वा रे हनुमान उडी!

bihar-election-2020-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-jivanmarga-communist-party-of-india-modi-government-rahul-gandhi-corona-vaccine-politics-india-congress

हनुमानाच्या शेपटीला आग लावल्यामुळे त्याने लंकादहन केल्याची कथा आपल्याला माहीत आहे. तसेच, ‘घरचा भेदी लंका दहन’ ही बिभीषणच्या संदर्भातली म्हणही आपल्याला माहीत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत सध्या हनुमानही आहे, बिभीषणही आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्य असली तरी या काव्यांमधून आर्य-अनार्य किंवा सनातन वैदिक आणि अवैदिक यांच्यामधील संघर्षाची प्रतीकात्मक रूपे दिसून येतात. रामायणातील शंबूकाची हत्या असो, अथवा महाभारतातील एकलव्याचा अंगठा असो या गोष्टी वर्णजाती वर्चस्व लादण्याच्या रूपकात्मक गोष्टी आहेत. त्याचबरोबर हनुमान आणि बिभीषण हे सनातन वैदिकांच्या राजकारणाला बळी पडून सत्तेच्या लोभापायी आपल्याच लोकांशी लढणारी पात्रे दिसून येतात. अशी पात्रे आपल्या भारतीय राजकारणात हजारोंच्या संख्येने दिसून येतात. हनुमानाचा आदर्श काय तर पराकोटीची छातीफोड स्वामीनिष्ठा! सेवाधर्म! जिंकल्या गेलेल्या अनार्यांनी हाच आदर्श घ्यावा, हा संदेश. हा संदेश आजही कार्यरत आहे. दलित, आदिवासी, बहुजन, कष्टकरी जाती आजही या सेवेत जुंपलेल्या आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशात, मध्यप्रदेशात, राजस्थानमध्ये जेथे औद्योगीकरण फारसे झालेले नाही; भांडवली क्रांती अपुरी आहे, तेथे आर्थिक व्यवस्थेचा पाया जातीव्यवस्थेच्या विळख्यातून पूर्ण बाहेर पडलेला नाही. त्या राज्यांमध्ये हे वास्तव ठळठळीतपणे दिसून येते. त्यामुळे जातींचे हितसंबंध अजूनही इत्तर औद्योगिकदृष्ट्या विकास झालेल्या राज्यांसारखे पूर्ण बदललेले नाहीत. असे असल्यामुळेच ‘आर्टिकल फिफ्टीन’ या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दलित जनतेवर होणारे भीषण स्वरूपाचे अत्याचार या राज्यांतून सर्रासपणे दिसून येतात. हाथरस त्याचे ताजे उदाहरण आहे.
त्यामुळे, तेथील निवडणुकाही पूर्णपणे जातींच्या रिंगणात फिरताना दिसतात. अर्थात, निवडणुकीतील जातीय वास्तव संपूर्ण देशातच कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. पण बिमारू समजलेल्या राज्यांमध्ये ते अधिक प्रमाणात दिसून येते.

निवडणुका जवळ आल्या की, दलित, आदिवासी, कष्टकरी, बहुजन जातीतून आधुनिक हनुमान उदयाला येणे सुरू होते. महाराष्ट्रात आपल्याला त्याचा अनुभव आहेच. त्यामुळेच, बिहारमध्ये दोन मुख्य आणि तीन-चार चिल्लर आघाड्या जातीआधाराच्या कुबड्या घेऊन उभ्या आहेत. निवडणुकीत वजाबाकीच्या राजकारणात त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढते. त्यातील एक म्हणजे चिराग पासवान. स्वतःला मोदीचे हनुमान म्हणून घेत आहेत आणि छाती फोडून त्यांच्या हृदयात मोदी कसे वसले आहेत, हे दाखवण्यास तयार आहेत.
महाराष्ट्रातही मोदींचे दोन हनुमान आहेतच. एक उघड. आणि एक छुपा, बिभीषणसारखा.. तुमच्याबरोबर असुनही तुमच्याबरोबर नसलेला. बिहार विधानसभा निवडणुकीत भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद, प्रकाश आंबेडकर यांनी कुठल्यातरी आघाडीबरोबर युती केली आहे. परंतु ते एकही जागा लढवत नाहीत, हे एक आश्चर्यच आहे. हा कुठला आंबेडकरवाद आहे माहीत नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या महाराष्ट्रातील विधानसभा, लोकसभा निवडणुकीसारखीच परिस्थिती आहे. म्हणजे महागठबंधनला विरोध करणे, म्हणजे भाजपला मदत करण्यासारखेच आहे. असो.

