होतं ना, ती फोटोग्राफीची असाइनमेंट होती, ती मिळाली मला.”
अब्बू चकित झाले. “ॲडव्हान्स?” त्यांनी विचारलं.
आदिल म्हणाला, “दिला ना.”
“झाले मग जमा?”
“हो, म्हणून तर आलोय; सुट्टी पण होईल आणि सोबतच जाऊ सोमवारी. त्या साईटवरच्या ऑफिसला कळवून आलोय तसं.”
अब्बूचा चेहरा खुललाच एकदम. मघाचा सगळा वैताग कुठल्या कुठं पळून गेला.
ॲडव्हान्स मिळाल्याचं ऐकून अम्मी पण खूश झाली. तिनं केलेल्या दालचावर ताव मारला आणि ढेकर देत माडीवर जाऊन झोपला आदिल. पुण्याला असतो तेव्हा दुपारचं कधी झोपायला मिळत नाही. सतत आऊट डोअर असतो असं नाही, पण काम असतंच ना काही ना काही. आणि ही नवी असाइन्मेंट मिळाल्यामुळं तर आणखीनच अवघड होणार होतं.
अब्बूचं हे शाळेचं शेवटचं वर्ष होतं. ते संपलं की अम्मी-अब्बूना पुण्यात घेऊन जायचा आदिलचा प्लॅन होता. म्हणूनच त्याची फ्लॅट खरेदीची घाई चालली होती. गेले दोन-तीन वर्षं त्यासाठी तो पैसे जमा करत होता. वेडिंग काय, कॉर्पोरेट काय, येतील त्या असाईन्मेंट अंगावर घेत होता. शेवटी पैसे जमले होते आणि म्हणून तो आज फार खूश होता.
दोन दिवस गावी राहून ठरल्याप्रमाणं तिघं निघाले. आदिल नेहमीप्रमाणं गाडीवर आणि अम्मी-अब्बू बसनं. अम्मीनं खूप आग्रह केला, आमच्याबरोबर बसनं ये म्हणून; पण आदिलला गाडीवर फिरायला आवडायचं. पुण्याला जाऊन सहा वर्षं झाली होती त्याला; पण आजवर एकदासुद्धा तो बसनं आला किंवा गेला नव्हता.
सकाळची गार हवा अंगावर घेत त्याचा प्रवास सुरू झाला आणि रस्त्यावरची गावं मागं पडायला लागली. गावांना आपला असा एक वास असतो. पेटलेल्या चुलीच्या धुराचा, गोठयांचा, शेतांचा असे वेगवेगळे वास. गाव जवळ आलं की तो हेल्मेट काढायचा आणि गावाचा, वस्तीच्या जगण्याचा वास नाकात भरून घ्यायचा. असं करतच तालुका मागे पडला आणि सातारा हायवेला गाडी लागली.
गेल्या सहा वर्षांत हा त्याचा चांगलाच पाठांतर झालेला रस्ता होता. अम्मी-अब्बू इथं आहेत म्हणून आवर्जून गावी येणं होतं. फ्लॅट झाला आणि सगळे तिकडं शिफ्ट झाले की, होईल का असं वरचेवर येणं? का कोणास ठाऊक; पण या खेपेला तो गावाचा विचार मनात आला की उगाच भावनिक होत होता.
खंबाटकीचा घाट लागला. बोगद्यात पेरलेले लाईट नेहमीप्रमाणंच सुरेख दिसत होते. दर खेपेला वाटायचं, थांबून या घाटाचे, बोगद्याचे फोटो काढावे; पण दर वेळेला घाई असायची. मग तो दर वेळेला स्वतःला सांगायचा, पुढच्या वेळी नक्की थांबू. या वेळेला मात्र आदिलनं ठरवलं, पुढच्या वेळेची वाट पाहायची नाही. योग्य अशी जागा पाहून त्यानं गाडी थांबवली आणि तो बोगद्याचे, बोगद्यातल्या अंधाराचे, त्या पलीकडच्या टोकाला दिसणाऱ्या प्रकाशाचे भराभरा फोटो काढायला लागला. खूप वर्षं मनात असलेली इच्छा आज त्यानं पूर्ण केली. एकूणच इच्छापूर्तीचा हंगाम चालू आहे आणि एक-एक करत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत याची त्याला गंमत वाटली.
अम्मी-अब्बू आदिलच्या आधीच पुण्यात पोचले होते. त्यांच्याकडे डुप्लिकेट चावी होती. त्यामुळं काही अडचणीचं नव्हतं. अम्मी नेहमीप्रमाणं घर आवरायच्या कामाला जुंपली होती. घर झाडता झाडताच तिनं विचारलं,
‘‘फ्लॅट किती खोल्यांचा आहे?”
आदिल पुन्हा उत्साहात सांगायला लागला, “१ बीएचके. साडे पाचशे स्क्वेअर फूट एरिया. शिवाय हॉलला टेरेस. बी-४, ६०३. गार्डन फेसिंग फ्लॅट आहे…”
आपल्या तोंडून त्या साईटवरची रिसेप्शनिस्ट बोलत आहे, असंच आदिलला वाटलं क्षणभर.
“इथं सिंगल रूम आवरून होत नाही तुझ्याच्यानी, तिथं फ्लॅट कसा स्वच्छ ठेवणार? सुपली आण,” अम्मी वैतागली. आदिल सुपली घेऊन आला आणि अम्मीच्या हाती दिली. अम्मी कचरा भरायला लागली. अम्मी आली की एवढा कचरा कसा आणि कुठून काढत असते याचं आदिलला नेहमी आश्चर्य वाटायचं. घर आवरणं, नीटनेटकं ठेवणं हे एरवी कटकटीचं वाटणारं काम आज मात्र त्याला उगाच जवळचं वाटायला लागलं.
अम्मीनं पहाटे उठून डबा बनवला होता तो काढला. तिघं जेवले. जेवण झाल्यांनतर अब्बू झोपले. अम्मी पुन्हा घर आवरायच्या कामात गुंतली. आदिल खाली सतरंजी टाकून आडवा झाला आणि युट्युब उघडून होम डेकोरेशनचे व्हिडिओ बघायला लागला.
“यांचं काय करू?”
गेले चार महिने फिरून गोळा केलेल्या वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन साईटच्या ब्रोशरची थप्पी अम्मीनं काढली आणि आदिलला विचारलं.
‘थांब’, म्हणत आदिल उठला. ते सगळे ब्रोशर त्यानं एकत्र बांधले आणि चौकात जाऊन रद्दीवाल्याला देऊन आला. केवढे ते ब्रोशर्स! त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. कमी फिरला होता का तो त्यांच्यासाठी? बजेट हा काही एकमेव प्रॉब्लेम नव्हता. घरसुद्धा आवडलं पाहिजे. जे बजेटमध्ये बसायचं त्यांचे प्लॅन आवडायचे नाही, ज्यांचे प्लॅन आवडायचे त्यांच्याकडे फ्लॅट शिल्लक नसायचे.
दुसऱ्या दिवशी सकाळी आदिलनं थेट रिक्षाच बोलावली. तिघं रिक्षेत बसले आणि साईटवर पोहोचले. ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट दुसऱ्या क्लाएंटशी बोलत होती,
‘१ बीएचके. साडेपाचशे स्क्वेअर फूट एरिया. शिवाय हॉलला टेरेस.’
तिची ही सगळी वाक्यं आदिलची आता पाठ झाली होती. रिसेप्शनिस्टनं प्रश्नार्थक नजरेनं आदिलकडे पाहिलं. आदिलनं तिला आठवण करून दिली,
‘‘मी फोन केला होता. आई-वडलांना घेऊन येतो म्हणून.”
“अच्छा, मिस्टर आदित्य?”, रिसेप्शनिस्टनं विचारलं.
अम्मी-अब्बूकडे बघणं टाळत आदिल ‘हो’ म्हणाला. अम्मी-अब्बू चकित. रिसेप्शनिस्ट अतिशय नम्रपणे म्हणाली,
“सर तुम्ही तोपर्यंत सॅम्पल फ्लॅट दाखवता आई-वडलांना?”
