suhel-kazi-photographer-chitrakatha-chitrakshare-goshta-creations-saarad-majkurmarathi-photoessay
परदेश । सुहेल काझी । चित्रकथा

आपल्या नजरेत आपल्या भागाचं एक चित्र तयार असतं. आपण पाहिलेल्या आणि प्रत्यक्ष न पाहिलेल्या भागांची चित्रं मिळून हे एक विशाल चित्र तयार होत असतं. आपण आपला परिसर जितका न्याहाळतो, जितका पायाखालून घालतो, तितक्या त्या परिसराच्या प्रतिमा आपल्या नजरेत घट्ट बसत जातात. शिवाय, आपल्या भागात अशी एक ना एक जागा असतेच, जिथं आपलं जाणं झालेलं नसतं. नेहमीच्या हिंडण्या-फिरण्याच्या सीमारेषेच्या पलीकडचा भाग असतो. हा भाग आपण प्रत्यक्ष पाहिलेला नसला तरी त्याचंसुद्धा मनात एक चित्र असतंच. कल्पनाशक्तीच्या आधारे मनानं मनाशीच रंगवलेलं…

सोबतचं छायाचित्र हे आमच्या वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या एका माळरानाचं आहे.
आधी आमची वस्ती लहान होती. आमचं खेळणं-फिरणं वस्तीत असायचं, फार तर वस्तीच्या जवळ कुठं… त्यामुळे वस्तीपासून दूर अंतरावर असलेल्या काही जागांवर कधी जाणं झालं नव्हतं.

हळूहळू वस्ती वाढत गेली, आमच्या फिरण्याचा-भटकण्याचा परीघ वाढत गेला; पण तरी तो परीघ या माळरानापर्यंत कधीही पोहोचला नव्हता. त्यामुळं कधीही न पाहिलेल्या जागेशी संबंध आलाच नव्हता. अर्थात तसं काही कारणही नव्हतं.

अलीकडे लॉकडाउनमध्ये मात्र असंच फिरता फिरता मी या कधीही न पाहिलेल्या जागांवर आलो. या माळरानावर येऊन तर अक्षरशः दंग झालो. पटापट फोटो काढले. ते शेअर केले. तेव्हा खूप लोकांनी विचारलं, ‘परदेशातला फोटो आहे का?’ मी उत्तर दिलं नाही. कारण, माझ्या घरापासून अगदी जवळ असलेला हा परिसर इतकी वर्षं माझ्यासाठी परदेशच होता. माझाच परिसर मला या छायाचित्राच्या रूपानं नव्यानं भेटला होता.

*


वाचा
इतर ‘चित्रकथा’


+ posts

मी सुहेल. गेल्या दहा वर्षांपासून व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम करतोय. छायाचित्रांच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जगणं टिपायला मला आवडतं. आजपर्यंत मी दोन मराठी आणि एका हिंदी सिनेमासाठी छायाचित्रकार म्हणून काम केलंय. शिवाय, मूकबधीर आणि कर्णबधीर मुलांना छायाचित्रण शिकवलंय.

2 Comments

  1. Pardesh….khup ch chaan

  2. खूप छान

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :