लेट्स सेलिब्रेट

chitrakshare-marathi-lalit-lekh-swati-mahale-lets-celebrate-article-about-indian-society-and marriage-amish-thakkar-unsplash-1

आमच्या लग्नाला नुकतीच ९ वर्षं पूर्ण झाली. महिन्याभरापासूनच आजच्या दिवसाची आठवण यायला लागली होती. बऱ्याच लोकांनी, मित्र-मैत्रिणींनी चिडवत म्हटलं पण, की इतका आठवतोय म्हणजे सेलिब्रेट करायचाय का तुला हा दिवस? कोणी रागावून म्हटलं, की कशाला उगाच आठवण काढतेय नको त्या दिवसाची! कोणी काहीही म्हणा, पण आठवण आल्याखेरीज राहत नाही. मी तर म्हणतेय, का नको आठवण काढायला? आनंदाचीच गोष्ट घडलीये ना, त्या दिवशी… मोठा सोहळा झालेला, तुम्ही सर्वांनी येऊन हसत खेळत आम्हाला आशीर्वादही  दिलेले. तसंही हे आशीर्वाद शेवटपर्यंत साथ देतील, असं तरी कुठं लिहून ठेवलंय. असो!

खरंतर, न विसरता येण्यासारखा असतो तो दिवस. अर्थातच, प्रत्येक मुला-मुलीनं आपल्या एका नवीन आयुष्याचं छान स्वप्न रंगवलेलं असतं. मुळात हा एकच सोहळा असा असतो, ज्यात फक्त त्या दोन व्यक्तींकरता हजारेक मंडळी एकत्र आलेली असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या आवतीभोवती फिरत असते. यावेळी मनात उधाणलेलं दुःख बाजुला ठेवून प्रत्येकाला हसतमुखानं भेटायचं असतं, बोलायचं असतं. त्यातही आपण कमी पडलो की आपलेच लोक प्रश्न करतात. काही ना काही कमी शोधतात. हा झाला प्रश्न ‘त्या’ दोघांचा, पण जे आईवडील आयुष्यभर आपल्या मुलीच्या लग्नाचं ओझं घेऊन एक एक पाऊल टाकत असतात, त्यांची गोष्ट तर अजुनच निराळी असते. त्यात मला फक्त आई. वडील माझ्या लहान वयातच वारले. तिनं एकटीनं कसं हे सगळं इतकं सुंदर केलं असेल? इतकं छान की, सोहळा बघून मुलीला वडील नाहीये, असं कोणालाही वाटणार नाही… मग का, का म्हणून मी त्या दिवसाची आठवण करू नये? तिचे कष्ट, तिची स्वप्नं; अगदी मुलीच्या भविष्याचीसुद्धा.. त्यात मुलीच्या पाठवणीच्या वेळीच्या तिच्या भावना, या सगळ्या गोष्टी कितीतरी भयंकर असतात.

आईच्या मोठ्या स्वप्नांच्या पत्त्यांचा बंगला उभा राहिला खरा, पण लवकरच कोलमडून पडला. पण तरी तिच्या कष्टाला सलाम! त्यामुळंच आजचा हा दिवस मला आठवतो. मी म्हणते, हा दिवस दोघांनी मिळून साजरा करावा, असं कुठं लिहिलंय का? तसंही मी एकटी नाहीये; माझं बाळ माझ्यासोबत आहे. या पुर्ण ९ वर्षांच्या लग्नाच्या प्रवासातून मला एक गोड मुलगी देवानं दिली आहे. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं ‘आई’ होणं आणि आज मी एक आई आहे. माझी मुलगीच माझ्या आयुष्यभराची सोबती आहे. म्हणूनच, मी नक्की हा दिवस आठवेन आणि साजराही करेन.

या ९ वर्षांत खूप चांगले-वाईट अनुभव मिळाले. आयुष्याची ९ वर्षं वाया गेली, असं तर मी  नक्कीच म्हणणार नाही. आधी आठवणींना उजाळा द्यायचा म्हटलं तरी लोकांची भिती वाटायची, पण आता नाही वाटतं. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लोकांचा इतका विचार का करावा?

मागच्या वर्षी आईनं माझा आणि माझ्या नवऱ्याचा एक फोटो याच दिवशी मला पाठवला. आईला फोटो एडिटिंगचं ज्ञान असल्यानं तिनं त्यावर लिहिलं, ‘असलेल्या, नसलेल्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!’ बघून हसूही आलं आणि दाटूनही आलं. तिलाही वाटलं असेल, आपल्या मुलीनं आता हसावं. कदाचित तिच्याही मनात माझ्यासारख्याच भावना असाव्यात, हसावं की रडावं?

या दिवसाची आठवण येत नाही, असं कधी होत नाही. सोबत नसेल तर, आठवण येतेच. अशा वेळी काही हसरे क्षण आठवावे, तर काही रडके. मनाला जास्त त्रास होणार नाही, याची काळजी न करता खूप मनापासून हा दिवस मी साजरा करेन.

आईसोबत अगदी लगबगीनं धावणारा माझा लहान भाऊ, या लग्नसोहळ्यात कष्ट करायला, धावायला कुठंही कमी पडला नाही. आजही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवतो. शिवाय, लग्नानंतर ४ दिवस जेवणावरून उठून एकटा रडत बसणारा, लग्नात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक माणसापुढे विनम्रपणे हात जोडणारा तो अजूनही डोळ्यांसमोर आहे. त्याच्यासाठीसुद्धा हा दिवस मला आठवावासा वाटतोच, साजरा करावासा वाटतोच.

आणि म्हणूनच ठरवलंय, लोकांचा विचार करायचा नाही आणि सगळं दुःख बाजूला ठेवून स्वतःला सांगायचं.. लेट्स सेलिब्रेट!

*

वाचा
स्वाती महाले यांचे लेख
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


लेक्चरर at सूर्यदत्त इन्स्टिट्यूट, पुणे | ०८८८८५७८३९० | + posts

स्वाती महाले या व्यवसायानं इंटिरियर डिझायनर आणि त्याच विषयाच्या लेक्चरर म्हणून पुण्यामध्ये काम करत आहेत. शिवाय, कॅनव्हास पेंटिंग्ज बनवणं, इंटिरियरमध्ये टेरेस-बाल्कनी डिझाईन करणं, त्यांचे मेकओव्हर करणं, अशी अनेक कामं वेळ मिळेल तशी करत असतात.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :