मराठी साहित्यातले भाऊ – वि. स. खांडेकर

Vi.s.khandekar-quote-2nd-september-death-anniversary-chitraksahre-aj-dinank-jayashri-nagpure-vacha-online-free-download-pdf

खांडेकर हे कुटुंब मूळचं सावंतवाडीचं. तिथल्या भटवाडीत आजही त्या कुटुंबाच्या रहिवासाच्या पाऊलखुणा स्थावराच्या रूपात साक्ष देतात. त्यांचे पूर्वज असलेल्या बळवंतराव खांडेकर यांना एक भाऊ होता – विष्णुशास्त्री. बळवंतराव खांडेकर वकिली करण्यासाठी हुबळी इथं स्थायिक झाले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. मुलाचं नाव आत्माराम होतं. आत्माराम पंधरा वर्षाचे असताना बळवंतरावांचं कॉलरानं निधन झालं. वडील गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आत्माराम यांच्या कोवळ्या खांद्यांवर आली. चरितार्थ करण्यासाठी त्यांच्यापुढं तेव्हा कुठलाही पर्याय नव्हता. त्यामुळे ते परत आपल्या गावी सावंतवाडीला आले. तिथं त्यांचे त्यांच्या काकांशी म्हणजेच विष्णुशास्त्रींशी संपत्तीच्या हक्कावरून मतभेद झाले. त्यामुळे, आत्माराम तिथून बाहेर पडले आणि तडक सांगलीला आले. सांगली गावानं त्यांना आधार दिला. तिथंच त्यांनी शिक्षण पुढं चालू ठेवलं. ते वकील झाले व मुन्सफ बनले. बाबाकाका माईणकर हे दरबारी पुराणिक होते; त्यांची सर्वात धाकटी मुलगी ‘सुंदरी’ हिचा विवाह आत्माराम यांच्याशी झाला. विवाहानंतर ‘सुंदरी’ यांचे नाव बदलून ‘रमाबाई’ ठेवले. आत्माराम आणि रमाबाई यांना तिन मुलं झाली – बळवंत, गणेश व शंकर.

गणेश

गणेशचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगलीमध्ये त्यांच्या आजोळी झाला. त्यांचं घर थेट गणपतीच्या देवळात होतं, म्हणून त्याचं नाव ‘गणेश’ ठेवण्यात आलं. या गणेशचं पूर्ण नाव होतं ‘गणेश आत्माराम खांडेकर’.

लहानपणी तो अतिशय खोडकर होता. इयत्ता तिसरीत गेल्यावर त्याचा मात्र खोडकरपणा कमी झाला आणि त्यानं मन अभ्यासाकडे वळवलं. चांगला अभ्यास करून त्यानं इयत्ता चौथीची तीन रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली. अभ्यासाबरोबरच त्याला कीर्तनं-पुराण यांचा चांगला नाद होता. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी त्याला आणखी दोन छंद जडले. पहिला क्रिकेटचा आणि दुसरा वाचनाचा!

गणेशचं कुटुंब सुखवस्तू होतं. त्याच्या वडिलांची मुलांवर फार माया होती. पण ते वरचेवर आजारी असत. या आजारातच वडलांचं निधन झालं. आणि लहानगा गणेश अतिशय कोवळ्या वयात पोरका झाला. आपल्यावर अपार प्रेम करणारं एक जवळचं माणूस आपल्याला सोडून जातं याचं दुःख कमी नसतं. साहजिकच हा काळ गणेशसाठी अतिशय खडतर होता.

मनाला आलेल्या या पोरकेपणामधून गणेशला नवंच वेड लागलं – नाटकाचं! सांगली ही विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्यासारख्या नाटककारांची नगरी होती. ती त्या काळी महाराष्ट्राची नाट्यपंढरी मानली जायची. ‘शारदा’, ‘भाऊबंदकी’, ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ यासारखी नाटकं गणेशनं लहानपणीच पाहिली. ‘शापसंभ्रम’, ‘शारदा’मधली पदं त्याला तोंडपाठ होती. एकदा ती देवलांना म्हणून दाखवून त्यानं शाबासकीसुद्धा मिळवली होती. या सगळ्या काळामध्ये तो वाचनामध्ये शाळेच्या अभ्यासापेक्षासुद्धा जास्त रमायचा. त्याच्या वाचनाला ‘बकासुरासारखं आहे’ असं म्हटलं जात होतं. अरबी भाषेतल्या सुरस व चमत्कारिक गोष्टी’, दाभोळकर ग्रंथमालेतील स्पेन्सर, मिल इत्यादी, हरिभाऊ आपटे यांच्या कादंबऱ्या, शनिमहात्म्य, नवनीत, वामन पंडित, मोरोपंत यांचं काव्य, केशवसुतांची कविता असं खूप सारं साहित्य त्यानं अल्पवयातच वाहून संपवलं होतं.

तसंच वडलांचं छत्र हरवलेलं असल्यानं घरची परिस्थिती बिकट झाली होती. त्याच्या अंगावरचे कपडे अनेकवेळा फाटके असत. शाळेच्या फी भरायला, पुस्तकं खरेदी करायला पैसे नसत. या काळामध्ये घराला आर्थिक हातभार लागावा यासाठी गणेश संस्कृत, गणिताच्या शिकवण्या घेऊ लागली. या शिकवण्यांमधून हातात येणारी कमाई होती, एक रुपया आठ आणे. त्या काळी ही रक्कम अगदीच लहान नव्हती. गणेशच्या शिकवण्यांमुळे घराला मोठा आधार मिळत होता.

अशा खडतर परिस्थितीमध्येसुद्धा गणेशनं अहमदाबाद, बेळगाव व मुंबई केंद्रांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बारावा क्रमांक पटकावून बाजी मारली. महाराष्ट्रातील (मुंबई इलाखा) विद्यार्थ्यांमध्ये त्याचा क्रमांक आठवा होता. पुढच्या शिक्षणासाठी गणेश पुण्यात आला आणि त्यानं फर्ग्युसन महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. तो वाचन तर लहानपणापासून करतच आला होता; पण इथं त्याचा साहित्याचा परीघ विस्तारला गेला. मित्र बन्याबापू कमतनूरकरांमुळे त्याला नवा मित्र मिळाला – राम गणेश गडकरी. या मित्रानं गणेशला वाचनाचं मार्गदर्शन केलं.

गणेश व राम गडकरी जेव्हा बालगंधर्वांना भेटले, तेव्हा बालगंधर्वांनी गणेशला पाहून प्रश्न केला,
‘मास्तर, हा बरोबरचा मुलगा कोण?’
राम गडकरींचं उत्तर आलं,
“हा कोल्हटकरांच्या गादीचा वारस आहे…”
हीच खरी गणेशची साहित्यिक होण्याची सुरुवात.
अशातच गणेशचा दत्तक विधी सावंतवाडीमधल्या वडिलोपार्जित घरी पार पडला आणि गणेश झाला ‘विष्णू सखाराम खांडेकर’!

पुढची एक-दोन वर्षं तब्बेतीच्या कुरबुरीत गेल्यानंतर मात्र विष्णू सखाराम खांडेकर यांनी म्हणजेच भाऊंनी साहित्य क्षेत्रात सूर मारला. त्यांनी लिहायला सुरुवात केली. त्यांनी लिहिलेलं साहित्य विविध नियतकालिकांमधून प्रकाशित व्हायला लागलं. कथा, कविता, विनोद, परीक्षण, लेख असं त्यांचं लिखाण चौफेर होतं. ‘संगीत रंकाचे राज्य’ हे त्यांचं नाटक पुस्तकरूपानं प्रकाशित झालं. बघता बघता त्यांचं नाव लेखक म्हणून प्रसिद्ध पावलं.

पुढं, शिक्षण संपल्यानंतर भाऊ शिक्षण म्हणून रुजू झाले. मन लावून मुलांना शिकवू लागले. पुढं दत्तक बहिणीच्या सततच्या टुमणं लावण्यामुळे ते लवकरच विवाहबद्ध झाले. कौटुंबिक जबाबदाऱ्या पडल्या, पण त्यातसुद्धा त्यांनी लिखाण चालूच ठेवलं. सोबत समाजकारण होतंच. मिठाच्या सत्याग्रहात ते सक्रिय सहभागी होते.

भाऊ हे फक्त लेखक नव्हते, तर ते एक उत्तम वक्तासुद्धा होते. त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांना वक्ता म्हणून आमंत्रणं यायला लागली. त्याकाळी ‘भारत गौरवमाला’ वाचकांच्या पसंतीला उतरली होती. ‘हृदयाची हाक’ ही त्यांची पहिली कादंबरी १९३० ला प्रकाशित झाली. नियतकालिकांमधलं त्यांचं लिखाण अगदी नियमित चालू होतं.

१०३० ते ३५ हा काळ विशेष महत्वाचा होता. कारण, याच कालखंडात १९३१ मध्ये ‘कांचनमृग’ या कादंबरीनंतर लगेचच त्यांचं ‘गडकरी: व्यक्ती व वाङ्मय’ हे पुस्तक प्रकाशित झालं. लगेचच १९३२ मध्ये त्यांनी लिहिलेलं ‘आगरकर चरित्र’ वाचकांच्या हाती आलं. पुढं ‘उल्का (१९३४), ‘दोन ध्रुव’ (१९२४) या कादंबऱ्या व ‘दत्तक व इतर गोष्टी’ (१९३४) या साहित्यकृतींचं प्रकाशन झालं. यामुळे त्यांची साहित्यिक प्रतिष्ठा चांगलीच उंचावली. त्यांच्या किर्तीमुळे बडोद्याच्या साहित्य संमेलनामधलं ‘कथा विभागा’चं अध्यक्षपद त्यांच्यापर्यंत चालून आलं. आणि पुढं १९३५ साली पहिल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा झाले.

१९३६ ला भाऊंचं चंदेरी दुनियेत पदार्पण झालं. ‘छाया’ या पहिल्या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली आणि हा चित्रपट त्याच वर्षी मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शितसुद्धा झाला. आता भाऊ हे मराठी साहित्य क्षेत्रातलं एक महत्वाचं नाव झालेलं होतं.

भाऊंना एकूण पाच आपत्य – एक मुलगा आणि चार मुली. त्यांचं आपल्या मुलांवर प्रेम होतं. आपलं लेखन, वक्तृत्व, संपादन, संमेलनं, चित्रपट या सगळ्यांमधून ते मोकळा वेळ काढत आणि तो वेळ मुलांबरोबर घालवत. त्यांना गोष्टी सांगत. त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी ते धडपडत.
भाऊ साहित्यिक असले तरी आधी ते एक शिक्षक होते. त्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांना आस्था होती. ते मुलांच्या शिक्षणात सर्वतोपरी मदत करत. त्यांचा सराव करून घेत. मुलींप्रमाणे आपल्या पत्नीनंही शिकावं अशी त्यांची इच्छा होती. पण पत्नी उषाताई यांना संसार सांभाळणं, घर नीटनेटकं ठेवणं, नीटनेटकं राहणं हे अधिक प्रिय होतं. त्या स्वयंपाकात सुगरण होत्या. कुटुंबवत्सल होत्या.
१९५८ साली उषाताईंचं निधन झालं आणि मुलांचा सांभाळ करण्याची पूर्ण जबाबदारी भाऊंवर येऊन पडली.

मराठी साहित्यामध्ये योगदान:

मराठी साहित्याला ‘रूपक कथा’ ही खांडेकरांची देणगी आहे. त्यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला मराठी साहित्याची अभिजात साहित्यकृती म्हणून साहित्य अकादमी (१९६०) व भारतीय ज्ञानपीठ (१९७४) असे मानाचे पुरस्कार लाभले. भाऊंना मिळालेला हा ज्ञानपीठ पुरस्कार महत्वाचा होता. कारण, मराठी साहित्यकृतीला मिळालेला पहिलावहिला ज्ञानपीठ होता. ‘ययाति’ या कादंबरीनं आजसुद्धा सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या मराठी साहित्यकृतींमधलं आपलं स्थान अढळ ठेवलं आहे. भाऊ म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर हे खरोखरीच मराठी साहित्यातलं एक मौलिक रत्न होतं.

*

वाचा
आज दिनांक
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
समाजकारण
कथा
कविता

शब्दांची सावली: अमृता देसर्डा


+ posts

जयश्री नागपुरे या फिल्म व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये गेल्या ९ वर्षांपासून लेखक व क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. टीव्हीसाठी डबिंग स्क्रिप्ट लिहिण्याचा व तसंच चित्रपट परीक्षणं लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे.

1 Comment

  1. Avatar

    खूपच सुंदर माहिती आहे👌🏽👌🏽👍🏻. THANK YOU Dear Writer माहिती share करण्यासाठी. 🙏🏻👌🏽👍🏻💐

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :