अगं!
मनाला येईल तेव्हा रडायचं असतं का?
असं मोठ्यांदी खळखळून हसायचं असतं का?
वाट्टेल ते बोलत सुटायचं असतं का?
हवं ते मागायचं का?
काही वेळ-काळ
ठाव-ठिकाण
तसा काय सुतकी चेहरा?
कसं प्रसन्न असावं नेहमी..
काहीच कसं नाही गं तुला?
डोळ्यात टिपूस तर आणावं..
बोंबलतेय काय?
ब्रम्हास्त्र काढतेस..
मनातलं मनात ठेव
घरातलं घरात
बाजार नुसता..
किती त्या मंद हालचाली?
चंचल असू नये एवढं..
समजून घ्यावं जरा
असतातच ती माणसं तशी
तक्रारी काय सारख्या?
जातील कंटाळून तुला..
एकटी जगशील कशी?
खूप आहेत पर्याय त्यांना..
तुला मात्र आम्ही अन आमच्या नंतर ते..
ओह..
समजून घेता घेता घर सुशोभित करत
स्वतःला एडिट करत
कधीच तिचा सोफा झाला,
टी. व्ही. झाला,
रिमोट इतरांच्या हातात असलेला रोबो झाला
भावनांचं प्रोग्रामिंग केलेला…
*
वाचा
ज्योत्स्ना जगताप यांचे साहित्य
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
चित्रकथा
ज्योत्सना जगताप या नाशिकच्या रहिवासी असून लेखिका व कवयित्री आहेत. वर्षानुवर्षं सार्वजनिक वाचनालयं चालवत त्या साहित्यसेवा करत आल्या आहेत.