खरे तर, आपण वाल्मिकी आणि व्यासांना वंदन केले पाहिजे. फार दूरचे त्यांनी लिहून ठेवले आहे. आणि म्हणूनच असेही म्हटले जाते की, व्यासांनी सगळेच लिहिलेले आहे. बाकी काहीच लिहायचे राहिलेले नाही. परत, दोघेही अनार्यच! त्यांनाच हा शोध लागणार, आपल्या लोकांच्या कमजोरी त्यांनाच माहीत असणार.

रामायण-महाभारताचा बारकाईने विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे कुठलीही लढाई शौर्याने जिंकता येत नाही, तर छळ, कपट, षडयंत्र, कारस्थानाने ती जिंकता येते. नाहीतर महाबलाढ्य वालीला, रावणाला, कर्णाला किंबहुना सर्वच असुरांना ठार मारणे, अगदी बळीराजाला पाताळात घालणे कट-कारस्थानाशिवाय शक्य होते काय? रामायण-महाभारताचा इतर कुठला नसला तरी छळ-कपट-कारस्थानांचा वारसा भाजपाने बरोबर उचलला आहे. गेल्या सहा वर्षातील भाजपच्या सत्तेचे राजकारण त्याचा एक नमुना आहे. कुठल्याही नैतिकतेचा पूर्ण अभाव हाच भाजपच्या राजकारण्यांचा स्थायीभाव राहिला आहे. खोटेपणा, कट-कारस्थान करून सत्तेवर येणे हेच उद्दिष्ट बाकी सब झूट.

गेली पंधरा वर्षं बिहारमध्ये नितीश कुमार या ना त्या प्रकारे सत्तेवर आहेत. मुख्यमंत्री आहेत. शेवटची चार वर्षं ते भाजपा आणि लोजपाबरोबर सत्तेत आहेत. या काळात बिहारमधील पूरस्थिती, शेल्टर होमसारखे सेक्स स्कॅण्डलचे प्रकरण, त्यात त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका सदस्याचा सहभागी असल्याचा आरोप होणे, गुन्हेगारी, खून, बलात्कार यांचे वाढते प्रमाण, आरोग्य व्यवस्थेची दयनीय स्थिती, शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा, बेरोजगारीचा भीषण प्रश्‍न, कोरोना काळातील स्थलांतरित कामगारांचा प्रश्न, वीज, रस्ते, पूल याबाबतीतील खोट्या थापा.. अश्या सर्व बाबतीत नितीश कुमार आणि त्यांचे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. विकासाचे जी आश्वासने दिली होती, ती कुठलीही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. मोदींनी बिहारला विकासाच्या संदर्भात विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन असो किंवा बिहारला अमुक-अमुक रुपयांचे पॅकेज असो, ते पूर्ण केलेले नाही. नुसत्या थापा.

विकासाच्या बाता मारायच्या, परंतु निवडणुका जातीय-धार्मिक ध्रुवीकरणावर, खोट्या राष्ट्रवादावर लढून जिंकायच्या, ही भाजपाची परंपरा. भाजपाने अजेंडा सेट करायचा आणि विरोधकांनी त्याला प्रतिक्रिया द्यायची, अशी भाजपची एकंदरीत निवडणुकीची चाल. पण यावेळी विरोधकांनी अजेंडा सेट केला आहे. तेजस्वी यादवने आधीपासूनच रोजगाराचा मुद्दा निवडणुकीचा मुख्य मुद्दा म्हणून पुढे आणला आणि हेच बिहार विधानसभा निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यामुळे, भाजपा आणि जेडीयूची तंतरली आहे. त्यांना नीट उत्तर देता येत नाही आणि बिहारची जनता, विशेषत: तरुण या मुद्याभोवती एकवटत आहेत. राजद काँग्रेस आणि डावी आघाडी या महागठबंधनला आज ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे, तो पाहता नितीश कुमार सरकारला नारळ देण्याच्या निर्णयाप्रत जनता आली आहे असे ठामपणे म्हणता येईल.

या पार्श्वभूमीवर आपल्याला चिराग पास्वान यांची हनुमानाची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे भाजपाची ही चाल नवीन नाही. ही चाल वापरूनच त्यांनी अनेक प्रादेशिक पक्षांना एक तर गिळंकृत केले आहे किंवा छोट्या भावाच्या भूमिकेत आणले आहे. महाराष्ट्रातही त्यांनी तोच प्रयोग केला होता, जो त्यांच्या अंगाशी आला. आणि शिवसेनेसारखा मित्रही गेला आणि सत्ताही गेली.

तोच खेळ ते बिहारमध्ये पुन्हा खेळू पाहताहेत. चिराग पासवान यांची ताकद सर्वांना माहिती आहे. दिवंगत रामविलास पासवान होते तेव्हाही विधानसभांच्या तीन-चार सीट पलीकडे त्यांची मजल गेली नव्हती. त्यामुळे आता लोजपाची ताकद वाढली आहे, असा काही प्रश्न नाही. चिराग पासवान जे उमेदवार उभे करतील, ते सगळे बीजेपीतून आयात केलेले आणि जेडीयूचे उमेदवार जेथे आहेत तेथेच जातीपातीची गणिते करून उभे केले जातील हे स्पष्ट आहे. म्हणजे एकीकडे जेडीयूचे उमेदवार पाडायचे आणि लोजपाचे निवडून आणायचे, ते अर्थात भाजपचे असतील. भाजपा-जेडीयू युतीमध्ये जेडीयूला कमी जागा मिळाल्या, तरी नितिश कुमार मुख्यमंत्री राहतील असे भाजपाने धूर्तपणे म्हटले आहे. एकदा निवडणूक झाली की, कोणीच कोणाचे राहत नाही. अमित शहाच्या भाषेत तो जुमला होता, म्हणून सगळे मागे टाकले जाईल.

पण खरे राजकारण हे नाही. हे राजकारण कळण्याइतके नितीश कुमार दुधखुळे नाहीत. चिराग पासवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाने एक गोष्ट केली, ती म्हणजे गेल्या पाच वर्षातील अपयशाची सारी जबाबदारी नितीश कुमार यांच्या माथ्यावर मारण्याचे राजकारण. त्यामुळे, नीतीशकुमाराना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
भाजप आणि लोजपा पण सत्तेत भागीदार, पण आता सगळी जबाबदारी नितीशकुमार यांच्या माथ्यावर मारून जणू या अपयशामध्ये भाजपाची काहीच भागीदारी नाही, अशा पद्धतीचा प्रचार संघटित केला आहे. चिराग पास्वानने केवळ नितीशकुमारांना टार्गेट केले आहे, ते त्यामुळेच.

खरे तर, सगळ्या अपयशाला केवळ एकटे नितीशकुमार जबाबदार नाहीत, तर तिघांचे मिळून सरकार होते त्यामुळे अपयशाला सर्वच जबाबदार आहेत. परंतु चिराग पासवान अपयशाचे सगळे खापर नितिश कुमारांवर फोडून मोकळे होत आहेत आणि भाजपला आणि स्वतःला धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत, असे भासवत आहेत. वाल्मिकीच्या कुटुंबाने वाल्मिकीच्या चोरीच्या पापात भागीदार होण्यास नकार दिला होता, तोच हा प्रकार आहे.

खरे म्हटले तर, ही लढाई आजही लोहियावाद्यांमध्येच आहे. लालूप्रसाद यादव, नितीशकुमार आणि दिवंगत रामविलास पासवान तिघेही लोहिया भक्त. हे भक्तच आज एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. घरचे वासे मोजण्याचे राजकारण त्यांनी केले नसते, तर बिहारमध्ये काँग्रेस आणि भाजपला शिरकाव करणे कधीच शक्य झाले नसते. जयप्रकाश नारायण, कर्पूरी ठाकूर, जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये यांसारखे धुरंधर नेते लाभूनही आणि स्वातंत्र्यानंतर दीर्घ काळ लोहियावादी बिहारमध्ये सत्तेवर राहूनही बिहारमध्ये मूलभूत स्वरूपाचे काही बदल झालेले नाहीत. उलट, बिहारची धूळधाण उडाली आहे. बिहार नेहमीच लोहियावाद्यांचा गड राहूनही बिहारी जनतेला काही दिलासा मिळालेला नाही. ज्या लालूप्रसाद यादवांनी धर्मनिरपेक्षतेचा वारसा जपत लालकृष्ण अडवाणी यांची रामरथ यात्रा अडवण्याचे धाडस केले, त्याच बिहारमध्ये नितीश कुमारांनी रामरथवाल्या धर्मांधांना बिहारच्या मानगुटीवर आणून बसवले आहे. म्हणजे लालूप्रसाद यांचा लोहियावाद आणि नितीश कुमारांचा लोहियावाद एकदम परस्परविरोधी.

