आज खूप दिवसांनी मम्मीच्या हातावर मेहंदी काढायचा योग आला. त्या निमित्तानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एक-एक गोष्ट मम्मी सांगत गेली आणि माझ्या मनातली मेहंदी तिच्या हातावर रंगत गेली…
माझ्या मम्मीचं माहेर सटाण्याचं. ती लहान असताना त्यांच्या गावात एक बोहारीण यायची. तिचं नाव ‘हिरा’. ती गावभर फिरून वेगवेगळ्या वस्तू विकायची. तिची आणि गावातल्या सगळ्या बायकांची चांगलीच गट्टी होती. चार वर्षांची मुलगी असो किंवा साठीची म्हातारी. गावातल्या सगळ्याच बायका हिराची वाट बघायच्या. का नाही बघणार? बायकांना हव्या, नको त्या वस्तू ती न चुकता घेऊन यायची. कोणी काही मागितलं आणि तिच्याकडं ते नसलं, तर पुढच्या खेपेला आणते, म्हणायची. पुढच्या खेपेला हिरा आली आणि वस्तू आणायला विसरली, असं मम्मीच्याच काय, आसपासच्यासुद्धा कुठल्या गावानं कधी पाहिलं नव्हतं.
मम्मीची आई, म्हणजे माझी आजी, तिला आम्ही ‘आजीआई’ म्हणायचो. तीसुद्धा हिराच्या वाटेकडं डोळे लावून बसायची. बाकीच्या बायकांना केसांचे चाप, कानातले, बांगड्या असं कसलंकसलं वेड होतं, पण आजीआई तिच्याकडून घ्यायची, ती मेहंदीच्या झाडाची वाळलेली पानं; अगदी दर खेपेला. ‘कांताबाई’, अशी आजीआईच्या नावानं हाक मारत हिरा अंगणात यायची आणि डोक्यावरल्या टोपलीतला खजिना एकएक करत रिता करायची. आजीआईच्या चार मुली. त्यातली एक माझी मम्मी. चौघी हिराला घेरायच्या. रंगीबेरंगी टिकल्या, गंधाच्या बाटल्या, कानातले, गळ्यातले, अशी त्यांची खरेदी उरकायची. हव्या त्या वस्तू मिळाल्या की, मुली पांगायच्या आणि मग आजीआई ज्यांची वाट बघायची, ती मेंदीची पानं हिरा हळूच पिशवीतून बाहेर काढायची. आजीआईचं सुख ते तेवढंच. मेहेंदीच्या लहानलहान पानांएवढं… त्या पानांचा घमघमाट सुटला की, आजीआई म्हणायची, “हं. चांगलीये.” मेंदी चांगली की, कशी, ते ठरवायला तिला नुसता वास पुरे असायचा.
तिथून पुढं आजीआईचा मोठ्ठाच कार्यक्रम आठवडाभर चालायचा. ती पानं पाट्यावर वाटायची, त्यांची बारीक भुकटी करायची, ती भुकटी मग लोखंडी भांड्यात भिजत घालायची, रात्रभर. दुसऱ्या दिवशी, तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावला की, देवघरातून बाहेर पडणारा उदबत्तीचा वास बघताबघता घरभर रेंगाळणाऱ्या मेंदीच्या वासात मिसळून जायचा आणि कुठल्याशा डोंगर-दरीत उगवलेल्या कुठल्याशा झाडाच्या पानांची ती हिरवट मेहंदी दैवी होऊन जायची…
जेवणं उरकली की, मग आजीआई चौघी मुलींच्या हातांवर मेहंदी लावून द्यायची. झोपायला आलेल्या मुली एक-एक कोपरा धरून झोपी जायच्या. मग सगळ्यात शेवटी कष्टांनी रखरखीत झालेल्या आपल्या हातांवर ती मन लावून मेहंदी काढत निवांत बसायची. एकटीच. इतकं मन लावून की, जणू तिची समाधीच लागायची त्या कामात…
अगदी पूर्वी ती मेंदी नुसतीच दोन्ही हातांवर थापायची. पुढंपुढं मग काडेपेटीच्या किंवा उदबत्तीच्या काड्यांनी नक्षी काढायला लागली. सुरुवातीला ओबडधोबड येणारी नक्षी मग रेखीव व्हायला लागली. तिच्या मेहंदीमधली नक्षी तिच्या रोजच्या जगण्यामधून यायची. अंगणातली फुलं-पानं, कसल्याशा वेली, पातळाच्या पदरावरला मोर अशी एक-एक नक्षी ती सगळ्यांच्या आणि स्वतःच्या हातावर जमेल तशी रेखत राहायची. पहाटेच अंघोळ उरकली की, मेहंदी धुवून जायची, पण तिचा तो मुग्ध करणारा वास, तरीसुद्धा दिवसभर आजीआईच्या आवतीभोवती दरवळत राहायचा. ओल्या केसांचा बुचडा बांधून हिरवं पातळ नेसून कामाला लागलेली आजीआई मग मेहंदीचं हिरवंगर्द झाड वाटू लागायची…
पुढंपुढं तिच्या चौघी मुलीसुद्धा आजीआईसारखे आकार रेखायला शिकल्या. सगळ्यांचा अट्टाहास असायचा, अगदी आजीआईसारखी मेंदी जमली पाहिजे म्हणून. आपापसांत स्पर्धापण लागायच्या. तिच्या चौघी मुलींनी तिचा खरा वारसा उचलला, तो त्यासुद्धा मेहंदी काढायला तिच्यासारखीच समाधी लावून बसायला लागल्या तेव्हापासून… मन लावून रेखत बसायच्या सगळ्या. माखल्या हातांनी झोपी जायच्या. सकाळी उठून खपल्या काढून मेंदी रंगली की नाही, ते बघायच्या. मग मेहंदी धुवायची गर्दी व्हायची. कोणाची मेहंदी आजीआईसारखी आली ते बघायची स्पर्धा लागायची.. चारही मावश्यांमध्ये सगळ्यांत चांगली मेहंदी माझ्या मम्मीचीच असायची. तरीदेखील मम्मीला वाटायचं, आजीआईसारखी नाही जमली. मग ती हिरमुसून आजीआईला म्हणायची, ‘जी मेहंदी तू लावते, तीच मी लावते. मग तुझी जास्त रंगते आणि माझी कमी असं कशामुळे?’ आजीआई म्हणायची, ‘प्रेम केलं मेहंदीवर की बरोबर खुलते आणि रंगतेसुद्धा…’
मम्मी लहानपणीच्या आठवणींमध्ये रंगलेली असतानाच माझे तिचे दोन्ही हात मेंदीच्या कोनानं रंगवून झाले. उरकलं म्हणून मी वर पाहिलं, तर मम्मीच्या डोळ्यांत पाणी. तिनं तिच्या हातांवरची मेहंदी डोळेभरून पाहिली आणि म्हणाली, ‘आईच्या हाताची कला माझ्यात आली. माझ्यातून ती आता तुझ्यात आली. आईची आठवण अगदी दाटून आली बघ.’
खरंच आहे हे. मी लहानाची मोठी झाले, तेच मुळात मम्मीचं असं मन लावून मेहंदी, रांगोळी रेखत बसणं पाहतपाहत. त्यातूनच चित्रकलेची आवड माझ्यात उतरली. रंगरेषांची ती कला माझ्यात बहरत गेली. खोल खोल रुजत गेली. कुठलंही खास प्रशिक्षण न घेता कला क्षेत्रात मुक्त संचार करण्याची क्षमता आणि विश्वास मला या सगसगळ्यांतूनच मिळत गेला. आज मी याच कलेला माझ्या उत्पन्नाचा आणि आनंदाचा स्रोत बनवलं आहे. व्यवसायानं इंटिरियर डिझायनर आणि त्याच विषयाची लेक्चरर म्हणून मी पुण्यामध्ये काम करत आहे. कॅनव्हास पेंटिंग्ज बनवणं, इंटिरियरमध्ये टेरेस-बाल्कनी डिझाईन करणं, त्यांचे मेकओव्हर करणं, अशी अनेक कामं वेळ मिळेल तशी करत असते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी माझं एक चित्र थेट इटलीपर्यंत जाऊन पोहोचलं. आज मी मागे वळून बघते, तेव्हा या सगळ्याचं श्रेय आजीआईला, मम्मीला आणि त्या दोघींनी मेहंदीवर जे प्रेम केलं त्या प्रेमाला जातं…!
(नोट : कुणाला मेंदी काढून हवी असेल किंवा कन्सेप्टनुसार पेंटींग बनवून हवी असेल, तर मला हक्कानं संपर्क करा. मेंदीवरचं, कलेवरचं ते प्रेम तुमच्यासह वाटून घ्यायला मला नक्कीच आवडेल.)
संपर्क :
स्वाती महाले
मोबाइल : ०८८८८५७८३९०
ईमेल : [email protected]
(शब्दांकन: अमित सोनावणे, सारद मजकूर)
*
वाचा
अमित सोनावणे यांचं साहित्य
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा