आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ट्रेनचं तिकीट ट्रेन खाली गेलं नाही पाहिजे! नाही तर काय! भटकंती करताना किस्से तर घडतच असतात, पण असं काही होईल असा कधी आम्ही विचार केला नव्हता.
मी, हर्षदा आणि आशिषदादानं ‘अलंग-मदन-कुलंग’ (AMK) या किल्ले त्रिकुटाचा प्लॅन केला होता. दरवेळी कोणीतरी एक व्यक्ती संपूर्ण ट्रेकचा प्लॅन तयार करत असतो. त्याप्रमाणं यावेळचा प्लॅन हा आशिषदादानं बनवला, म्हणजे कुठं जायचं, कसं जायचं, कुठं भेटायचं, गाईड, जेवणाची व्यवस्था वगैरे वगैरे.
ठरल्याप्रमाणे मी आणि हर्षदा मुंबईतून कल्याणला पोचलो. आशिषदादा पुण्यावरून कल्याणला आला. रेल्वेच्या जनरल डब्याची इगतपुरीपर्यंतची ३ तिकिटं काढली. ट्रेन आली; पण जनरल डब्याला भयंकर गर्दी असल्यामुळं आम्ही स्लीपर डब्यात शिरलो आणि दरवाज्यात बसून प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात टीसी नावाचा दुष्ट राक्षस आला. आमची जनरलची तिकिटं असल्यामुळं आम्हाला ‘फाईन भरा’ असं बोलला. पण आम्ही कसला भरतोय फाईन. शेवटी तो मांडवलीला तयार झाला.
तोपर्यंत कसारा आलं. चढणारी लोकं चढली आणि आत गेली. आम्ही परत दरवाज्याजवळ येऊन बसलो. ट्रेन सुटायला अजून काही वेळ होता. पण झालं असं की मस्तीमस्तीत माझ्या हातातून ट्रेनचं तिकिट उडालं आणि थेट जाऊन पडलं ट्रेनच्या बाहेर.
मी हळूच हर्षदाकडे पाहिलं आणि बोललो, ‘हर्षा तिकिट पडलं.’
तिनंही थोरल्या बहिणीच्या रूबाबात सांगितलं, ‘तुझ्याकडून पडलं, तू आण.’
मी गुपचूप ट्रेनमधून खाली उतरलो. बघतो तर तिकिट पडलं होतं पटरीवर. ते कसं काढता येईल याचा विचार करत असतानाच ट्रेनचा भोंगा वाजला आणि माझी छाती ट्रेनच्या इंजिनपेक्षा जास्त वेगानं धडधडू लागली. आम्ही घाबरून एकमेकांकडे पाहायला लागलो. ट्रेन सुरू झाली तसा मी आत येऊन बसलो. आता पुढं करायचं काय हा मोठा प्रश्न होता. इगतपुरीला उतरल्यावर टीसीनं पकडलं तर? फाईन भरावा लागला तर? माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मधे मधे हर्षाकडून पाठीत बुक्क्यांची शिक्षा मिळत होती. नेहमीप्रमाणं आमचं त्यावरून ‘टॉम ॲण्ड जेरी’सारखं भांडण चालू होतं. (प्रत्येक ट्रेकला तसंही आमच्यात भांडण होतंच असतं. नाही झालं तर एकमेकांना करमत नाही.)
मग आम्ही परत त्या टीसीसाहेबांना शोधलं. मघा दुष्ट राक्षस वाटणारे टीसी साहेब यावेळी मात्र आमचा एकमेव आधार वाटत होते. त्या देवमाणसाला गाठलं आणि झालेला प्रकार सांगितला. टीसी साहेब म्हणाले, ‘घाबरू नका. खाली उतरल्यावर टीसी असेल, तर मला सांगा. मी एस-७ मध्ये आहे.’ आता आम्ही बिनधास झालो.
इगतपुरी आलं. रात्रीचे दीड-दोन वाजले असतील. शेंडी गावात जायची एसटी बस सकाळी साडेपाच वाजताची होती. त्यामुळे आम्ही फ्लॅटफॉर्मवरच थांबायचं ठरवलं. असेल नसेल ते पसरलं आणि झालो आडवं प्लॅटफॉर्मवरच. खूप प्रयत्न केला झोपायचा. पण येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेनचे भोंगे आणि मच्छर… शक्य तरी होतं का झोप येणं?
सकाळी पाच वाजता उठून फ्रेश होऊन आम्ही एसटी स्टँडवर गेलो. तिथं वातावरण सामसूम होतं. तिथं केवळ एक गाय, चार-पाच कुत्री आणि आम्ही तिघं एवढेच होतो. हळूहळू लोक जमायला लागले. ‘शेंडी’ची बस आली आणि आमचा प्रवास सुरू झाला. थंडी खूप होती.
सातच्या दरम्यान आम्ही शेंडी गावात उतरलो. ट्रेक गाईड ज्ञानेश्वरदादाला फोन लावू लागलो, पण फोन काही लागेना. आता पुन्हा पंचायत जायचं कसं पुढं? तेवढ्यात एक रिक्षा समोर आली आणि रिक्षावाले काका म्हणाले, ‘कुठं जायचंय पोरांनो.’
म्हटलं, ‘घाटघरला, ज्ञानेश्वरच्या घरी.’
बोलले, ‘चला सोडतो.’
भराभरा बॅगा रिक्षात भरल्या आणि बसलो. बोलणं सुरू झालं. बोलता बोलता त्यांचं नाव राजू असल्याचं कळलं. राजूकाकांनी परिसराची माहिती सांगायला सुरुवात केली. उजव्या हाताला कळसूबाई शिखर आभाळात घुसलं होतं. डिसेंबरचा महिना असल्यामुळं वातावरण खूप भारी होतं.
राजूकाकांनी आम्हाला ज्ञानेश्वरदादाच्या घराजवळ सोडलं. ज्ञानेश्वरदादाचं घर मस्त आहे. कौलारू. पोहोचल्या पोहोचल्याच कांदा-पोहे आणि चहानं आमचं स्वागत झालं. आपुलकीनं दिलेला हा नाश्ता अजूनही डोळ्यासमोर जसाच्या तसा येतोय.
पटापट आवरून आम्ही अलंग गडाकडे कूच केलं. गाव वस्तीतून बाहेर आल्यावर पठार लागलं. समोर अलंग किल्ला धिप्पाड मल्लासारखा उभा होता. एव्हाना ऊन वाढू लागलं होतं. आम्ही ओढ्यातल्या वाटेनं चालत होतो. थोड्या वेळानं आम्ही अलंगच्या शिडीजवळ आलो. शिडी पार केल्यावर समोरच काळाच्या ओघात दगड-मातीनं बंद झालेला अलंगचा दरवाजा दिसला. भिंतीच्या आधारानं आम्ही वर चढलो. वर एक छोटी कोरीव गुहा आहे, त्यात बसून पाणी प्यायलो. ताजंतवानं होऊन परत चालू लागलो.
डाव्या हाताला खोल दरी आणि उजव्या हाताला कातळकडा. मधल्या निमुळत्या वाटेवरून सावधगिरीनं चालत आम्ही एका गुहेजवळ पोचलो. त्यापुढं आणखी ५ मिनिटं चालल्यावर दुसरी एक मोठी गुहा लागते. ही गुहा मुक्कामासाठी योग्य आहे. ५०-६० माणसं यात सहज राहू शकतात. तिथं पोहोचलो. गुहेतल्या थंडाव्यात बसल्यावर स्वर्ग सुख असतं ते हेच असं वाटत होतं. ज्ञानेश्वरदादा बोलले, ‘तुम्ही किल्ला बघून या, मी तोपर्यंत जेवण बनवतो.’
मदन किल्ला, इगतपुरी कुलंगगडावरील टाक्यांचा समूह
आम्ही तिघं मग किल्ला बघायला निघालो. गुहेच्या उजव्या हातानं वर गेल्यावर पाण्याच्या ११ टाक्यांचा समूह आहे. तिथून पुढं गेल्यावर जुन्या वाड्याचे अवशेष लागतात. थोडं आणखी पुढं गेल्यावर अनेक इमारतीचे चौथरे आणि भिंती जाज्ज्वल्य इतिहासाची साक्ष देत उभे असलेले दिसतात. वाड्याचा परिसर आणि रूबाब पाहून कोणीतरी मोठी व्यक्ती इथं राहत असणार, हे जाणवतं. तसंच पुढं चालत गेलं की येतो अलंगचा सर्वोच्च माथा. त्या माथ्यावर आणखी एक गुहा आहे. तिच्यासमोर एक कोरीव स्तंभ आहे. या स्तंभाजवळ उभं राहिलं की समोर भंडारदरा, रतनगड, आजोबा हे किल्ले दिसतात. आम्ही आजूबाजूचा परिसर बघत होतो, तेवढ्यात ज्ञानेश्वरदादानं आवाज दिला. आम्ही परत आलो गुहेजवळ. चांगलीच भूक लागली होती. ज्ञानेश्वर दादाने बनवलेला गरमागरम पिठलं-भात, निघताना त्यांनी घरातूनच घेतलेल्या भाकरी आणि झणझणीत चटणी… दणकून जेवलो आणि फार वेळ न घालवता पुन्हा आवरून अलंग गडावरच्या शिवलिंग आणि नदीचं दर्शन घेऊन मदन गडाकडे जायला निघालो. काळोख व्हायच्या आत आम्हाला मदन गडावर मुक्कामाला पोहोचायचं होतं.