अर्थात, दोष मूळ लोहियावादाचाच आहे. वैचारिक गोंधळ, दीर्घकालीन धोरणात्मक राजकारणाचा अभाव, मुख्य उद्दिष्ट आणि त्याकडे जाण्याची रणनीती यांची काही मांडणी नाही. केवळ, व्यक्तीकेंद्री राजकारण हा या वादाचा स्थायीभाव राहिला आहे. तसेच, केवळ काँग्रेसविरोध, त्यातही गांधी कुटुंबाचा विरोध, साम्राज्यवादी जागतिक राजकारणाचा गंध नसणे किंवा लोकशाहीच्या नावाखाली त्याला पूरक भूमिका घेणे, अर्थनीतीच्या नावाने बोंब हेच या वादाचे लक्षण राहिले आहे. अशा राजकीय अडाणीपणामुळेच त्यांनी भाजपा, आरएसएससारख्या अतिशय प्रतिगामी शक्तींनाही बरोबर घेण्यास कमी केले नाही. या लोहियावादाचा पाश्चात्त्य समाजावादाशी काही संबंध नाही; असलाच तर तो गांधीवादाशी. आणि गांधीवादी राजकारणाच्या तथाकथित राजकीय नैतिकतेशी.

नैतिकतेची भाषा लोहियावादी तोंड फाटेपर्यंत करत असतात, परंतु नितीश कुमार आणि नुकतेच दिवंगत झालेले रामविलास पासवान यांचे राजकारण पाहता, त्यांनी भाजपसारखीच सर्व नैतिकता खुंटीला बांधून ठेवली होती. गुजरात नरसंहारानंतर नितीश कुमारांनी मोदींविरुद्ध भूमिका घेऊन नैतिकतेचा मोठा आव आणला होता आणि भावी पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव पुढे आणले होते. पुढे त्यांनी अशी काय पलटी मारली की, सर्व थक्क होऊन गेले. तीच गोष्ट रामविलास पासवान यांची. त्यांनी गुजरात नरसंहारानंतर वाजपेयी मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस आघाडीत उडी घेतली. दहा वर्षे मंत्रीपद भोगले आणि परत भाजपा सत्तेवर आल्यावर पुन्हा उडी मारून मोदी सरकारमध्ये मंत्री झाले. त्यामुळे, लोहियावादी समाजवादाचे काही खरे नाही. एक वेळ पाश्चात्य समाजवादी परंपरेतून आले असते तर असे वागले नसते. आणि हेच मोठे तोंड करून कम्युनिस्टांवर टीका करायला सगळ्यात पुढे. याबाबतीत मात्र ते जागतिक समाजवाद्यांचा वारसा चालवतात.

वर म्हटल्याप्रमाणे केवळ काँग्रेसविरोध हा‍‌ लोहियावादी राजकारणाचा पाया राहिला आहे. अशा पायावर बेतलेले राजकारण समाजवादी कसे राहाणार? दिवंगत जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान आणि नितिश कुमारांचे भाजपाच्या सत्तेचा पाया घालण्यात त्यामुळेच योगदान मोठे आहे. भाजपाची राजकीय अस्पृश्यता घालवण्याचे महान कार्य त्यांच्याच नावावर जमा आहे.

लालूप्रसादसारख्या यादव मंडळींनीच किमान वारसा जपलेला दिसून येतो. भाजपाशी आजतागायत त्यांनी कुठल्या प्रकारची तडजोड केलेली नाही. आज लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव त्याच तडफेने राजकारणाची मांडणी करताना दिसतात.
धर्मनिरपेक्षता, लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि राज्यघटनेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता या लोकशाही मूल्यांचा बचाव करून राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत आणि समतेत करणे हाच भारतीय राजकारणासमोर मुख्य कायम स्वरूपाचा प्रश्न आहे.

बिहारची विधानसभेची निवडणूक त्यासाठी महत्त्वाची आहे. कारण बिहार विधानसभा निवडणूकच पुढील वर्षी पाच-सहा राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची दिशा ठरवणार आहे.

(सदर लेख हा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), महाराष्ट्र राज्य कमिटीचे साप्ताहिक ‘जीवनमार्ग’ यामधून घेतला आहे.
जीवनमार्ग बुलेटिन : २०६
सोमवार, २६ ऑक्टोबर २०२०
संपादक: उदय नारकर)

*

वाचा
जीवनमार्ग
आज दिनांक

कार्यकर्ता
कविता
‘महाडचे दिवस’
– कादंबरी


1 Comment

  1. Avatar

    उत्तम विश्लेषण आणि अत्यंत अभ्यासपूर्ण.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :