कोरोना आल्यानंतर पहिलं लॉकडाउन जाहीर झालं आणि मी थेट गाव गाठलं. तालुका खटाव, जिल्हा सातारा. गावी आई आणि वडील दोघंच असतात. आई अत्यावश्यक सेवेत काम करत असल्यामुळं तिला लॉकडाउनमध्येसुद्धा रोज ड्युटी होती. घरापासून अंतर बरंच असल्यामुळं आणि सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळं मी तिला रोज कारमधून सोडवायला जायचो आणि तिचं काम होईपर्यंत तिथंच थांबायचो. कॅमेरा सोबत असतोच, त्यामुळं काही इंट्रेस्टिंग दिसलं की, त्याचे फोटो पण काढायचो.
एक दिवस मला रस्त्यानं जाणारे हे बाबा दिसले. ते रानात शेळ्या-मेंढ्या चरायला घेऊन जात होते. मळकी रापलेली त्वचा, त्यावर मळकेच कपडे आणि तोंडाला बांधलेला तेवढाच मळका मास्क… मी सगळ्यात आधी त्यांचा फोटो घेतला आणि मग त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.
‘बाहेर कोरोना आलाय’ म्हणून कोणीतरी त्यांना हा मास्क आठ दिवसांपूर्वी दिला होता. कोरोना म्हणजे काय, तो कशानं पसरतो याची त्यांना अजिबात काही माहिती नव्हती; पण हा मास्क ते रोज न चुकता घालत होते. ‘होय, रोज हाच मास्क. न धुता…’
लॉकडाउन कामकाजाला होतं, मार्केटला होतं. पण पाळलेल्या शेळ्या-मेंढयांची पोटं कशी करणार लॉकडाउन? आपल्या जित्राबांना जगवण्यासाठी या बाबांना घराबाहेर पडणं भाग होतं. अशावेळी, रोजच्या रोज मास्क बदलला पाहिजे याबद्दल त्यांना कुणी काही सांगितलेलंच नव्हतं. शिवाय सांगितलं असतं, तरी एक मास्क धुतल्यावर दुसरा घालण्यासाठी त्यांच्याजवळ तोही हवा ना… स्वच्छता पाळली पाहिजे, एकदा वापरलेला मास्क पुन्हा घालताना आधी धुवून घेतला पाहिजे असं बरंच काही सांगण्याचा मी प्रयत्न केला. पण ते सगळं त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. बाबा तर शांतपणे आपली जनावरं हाकत निघून गेले; पण मला मात्र गावागावात पोहोचलेल्या कोरोनाची आणखीनच भीती वाटायला लागली.
(फोटोग्राफ सुहेल काझी यांचा असून त्या मागच्या कथेचं शब्दांकन केलं आहे अमृता देसर्डा यांनी.)
*
वाचा
चित्रकथा
चित्रपटविषय लेख
कविता
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
मी सुहेल. गेल्या दहा वर्षांपासून व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम करतोय. छायाचित्रांच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जगणं टिपायला मला आवडतं. आजपर्यंत मी दोन मराठी आणि एका हिंदी सिनेमासाठी छायाचित्रकार म्हणून काम केलंय. शिवाय, मूकबधीर आणि कर्णबधीर मुलांना छायाचित्रण शिकवलंय.
😊👌💐
Mast amruta…
खूप आभार!