अलंगच्या पायऱ्या उतरल्यानंतर ज्ञानेश्वर दादानं रॅपलिंगचा सेटअप लावला आणि आम्ही उतरायला लागलो. पुढं आशिष दादा, मध्ये हर्षा, तिच्यामागे मी आणि शेवटी ज्ञानेश्वर दादा.. आम्ही चौघं ७० फूट रॅपलिंग करून खाली उतरलो. पटापट मदन गडाच्या दिशेनं चालू लागलो. निसरडा रस्ता आणि बाजूला खोल दरी यांचा आनंद घेत, मध्ये मध्ये डोकं वर काढणारी भीती आतल्या आत दाबत आम्ही चालत राहिलो. पुढं लागतो तो आडवा पॅच सावधानतेनं पार केला आणि पायऱ्या चढू लागलो. ‘तुम्ही या मागून, मी पुढं जाऊन अंधार व्हायच्या आत सेटअप लावतो,’ म्हणत ज्ञानेश्वर दादा निघून गेले पुढं. आम्ही तिघं आमच्या स्पीडनं चालत राहिलो.
पोचेपर्यंत अंधार झालाच. सुरुवातीला बॅगा वर दिल्या. नंतर आशिष दादाला हारनेस चढवला आणि कॅराबाईन लॉक केला. दादानं चढाईला सुरुवात केली. कसाबसा दहा-एक फूट वर गेला तो आणि ‘ज्ञानेश्वरss’ असा मोठ्ठा आवाज ऐकू आला. दादाचा रोप स्लिप झाला होता. २-३ फूट खाली फॉल झाला होता तो. आम्हाला वरचं काही दिसेना, त्याला आम्ही दिसेना. काही वेळ तो तसाच अंदाज घेत राहिला. मग पुन्हा चढाई करायला लागला आणि सुखरूप वर पोहोचला. त्याच्या मागोमाग हर्षदानं चढाई केली. शेवटी राहिलो मी. टॉर्च, शूज वगैरे एका पिट्टू बॅगमध्ये भरून वर दिलं. मी हारनेसला चढवली. कॅरबाईन लॉक केला आणि चढायला सुरुवात केली. अंधारामुळे आसपासचं सोडाच, रोपसुद्धा दिसत नव्हता. तरी आपला चाचपडत चाचपडत चढत राहिलो. चढाई पार केली आणि मीसुद्धा सुखरूप वर पोहोचलो.
वर गेलो तर आशिषदादा अजूनसुद्धा शांत बसून होता. भीती गेली नव्हती त्याची. त्यानं मघा घाबरून दिलेली ‘ज्ञानेश्वरss’ अशी आरोळी पुन्हा आठवली आणि काटा आला अंगावर. मग आम्हीसुद्धा बसलो काही वेळ आणि चालू लागलो पुन्हा. गुहेच्या दिशेनं. काही वेळ चालल्यानंतर गुहेजवळ येऊन पोहोचलो. बॅगा ठेवल्या. हर्षा आणि मी टाक्यातलं पाणी भरून आणलं आणि बसून प्यायलो. आशिषदादाला चांगलंच खरचटलेलं होतं. ते सर्व धुतलं त्याला तेल लावलं. बोललो, ‘तू झोप, आम्ही जेवण बनवतो.’
त्यानं गुहेत अंथरूण घातलं. अंग टाकणार, तेवढ्यात मी त्याला धरून खेचलं. तो गोंधळला, काय झालंय ते त्याला कळेना. मी पटकन चादर बाजूला केली, तेव्हा काय झालंय ते सर्वांच्या लक्षात आलं. दादा झोपत होता तिथं उशाला एक फुरसे (साप) वेटोळं करून बसलेलं दिसलं. त्याला आम्ही काठीनं हळुवार बाहेर आणून सोडला. दादा तर आणखीनच घाबरला होता. आजचा दिवसच भयंकर आहे, असं त्याचं मत झालं होतं.
आम्ही तिघांनी जेवणाची तयारी केली. चूल पेटवायला दगड सरकवला तर त्या खाली आणखी एक फुरसे दिसलं. त्यालासुद्धा बाजूला केल्यावर आम्ही जेवण बनवायला घेतलं. दादा गुहेत शांत झोपला होता. जेवण झाल्यावर त्याला जेवायला उठवलं. थकलो होतो खूप. पोटभर जेवलो आणि गुहेतच झोपलो.
डोळा लागून फार वेळ झाला नसेल तोच मला जाग आली. कसला तरी भयंकर मोठा आवाज येत होता, जनावरासारखा. मी घाबतच उठलो. टॉर्च हातात घेतला. बघतो तर काय, ज्ञानेश्वर दादा जोरजोरात घोरत होता आणि गुहेत आवाज घुमत असल्यामुळे तो उगाच भीतीदायक वाटत होता. मी कान बंद करून झोपलो, ते थेट सकाळीच उठलो.
सकाळी लवकर उठून आवराआवर करून पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि आम्ही मदनगडाच्या आठवणी मनात घेऊन उतरू लागलो, कुलंगकडे जाण्यासाठी. आदल्या दिवशी ज्या पॅचवर क्लाईम्ब करताना आशिषदादाचा पाय घसरला होता, त्या जागेवर आलो. खाली डोकावून पाहिलं. खोल दरी पाहून छातीच दडपली. रॅपलिंगचा सेटअप केला आणि उतरायला लागलो. मदनच्या पायऱ्या लागल्या. पायऱ्यांची मज्जा घेत आणि निसर्गाचं सौंदर्य डोळ्यांत साठवत उतरू लागलो.
सह्याद्रीची एक गम्मत आहे. त्याचं असं रौद्र रूप पाहिलं की भीती भरते. तो भयंकर आहे, भीतीदायक आहे असं वाटायला लागतं. पण तोच सह्याद्री इतर अनेक वेळा नातवाचे लाड पुरवणाऱ्या प्रेमळ आजोबासारखासुद्धा वाटतो.
ऊन वाढायच्या अगोदर कुलंगचा माथा गाठायचं ठरलं होतं. त्यानुसार पटापट पाय उचलत होतो. सूर्य जसजसा वर चढत होता, तसतशी एकसारखी तहान लागत होती. पाण्याच्या बाटल्या संपत आला होत्या. थोडं पाणी सांभाळून ठेवायचं असतं म्हणून २ बाटल्या राखून ठेवल्या. पण तहानच आवरेना. मग काय? हर्षा बोलली, ‘थांबा, आपण थोडं खाऊया.’ थांबलो. हर्षानं तिच्या बॅगेतला डबा काढला. डब्यात द्राक्ष होती. हि तर मेजवानीच झाली! मग काय, मेजवानीवर ताव मारला. द्राक्षांमुळे तहान आणि भूक दोन्ही भागले जरासे. नशीब तिनं आधी नाही सांगितलं की, द्राक्षं आणलीत. नाहीतर केव्हाच संपली असती.
पोटाला आधार मिळाला तसा चालायला जोर आला. बघता बघता कुलंगच्या पायऱ्या लागल्या. सुरुवातीच्या काही ठिकाणी पायऱ्या तुटल्यात, तिथं छाती भीतीनं धडधडली. (आज-काल मला असं होतं, कधीही कसलीही भीती वाटते.) पण हर्षदानं धीर दिला, चालत राहा म्हणाली. चालत राहिलो. आणि हळूहळू भीती ओसरली तसं लक्षात आलं, कुलंगच्या पायऱ्या म्हणजे स्वर्गात नेणारी वाटच जणू! अविस्मरणीय!
मजल-दरमजल करत आम्ही कुलंगच्या माथ्यावर पोचलो. बॅगा गुहेतच ठेवल्या आडोशाला. ज्ञानेश्वरदादानं नाश्ता बनवायला घेतला. आणि आम्ही गड फिरायला लागलो.
गुहेच्या बाजूला खंदक आहे. तो पाहून पुढं गेलो की, वाड्याचे अवशेष दिसतात. इथून आणखी पुढं गेल्यावर कुलंगवरच्या टाक्यांचा समूह दिसतो. तो पाहिला. एका टाक्याच्या भिंतीवर गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली दिसली. खूप सुंदर मूर्ती आहे. त्या काळात एवढ्या उंचीच्या पाण्याच्या टाक्यांचं योग्य नियोजन करून पाण्यासारख्या प्राथमिक गरजेवर किती बारकाईनं लक्ष दिलं जायचं, हे लक्षात येतं. संपूर्ण गडाला फेरी घालून आम्ही वेगवेगळ्या गोष्टी बारकाईनं पाहिल्या, समजून घेतल्या. परत गुहेजवळ आलो. नाश्ता तयार होता, तो खाल्ला. इच्छा नसताना परतीच्या प्रवासाला लागलो.
पुन्हा इगतपुरी गाठण्यासाठी आंबेवाडीतून घोटीला जाणारी एसटी पकडायची होती. आंबेवाडीकडे जाणारा रस्ता दाखवून ज्ञानेश्वरदादा त्यांच्या घराकडे निघू लागले. आम्ही त्यांचे अगदी मनापासून आभार मानले. दोन दिवस त्यांनी आम्हाला सुरक्षित आणि काळजीपूर्वक तिन्ही गड फिरवून आणले त्यासाठी. आशिषदादा तर त्यांना परत परत घट्ट मिठ्ठी मारून आभार मानत होता. रात्रीच्या पाय घसरला त्या प्रसंगाची आठवण अजूनही त्याच्या मनात ताजी होती.
भरल्या हृदयानं आम्ही ज्ञानेश्वरदादाचा निरोप घेऊन आम्ही आंबेवाडीकडे चालू लागलो. आमच्या पाठीशी असणारे अलंग-मदन-कुलंग हे किल्ले त्रिकुट परतीची वाट धरलेल्या आम्हा तिघांकडे प्रेमानं बघत होते. ‘परत या रे पोरांनो’ असं महिनाभर गावी राहिल्यानंतर निरोप घेताना आजोबा म्हणतात, तसं हे त्रिकुट प्रेमानं हात हलवून ओरडून ओरडून सांगत होतं. परत परत मागं वळून बघत आम्हीसुद्धा म्हणत होतो, ‘हो, नक्की येणार. लवकरच…”
टीपः ‘अलंग-मदन-कुलंग’ हा ट्रेक करताना क्लाइबिंग आणि रॅपलिंगचा पुरेसा अनुभव असलेल्या व्यक्तींना आणि योग्य गाईडला सोबत घेऊनच करावा. हौशा-नवश्यांनी अवास्तव धाडस करू नये. आणि महत्वाचं, प्रवासाची तिकीटं माझ्यासारख्या वेंधळ्या माणसाच्या हाती देऊ नये.
*
वाचा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
आज दिनांक
कथा
चित्रकथा
कविता
मी मुकुंद रतन मोरे. शाळेपासूनच नाटक आणि चित्रपटांची आवड असल्यामुळं एका खाजगी इन्स्टिट्यूटमधून चित्रपट संकलनाचं शिक्षण घेतलं. संकलक म्हणून काम करत असतानाच 'रॉम कॉम', 'दोस्तीगिरी', 'विडा', 'छत्रपती शासन', 'कलाकेंद्र' अशा काही मराठी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणूनही कामाला सुरुवात केली. 'ओ ला ला', 'निर्मोण' हे गोयेंन या कोकणी चित्रपटांचंसुद्धा कलादिग्दर्शन केलं आहे.
खुपच छान, पहिलं वाक्य लै भारी. सुरुवाती पासूनच्या प्रवासाची कहाणी खासच शैलीत लिहिली आहे.टी सी नावाचा दृष्ट् राक्षस आणि पुढे तोच आधार स्तंभ.फारच छान अनुभव.फुरसे नावाच्या सापाचा प्रसंग थरारक.
तिन्ही गडाचे वर्णन अप्रतिम
आवडलं
Dhanyawaad
सह्याद्रीची एक गम्मत आहे. त्याचं असं रौद्र रूप पाहिलं की भीती भरते. तो भयंकर आहे, भीतीदायक आहे असं वाटायला लागतं. पण तोच सह्याद्री इतर अनेक वेळा नातवाचे लाड पुरवणाऱ्या प्रेमळ आजोबासारखासुद्धा वाटतो.
हे फार भावलं.
Dhanyawaad
गिर्यारोहकांची पंढरी अलंग-मदन-कुलंग’ (AMK) चे छान आणि वास्तववादी वर्णन… शब्दरचना हि उत्तम…. पैकीच्या पैकी मार्क्स…
Dhanyawaad