सलूनमध्ये हरघडी न्यूज मिळतात. या न्यूज ऐकताना कान तृप्त होतात (मळाची तमा न बाळगता). मला नेहमी प्रश्न पडतो, हे सलूनमधले केशतज्ञ यांना या बातम्या मिळतात कुठून? यांची काही वेगळी गुप्त यंत्रणा आहे का? की ट्रम्पसारखा कुणी यांना विदाऊट कैची ऑपरेट तर करत नाही ना? डोक्यात फंगस व्हावं, तसे हे प्रश्न विचारांचं वादळ बनून डोकं खाजवत ठेवतात.
मला मात्र पत्रकार म्हणून या सलूनचा अचंबा वाटतो. इथं कुठलेही विषय गुटखा चघळावा अशा शैलीत थुंकून तोंडावेगळा करतात.
निवडणूक काळात तर गूगलची आयझेड करणारी माहिती यांच्याकडे मुद्देसूद असते. एकदा आडवारी (रविवार सोडून इतर वाराला ‘आडवार’ म्हणतात. कृपया, हा शब्द शोधण्यासाठी विश्वकोशाच्या नादी लागून तुमचा फालतूचा वेळ वाया घालवू नये.) सलूनमध्ये जाऊन बसलो. मला पाहताच एकजण पुढं आला.
‘दाढी की केस?’
‘केस.’
‘बारीक करायचे आहेत?’
तिथं एक विशीचा पोरगा बसला होता. त्यानं भाऊ कदम स्टाईल ‘पंच’ मारला.
‘काका, सलूनमध्ये केस कटिंग केल्यावर बारीकच होतात. काय जोक मारता तुम्ही?’ त्याच्या या कमेंटनं केशतज्ञ भावकी हसली.
साथीदारानं हसण्याच्या नादात कैचीनं एका ग्राहकाची मिशी डाव्या बाजूनं जास्त उडवली. ग्राहकानं हसू दाबत दम भरला.
‘दादा, माझ्या बायकोचा माझ्या मिशीवर फार जीव आहे. तिला डावं-उजवं खपत नाही. आता उजवीकडे लेव्हल करा.’
केशतज्ञ शरमिंदा झाला.
‘सॉरी साहेब.’
‘वेळ लागेल का?’ माझा प्रश्न.
‘नाही. दोन मिनिटात ही चेअर खाली होईल. तिथं बसा. दाढीपण करून घ्या. दोन्ही मिळून फक्त १३० रुपये. फेशिअल, मसाज करून घ्या.’
मोबाईल कंपन्या जशा कॉम्बो ऑफर तोंडावर फेकतात, तितक्याच सराईतपणे तो बोलला.
चेअर रिकामी झाली. आणि बसलो.
पुन्हा अगोदरचा प्रश्न, ‘केस-दाढी दोन्ही करू का?’
मंदीची झुळूक सलूनमध्ये आली असावी. म्हणून मी थोर समाज सेवकांच्या थाटात फर्मान सोडलं (हळू आवाजात).
‘केस, दाढी दोन्ही करा.’
माझी ही ऑफर ऐकून केशतज्ञ आनंदित झाला. त्यानं हत्यारं परजली.
गळ्याला कापड गुंडाळलं. बागेत झारीनं पाणी घालावं, असे तुषार केसभर उडाले.
मग हळूच तोच सांगू लागला –
‘साहेब, इलेक्शनचा कंटाळा आलाय. जो तो उड्या मारतोय. माकडासारखा. याला काय अर्थ? डर्टी पॉलिटिक्स.’
‘तुम्हाला कुठली पार्टी आवडते?’ माझा प्रश्न.
त्यानं हातानं इशारा करून अंगठा दाखवला. दारू पिण्याची ती खूण होती.
‘नेहमी घेता का? तुम्हाला कसं परवडतं?’
त्यानं हा चाणाक्ष प्रश्न टाळला. विषय बदलून म्हणाला, ‘तुमच्याकडे काय भाव आहे वन बी एच के?’
‘माझ्या एरियात ६० लाख जाईल. रिसेलमध्ये.’
‘काय पण भाव सांगतात लोकं. मी याच वर्षी दोन फ्लॅट विकले. ४०-४० मध्ये. पेपरमध्ये गडबड होती. पण पार्टी घाईवर. दिलं धक्क्याला लावून. आपले दोन टक्के सुटले ना साहेब. पोराला गावी आमदार करणार. देवीला तसं साकडं घातलंय. पॉलिटिक्समध्ये खूप ‘मनी’ लागतो. ती लायकी बघून तिकीट देतात. आपण पोरासाठी सगळं मॅनेज करणार!’
कैची तालावर फिरवत केस उडवत होता. १५ मिनिटात केस भादरणं आणि १० मिनिटात दाढी. हे यांचं पक्कं गणित. यात कुठलाही वयोगट आडवा येत नाही.
हत्यारं, सामग्री अपडेट, क्रीम, लोशन, पावडरी, कंगवे अशी बरीच खरीच साधनं वापरून यांची साधना चालत असते. आरशात स्वतःला पाहत होतो. आतल्या आत बोलत होतो. एखादं वाक्य बोलताना लांब झालं की, माझेच केस तोंडात जायला नको, या भीतीपोटी छोटी वाक्यं वापरून संवाद करत होतो. रेडिओवरची गाणी मनाला रिझवत होती. डोक्यात शाळेत असताना मुलं टपल्या मारायची. हेच तो करू लागला. मुकाट सहन केलं. कुठलं तरी ऑइल बदाबदा ओतलं. मालिश केलं. दोन बोटात केस धरून उपटाउपटी केली. इतक्यात त्याचा मोबाइल वाजला.
‘गावचा फोन आहे.’ असे सांगून तो बाहेर गेला.
मग दुसऱ्यानं माझा ताबा घेतला. दाढीकाम सुरु झालं. पुन्हा गळ्याला नॅपकिन लपेटला. चेहऱ्यावर क्रीमनं फेस जमा झाला. एक जाडसर फेस ओठांवर आदळला. आपसूक जीभ ओठांवर फिरली. कडू कडू चव होती.
माझा चेहरा आरशात पाहत केशतज्ञ म्हणाला, ‘साहेब, सॉरी.’
असं बोलून त्यानं हलकेच ओठांवर बोट फिरवून वेगळं फिलिंग दिलं. नकळत. असो.
‘साहेब, दाढी घरी करता का?’ हा कॉमन प्रश्न होता. पण काही काही सलूनवाले तुम्हाला असे छोटे छोटे प्रश्न सहज विचारून डेटा गोळा करतात. आणि जशी रिक्वायरमेंट असेल तसा सप्लाय करतात. असे अनुभव मित्रांच्या गाठीशी होते. त्यापासून सावध राहत म्हटलं –
‘हो, घरीच करतो.’
‘खरखरीत लागते दाढी म्हणून विचारलं.’
मी गप्प.
त्यानं कुशलतेनं दाढी कटिंग केली. १० मिनिटात. गर्दी वाढली होती. याचा अंदाज घेत त्यानं वेगही वाढवला होता. मलाही आता घाई झाली होती. मस्त लोशन-पावडर लावून दाढी तुळतुळीत केली. मी थँक्स म्हणत कटिंगची रक्कम अदा केली. त्यानं २०० च्या नोटेतून ५० ची नोट परत केली. ते पाहून मी म्हणालो –
‘अजून २० रुपये?’
‘साहेब, केस-दाढीची मिळून दोघांची टीप. जोडीदाराला दहा देणार. आपण बेईमानी करणार नाही. साहेब, पोराची शपथ.’
मी सर्द झालो. हे काय नवीन? सगळेच लुटायला बसलेत. न राहवून विचारलं –
‘दादा, सगळ्यांकडून कलेक्शन करता का? की माझी स्पेशल केस आहे?’
‘नाही. बंधुभाव जपतो आम्ही. केसाने गळा कापणारी अवलाद नाही ही. विश्वास ठेवा. सगळ्यांना एकच रुल!’
एसीत बसलेला हा धक्का होता.
‘पण ही लुटालूट आहे.’ मी रागात म्हटलं.
त्यानं उत्तर दिलं,
‘साहेब, बाजारात मंदी आहे. काही तरी तोडगा काढावाच लागेल. आमचं दुःख तुम्हीच समजू शकता.’
*
राजेश दाभोलकर हे ज्येष्ठ पत्रकार असून मुंबई पुण्यनगरीमध्ये ते कार्यरत आहेत. गंभीरपणे विनोदी लेखन करणं हा त्यांचा स्थायीभाव आहे...
मंदीचे सावट सर्वांना जाणवतेय .. पण दहा दहा रुपये टीप घेणार आणि 40 – 40 ला दोन फ्लॅट विकून आमदारकीसाठी मॅनेज करणार !! ही फोडणी चुरचुरीत होती ! ! 😁