सचिन तेंडुलकर एक मॅच पाकिस्तानच्या संघाकडून खेळला होता!

राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त, अशा काही रंजक गोष्टी!
आज दिनांक २९ ऑगस्ट. मेजर ध्यान चंद सिंग या आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातकीर्त असलेल्या हॉकीपटूचा जन्मदिवस. हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय खेळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी विशेष कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना ‘अर्जुन’, ‘द्रोणाचार्य’, ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’नं राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जातं. या दिवसाच्या निमित्तानं एकूणच खेळ जगतामध्ये मुशाफिरी करूया.

खेळ जगतातील गमतीशीर माहिती:

१) सापशिडी, पत्ते तसंच बुद्धिबळ अशा अनेक खेळांचा उगम भारतामध्ये झाल्याचं दिसून येतं. यापैकी, सापशिडी या खेळाचा उगम १३ व्या शतकात झाला. आज आपण त्याला सापशिडी म्हणत असलो तरी हा खेळ टप्प्याटप्प्यावर वेगवेगळ्या नावांनी ओळखला गेला. जसे की ‘परमबंधनम्’, ‘मोक्षपाथ’ इत्यादी. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ‘चेस’लासुद्धा आज आपण बुद्धिबळ म्हणत असलो तरी त्याची जुनी मजेशीर नावं आहेत. जसे की ‘चतुरंग’, ‘चतुरंगम्’ इत्यादी. आज पत्ते खेळणं आणि जुगारबाजी यांचा जवळचा संबंध दिसून येतो. ग्रामीण भागामधल्या अनेक घरांमध्ये लहान मुलांना पत्त्याच्या खेळापासून दूर ठेवलं जातं. परंतु, जुन्या काळाचा आढावा घेतल्यावर हे लक्षात येईल की ‘पत्ते’ या खेळाचा उगम एक कौटुंबिक खेळ म्हणूनच झाला होता.

२) भारतानं ऑलिम्पिक गेम्समध्ये पहिलं पाऊल टाकलं ते १९०० मध्ये. त्या वर्षी नॉर्मन गिल्बर्ट प्रिचर्ड हा ब्रिटिश वंशाचा धावपटू भारताचा प्रतिनिधी म्हणून खेळामध्ये सहभागी झाला होता. या धावपटूनं दोन मेडल्स जिंकून आणून भारताची मोहर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवली होती.

३) हॉकीपटू ध्यान सिंग यांचे वडील ब्रिटिश आर्मीमध्ये सैनिक होते. पहिल्या महायुद्धावरून ते भारतात परत आले तेव्हा ध्यान सिंग १६ वर्षांचे झाले होते. आपला मुलगा वाईट वळणाला लागू नये म्हणून त्यांनी ध्यान सिंग यांना ब्रिटिश आर्मीमध्ये भरती केलं. तिथं ध्यान सिंगांचा हॉकीशी परिचय झाला. ध्यान सिंग यांच्याकडे हॉकी स्टिक नव्हती, त्यामुळं ते झाडाच्या फांदीनं हॉकी खेळत. हे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं पाहिलं आणि त्यांना हॉकी खेळण्यास प्रवृत्त केलं. पुढं ध्यान सिंग राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर हॉकी खेळत गेले आणि बघता बघता १९२२ ते १९४८ या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ४०० पेक्षासुद्धा जास्त गोल केले.

४) ध्यान सिंग यांचं हॉकीवर अपार प्रेम होतं. खेळामध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी ते रात्रीच्या वेळीसुद्धा हॉकीचा सराव करत. त्यांच्या या सवयीमुळं त्यांना त्यांचे सहकारी ‘चंद्र’ म्हणून चिडवत. ‘चंद्र’ म्हणणं हळूहळू रुळत गेलं, ‘चंद्र’चं ‘चंद’ झालं आणि कालांतरानं या ‘चंद’चा ध्यान सिंग यांच्या नावात प्रवेश झाला. तेव्हापासून ‘ध्यान सिंग’ हे ‘ध्यान चंद सिंग’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

५) १९३६ सालचा ऑलिंपिक खेळ विशेष होता. या खेळाचं यजमान राष्ट्र होतं जर्मनी. या खेळाच्या माध्यमातून जर्मनीचा संपूर्ण जगावर प्रभाव पाडण्याची हिटलरची महत्त्वाकांक्षा होती. सगळ्या खेळांमध्ये जर्मनीच पुढं होती, पण हॉकीत मात्र ब्रिटिश-इंडिया पुढं होता. हॉकीचा अंतिम सामना ‘जर्मनी विरुद्ध ब्रिटिश-इंडिया’ असा होता. खास त्या सामन्यासाठी हिटलर स्वतः उपस्थित होता. खेळाच्या मध्यापर्यंत ब्रिटिश-इंडियाला फार जास्त गोल करता आले नव्हते. त्यामुळं हिटलर खुश होता. परंतु खेळाच्या दरम्यान एका जर्मन खेळाडूनं ध्यान चंद यांना हॉकी स्टिकनं मारलं व त्यांचा दात तोडला. खेळाच्या विश्रांतीच्या दरम्यान भारताचे कोच पंकज गुप्ता यांनी ध्यान सिंगांचं मनोबल वाढवलं. खेळाच्या दुसर्‍या टप्प्यात ४-१ अशा पद्धतीनं गोल करत ब्रिटिश-इंडियानं तो सामना जिंकला आणि १९३६ चं ऑलिंपिक गोल्ड मेडल मिळवलं. या खेळानंतर हिटलरनं ध्यान चंद यांच्यासमोर जर्मन सेनेत भरती होण्याचा प्रस्ताव मांडला, पण ध्यान चंद यांनी तो नाकारला.

६) ऑस्ट्रिया देशानं ध्यान सिंग यांचा एक सुंदर पुतळा आपल्या देशात उभारून त्यांचा सन्मान केला. हॉकी खेळणाऱ्या या ध्यान सिंग यांच्या पुतळ्याला चार हात आहेत व त्या चारही हातांमध्ये चार हॉकी स्टिक आहेत. या पुतळ्याला नाव दिलं आहे ‘विझार्ड ऑफ हॉकी’, म्हणजेच ‘हॉकीचा जादूगार’! हा निश्चितच ध्यान सिंग यांचा आणि भारताचा बहुमान आहे.

७) ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू आहेत कर्णम मल्लेश्वरी, तर आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू आहेत कमलजीत संधू.

८) मेरी कोम या आज आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मुष्टीयोद्धा असल्या तरी सुरुवातीच्या काळात त्यांच्या खेळण्याला घरून विरोध होता. मुष्टीयुद्ध म्हणजेच बॉक्सिंग हा मुलींनी खेळण्याचा खेळ नाही, हा पक्का समज त्या काळात होता. म्हणूनच मेरी यांनी घरी न कळवताच लपूनछपून बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता त्या मणिपूर राज्याची चॅम्पियनशिप जिंकल्या आणि त्यांचा वर्तमानपत्रात फोटो छापून आला. तो फोटो त्यांच्या वडलांनी पाहिला तेव्हा त्यांना मेरीच्या खेळाविषयी प्रथमच कळलं.

९) मूळच्या केरळच्या असलेल्या पी. टी. उषा या अतिशय गरीब घरात जन्मल्या होत्या. दोन वेळच्या खाण्याची जिथं ददात होती, तिथं खेळासारख्या क्षेत्रात करिअर करणं जवळपास अशक्य होतं. अशात खेळाच्या एका स्कॉलरशीपचा त्यांना आधार मिळाला आणि त्यांनी खेळायला सुरुवात केली. आज त्या ‘धावपट्टीची राणी’ म्हणून ओळखल्या जात असल्या तरी ज्या स्कॉलरशिपनं त्यांना आधार दिला ती स्कॉलरशिप होती अवघ्या २५० रुपयांची.

१०) १९८७ सालच्या एका टेस्ट सिरीजमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना चालू होता. इम्रान खान पाकिस्तान टीमचे कॅप्टन होते. त्यांच्या टीमला तेव्हा एका फिल्डरची आवश्यकता होती; म्हणून अवघं १३ वर्षं वय असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी त्या सामन्यामध्ये पाकिस्तान टीमसाठी फिल्डिंग करण्याचं काम केलं होतं.

(संकलन संदर्भ : इंटरनेटवरील माहितीवरून)

*

वाचा
आज दिनांक

समाजकारण
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
कथा
कविता


+ posts

जयश्री नागपुरे या फिल्म व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये गेल्या ९ वर्षांपासून लेखक व क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. टीव्हीसाठी डबिंग स्क्रिप्ट लिहिण्याचा व तसंच चित्रपट परीक्षणं लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे.

3 Comments

  1. Avatar

    Great Information 👌🏽👌🏽👍🏻. This information is very helpful to improve our general knowledge👌🏽👍🏻… I like this Article 👍🏻. & Also THANK YOU SO MUCH to WRITER for sharing this information to us🙏🏻👍🏻. 👏🏼👏🏼👌🏽👍🏻💐

  2. Avatar

    खूप छान माहितीपूर्ण लेख

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :