chitrakshare-marathi-kavita-sudesh-ingale-mi-goshta-creations-saarad-majkur-bosco-shots-unsplash

मी मानरहीत, अपमानरहीत
मी तेजहीन, मी तमोहीन

मी युध्दामध्ये अकलंकित
ना प्रेमामध्ये पुलकित पुलकित ।।

मी सूर्यामध्ये अनल अनल
मी सर्पामध्ये गरल गरल ।
लंकेमध्ये लंकेशरहीत नी,
अयोध्येत मी रामरहीत ।

मी शब्दरहीत, मी रंगरहीत
निःशब्दरहीत, निरंगरहीत

मी सैरभैर, मी स्थिर अचल
मी धराधरंद्रे मी गगनविभोर

मी सत्वहीन, निसत्वहीन
जाज्वल्यरहीत, शैथिल्यरहीत

मी शूलटक, मी पाशदंड
मी निदलपुंज, मी बंधरहीत ।

मी सघन सघन, मी गृत्समदीत…

मी पापरहीत, मी पुण्यरहीत
देवरहीत, मी दैत्यरहीत

मी श्रध्दहीन, अश्रद्धहीन ।
मी श्वासरचित… निश्वासरचित

मी विज्ञानरचित, मी अभिमंत्रित
इतिहासरहीत, मी भूगोलरहीत ।

मी पाषाणहीन, मी पवनहीन
मी उदकहीन, अवकाशहीन

मी पुरुषहीन, मी प्रकृतीहीन
सगुणरहीत, नी निर्गुणरहीत…

मी पाण्यावरती तरल तरल
मी पाण्याखाली प्रवल प्रवल

मथुरेत मी कंसरहीत
अन्
द्वारकेत भी कृष्णरहीत ।

मी पद्यरहीत, मी गद्यरहीत
मी खंडरहीत, मी सर्गरहीत ।

मी वर्णरहीत, मी चर्महीन
मी रंध्ररहीत, मी रुधिर हीन

मी हास्यहीन, मी अश्रुरहीत
मी स्वेदहीन, मी मद्यरहित

मी ध्यानरहीत, मी कैफरहीत
मी गंधहीन, दुर्गंधहीन ।

मी हीनरहीत मी रहीतहीन
मी रहीतहीन मी हीनरहीत… ।।

(गृत्समद: कापसाचा शोध लावणारा ऋग्वेदी ऋषी )

  • सुदेश (काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट)

Website | + posts

मी सुदेश इंगळे. अक्षर मानव प्रकाशनातर्फे माझे 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या मी 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :