तब्बल ३० वर्षांनंतर त्यांनी भेटायचं ठरवलं. सगळे शाळेतले दोस्त. स्ट्रगल संपत आलेलं. तारीख जसजशी जवळ येऊ लागली तशी रम्याची झोप ‘तळमळ’ फेजमध्ये आली. रम्या, त्या टायमाचा अनिल कपूर. भरपूर केस त्याच्या अंगावर. अस्वलानं उसने मागावेत, इतपत दाट! पोरं सांगायची. अशी केसाळ पोरं सेक्सी असतात. पंधरा-साडे पंधरा, सोळा वयातला हा माहितीचा अंकुर. जो तो थेअरी जमवण्याचा आटापिटा करण्यात मश्गुल.
रम्यानं हल्लीच मिलिंद बोकील यांची ‘शाळा’ कादंबरी वाचली. किती वेळा? नाही सांगता येणार तुम्हाला… प्रत्येक वेळी फिलिंग वेगळं. त्याचवेळी त्याच्या मनात ‘ती’ रेंगाळत राहिली…
बेबी नावानं ती फेमस. रम्याच्या बाजूच्या वर्गात बसायची. रम्या तास सुरू झाला तरी तिच्या वर्गात मनानं रेंगाळत राहायचा.
एकदा तर ठाकूरबाईंनी त्याला डस्टर फेकून मारला. तरीसुद्धा रम्याची निष्ठा ढळली नाही.
बेबी आपल्याला आवडायला लागली आहे, हे त्याला कुणाला तरी सांगायचं होतं.
दुसऱ्या दिवशी त्यानं दत्तूला वडापावच्या गाडीवर नेलं.
‘रम्या, आज काय बापाच्या लेंग्यात लॉटरी लागली की काय?’
‘अरे दत्तू, तू आपला खास दोस्त. मूड झाला. म्हटलं चला, आज दत्तूला वडापाव चारू या? मिरची तिखट चालेल ना?’
असं म्हणत- रम्यानं दोन वडापावची ऑर्डर दिली. वडे कढईत तळले जात होते. तोवर थोडा वेळ हाताशी आहे, याचा अंदाज घेऊन रम्यानं टेप लावली.
‘दत्तू, तू त्या बेबीला ओळखतो का?’
दत्तूनं रम्याकडे पाहिलं.
‘एवढा काय विचार करतोस, दत्तू.. नसेल माहीत तर नाय म्हणून सांग.’
‘ओळखतो. तिच्या आणि माझ्या घरात एकच भिंत मध्ये आहे.’
‘म्हणजे मला मिळालेली पक्की खबर आहे.’
‘रम्या, कसली खबर आणि तू बेबीबद्दल बोलायला मला वडापाव चारत असशील तर तो मला पचायचा नाही.’
आयला हा तर लय हेकडी निघाला राव. ऑर्डर करायच्या अगोदर हे कळलं असतं तर पैसे वाचले असते. असो. आता माघार नाही. भिंतीच्या पलीकडचं काय काय असतं, ते गोड बोलून काढता येईल. इतक्यात घाई नको. आई म्हणायची गरम गरम खाल्लं की, तोंड पोळतं; हा कानमंत्र लक्षात ठेवून त्यानं विषय बदलला.
‘हे घे.’ असं म्हणत त्यानं दत्तूला वडापाव ऑफर केला. ‘खा. बिनधास्त. अजून खाऊ शकतो आपण. पैशाचं टेन्शन नको.’
दत्तू मोठे मोठे चावे घेत होता. वडापाव त्याचं ऑल टाइम फेवरीट फूड.
त्याच्या खाण्याकडे बघत असताना रम्याचा अर्धा वडा पावातून मुसंडी मारून टुणकन खाली पडला. हे पाहून दत्तू हसला. राग आला होता. पण भिंतीचा विचार आला नि गिळला, ‘हवा का अजून एक?’
‘नको. पोट भरलं.’ असं म्हणत त्यानं मस्त ढेकर दिली.
दोघं घरी परतू लागले. इथल्या तिथल्या वायफळ गप्पा करत करत. रम्यानं संयम ठेवला. त्याच्या डोक्यात एकच. बेबीला कसं गाठायचं. ते फिलिंग-बिलिंग झोपू देत नव्हतं. पिंट्याला बेबीची माहिती गोळा करण्यासाठी आव्हान देण्यात आलं. आता मोहीम फत्ते होणार, अशा आनंदाच्या उकळ्या रम्याला फुटू लागल्या.
मधे काही दिवस गेले. घरी लोच्या झाला होता. त्यामुळे रम्या डिस्टर्ब होता. वर्गात शांत बसू लागला. अभ्यासात लक्ष देऊ लागला. त्याचा हा बदल दत्तू, पिंट्याला जाम भारी वाटू लागला. इतक्यात ओमला खुजली आली. त्यानं रम्याची एकाग्रता भंग व्हावी, म्हणून पैज लावली. जो कुणी बेबीला कुल्फी खिलवेल, त्याला माझ्याकडून १०० रुपये बक्षीस. मित्राची इज्जत राखण्यासाठी दत्तू आणि पिंट्यानं हे आव्हान स्वीकारलं. आणि ते जिंकले. बेबी कुल्फीला हावरट. तिनं आनंदानं कुल्फी खाल्ली आणि चुपून चुपून काडी जोरात फेकली. ती काडी जाऊन पडली, रम्याच्या अंगावर. ती उष्टी काडी त्यानं आजपर्यंत जपून ठेवली…
काडी काडी जमवून लोकं संसार करतात. पण, रम्याच्या आयुष्यात या काडीला वेगळं स्थान आहे.
गेट टूगेदरला शाळेचे मित्र भेटणार. धम्माल येणार.
तोही रोमांचित झाला होता. त्यानं सगळ्या मीटिंगा त्या दिवशीच्या कॅन्सल केल्या.
बायकोनं विचारलं –
‘२० तारखेला विशेष काही आहे का?’ तिनं रम्याचं बोलणं चोरून ऐकलं होतं.
‘शाळेतले मित्र भेटणार आहेत, त्या दिवशी.’
‘ओके. भेटा. मस्त एन्जॉय करा. फोटोबिटो घ्या. बघू, कसे दिसतात, तुमचे फ्रेण्ड.’
आता दोनच दिवस राहिले होते. सगळे भेटणार. दत्तू, पिंट्या, सुरेश, महेश, स्वाती, सुरेखा आणि… बेबीसुद्धा!
ऑफिस वरून लवकर आला. थकल्यासारखं झालं होतं त्याला.
बायकोनं चहा देऊ का विचारलं. तर नाही म्हणाला. वॉश घेतला. कपडे चेंज केले आणि तो बेडरूममध्ये आडवा झाला. घट्ट डोळे मिटले त्यानं. इतक्यात मोबाइलची रिंग वाजली. त्याने कंटाळत फोन उचलला…
‘हॅलो कोण?’
……
‘हॅलो, कोण पाहिजे?’
‘रमेश पांडुरंग कोलते?
‘बोला, बोलतोय…’
पलीकडचा आवाज पंधरा, साडेपंधरा, सोळा वयाच्या मुलीसारखा..
त्यानं फोन कट केला.
कूस बदलली. डोळे बंद केले. पुन्हा रिंग वाजली. त्यानं कंटाळत मोबाइल रिसिव्ह केला. तोच अनोळखी नंबर. तोंडात धारदार शिवी आली. आणखी उपशिवी आली. शिवी सुसाट निघण्याच्या आवेशात… तोच पलीकडून आवाज आला.
‘रम्या, मी बेबी बोलतेय!’
‘बेबी… हे बेबी… ‘ असं चारदा बोलत राहिला. खूपच आनंद झाला. त्यानं उशी जवळ घेतली. नटीला खसकन ओढून घ्यावं तसं.
‘हॅलो, रमेश… अरे काय झालं… मी बेबी बोलतेय. तू बरा आहेस ना? आपल्याला भेटायचं आहे. सगळ्यांना. पण, मी तुला अगोदर भेटणार आहे. चालेल ना तुला? म्हणजे तुझ्या बायकोला?’
ती धडाधड बोलत राहिली. तिच्या बोलण्यावरून टोटल लागत नव्हती; तिच्या मनात नेमकं काय चाललं आहे. साला, लाईफमध्ये कधी कुठला ट्विस्ट येईल, याचा काही नेम नाही. त्याने अधाशीनं मोबाइल कानाशी लावला.
‘ह, बेबी बोल ना. भेटू आपण. अगोदर. तू म्हणतील तसं..’ मग रम्यानं स्वर बदलला. ‘ तू अजून तशीच आहेस ना?’
ती लाजली.
‘मी पण कसले प्रश्न विचारतो तुला. सॉरी बेबी. आपण भेटूया. तू मेसेज कर.’
‘मलाही तुला भेटायची ओढ लागली आहे. तुझा आवाज ऐकला, खूप छान वाटलं. बाय रमेश!’
तिनं फोन ठेवला. उशीची आवळून आवळून पार वाट लावली रम्यानं.
अखेर भेटण्याचा दिवस उजाडला. दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर रमेश हॉटेलमध्ये पोहचला. एक सारखा हातातलं घड्याळ बघत होता. कधी येतेय आणि तिला डोळे भरून बघतो. कासावीस झाला होता.
मेसेज आला. रीड केला. ‘पाच मिनिटांत येते. बेबी.’
चला, फक्त पाच मिनिटं.
वेटर आला. मेनू कार्ड दिलं. ‘काय आणू साहेब?’
तो कार्ड वाचत राहिला. वेटर तिथंच उभा. पुन्हा घड्याळ पाहिलं. ती येईल इतक्यात.
‘हे बघ, माझे गेस्ट येतील आता. मग देतो ऑर्डर.’
वेटर निघून गेला आणि एक कार हॉटेलच्या आवारात शिरली.
प्रतीक्षा संपली.
तिनं फोन केला. ‘रमेश, कुठे आहेस तू. दिसत नाहीस.’
‘मी एसीत बसलोय. टेबल बुक केलंय. आत ये.’
ती आत आली. तिच्या सँडलचा आवाज तालात होत होता. डोअर पुश केलं आणि समोरच रम्या दिसला.
‘रमेश…’
‘हो. रमेश. ये ना ये. बस.’
ती बसली.
तो तिच्याकडे बघत राहिला. ‘किती बदल झालाय, तुझ्यात.’
‘हो. खूप झालाय. तुही वेगळा दिसतोस.’
रम्या लाजला. वेटर आला. ‘तू मागव तुला हवं ते. आणि बिल पण मीच पे करणार.’
तिनं ऑर्डर दिली.
‘हं, बोल आता.’
‘रमेश, तू सांग तुझ्याबद्दल?’
‘नाही तू सांग.’
‘बरं, मीच सांगते.’
बेबीनं शाळेनंतरचा प्रवास कसा झाला, हे सांगत असताना रमेशला धक्के बसत होते. इतकं खडतर आयुष्य हिच्या वाट्याला आलं. अगोदर मला भेटली असती तर लाईफ सेटल झालं असतं, दोघांचं.
‘मुलं मोठी झाली आता. स्ट्रगल संपलं. मिस्टर चांगल्या जॉबला आहेत. मला खूप जपतात. मुलं आज-उद्या त्यांच्या पायावर उभी राहतील. म्हणून ठरवलं, पुण्यात शिफ्ट व्हायचं.’
‘मस्त. पुणे बेस्ट चॉईस आहे तुमचा. माझंही कामानिमित्त पुण्यात येणं-जाणं असतं. भेट होत जाईल त्यामुळे. अधनं-मधनं.’
तिनं स्माईल दिलं. रम्या तिचे ओठ बघत राहिला.
‘हो, तुझी हेल्प लागेल. म्हणून आज, अगोदर भेटायचं ठरवलं. आमचा फ्लॅट काढायचा आहे. दीड करोड रेट आहे. तुझ्या खूप ओळखी आहेत. आणि मला माहित्येय, तू मला निराश करणार नाहीस. हे माझ्या मिस्टरांचं कार्ड.’
रम्यानं कार्ड हातात घेतलं.
आता त्याची ट्यूब पेटली.
‘केसानं गळा कापणं याला म्हणतात!’
*
वाचा
राजेश दाभोळकर यांचे इतर लेख
‘महाडचे दिवस’ – (कादंबरी)
कथा
कविता
राजेश दाभोलकर हे ज्येष्ठ पत्रकार असून मुंबई पुण्यनगरीमध्ये ते कार्यरत आहेत. गंभीरपणे विनोदी लेखन करणं हा त्यांचा स्थायीभाव आहे...
व्वा, छानच!!