चिमणी घरं

chitrakshare-marathi-katha-parameshwar-mali-chimani-ghara-goshta-creations-saarad-majkur-henry-unsplash

दिवाळीनिमित्त आग्रहास्तव एक दिवस मुक्कामी मित्राच्या गावी गेलो होतो. मोठ्या शहरांच्या वर्दळीपासून दूर असलेलं ते २ हजार लोक वस्तीचं गाव. मुख्य रस्त्यापासुन थोडसं आतमध्ये. गाडीतळाकडं जाताना सध्या झालेली नवीन घरं आणि प्लॉटिंग पडलेली दिसत होती. फाट्यावर उतरून बोलत-बोलत आम्ही गावठाणात पोहचलो. गावं तसं चांगलं आणि जुनच होतं. गावाला जुनी पडकी वेस होती. तिथुन पुढं वेगवेगळ्या गल्लीत पाण्याची सोय म्हणून मोटेच्या विहिरी, आड आणि बारवा होत्या. बरेच जुने पडके वाडे होते. मित्राचं घरही असाच एक जुना वाडा होता. चिरेबंदी दगडाचं प्रवेशद्वार, वाड्याला जुन्या पद्धतीची कवाडं, त्याला बाहेरून अनकुचीदार खिळे आणि कड्या-कोंड्या लावलेल्या. दरवाजाला लागुनच ४ खनी माळवदाची ढाळज. ढाळजेच्या एका बाजुला शेतातील बारदानं आणि धान्याची पोती होती तर दुसरी बाजु बैठक खोली म्हणुन वापरात असलेली. भिंतीला जुन्या प्रकारच्या देवळ्या आणि खिडक्या होत्या. एका खिडकीतून प्रकाशाचे कवडसे आत आले होते. वाड्याच्या आत स्वयंपाक खोली आणि माजघर होते. खोल्या सगळ्या माती आणि दगडाच्या बांधकाम केलेल्या होत्या. परवर मातीचाच होता आणि वरून पत्रे. एका बाजुस सार्वजनिक न्हाणी आणि बाजुला तिथंच नव्या पद्धतीनं बांधलेले दोन संडास आणि तिथंच पाणी तापवण्याचा बंब. वाड्याचा एक कोपरा ढासळलेला. मध्यभागी दोन तुळशी वृंदावनं. वाड्यात चिमण्यांचा वावर होता. मी ढाळजातल्या बोळीत चप्पल सोडली आणि चिमणीची घरं शोधत आत आलो. मित्रानं वाड्याच्या डाव्या बाजुला असलेल्या घरात बोलावलं. मित्राच्या आईसाहेबांनी एका मोठ्या रांजणातून हात-पाय धुण्यासाठी बादलीत पाणी काढून दिलं. मी हात-पाय धुतले आणि आत आलो. आत येताच त्यांनी तांब्यात प्यायला माठातील थंड पाणी दिलं आणि काकूंनी मला बजावून ठेवलं,
“तु मला माझ्या मुलासारखाच आहेस. त्यामुळं पाहुण्यासारखा वागू नगस. तुला जे पाहिजे ते हातानं घे आणि तरी बी काही अडलं-नडल तर मला विचार.”
मी ‘हो’ म्हणत मान हलवली. त्यांच्या पाया पडायला म्हणून खाली वाकलो पण त्यांनी दर्शन घेऊ दिलं नाही. मला माझ्या घरी आल्यासारखं वाटत होतं.

आम्ही उरकलं आणि शेताकडं निघालो, तर आईसाहेब मित्राला मोठ्या आवाजात म्हणाल्या,
“कडुसं पडायच्या आत घरी या. कुटं पण हुंदडत बसु नका. पार माळापतूर जाऊ नका. खालच्या शेतातच तेवढं जाऊन या. आन् प्रमोदला लांब कांड्याच्या उसाची टिपरी काढून दे खायला कोट्याजवळच्या फडातली. तवर मी सांच्याला ठेचा, भाकरी आणि पिठलं करून ठिवते आणि शिवारावरून येताना दोघ बी गाव देवीचं दर्शन घेऊन या, न विसरता.”

त्यानं आईकडं न बघताच ‘व्हय’ म्हणलं. कदाचित असं बजावून सांगणं त्याला नवीन नसावं. मी काकुंकडं बघत मान हलवली. त्यानं सायकलवर टांग मारली आणि मला कॅरेजवर बसायला सांगितलं. गावचा शिवार दाखवत त्याचं बोलणं चालुच होतं. मी मात्र टेहळणी करत होतो. गावाचा शिवार, डोंगर-डगरी, ओढा, नद्या, नाले.. सगळं हिरवंगार दिसत होतं.  
“औंधा पाऊस चिक्कार झाला, पीकं जोरात येणार. चांगला उतार पडल वाटतंय आणि घरी टँकरनं पाणी भरण्याची वेळ बी नाय येणार गावावर,” असा तो धापा देत आणि सुस्कारा सोडत म्हणत होता.

येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांची ओळख करून देत होता. मी सारं ऐकत होतो, पहात होतो आणि साठवत होतो डोळ्याच्या खाचात. या शिवारात, या गावात मी माझा गाव आणि शेत-शिवार आठवत होतो. माझ्यासाठी आज तो त्याचा गावचा वाटाड्या होता आणि मी त्याचा पहिला कस्टंबर-मित्र, असंच काहीतरी. त्याचवेळी मला इंद्रजित भालेरावांची कविता आठवली,

‘काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता,
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता
कशी उन्हात, उन्हात तळतात माणसं
कशी मातीत, मातीत मळतात माणसं
कशी खातात जिवाला खस्ता,
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’

आम्ही ऐका कोट्याजवळ येऊन थांबलो. त्यानं सायकल मेडीला टेकुन लावली आणि नदीच्या तुकड्यात बांधानं निघालो. तो हातानं इशारे करत त्याच्या चुलत्याचं, भावकीचं, त्याचा गावातल्या जवळच्या मित्राचं आणि त्याचं शेत दाखवत होता. आम्ही उसाच्या फडाजवळ येऊन थांबलो. सराईत शेतकऱ्यांप्रमाणे स्वतः फडात जाऊन ऊस निवडला, मोडला आणि खायला चालु केला. तो बोलतच होता. आता तो खुपच गंभीर दिसत होता. भावकीची उनी-धुनी सांगत होता. म्हणत होता,
“एक वेळ परका माणुस परवडला पण गरज पडली तर कापल्या करंगळीवर पण मुत म्हणलं तर मुतनार नाय, अशी ही भावकी.”

तो लहान असताना, त्याचे वडील वारल्यानंतर वडिलांची जमीन बहिणींच्या लग्नाचं कारण सांगून कशी ह्यांनी विकली आणि ढापली, हे तो रंजकपणे सांगत होता. त्याचा आवाज कातर झाला होता, डोळे पानावले होते. तो बैलगाडीच्या दांडीवर खाली मान खालुन बसला होता. मी ऊस खाणं सोडुन दिलं आणि त्याचं सांत्वन केलं. बोललो,
“हे बघ, गाव म्हणलं की ह्या गोष्टी आल्याच. पाची बोटं कुटं सारखी असतात का? तु पहिला आईचा विचार करत जा. तुझं काम आहे आईला धीर देणं. तुझ्याचसाठी ती दिनरात खस्ता खातेय, तिला जप.”

एव्हाना दिवस मावळत आला होता. पक्षांचा किलबिलाट आणि रातकिड्यांची किर-किर वाढली होती. मावळतीला गेलेल्या सूर्याच्या किरणांनी ढगांवर पडलेल्या उजेडानं शिवारभर लाल, तांबुस, केशरी रंग पसरल्यासारखं जाणवत होतं. बाया-बापुड्यांची, शेळ्या-मेंढ्यांची गावाकडं जाण्याच्या रस्त्यावर लगबग वाढली होती. मध्येच गायीचं हंबरणं ऐकु येत होतं. आम्ही पटकन वर आलो. त्यानं उसाच्या दंडाला लावलेलं दोन-चार पातीचं कांदं  आणि माळव्यातली थोडीशी कोथिंबीर काढून रुमालात बांधली. मी ते जुटं हातात घेतलं आणि लगबगीनं घराकडं निघालो. गावाकडं जाणाऱ्या बैलगाडीच्या चाकाला लावलेल्या घुंघराचा आवाज अख्ख्या बारल्यात घुमत होता. बैलगाडीचं चाक फिरावं तसं डोक्यातल्या विचाराचं जातं फिरत होतं.

आम्ही मधल्या पांदीतल्या वाटेनं घराजवळ पोहोचलो तर आईसाहेब वाटेकडं नजर लावुन दारात येऊन बसलेल्या. आम्हाला पाहताच म्हणाल्या,
“किती वेळ झालं वाट बघतेया, एव्हढा उशीर करायचा असतो का? तिन्ही सांज झाली.”

त्यानं काहीतरी कारणं सांगितलं आणि घरात आला. मोबाईल चार्जिंगला लावला आणि हात धुवून आम्ही जेवायला बसलो. काकूंनी आधीच बसायला पाट टाकला होता. मी पाट नको म्हणलं बसायला. खाली बसुनच जेवायला बरं वाटतं. आज बेत फक्कड होता. मी आलकून-पालकून जेवायला बसलो. चुलीवरचं पिठलं-भाकरी खाण्याची चवच न्यारी! खुप दिवसांनी मी चुरून जेवण केलं होतं.

आमची जेवणं झाल्यावर काकू जेवण करायला बसल्या. असं का? मी विचारलं. तर म्हणाल्या,
“सवयच लागलीये सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवण करायची.”

मित्र खुपच थकला होता. जेवण केल्यावर त्यानं लगेच ताणुन दिली. त्याची ही एक पहिल्यापासूनची सवय होती. डोळा झाकला की लगेच झोपी जाणार. काकू झोपण्याच्या तयारीत होत्या आणि मी आपलं मोबाईल डिवचत बसलेलो. घडीभरानंतर काकू बोलल्या,
“प्रमोद, असाच जागा राहतोस का रोज? झोपत जा लवकर आन् सारखं त्या आंब्याच्या कोईला काय डिवचत बसायचं?”
मला कळेना आंब्याची कोय? नंतर लगेच जाणवलं मोबाईलला म्हणत्यात त्या. मी लगेच मोबाईल बाजुला ठेवला. वाकळ पांघरून पडलो, पण झोप काय येईना. मी आडुकडं पाहिलं तर मोठ्या शिक्यावर हंड्याच्या आकाराच्या तीन वस्तु होत्या. मी न राहवून विचारलं,
“हे काय आहे?”
त्या एक अंगु झाल्या. त्या वस्तुकडं पाहिलं आणि म्हणाल्या,
“सळद हाय ते. माझ्या वडिलांनी लग्नाच्या वेळेस दिल्या होत्या. शेणानं लिपल्यामुळं इतक्या दिवस टिकल्या आहेत. त्यातल्या एका सळदेत कुरवड्या, दुसऱ्यात पापड्या आणि तिसऱ्यात लक्ष्म्या आहेत. वरून झाकण लावुन त्याला शेणानं लिपलंय. त्यामुळं त्याला किड लागत नाही आणि कुरवाड्या सादळत नाहीत.”
“एवढा जुना कंदील कशाला ठेवलाय तिथं?” मी काय बोलावं म्हणुन विचारलं, तर काकू थोड्या भावूक होऊन म्हणाल्या,
“ह्याचा बाप रात्री शेताला जाताना कंदील घेऊन जायचा. हा लहान होता. रांगत असंल. तव्हा पिऊन वारले.”
मी उगाच विचारलं असं मनात वाटलं. पुढं त्या म्हणाल्या,
“आमचं एकत्र कुटुंब होतं. २०-२२ माणसांचं खटलं होतं, पण नंतर किल्लारीचा भुकंप झाला आणि वाड्याला तडे गेले. तो वाड्याचा कोपरा तेवढा ढासळला तो तसाच पडलेला आहे. आम्ही वाचलो पण माहेरची बरीच माणसं भूकंपात गेली. माकनीपासुन जवळच माहेर होतं माझं. इकडं हादरा कमी झाल्यामुळं आम्ही वाचलो. पण लोक वाडे सोडुन शेतांनी राहायला गेले. आमचे एक दिर लातुरला राहायला गेले आणि तिथंच स्थायीक झाले. दुसरे दिर शेजारी वायलं राहतात.”

वाहत्या पाण्याला दंड घालावा आणि पाणी तुबावं तसं काकूंनी अवंडा गिळत डोळ्यात येणार पाणी थांबवलं. मला ते जाणवलं पण काय बोलावं याचा विचार करत परत बोललो,
“असंय का.. म्हणुन वाड्यात दोन संडास आणि दोन तुळशी वृंदावन आहेत का?” मी सहजच विचारलं, “आणि ताईंची लग्नं?” 
“मीच केली. चारी कोनी मजुरी करत मीच लेकरांना जगवलं. मोठं केलं. शाळा शिकवली. तीन पोरींची लग्न लावून दिली आणि आता हे शेंडेफळ राहिलंय. जशा पोरी वयात आल्या तसं लै जीवाला घोर लागलेला. त्यात मी बाईमाणुस. आमचं कोण ऐकणार? धाराशिवाला राहत्यात त्या दिरानी लग्न करून द्यायला मदत केली. मदत कसली शेत इकलं आमच्या वाटनीचं. कवडीमोल किमतीत गेलं शेत. ती येळ मारून नेली त्या वक्ताला पण आता त्या जमिनीची किंमत मस करोडच्या वर गेलीया म्हनं.”
मी गप्प बसुन ऐकत होतो. ऐकण्यात एक कुतूहल होतं, जिज्ञासा होती आणि वंगाळ पण वाटत होतं.
“जाऊ दया झालं गेलं पण ताईंचं चांगलं झालं ना?”
काकू थोड्या उल्हासित होऊन बोलल्या,
“व्हय, त्यांचं चांगलं बघुन जिवाला दिलासा वाटतोय. नातवांड अंगा-खंदयावर खेळतात. इंग्रजीत कायनू-बायनू बोलत राहतात. आमचं जुनं शिकशान, नवं काय समजत नाही पण बरं वाटतं.”
वेळेचं भान राखत त्या म्हणाल्या,
“झोप आता. आसच बोलत राहिलं तर कोंबडं आरवल थोड्या वेळानी.”
मी ‘बरं’ म्हणत वाकळत घुसलो ते अनेक अघटीत घटना, भोग, यातना आणि संकटांच्या वावटळीत त्या माऊलीच्या कैफियतेचा शोध घेत.

सुरक्षित आयुष्याच्या मागे धावणारा मी. भोपळ्यातल्या आलादी बियासारखं कायम जगत आलो होतो. माझ्या सुखाच्या कल्पना या काकूंच्या वास्तवातल्या कल्पनेपेक्षा खुपच वेगळ्या होत्या. यातलं योग्य काय? आणि कशासाठी?

ती संपुर्ण रात्र मन आणि विचार यांच्या संघर्षात गेली. रात्रभर आत्मचिंतनाच्या भुमीवर मनातल्या विचारांनी खैदोळ घातला. मी आठवत राहिलो एक-एक बोल. तोलत राहिलो त्या बोलांना भीमराव गोपनारायण यांच्या कवितेच्या शब्दात,

‘असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती.
माझी आई म्हणते चार भिंतीचं घर मी एकटी चालवते.’

अशा अनेक माय-माऊल्या असतील महाराष्ट्रातील गावागावात, ज्यांचं जगणं म्हणजे जीवनजाणिवेचा जिताजागता आलेख आहे. विचारांच्या गराड्यात कधी पहाट झाली कळालंच नाही. काकूंनी पाणी तापवुन ठेवलं होतं. आम्ही अंघोळ केली. पोह्याचा नाष्टा खाल्ला. काकूच्या पाया पडलो. नतमस्तक व्हावं असे पाय हल्ली भेटतात तरी कुठं? आणि परतीचा निरोप घेतला. काकू लगबगीनं आतल्या घरात गेल्या आणि दिवाळीच्या पदार्थांची एक पिशवी भरून घेऊन आल्या. ती पिशवी माझ्या हातात ठेवत म्हणाल्या,
“रूमवर सगळी पोरं मिळुन खा.”

मी आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर जीवनातले वेगवेगळे अविष्कार शोधत भरलेली पिशवी घेऊन जड पावलांनी परत पुण्याला चाललो होतो.

*

वाचा
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कविता


+ posts

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :