आमच्या आयुष्यातली २०१६ ते २०१८ ही वर्षं अचाट होती. कारण या दोन वर्षांत आम्ही सलग प्रत्येक शनिवार-रविवारी ट्रेक केले. एकही खाडा होऊ न देता. म्हणजे गुरुवार-शुक्रवार उजाडला की कुठं जायचं यावर आमचं प्लॅनिंग सुरू व्हायचं. कुठला ट्रेक करायचा? कोण कोण येणार? या मित्राला वेळ नाही, त्याला सुट्टी नाही.. असं करता करता कुठलं एखादं ठिकाण पक्कं व्हायचं.
असाच एक शुक्रवार. मी आणि हर्षदा दुपारपर्यंत कोणत्या ट्रेकचा प्लॅन करायचा यावर चर्चा करत होतो. चर्चेबरोबर फोनसुद्धा चांगलाच तापला होता, पण ठिकाण काही पक्कं होईना. हो-नाही करता करता एकदाचं ठिकाण ठरलं – तोरणा किल्ला. थोड्या वेळानं परत हर्षाचा कॉल आला. ती म्हणाली, ‘नाशिक रेंजमधली दुर्गजोडी रावळ्या-जावळ्या करूया.’ मी म्हटलं, ‘बरं. रावळ्या-जावळ्या, तर रावळ्या-जावळ्या.’
ही दुर्गजोडी सप्तश्रृंगी वणीजवळ आहे. माहिती काढल्यावर लक्षात आलं की, वेळेच्या गणितात ही दुर्गजोडी काही बसत नाहीत. (सार्वजनिक वाहनानं वाहतूक करायची म्हटलं की कधी कधी असं होतं.) मग आता कोणता किल्ला करायचा? तर पुन्हा हर्षानंच नाव सुचवलं – ‘कलाडगड’. परत पुस्तकांमध्ये, गुगलवर माहिती शोधायला सुरूवात केली. हा किल्ला ‘पाचनई’मधून करावा लागतो. पण पाचनईपर्यंत पोहोचायचं कसं? कारण ‘ओतूर ते पाचनई’ प्रवासाला स्वतःचं वाहन असेल तर बरं. नाहीतर, एसटी बसनं करायचं म्हणजे अवघड होणार. म्हणजे हेसुद्धा वेळेत बसायला जरा अडचणीचं होतं तर. जायचं मात्र नक्की होतं. मित्र परिवारात फोन करून सर्वांना ‘कोण येतंय का’ विचारायला सुरुवात केली. पण कोणीच तयार नव्हतं. प्रत्येकाकडे काही ना काही कारण होतं. हर्षदा म्हणाली की, तिचे पुण्यातले दोन मित्र यायला तयार आहेत. मी म्हटलं, ‘चालतंय.’ (ते दोघं तिचे फेसबुक मित्र होते, ज्यांना ती यापूर्वी कधीच भेटली नव्हती. आणि हे तिनं मला खूप उशिरा सांगितलं.) ते दोघं स्वतःची गाडी घेऊन येणार होते. आम्ही त्यांना ओतूर एसटी स्टॅन्डवर भेटणार होतो.
शनिवार उजाडला. सकाळी सहा वाजता मी आणि हर्षदा दादरला भेटणार होतो. मला जरा भीती होती, हर्षा वेळेत येतेय की नाही याची. कारण, तिला वेळेवर म्हणजे अगदी कट-टू-कट यायची घाणेरडी सवय आहे. माझा जीव वर-खाली होतो अशा वेळी. नशिबानं ती वेळेत आली. दादरहून आमचा प्रवास ठरलेल्या वेळेत सुरू झाला. कल्याण आलं, उतरलो. धावत एसटी स्टँड गाठलं. सकाळी सव्वा सातची ‘जामखेड’ची एसटी पकडली आणि निघालो ओतूरला जायला.
कल्याण शहराची गजबज मागं सोडल्यावर तासाभरात एसटी मुरबाडला पोहोचली. टोकावडेला नाष्ट्यासाठी थांबली. तेवढ्यात मित्रांचा फोन आला की ते ओतूरला पोहोचलेत. ‘आलोच,’ म्हणत बसमधे बसलो. बस निघाली.
मुरबाड ते ओतूर हा प्रवास म्हणजे ट्रेकसाठी निसर्गानं वाढलेलं पंचपक्वान्नच! वैशाखैरे, नाणेघाट, आणखी पुढं गेल्यावर डोंगररांगांमधून डोकावणारा मोरोशीचा भैरवगड, त्या पुढं नागमोडी वळणाचा माळशेज घाट, पुढं डाव्या हाताला दिसणारा हरिश्चंद्रगड.. या सर्वांचं नयनसुख घेत ओतूर कधी आलं कळलंच नाही. आम्ही अकरा वाजता ओतूरला पोचलो.
उतरल्यावर दोघा मित्रांना शोधायला सुरुवात केली. हर्षानं त्यांना कॉल केला. ते समोरच उभे होते, गाडीजवळ. माझ्या मनात अनेक प्रश्न होते, कसे असतील हे दोघं? स्वभाव कसा असेल? चांगली माणसं असतील ना?.. त्या दोघांपैकी एक म्हणजे आशिषदादा – गोरागोमटा, बोलका (पण बोलण्यात पुणेरी ॲटिट्युड असलेला) आणि दुसरा म्हणजे संजय दादा (तेव्हाचा संजय दादा, आणि आताचा संजूदादा) – महाभारतातल्या भीमासारखा उंच आणि धष्टपुष्ट, बलदंड शरीराचा माणूस, ज्याच्यासमोर मी अगदीच इटुकला वाटत होतो. तोंडओळख झाल्यावर गप्पा सुरू झाल्या. दोघांना गड-किल्ल्यांची आवड आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहेत, असं लक्षात आलं. हळूहळू दोघांवर विश्वास बसायला लागला. कधी मनातसुद्धा आलं नव्हतं, की तेव्हाची अनोळखी माणसं पुढं जाऊन आपले जिवलग मित्र होतील आणि भविष्यात या दोघांबरोबर खूप भारी आठवणी असणारे ट्रेक होतील म्हणून.
आम्ही त्यांच्या गाडीतून पाचनईकडे निघालो. पाचनईचा रस्ता म्हणजे भयंकरच. खड्ड्यांनी भरलेला. एक एक खड्डा चुकवत, कधी त्यात फसत आमची गाडी हळूहळू पुढं सरकत होती. सुरुवातीला ब्राह्मणवाडा, नंतर कोथूल, पुढं राजुरी.. विचारत विचारत एकदाचे आम्ही पाचनईमध्ये पोहोचलो.
पाचनईमध्ये रस्त्याला लागून फॉरेस्टवाल्यांची चौकी आहे. तिथं १०० रु. पार्किंग चार्ज भरून गाडी पार्क केली. प्रत्येकी ३० रु., असे चौघांचे १२० रु. भरले. पावती घेतली आणि कोठेवाडीतून ट्रेकला सुरुवात केली. एव्हाना दुपारचा पाऊण वाजला होता. ट्रेक सुरू व्हायला उशीर झाला होता. घाईगडबडीत रस्ता चुकायला नको म्हणून गावातून श्यामदादा नावाचा वाटाड्या घेतला. श्यामदादा रस्त्याची आणि परिसराची माहिती देत पुढं चालत होता. भर दुपारी ट्रेकला सुरुवात केलेली खरी, पण भयंकर उन्हामुळं आशिषदादाला त्रास होऊ लागला. त्यात तो ड्रायव्हिंग करून आलेला. अशक्तपणा जाणवत होता त्याला. तरी चालत राहिला.
अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मात्र तीव्र चढण लागली. ऊन आग ओकायचं थांबत नव्हतं. अशात, संजूदादानं हार मानली. ‘इथंच पंढरपूर’ म्हणत त्यानं ठाणच मांडली. आशिषदादा मात्र थांबला नाही. आलो आहे तर ‘टॉप’ करूनच जाणार, असं म्हणत होता. हे तो आम्हाला सांगत होता की स्वतःला, कुणास ठाऊक.
संजूदादा थांबला. मी, हर्षदा, आशिषदादा श्यामच्या मागोमाग चालत होतो. कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या. मला नेहमीप्रमाणं भीती वाटत होती. पावसाळ्यात फार काळजीपूर्वक आणि सावध राहून त्या पार कराव्या लागतात. निष्काळजीपणा करून चालत नाही. आम्ही त्या पायऱ्या काळजीपूर्वक पार केल्या आणि थोड्या वेळात भैरवनाथाच्या मंदिरात पोचलो. या मंदिराजवळ एक सुंदर गणपतीची मूर्ती आहे. तिला नमस्कार करून गड फेरीला सुरुवात केली.
गुहेचा परिसर पाहिल्यावर आम्ही डाव्या हातानं पुढं गेलो. एक पाण्याची टाकी दिसली. बाजूलाच एक छोटी उखळसुद्धा होती. तिथून पुढं गेल्यावर ‘वेतोबाचा तांदळा’ दिसतो. तिथं फोटो काढून आम्ही पुढं निघालो. तिथून थोडं पुढं गेल्यावर समोरचा ‘कोंबडा सुळका’ आपल्याला खुणावू लागतो. (कोंबड्यासारखा दिसतो, म्हणून बहुतेक त्याला कोंबडा सुळका म्हणत असावेत.) डाव्या बाजूला हरिश्चंद्रगड, तारामतीटोक, रोहिदास शिखर डोळ्याची पारणं फेडतात. उजव्या बाजूला ‘नाफत्याचा सुळका’ उभा दिसतो. नीट लक्ष देऊन पाहिलं तर भैरवगडसुद्धा दिसतो.
चालत चालत आम्ही कलाड गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. तिथून आजूबाजूचा परिसर न्याहाळला. सुंदर दिसत होतं सगळं. जरा वेळ बसून आल्या मार्गी चालायला लागलो. परत भैरवनाथाच्या गुहेजवळ आलो. पोटपूजा करायचं ठरलं. माझा उपवास होता, त्यामुळं हर्षदानं आठवणीनं ‘काठीकनग’ (बटाट्यासारखं एक कंद) उकडून आणलं होतं. असे आम्ही दोघं एकसारखे भांडत असलो तरी हर्षा आठवणीनं माझ्यासाठी ट्रेकला उपवासाचं काही ना काही घेऊन येत असते. म्हणजे ती भांडकुदळ नाही असं नाही; पण प्रेमळ नाही असंसुद्धा नाही. (हो ना, प्रेमळ म्हटलंच पाहिजे. ती लेख वाचत असणार. फार खरं बोलायला गेलो आणि ती रागावली आणि पुढच्या ट्रेकला मला उपाशीच ठेवलं तर मग?)
पोटपूजा झाल्यावर आल्या मार्गी उतरायला सुरुवात केली. संजूदादा वाटच बघत होते. त्यांना आता बरं वाटत होतं. त्यांना सोबत घेऊन आम्ही खाली उतरायला लागलो. अतिघामामुळं जीव नकोसा झाला होता. कधी एकदा खाली जाऊन शांत बसतोय, असं झालं होतं. पार्किंगला पोहोचलो. गाडीत बसलो आणि पाचनाईत आलो. इथून आमचे रस्ते वेगळे होणार होते. संजूदादा आणि आशिषदा पुण्यासाठी निघणार होते आणि आम्ही दोघं आज इथंच वस्ती करून दुसऱ्या दिवशी सकाळी रतनगड करणार होतो. दादाला म्हटलं, ‘तुम्ही निघा. आम्ही बघतो राहण्याची काय सोय होते ते.’ पण त्यांनी अगोदर आमची कोणाकडे सोय होते का ते पाहिलं. सर्व व्यवस्था लागल्यावर मग ते निघाले. त्यांचं हे काळजीपूर्वक वागणं त्यांच्याशी आमचं नातं घट्ट करून गेलं.
आम्ही किरण धारमल यांच्या घरी राहिलो. त्यांच्या आई आणि बहिणीनं प्रेमानं स्वयंपाक केला. मस्त पोट भरून जेवलो. दिवसभराच्या थकव्यामुळं रात्री अगदी गाढ झोप लागली.
सकाळी ५ वाजता उठायचं आणि सकाळी ६ वाजताची वस्तीला असलेली एसटी बस पकडून राजुरीला जायचं, असं ठरलं होतं. वेळेत उठून दोघांनी आवराआवर करून बस पकडली. थंडी कडाक्याची होती. एक तासाचा प्रवास करत आम्ही ७ वाजता राजुरीला पोहोचलो. तरीसुद्धा ७.३० ची भंडारदऱ्याला जाणारी एसटी आमची चुकलीच. (कोणामुळे चुकली हे मी सांगणार नाही; कारण पुढच्या वेळेस उपवासाचं जेवण मला खायचं आहे.)
पुढची बस होती ९.४५ वाजता. त्यामुळं आमच्याकडे खूप वेळ होता. आम्ही नाश्ता करण्यासाठी म्हणून बाहेरच्या एका टपरीवजा हॉटेलवर आलो. हॉटेलच्या बोर्डावर ‘मिठ्ठा वडा’ नावाचा नवाच मेनू वाचला. काहीतरी नवीन खाऊया या विचारानं ‘मिठ्ठा वडा’ मागवला. वडा चक्क गोड होता. मला गोड आवडतं. त्यामुळं मस्त ताव मारला. पोट भरलं. परत एसटी स्टँडवर येऊन पावणे नऊची बस पकडली आणि भंडारदऱ्याला उतरलो.
तिथं उतरून रतनगडाकडे जाणाऱ्या बोटीची चौकशी केली. एक जण म्हणाला दीड हजार रु. एवढे पैसे खर्च करायचं आमच्या मनाला काही पटेना. दुसरं कोणतं वाहन जातंय का याची विचारपूस केली, पण काही उपयोग झाला नाही. आता पुढं काय करायचं? तेवढ्यात एक छोटा मुलगा जवळ आला आणि म्हणाला, ‘मी तुम्हाला ‘पाभरगड’ फिरवून आणतो. हजार रु. द्या.’ घासाघाशी करून शेवटी ४०० रुपयावर थांबलो.
त्या मुलाचं नाव होतं सौरभ. हा छोटा सौरभ आता आमच्या ट्रेकचा म्होरक्या झाला होता. गावातून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि ११ वाजता चालायला सुरुवात केली. पायवाटेनं जाताना सौरभची मस्ती चालू होती. आम्हीदेखील त्याच्यासोबत लहान झालो. पठ्ठ्याकडे कमालीचा आत्मविश्वास. बोलण्यात स्पष्टपणा होता. बिनधास्त होता तो. आपल्याच मस्तीत चालत होता. मला माझं लहानपण आठवलं. मीसुद्धा गावात वाढलेला असल्यामुळं असाच मस्तीखोर होतो. जंगल आपलंच आहे या थाटात जंगल फिरायचो…
ऊन वाढायला लागलं तसा हर्षदालासुद्धा त्रास व्हायला लागला. चक्कर यायला लागली, उलट्या व्हायला लागल्या. पित्त वाढलं असावं. मनात आलं, परत फिरावं. पाभरगडाला परत येऊ कधीतरी. पण हर्षा बोलली, ‘थोडा वेळ बसलो की होईल ठीक.’ मग जरा आराम केला. आणि हर्षाला खरोखर बरं वाटायला लागलं. मग काय? चालायला लागलो पुन्हा – पाभरगडाची पायवाट.
चालताना मागं वळून पाहिलं की विस्तीर्ण पसरलेला भंडारदरा जलाशय दिसत होता. त्यापलीकडे डाव्या बाजूला ‘कळसुबाई शिखर’ खुणावत होतं. मजल-दरमजल करत आम्ही एकदाचे किल्ल्यावर पोहोचलो. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. शांत बसून पाणी प्यायलो, आता कुठं हर्षदाला हायसं वाटत होतं.
गडावर एक शिवलिंग आहे. तिथं पाया पडलो आणि पुढं चालायला लागलो. गडाच्या माथ्यावर पोचलो. या गडावरसुद्धा भैरवनाथाचं मंदिर आहे. मंदिर पाहून पुन्हा चालायला लागलो. पुढं एका टाक्यावर मारुती कोरलेला दिसला. हे शक्तीचं प्रतीक खूपशा किल्ल्यांवर बघायला मिळतं. माथ्यावरून सर्व परिसर बघून आम्ही परत भैरवनाथाच्या मंदिराजवळ पोचलो. तिथं गड पाहायला आलेली दोन माणसं आम्हाला भेटली. एकमेकांची विचारपूस झाली. ती दोघंसुद्धा मुंबईतून आली होती. त्यांची नावं आता आठवत नाहीत; पण आम्हाला या आडवाटेवरच्या किल्ल्यावर आलेलं पाहून त्या दोघांना अप्रुप वाटलं होतं हे नक्की आठवतंय. कुठं राहता ते त्यांनी विचारलं. मी म्हटलं, ‘गिरगावात’. हे ऐकून ते खूश झाले, कारण त्यांचं बालपणसुद्धा गिरगावात गेलं होतं. मग काय? त्यांच्या जुन्या आठवणी निघाल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
काका म्हणाले, ‘जाताना कसे जाणार आहात?’
मी म्हटलं, ‘मिळेल त्या वाहनानं.’
काका म्हणाले, ‘आम्ही कार आणलीये. चला आमच्याबरोबर.’
जरा वेळ गप्पा मारून गड फेरी पूर्ण केली. खाली उतरलो. आणि परतीच्या प्रवासाला लागलो. खरं सांगतो, नशीब की ते काका भेटले. नाहीतर आम्हाला मुंबईत परतायला असला उशीर झाला असता..
कधी कधी आपण ठरवतो काय आणि प्रत्यक्ष घडतं काय! हा संपूर्ण ट्रेकच अनपेक्षित होता, अनोळखी माणसांच्या सोबतीनं भरलेला होता. गंमत असते पण! अशाच भरकटलेल्या वाटांवर कोण-कुठली भटकी माणसं भेटतात, आपली होतात… या माणसांच्या सोबतीनं आपण अनोळखी वाटा तुडवत राहतो… हसत-खेळत सोबत प्रवास करतो… हीच भटकी माणसं मग आपल्याला आपल्या घरीसुद्धा आणून सोडतात… सर्व काही अनपेक्षित!
*
वाचा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
आज दिनांक
कथा
चित्रकथा
कविता
मी मुकुंद रतन मोरे. शाळेपासूनच नाटक आणि चित्रपटांची आवड असल्यामुळं एका खाजगी इन्स्टिट्यूटमधून चित्रपट संकलनाचं शिक्षण घेतलं. संकलक म्हणून काम करत असतानाच 'रॉम कॉम', 'दोस्तीगिरी', 'विडा', 'छत्रपती शासन', 'कलाकेंद्र' अशा काही मराठी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणूनही कामाला सुरुवात केली. 'ओ ला ला', 'निर्मोण' हे गोयेंन या कोकणी चित्रपटांचंसुद्धा कलादिग्दर्शन केलं आहे.
वा… छान लेख … अप्रतिम ….
Nice tracking experience by mukund.
व्वा, मस्त भटकंती!