chitrakshare-marathi-shetichi-baichi-kavita-levaganboli-madhuri-chaudhari-goshta-creations-saarad-majkur-joel-vodell-unsplash

बापाबरोबर ती बी शेतामंधी जायाची
बाप वखरायचा त ती निंद्याची
कहीमही जरूशी कायजीत अश्याची
केयीचं पान हाललं की घाबऱ्याची

एक बोक्या तढी बांधावरज फिऱ्याचा
अधाश्या नजरायनं तो तिले पाह्याचा
तिच्या कायजात मं गह्यरज धस होयाचं
कसं सांग्याचं बापाले तिले नी कयाचं

एका दिवशी बोक्यानं हिम्मत केली
ओढत ओढत तिले बागामंधी नेली
तोंडात बोया खुपशिसन कुकरम केलं
एका मिनटात तिचं जीवन बरबाद झालं

पयत पयत मंग ती इहिरीजोय गेली
बापाले पाहिसन धाय कोलमडिसन लळ्ली
बाप काय समज्याचं समजीसन गेला
नराधम्याले माऱ्याले बागाकळे पयाला

कसं कऱ्याचं आता तिले समजेना काही
राहीराहीसन डोयासमोर इहिरज येई
हिम्मत करीसन तिनं इहिरीत मारली उळी
धप आवाजाबरोबर बादलीची वाजली कळी

जो तो मंग आता तढी जमत व्हता
काय न कसं झालं इचारत व्हता
कायजावर दगळ ठिसन बाप बोलला
बाधलीनं पानी काढतायना पाय घसरला

*

वाचा
माधुरी चौधरी यांच्या कविता
कविता

कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
चित्रकथा


+ posts

माधुरी चौधरी यांचे 'मधुज मेलॉडी' व 'माह्या जगन्याची ताकद' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या 'माय मराठी साहित्य परीषदे'च्या संस्थापक व 'आम्ही लेखिका'च्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आहेत. 'गुरूनाथ फाउंडेशन जळगाव'चा 'बहिणाबाई पुरस्कार', 'कवि मित्र संस्था, पुणे'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार, 'हिरकणी संस्था, जालना'चा 'हिरकणी पुरस्कार', 'प्रेरणा फाउंडेशन, बदलापूर'चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार', 'मातोश्री फाउंडेशन'तर्फे 'कर्तबगार महिला' सन्मान, 'विश्वशांति संस्थे'चा शिक्षण क्षेत्रासाठी विशेष सन्मान, 'सेवक सेवाभावी संस्थे'चा 'हिरकणी' पुरस्कार, 'लेवा पाटीदार बहुउद्देशीय मंडळ, जालना'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :