धागे नव्यानं गुंफताना

swati-mahale-dhage-gunfatana-mehedi-diy-terrace-decoration-interior-designer-pune-nashik-chitrakshare

लिखाणात एक असते वास्तविकता एक असते काल्पनिकता. अनुभवातून समोर आलेली वास्तविकता बऱ्याचदा लिखाणाच्या स्वरुपात बाहेर येते. असाच काहीसा माझा अनुभव मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

माझ्या लग्नाला आता आठ वर्ष पूर्ण झाली. ह्या आठ वर्षात मी आणि नवरा अगदीच कमी काळ सोबत राहिलो. फार कमी सण एकमेकांसोबत साजरे केले. काही वादावरून तीन वर्षापुर्वी मी माझ्या अडीच वर्षाच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडले. अगदी घर सोडण्याच्या विचारानं नाही, पण एक एक गोष्ट बिघडत गेली आणि आज तीन वर्ष झाली तरी मी माहेरीच आहे.

ह्या तीन वर्षात अशा बऱ्याच गोष्टी घडल्या की, समाज काय आहे? सण काय आहे? प्रथा काय आहेत? आणि ह्या सगळ्यांचा नवरा सोबत असणं आणि नसणं ह्या गोष्टींशी किती जवळचा आंतरिक संबंध आहे, किती महत्त्व आहे, या सगळ्याची जाणीव या तीन वर्षात झाली.

लग्न झाल्यानंतर हिंदू धर्मात मुलीला ‘सवाशीण’ म्हटलं जातं. आणि त्याच सवाशिणीचा नवरा वारला, तर तिला ‘विधवा’ म्हटलं जातं. मग ह्या दोघांमध्ये अडकलेल्या म्हणजेच नवरा आहे, पण सोबत नाही, अशा स्त्रिला नेमकं काय म्हणावं?

अर्थातच, वयाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची संकल्पना आहे. मात्र चांगल्यापेक्षा ९० टक्के अधिक वाईट आहे. ह्याच स्त्रिला / मुलीला नटण्या-मुरडण्याचं वेड असेल, छान राहणं, सुंदर दिसणं, हे गुण जर तिच्या अंगी अगदी लहाणपणापासून रुजले असेल, तर अशा वेळी फक्त नवरा सोबत नाही म्हणून तिने तिच्या सगळ्याच इच्छा अपेक्षांना मारावं का?

मला स्वतःला छान राहणं, छान दिसणं, सजणं या गोष्टींची हौस आहे आणि फोटो काढणं तर आजच्या काळात सगळेच करतात. मग त्यात वेगवेगळे अँगल, पोझ, सेल्फी आल्याच, चेहऱ्याचे वेगवेगळे हावभाव आले, हे सगळं मला आवडतं. माझ्या इतकीच प्रचंड आवड माझ्या पाच वर्षाच्या लेकीलासुद्धा आहे. ती अगदी दोन वर्षाची असल्यापासून ‘नाकावरची नथ’ अगदी तोऱ्याने सांभाळते, मुरडते. यावर लोक म्हणतात, आईसारखीच नखरे करते… नवरा असता तर ही कमेंट मी हसत खेळत झेलली असती, पण फक्त नवरा सोबत नाही म्हणुन ह्या कमेंटला कसं उत्तर द्यायचं, हेच मला कळत नाही.

हिंदू वर्षातला महत्वाचा सण दिवाळी; ज्यात मी अगदी स्वतःच्या कष्टानं कमवलेल्या पैशानं स्वतःसाठी, मुलीसाठी कपडे घेतले. तिची प्रत्येक हौस पुरविण्याचा प्रयत्न केला. आम्ही नटलो, सजलो, फोटो काढले. दिवाळीच्या खुप शुभेच्छा आल्या. फोटोंवर सुंदर कमेंटही मिळाल्या, पण फोटोत दिसणाऱ्या हसऱ्या चेहऱ्या मागे काय लपलंय, हे या तीन वर्षातील दिवाळीमध्ये एकदाही कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण हा, प्रश्न विचारणारे शंभर लोक उभे असतात. प्रश्न विचारणाऱ्या हजारो नजरा टोचत असतात. फोटो बघून ज्यांनी साफ मनाने अभिप्राय दिले, त्यांना मनापासून धन्यवाद! पण बाकी त्या लोकांचं काय? ज्यांनी माझे फोटो बघून आपसांत प्रश्न विचारले असतील. प्रत्येक समाजात असे आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्र आहेतच.

‘ही कोणासाठी सजते एवढी? नवरा नसताना कशाला नटायच एवढं? इतकी भारी साडी नेसलीये, कुठुन आणले असतील एवढे पैसे? आणि जरी असले स्वत:चे पैसे, तर किती उधळतेय ही?’ काहींनी तर स्वत:च्या मनाने ठरवून टाकल आहे की, हिला असेल ४०-४५ हजार पगार, म्हणून मग काय जातय मजा मारायला?

जरी समोर मला उत्तर द्यावी लागत नसली ना, तरी मी ह्या प्रश्नांची उत्तर देताना, ह्या नजरांना सतत नकळत उत्तर देतेय. समजावतेय, जीवाच्या आकांताने, आक्रोश करून उत्तर देतेय की, माझा नवरा आज माझ्यासोबत नाही ह्यासाठी मी एकटी दोषी नाहीये. तो माझ्या आयुष्यात नाही म्हणुन तुमच्या नजरा माझ्याकडुन स्वच्छंदी राहण्याचा, नटण्या-मुरडण्याचा आनंद खेचुन घेताय.

मी छान राहते, सजते पण मनात तुमचे हजारो प्रश्न सलतात. त्यांना मागे ढकलत, स्वतःला सावरण्याचा मी प्रयत्न करते आणि ह्या सगळ्याचा शेवटी माझं लेकरू मला प्रत्येक दिवशी प्रश्न विचारतं, “मम्मा ह्याला पप्पा आहेत, त्याला पप्पा आहेत, मला का नाही? आणि आपण आपल्या घरी का नाही?” तिच्या प्रश्नांना उत्तर देताना काळीज जळतं. पुन्हा तिच आपलीच लोकं ह्याची पण खिल्ली उडवतात आणि पुन्हा एकदा मलाच दोष देतात, ‘ही वेळ तू आणली, तुझ्यामुळे आली’.

वयाच्या दहाव्या वर्षी मी माझे वडिल गमावले. बाप आणि मुलगी हे नातं ते नसतानाही मी जगलेय. दुखाःत एक एक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक सण त्यांची आठवण काढत त्यांच्या उणीवेन पार पडतो. ते असते तर, माझं आयुष्य काय असतं? मी आज आहे, त्या ठिकाणी असते का? असे प्रश्न स्वतःलाच विचारत दिवस सरले. मला सांगा कोणीतरी, आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या नात्याला जे मी गमावलंय, तीच वेळ, तेच दुःख कुठली आई आपल्या लेकरावर येऊ देईल का? माझ्या मुलीला आणि तिच्या वडिलांना मी का वेगळं करेन?

काय घडलं, कसं घडलं आणि आम्ही का वेगळे झालो ह्यामागे कित्येक कारण आहेत, गोष्टी आहेत; पण ह्या समाजाला जर मी खिरापतीसारखं माझं आयुष्य वाटत गेले, तर जगु कधी? स्वतःच्या मुलीसाठी कमवू कधी?

तीन वर्षात खुप म्हणजे खुप वाईट अनुभवातुन जावं लागलं. पण आपल्या लोकांना, सगळ्यांना दिसली ती प्रत्येक वेळी ‘फोटोमधील ती’, जी की छान नटतेय, छान हसतेय. त्यावरून जगाने ठरवलंय, हसतेय, मजा करतेय म्हणजे हिला काय कमी आहे. हिला नवरा सोबत नसण्याचा फरक पडत नाही. रोज मुलीच्या प्रश्नांना, तुमच्या टोचणाऱ्या नजरांना उत्तर देताना दिवस-रात्र अश्रुंमध्ये झोपणं आणि सकाळी पुन्हा उठुन त्या गोड हसऱ्या पाच वर्षाच्या चेहऱ्यासाठी पुन्हा नव्यानं जगण्याचा मी अनुभव घेतलाय. तुमच्याच प्रश्नाला रोज आरश्यासमोर उभं राहून उत्तर दिलंय मी.

नवरा नसण्याचा फरक पडतो? हा पडतो ना, खुप फरक पडतो. पण तुला उभं राहायचंय, स्वतःच्या लेकारासाठी जगायचंय. दिवसभर एका जागी बसलं काय आणि कष्ट करून थकलं काय, रात्री दोन शब्द बोलायला आपलं माणुस आपल्या जवळ लागतं. दिवसभरात किती आनंद झाला, किती दुःख झालं, काय लागलं, काय खुपलं, मी कशी दिसतेय याचं कौतुक करणारं आपलं माणुस, आपल्या माणसाचा खांदा, आपल्या नजरेला मिळवणारी ‘ती’ एक नजर लागते, नक्कीच लागते.

फरक कसा नाही पडत, नक्कीच पडतो. पण प्रत्येक क्षणी तो कोणाला सांगता, बोलता येत नाही. आपल्याला स्वयंपाकातल्या चार चांगल्या गोष्टी येतात पण त्याची ‘चव छान झालीये’, हे त्या नजरेने सगळ्यांमध्ये आपल्याला सांगणार आपलं कुणीतरी हवं. तुझ्या असण्यानं आणि तुझ्या नसण्यानं ‘मला काय फरक पडतो’, हे मनभरून बोलणारं कोणीतरी असावं.

मागच्या दिड वर्षापुर्वीचा एका मित्राच्या लग्नातला प्रसंग आठवला. लग्न छान झालं. नवीन जोडप्याला गृहप्रवेश करून आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी आपआपल्या घरी जायला निघालो. त्यांच्या घरात त्याच्या आत्या, मामी, काकू, ज्यांना प्रथा माहिती आहेत, असे सगळेच होते. त्यांनी इतर मैत्रिणींना हळदी-कुंकू लावायला सांगितलं. ओटी भरली, सवाशिणीचे वाण म्हणुन खुप नाही, पण दोन वाणाचे पिस हातात दिले. मी ही तिथेच होते, पण कोणी मला हळदी-कुंकू लावायला सांगितले नाही की माझी ओटी भरली नाही.
“अरे! नवरा जिवंत आहे माझा. मीही सवाशीण आहे. पोटी लेकरू आहे माझ्या. माझीही ओटी  भरली असती.”
मला एरव्ही फारसा ह्या प्रश्नांचा फरक पडला नसला तरी, त्या दिवशी मात्र मला खुप फरक पडला. अख्खा प्रवासात रडत मी घरी आले. दोन दिवस रडरड रडले. काय कामाच्या अशा प्रथा, ज्या माझ्यासाठी असूनही नसल्यासारख्याच आणि नवरा असुनही विधवा असल्याचा अनुभव देणाऱ्या…

मागच्या वर्षी अधिक महिनाही गेला. हिंदू धर्मात अधिक महिन्याला फार महत्त्व आहे. मुलीला आणि जावयाला मानानं घरी आणलं जातं, दोघांनाही नवीन कपडे दिले जातात, जावयाची आणि मुलीची पाय धुवून पूजा करतात, ऐपतीप्रमाणे जावयाला सोन्या-चांदीचं वाण दिलं जातं. प्रथेनुसार माझ्याही नवऱ्याला पहिल्या अधिक महिन्यात, दुसऱ्या अधिक महिन्यात सोन्याचं वाण, कपडे दिले होते. माझ्यासोबत पुजाही झाली. पण मागच्या वर्षीच्या अधिक महिन्यात साधं कोणी प्रेमानं ओवाळलंही नाही. वस्तुची अपेक्षा नक्कीच नव्हती, पण ‘तो’ सोबत नाही म्हणुन घरच्यांनीच ते स्थान कायमचं हिरावून घेतलं, तर लोकांकडून अपेक्षा करणं दुरच. म्हणुनच आज पुन्हा वाटतं, नवरा सोबत नसणं हे एका सवाशिणीला ‘विधवा’ स्त्रीपेक्षा कमी नाही.

मनातील हे भाव जेव्हा आपल्याच लोकांपर्यत येतील, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियाही मला माहित आहेत. त्यांचं कुचकेपणानं हसणं, बोलणं, पुन्हा एकदा मन खच्ची करणार आहे. तरीही त्यांना आवर्जून सांगावसं वाटतं, तुमच्या ‘अर्थ’ नसलेल्या प्रतिक्रियांना नक्कीच महत्त्व आहे. त्या मला आतुन-बाहेरुन हलवुन टाकणाऱ्या आहेत. तरीही मनातुन तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी एकच वाक्य निघेल, ‘अशी वेळ देव कोणाला न देवो…’

*

वाचा
स्वाती महाले यांचे लेख
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


लेक्चरर at सूर्यदत्त इन्स्टिट्यूट, पुणे | ०८८८८५७८३९० | + posts

स्वाती महाले या व्यवसायानं इंटिरियर डिझायनर आणि त्याच विषयाच्या लेक्चरर म्हणून पुण्यामध्ये काम करत आहेत. शिवाय, कॅनव्हास पेंटिंग्ज बनवणं, इंटिरियरमध्ये टेरेस-बाल्कनी डिझाईन करणं, त्यांचे मेकओव्हर करणं, अशी अनेक कामं वेळ मिळेल तशी करत असतात.

1 Comment

  1. Avatar

    सुंदर, असे प्रसंग आपल्या अवतीभोवती घडत असतात, ते धाडसाने मांडले गेले पाहिजे होते 👌

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :