एक असावे ठिकाण अपुले अव्यक्ताचा काठ
स्वच्छ दिसावे तिथे चांदणे जरी धुके घनदाट
हात असावा पाठीवरती डोळ्यांमध्ये धाक
पाऊल अडता अलगद यावी तुझ्याचसाठी हाक
कधी तुला जर भेटत गेल्या न सुटणाऱ्या गाठी
मी मोठी, तू छोटी व्हावे थोड्या वेळासाठी
तुझ्या प्रार्थनेमध्ये माझे नाव आपसूक येते
माझ्याकडच्या अंधाराला ज्योत तुझी उजळवते
तुझी भेट हे संचित आहे पूर्वजन्मीचे काही
तुझ्यासारखी होत चालले कधी समजले नाही
असेच चालत राहू सखये एक आपली वाट
शब्दांच्या लाटांना भेटो अव्यक्ताचा काठ
*
वाचा
निर्मिती कोलते यांच्या कविता
कविता
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कथा
निर्मिती कोलते या उत्तम कवयित्री आणि अनुवादक आहेत.