दोन माणसं जेव्हा कुठल्याही कारणानं जोडली जातात तेव्हा ते कारण कालांतरानं बाजूला पडतं आणि त्यातून त्या दोन जीवांचं एक नातं तयार होत जातं. त्या नात्याला मग आपण नाव देतो. किंवा त्या नात्याला एका चौकटीत बांधायचा प्रयत्न करतो. अर्थात एखादा माणूस आपल्याशी कारणाशिवाय जोडला गेला तर गोष्ट वेगळी. पण तरीही आपण जगण्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला कुठल्यातरी नात्याचं नाव देत राहतो. कदाचित ती आपली सोय असावी. किंवा समाजाची ती गरज असावी.
एक स्त्री आणि अजून एक स्त्री. दोघी जेव्हा कुठल्याही रक्ताच्या नात्यात नसतील आणि एकत्र आल्या असतील तर त्या एकमेकींची ओळख ‘जिवलग मैत्रीण’ म्हणून करून देतात. किंवा काहीजणी त्या ओळखीला ‘बेस्ट फ्रेंड’ असं नाव देतात. काहीजणी ‘जिवाभावाच्या मैत्रिणी’ होतात. तर काहीजणी अगदी ‘बहिणी’ म्हणून संबोधतात. जर एक स्त्री आणि एक पुरुष एकमेकांशी जोडले गेले तर मात्र या नात्याला साधारणपणे संशयी नजरेनं बघितलं जातं. दोघांच्यात काहीतरी चालू आहे, हा ग्रह सगळ्यात आधी केला जातो. भाऊ, भाऊजी, दादा, काका, मामा या नात्यानं त्या स्त्रीला त्या पुरुषाचा स्वीकार करावा लागतो. ती स्त्री जर लग्न झालेली असेल तर तिला या नात्यांच्या मर्यादा आधीच आखून घ्याव्या लागतात. त्या दोघांची मैत्री ही लिंगभाव विरहीत घेतली जात नाही. शहर असो किंवा खेडेगाव. स्त्री-पुरुषांची बहुतांश मानसिकता ही संकुचित होते. मग नोकरी करणारी स्त्री असेल, नि तिचा सहकारी जर पुरुष असेल, तर त्या दोघांमध्ये असणारं नातं हे औपचारिक,व्यावहारिक होत जातं. एकमेकांशी हक्कानं बोलणारी, मन मोकळं करून बोलणारी मैत्री सध्याच्या काळात तशी दुरापास्त होत आहे.
निखळ मैत्री ही तशी खूप आदर्श संकल्पना वाटते. माणसं एकमेकांशी कारणानंच जोडली जातात. त्यातून फायदा होत असेल तर ती मैत्री टिकण्याची शक्यता अधिक असते. पण जर तोटा दिसला तर एकमेकांपासून लांब राहणं लोक पसंद करतात. म्हणून मला वाटतं, जसे आपण वयानं मोठे होत जातो, तसे आपल्यातला मैत्र भाव हा बदलतो. त्यातून व्यवहाराचा कोरडेपणा स्पष्ट पुढं येऊ लागतो. लहानपणी केलेली मैत्री ही त्या त्या काळाची गरज वाटते. त्यात कारण काय याचा अजिबात विचार केलेला नसतो. रिकाम्या वेळात आपला सवंगडी आपल्याशी खेळतो, त्याच्याशी बोलायला, भेटायला चांगलं वाटतं हे कारण त्यावेळेस आपल्या भाबड्या मनाला समजत नाही.
मैत्रीचं हे मूल्य भारतीय समाजात अनेक प्रतीकात्मक गोष्टींनी आपण टिकवून ठेवलं आहे. कृष्ण आणि सुदामा हे त्याचं एक रूपक. गरीब आणि श्रीमंत या दोन वर्गातील माणसांशी असलेली मैत्री ही खरंच चिरकाल टिकणारी असेल? सुदामा आणि श्रीकृष्ण आजच्या काळात आजूबाजूला असतील? लोकांना रोजच्या संघर्षातून मैत्री करायला, ती निभवायला वेळ मिळेल? आणि वेळ असला तरी तो काढला जाईल? असे अनेक प्रश्न मनाला पडतात. हे प्रश्न स्वतःला अंतर्मुख करतात.
मैत्रीतली प्रतिष्ठा, एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा, आपलेपणा, आदर, बाजू घेण्याची वृत्ती ही अनेक मूल्ये या गोष्टीशी जोडली गेलेली असतात. मैत्रीत नुसता संवाद असून भागत नाही. तर ही मूल्यं मैत्रीत पाझरली तरच तिला अनुभवण्यात मजा येते. नाहीतर मग ती मैत्री नुसती नावाला असते. मग स्त्री, पुरुष अगदी कुठल्याही वयाचे, कुठल्याही वर्गातले, समाजातल्या कुठल्याही स्तराचे असोत. मैत्रीच्या संपन्न नात्याला कुणीही मग अडवू शकत नाही. कदाचित अशा मैत्रीत अनेक वर्षांचा अबोला असेल, दुरावा असेल, तरीही तो भाव टिकून राहणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.
या भावनेत एक प्रकारचा दिलासा असतो. जो कुठल्याही नात्यात अनुभवायला येत नाही. ही गोष्ट फक्त मैत्रीच्या नात्यात फुलते, वाढते. जिवलग मित्रत्व असणं ही तशी अतिशय दुर्मिळ गोष्ट. पण जर स्वतःहून आपणच एक पाऊल पुढं जाऊन असं मित्रत्व शोधायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे, नाही का?
*
वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता
चित्रकथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.
मस्तच लिहिलंय… ताजं, निखळ!
धन्यवाद. 😊
छान लिहिलय. मनपूर्वक अभिनंदन.
धन्यवाद! 💐
मैत्री दिनाच्या दिवशी मैत्री बद्दल अतिशय सुरेख लेख वाचण्याची संधी मिळाली.मित्र या नात्याला विविध कंगोरे आहेत,यावर अभ्यासपूर्ण लेख.
खूप छान.
खूप खूप आभार आणि तुम्हालाही शुभेच्छा! 😊
उत्तम एकदम झकास..👌
खूप आभार!
khup chhan