हो हो म्हणत आदिल उठला आणि अम्मी-अब्बूंना बाहेर घेऊन आला. बाहेर पडताच अम्मी म्हणाली,
‘’आदित्य कोण?”
“ते जाऊ दे गं” म्हणत आदिलनं तो विषय टाळायचा प्रयत्न केला; पण अम्मी ऐकेना म्हटल्यावर आदिल सांगायला लागला.
“अगं मी पहिल्यांदा चौकशीला आलो तेव्हा त्यांनी मला फॉर्म भरायला सांगितला. मी तो भरला. तर त्यांना माझं अक्षर वाचता नाही आलं. त्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये आदिल ऐवजी आदित्य सेव्ह केलं.”
हे ऐकून अब्बूना राग आला. ते रागातच भराभर चालायला लागले. ते स्वतः भाषा विषयाचे शिक्षक असल्यामुळं आपल्या मुलाचं अक्षर वाईट असण्याचा त्यांना फार राग होता. उगाच कशाला जुने वाद उकरून काढा, म्हणून आदिलसुद्धा हा विषय टाळायचा. तिघांमध्ये एक अस्वस्थ शांतता पसरली.
तिघं चालत सॅम्पल फ्लॅट होता, तिथं पोहोचले. अम्मी-अब्बू सॅम्पल फ्लॅट पाहून खूश झाले. तिथल्या स्टाफ मेम्बरने २४ तास पाणी, पाण्याचं गीझर फ्री वगैरे सगळं डिटेल सांगितलं. मग बांधकाम चालू होतं तिथं तिघं गेले. आदिलनं लांबूनच बिल्डिंग दाखवली. बांधकाम चालू असल्यामुळं वर जाता येत नव्हतं; पण संध्याकाळी तिथल्या कामाची शिफ्ट संपल्यानंतर एक-दोन वेळा येऊन आदिल बांधकाम, ६०३ नंबरचा फ्लॅट असं सगळं पाहून गेला होता. ते त्यानं अम्मी-अब्बूना सांगितलं.
तिघं पुन्हा ऑफिसवर आले. मघाचा क्लाएंट आता नव्हता. रिसेप्शनिस्टनं आपल्या गोड, मधाळ आवाजात तिघांचं स्वागत केलं आणि अम्मी-अब्बूना विचारलं, “कसा वाटला फ्लॅट?”
“अतिशय सुंदर,” अब्बूंना बाहेरच्या कोणाशी विशेषतः शहरी माणसाशी बोलताना शुद्ध भाषेत बोलायची सवय होती. अब्बूच काय त्यांच्या सगळ्या शिक्षक मित्रांमध्ये आदिलला हे कॉमन जाणवायचं. विशेषतः पुण्याला गेल्यापासून. एरवी आदिलशी घरच्यासारखे बोलणारे अब्बूचे सगळे मित्र आदिल पुण्याला गेल्यापासून तो शहरी झालाय, या समजुतीतून अतिशहरी बोलायला लागले होते. त्याची आदिलला गंमत वाटायची. अब्बू तशाच शहरी म्हणा, अतिशहरी म्हणा; पण शुद्ध भाषेत रिसेप्शनिस्टशी बोलत राहिले. रिसेप्शनिस्टनंसुद्धा आपली पाठांतर झालेली सगळी माहिती अम्मी-अब्बूनं ऐकवली. त्यांनी विचारलेल्या एक-दोन शंकांचंसुद्धा तिनं निरसन केलं. माहिती देण्याचं काम पार पाडल्यानंतर आता पुढची चौकशी सुरू झाली. अब्बू काय करता? अम्मी काय करते? माझं लग्न झालं आहे का? कोणता फ्लॅट हवा आहे? कॅश देणार की लोन घेणार? लोन कोणाच्या नावावर घेणार? असं सगळं झाल्यानंतर रिसेप्शनिस्टनं आणखी एक फॉर्म माझ्याकडे सरकवला आणि भरून द्या म्हणाली. अब्बूंनी फॉर्म कटाक्षानं स्वतःजवळ ओढून घेतला आणि आपल्या मोत्यासारख्या हस्ताक्षरात ते फॉर्म भरायला लागले.
फॉर्म भरून त्यांनी तो रिसेप्शनिस्टकडे दिला. ती तो फॉर्म वाचायला लागली. वाचता वाचता मध्येच तिला काही शंका आली आणि तिनं आदिलकडे पाहिलं. मग अब्बूकडे पाहिलं आणि विचारलं, “तुमचं नाव?”
“मोहसीन नूर मोहम्मद इनामदार,” वडलांनी उत्तर दिलं.
रिसेप्शनिस्ट भलती घाबरलेली वाटली. मग तिनं पुन्हा माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, “आणि आदिल इनामदार कोण?”
“मी,” आदिलनं उत्तर दिलं.
“पण तुमचं नाव तर आदित्य ना?” रिसेप्शनिस्टनं खोटं खोटं हसत विचारलं.
आता पुन्हा अक्षरावरून आपली इज्जत निघायला नको म्हणून अब्बूंनी पुढं विषय टाळला आणि म्हणाले, “नाही, आदिल इनामदार.”
“कोणता फ्लॅट हवाय तुम्हाला?” तिनं पुन्हा विचारलं.
“६०३. गार्डन फेसिंग फ्लॅट,” आता फ्लॅटचा नंबर अब्बूनासुद्धा पाठ झाला होता.
“एक मिनिट,” असं म्हणत रिसेप्शनिस्टनं आतल्या केबिनमध्ये बसलेल्या तिच्या बॉसला फोन लावला. काहीबाही बोलली ती फोनवर आणि फोन ठेवला. पुढं शांतपणे आणि नम्रपणे ती म्हणाली,
“सॉरी इनामदार सर. तो फ्लॅट गेलाय. मघा जे क्लायन्ट आले होते त्यांनासुद्धा तोच फ्लॅट हवा होता. त्यांनी ऑनलाईन पेमेंट केलं आणि त्या फ्लॅटसाठी टोकन दिलं.”
“कधी?” अम्मीला प्रश्न पडला.
“जस्ट. सर मला फोनवर तेच म्हणाले.” रिसेप्शनिस्टनं उत्तर दिलं.
अब्बू झटकन म्हणाले,
“कुठला रिकामा आहे मग? घर चांगलं असल्याशी मतलब, गार्डन फेसिंगचं काय एवढं?”
‘‘ॲक्च्युअली सर, साईट ऑलमोस्ट रेडी आहे त्यामुळे सगळे फ्लॅट बुक झालेत,” रिसेप्शनिस्ट आदिलकडे बघणं टाळत म्हणाली.
“अरे असं कसं? तुम्ही आधी का नाही सांगितलं? साताऱ्याहून आलोय आम्ही,” अब्बूच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न होते. रिसेप्शनिस्ट शेवटपर्यंत गोड बोलण्याचा प्रयत्न करत राहिली.
“एक काम करा सर तुम्ही. मोशीला आमची दुसरी साईट चालू आहे, ती बघून या. तिथं मिळेल तुम्हाला फ्लॅट.” “मोशी? कुठं आलं हे?”, अम्मीनं भोळा प्रश्न विचारला.
आदिल मात्र उठून उभा राहिला.
“नको मोशी. चला.”, असं म्हणून चालायला लागला.
एरवी उठून जाणाऱ्या गिऱ्हाइकाशी गोड गोड बोलणारी रिसेप्शनिस्ट आता मात्र आम्ही उठून जात होतो तर शांत होती. शेवटपर्यंत आदिलकडे बघणं टाळत होती.
तिघं बाहेर पडले. रिक्षा पकडली आणि निघाले.
दिवसभर अम्मी-अब्बू घराविषयी बोलत राहिले. आदिल मात्र कुठल्याच चर्चेत सहभागी झाला नाही.
रात्र झाली. अम्मी-अब्बूच्या घोरण्याचा आवाज यायला लागला. आदिलला मात्र काही केल्या झोप येईना. बाहेरच्या मशिदीतून रात्रीची अजान ऐकू आली. तशी ती रोजच होत असते. दिवसातून पाच वेळा होत असते. कानावरसुद्धा प्रत्येकच वेळी पडत असते; पण आज आदिलन पहिल्यांदा ती जाणीवपूर्वक ऐकली. मशिदीच्या मनोऱ्याच्या सज्जावर एक जुनाट लाईट होता. तो लाईट हिरवा प्रकाश बाहेर फेकत होता. बऱ्याच घरांच्यावरून रूमच्या खिडकीपर्यंत पोहोचलेला तो लाईट खिडकीच्या काचेतून रूममधल्या भिंतीवर पडला होता. हा लाईट तसा रोजच पडायचा. दिसायचासुद्धा तो रोजच; पण आज पहिल्यांदा त्यानं आदिलला तो ‘मुसलमान’ असल्याची आठवण करून दिली.
*
वाचा
अमित सोनावणे यांचे साहित्य
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कविता
अमित सोनावणे फिल्म एडिटर असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मीडिया व कम्युनिकेशन स्टडीज डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
अमित, खूपच सुंदर कथा.. खूपच !! शेवट घाव करणारा आहे. कथेचे वैशिष्ट्य म्हणजे, ती कसलाच त्रागा करत नाही , कि कुणाला दोष देत नाही, आरोप, संताप काहीच न करता उत्तम परिणाम साधतेय !!! मस्तच!
अभिनंदन!!
खूप छान आणि खरंतर पुण्यातील बऱ्याच ठिकाणची सत्यता
कथा खरंच छान आहे. आज आपण कितीही नवमतवादी, सुधारक असलो तरी समाजाने केलेले संस्कार विसरत नाही आहोत. कथेचा शेवट अनपेक्षित असला तरी तो खोटा वाटत नाही. माणसाची प्रवृत्ती किती खालच्या पातळीला गेली आहे याचा विचार करायला लावणारी ही कथा आहे.
अमित खरंच खूप छान. विदारक सत्य उघड केलंयस.
(कथानायकाचे नाव आदिलच का निवडलेस ? एक कुतूहल)
कथा खूप छान 👍👍 अभिनंदन
परखड सत्य मांडणारी परिणामकारक कथा. चित्राक्षरे ची सुरवात फारच छान केली ह्या कथेने गीतांजलि
मलाही आवडली कथा.
काय कम्माल लिहलीय कथा ग्रेट हो
माणूस म्हणून जगायला कधी शिकणार? हा प्रश्न विचारणारी कथा.
Khup sundar !!!
खूपच छान… वर्णन अप्रतिम… कथा खिळवून ठेवणारी.. विदारक सत्य मांडणारी…
अभिनंदन… Keep it up
Mast……
खूपच सुंदर….कथा फार आवडली…खूप मनातल्या विषयाला हात घातला आहे… कौतुक ❤️
Very nice story.
ख़ूपच सुंदर कथा अमितदादा👌🏻👌🏻
अप्रतिम कथा झाली आहे अमित.सुरुवातीपासून वाचनीय आहे.शेवट अतिशय अनपेक्षित धक्का देऊन जातो.माणसा माणसातले गट आणि भेद या बद्दल सरळ सरळ न भाष्य करता सणसणीत षटकार ठोकावा असा चिंतनीय टोला.
खूप खूप छान.मनापासून आवडली कथा.
सध्याच्या परिस्थितीवर आधारित सुंदर कथा.
Khup Sundar Katha ahe
Khup khup dhanyawand ashi sundar ani realistic katha lihlya baddal
Ajun khup kahi watach v vatye
Ajun katha lihnya sayhi khup khup shubheccha
Amhi next kathe chi wat baghtoy
Best wishes sir
अप्रतिम कथा अमित…. वास्तववादी कथा…. शेवट चटका लावणारा आहे….