महाडचे दिवस १२: तिचं पत्रं आलं

सकाळी सकाळी साहेबानी बोलावलं आणि विचारलं,
‘‘जोशी अभ्यास चालू आहे ना? माझ्या पुतण्याचं काल पत्र आलंय, तोही डिप्लोमा करतोय. म्हणत होता परीक्षा तीन आठवड्यावर आलीय. काय तुमचा विषय राहिलाय तो उरकून टाका म्हणजे तुम्हाला जोमानं कामाला लागता येईल. दिवाळी झाली की, आपल्याला सर्व्हेसाठी बाहेर पडायला लागेल. एक काम करा, आज महाडच्या तहसील कार्यालयात त्यांची मीटिंग आहे. मी जाणारच आहे. तुम्हीही चला. तिथं वेगवेगळ्या गावातील तलाठी येतील. त्यांच्या गाठी पडल्या की मागं तुम्ही तुडीलला जाऊन जसा डाटा आणला होता, तसा इतर गावांचा आणता येईल. आणि जमेल तेव्हा पोलादपूरला एक चक्कर मारून या. टोपोशीटप्रमाणे तिथल्या एका पुलावर जी.टी.एस. बेंचमार्क आहे. त्याचं लोकेशन आणि व्हॅल्यू लिहिलीय का बघून घ्या. ठीक आहे.”
बऱ्याच दिवसांनी साहेबांनी मला बोलावलं होतं. एकूण मी तुडीलला जाऊन गोळा केलेला डाटा त्यांना भावला आहे, असं दिसतंय.

मीटिंग पार पडली. साहेबांनी मीटिंगमध्ये साखर-बोरज आणि कोंझर इथं धरणाच्या प्रपोज साईटबद्दल वाच्यता केली. दोन-तीन पुढाऱ्यांनी शंका विचारण्याच्या अविर्भावात विरोधही प्रकट केला. त्यावर सर्व्हे पुरा झाल्याशिवाय मला काही सांगता यायचं नाही असं सांगून साहेबांनी जास्त बोलायचं टाळलं.
मीटिंगहून परत येताना मला म्हणाले,
‘‘हे पुढारी कदाचित तुम्हाला स्वतंत्रपणे गाठून काही विचारतील. तुम्ही काही माहीत नाही, असंच सांगा. फारच मागं लागले तर माझं नाव सांगा. ते आलेच माझ्याकडे तर मी मोकाशीसाहेबांचं नाव सांगीन. उगाच ज्यादा माहिती दिली तर प्रोजेक्टला खो बसेल. ही लोकं कामाला विरोध करायलाच बसलेत. आपल्याला सर्व्हेचं कामदेखील नीट करू देणार नाहीत.”

दादांनी अभ्यासाचा विषय काढला नाही पण साहेबांनी काढला. आता मात्र मला हा विषय ‘विनय जोशी’पाशी काढायला हवा. मी फार आळशी नाही; पण हा विनय जोशी खूप आळशी आहे. त्या बेट्याला यावेळी पास होणं किती महत्त्वाचं आहे, हे समजावून सांगायला हवं.

जवळपास चार दिवस तलाठी लोकांबरोबर होतो. सगळेच सहकार्य करणारे होते. अजून तरी एकही पुढारी ना मला भेटला ना साहेबांना. पोलादपूरचा पूल पाहिला. सुदैवानं त्यावर बेंचमार्क मिळाला आणि त्यावर व्हॅल्यू लिहिलेली देखील दिसली. पाऊस पाचवीला पूजलेलाच होता. माझी पावसाकडे बघायची मानसिकता बदलत होती. मी त्याला स्वीकारलं होतं. मी महाडकर व्हायला लागलो होतो…

ऑफिसमध्ये येणं, बाजारात फिरणं, स्टॅण्डवर जाऊन पेपर आणणं, रूम पार्टनर म्हणून एन. एम. कोल्हे आणि कुरेशी यांच्यातील होऊन जाणं, तरीही अरुणोदय वाचनालयातील पुस्तकं वाचत आपलं वेगळेपण राखणं आणि हो, मुन्नाचं पाट्यावर वाटण वाटत बसणं… हे सगळंच माझ्या अंगवळणी पडत चाललं होतं.

रात्री कोकणेंकडून जेऊन बाहेर पडलो. चव्हाण ‘खोलीवर चल’ म्हणाला म्हणून गेलो. चव्हाण, बीएस, डीजे यांच्याशी गप्पा माराव्या लागल्या. कारण गुजरांच्या घराला कुलूप होतं. या लोकांना धड गप्पा मारता का येत नसाव्यात? कारण शोधत राहिलो. एक कारण सापडलं, वाचन नाही. दुसरं सापडलं, जिज्ञासा नाही. तिसरं.. रस्त्यात कळप करून बसणाऱ्या गुरांची जी जडणघडण असते, तीच यांची होती. मनाला, बुद्धीला ताण द्यायचा नाही, घ्यायचा नाही. ते सुखी आहेत? मी सुखात आहे? या सगळ्या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी त्यांच्याशी बोलत राहिलो, त्यांना बोलतं करत राहिलो. एक गोष्ट लक्षात आली की यांना थोडी किल्ली दिलेली पुरते आणि किल्ली दिलीय, हे समजत नाही.

मला त्यांच्यात तसा रस वाटत नव्हता; पण माझ्या गप्पात त्यांना रस वाटत होता. जोशी तुला किती वेगवेगळी माहिती आहे, हे वाक्य आलटून पालटून मी त्या तिघांकडून ऐकत राहिलो. मला माझ्यातल्या अपूर्णपणाचा विसर पडत राहिला.

या गप्पात रात्रीचे दहा वाजून गेले. त्यांनी आग्रह केला म्हणून तिथंच झोपलो. सकाळ झाली. चव्हाण, बीएस उठलेले दिसले; पण अंथरुणातच होते. गॅलरीत उभा राहिलो. तांबट आळीच्या पिंपळाच्या गणपतीपाशी दोनचार जण नमस्कार करत होते. आत डोकावलं तर डीजेची हालचाल दिसली; पण डोळे मिटलेले. डोळे मिटूनच त्यांनी चादरींची घडी घातली. उशाला ठेवलेल्या तांब्यातून घटाघटा पाणी प्यायलं. आळोखेपिळोखे दिले. हात जोडून काहीतरी पुटपुट केली. कपाळाशी जोडलेले हात नेऊन नमस्काराची तीन आवर्तनं पुरी केली. परंतु हे सगळं डोळे मिटून.

आता त्यांनी उशी उचलली. उशीखालून छोटा आरसा काढला. तो चेहऱ्यापुढं धरला. हेही सगळं डोळे मिटून. आरसा योग्य स्थितीत धरला गेलाय, याची खात्री पटताच डोळे उघडले. आरसा ठेवला आणि मला हाक मारली. मला या कृतींचा अर्थच कळेना. न राहून मी विचारलं, तर माझ्याकडं पाहून निरागस हसत म्हणाला, “ही माझी सवय आहे. काय होतं, दिवसभरात एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते आणि मग आपण म्हणतो की सकाळी कुणाचं तोंड पाहिलं माहीत नाही. ज्याचं पहिल्यांदा तोंड पाहिलेलं असतं त्यांच्याविषयी मनात अढी तयार होते. त्या बिचाऱ्याचा काही दोष नाही, हे माहीत असूनही. आपण पुढच्या सकाळी त्याचं तोंड पाहायचं टाळत राहतो. यापेक्षा मला हे झ्याक वाटतं. आपणच आपलं तोंड आरशात पाहायचं. दिवस चांगला गेला तर बेष्ट.. वाईट गेला तर आपल्यामुळंच गेला. कुणाचं वाईट चिंतायला नको. शिव्याशाप नकोत.

हे तत्त्वज्ञान मूर्खपणाचं आहे, हे मला समजत होतं. त्याला समजावून देऊन काही फायदा नव्हता. या ज्याच्या त्याच्या धारणा होत्या. माझं लहानपण असं गेलं.. त्याचं तसं गेलं. धारणा लहानपणी तयार होतात. श्रद्धा, अंधश्रद्धा या गोष्टी वाद घालायच्या. वाद पूर्ण झाला म्हणून कुणी आपल्या मूळधारणा बदलल्याचं माझ्या अनुभवात नव्हतं. ऐकिवात नव्हतं.

डीजेनी आरशात पाहिलेला स्वतःचा चेहरा… हे मी पाहिलं. माझा दिवस उत्तम गेला. ऑफिस बंद करायच्यावेळी पोस्टमन आला. स्वामींनी पत्र घेतली. ज्याची त्याला दिली. माझ्यापुढं तीन पत्रं ठेवली. मी चमकलो. एकाच दिवशी तीन पत्रं? नजर टाकली. एक होतं दादांचं. दुसरं मुंबईहून अनिल करंदीकरचं. आणि तिसरं होतं.. नीला खानोलकरचं!

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

1 Comment

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :