माही कविता
सातपुळ्याची वं माळ
सातपुळ्यातुन झुयझुयनाऱ्या पान्याचा सुपीक गाळ
माही कविता
जयगावच्या कसदार काया मातीतली खोल
केयीच्या वावरातलं हिरवं हिरवं मोल
माही कविता
पेरकांड गोळ कारखान्यातल्या ऊसाचं
जसं कपाशीचं बोंड वात उजये मनामनात
माही कविता
अट्रावल, वाघोडच्या मुंज्यायच्या यात्रेतली तुफान गर्दी
फैजपूरच्या जत्रेतल्या लावनीची दर्दी
माही कविता
वांग्याचं भरीत नं कयन्याची भाकरी
ठेचा-भाकर नं शेवायच्या भाजीवरली तरी
माही कविता
तापी नदीचं थंड शांत पानी खोल
हतनूर धरनाचं शेतीतलं मोल
माही कविता
वरनगावच्या फॅक्टरीची सीमेवरली साथ
अन् मनुदेवीचा भक्तायच्या डोक्यावरला हाथ
माही कविता
ज्ञानेशाची बहीन कोथळीची मुक्ताई
तपस्या चांगदेवाची अन् सकय संतांयची आई
माही कविता
बहिनाबाईनं गायलेलं जात्यावरलं गान
शिरीषकुमारचं देशासाठी रघतातलं न्हान
माही कविता
सरदार वल्लभ पटेलसारखी मर्दानी थोर
थोडुसा आंबुस गोळ आंबा, थोडुसी काटेरी बोर
*
वाचा
माधुरी चौधरी यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
माधुरी चौधरी यांचे 'मधुज मेलॉडी' व 'माह्या जगन्याची ताकद' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या 'माय मराठी साहित्य परीषदे'च्या संस्थापक व 'आम्ही लेखिका'च्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आहेत. 'गुरूनाथ फाउंडेशन जळगाव'चा 'बहिणाबाई पुरस्कार', 'कवि मित्र संस्था, पुणे'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार, 'हिरकणी संस्था, जालना'चा 'हिरकणी पुरस्कार', 'प्रेरणा फाउंडेशन, बदलापूर'चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार', 'मातोश्री फाउंडेशन'तर्फे 'कर्तबगार महिला' सन्मान, 'विश्वशांति संस्थे'चा शिक्षण क्षेत्रासाठी विशेष सन्मान, 'सेवक सेवाभावी संस्थे'चा 'हिरकणी' पुरस्कार, 'लेवा पाटीदार बहुउद्देशीय मंडळ, जालना'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.