पदरगड – आयुष्यात पहिल्यांदा केलेलं चिमणी क्लाईम्ब
या गडाविषयी वाचलं तेव्हा त्यात शब्द आला ‘चिमणी क्लाईम्ब’. आतापर्यंत असं चिमणी क्लाईम्ब वगैरे कधी केलेलं नव्हतं. त्यामुळे, गड पाहण्यासोबत ‘चिमणी क्लाईम्ब’बद्दलचं कुतुहल जरा जास्त होतं.
– मुकुंद मोरे
डोंगराळलेले दिवस। चित्राक्षरे
www.chitrakshare.com
‘खानेवालों को खाने का बहाना चाहीये..’, तसं भटक्या माणसांना भटकण्यासाठी फक्त कारण हवं असतं. कारण नसेल तर ते निर्माण करायचं, पण भटकायचं जरूर! या वेळच्या आमच्या भटकंतीचं औचित्य होतं ‘नवीन वर्ष’. असा काही ट्रेक प्लॅन करायचा की काहीही झालं तरी १ जानेवारीची म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात ही डोंगराच्या कुशीत, सुर्याच्या सोनेरी किरणांच्या सानीध्यात झाली पाहिजे. (मुंबईत सकाळची कोवळी उन्हं लुप्त झालीयेत. सुर्य डोक्यावर येतो तेव्हाच दिसतो या इमारतींच्या गर्दीतून.) जायचं कुठं याचं नियोजन यावेळी आशिषदादा आणि पुण्यातली मित्र मंडळी यांनी केलं होतं. नववर्षाचा बेत ठरला – किल्ले ‘पदरगड’ करायचा.
या गडाविषयी वाचलं तेव्हा त्यात शब्द आला ‘चिमणी क्लाईम्ब’. बरं, आतापर्यंत असं चिमणी क्लाईम्ब वगैरे कधी केलेलं नव्हतं. किंवा तसा कधी प्रसंगच आलेला नव्हता. त्यामुळे, गड पाहण्यासोबत ‘चिमणी क्लाईम्ब’बद्दलचं कुतुहल जरा जास्त होतं. संपुर्ण प्लॅन ठरला. कोण कोण येणार याची लिस्ट झाली. पुण्यातून ५ जण, मुंबईतून आम्ही चौघं असे एकूण ९ जण या ट्रेकसाठी तयार होतो.
ठरलेल्या प्लॅननुसार रात्री निघायचं होतं आणि आम्ही मुंबईकरांनी पुणेकरांना कर्जतच्या पुढं ‘खांडस’ गावात भेटायचं होतं. दादरवरून निघणारे आम्ही चौघं होतो – मी, हर्षदा, सोनम आणि यापूर्वी कधी न पाहिलेला निलेश जोशी. (पुण्यातील मित्रांचा तो मित्र. नंतर तो आमचासुद्धा खास मित्र झाला हे काही वेगळं सांगायला नको.)
मुंबईतुन निघून आम्ही चौघांनी कर्जतला उतरून पुढं टमटमनं खांडस गावात जायचं आणि तिथं पुणेकरांना भेटायचं, असं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे दादरवरून रात्री १०:१८ ची लोकल पकडली. मुंबई लोकलचा गर्दीचा प्रवास सुरू केला. त्या गर्दीतसुद्धा आमची चौघांची मस्ती आणि हर्षदा व माझी कुस्ती चालूच होती. बरं, नवा मित्र निलेश भेटला तेव्हा तो ‘निलेश जोशी’ होता. कर्जत येईपर्यंत मी त्याचा ‘नांजी भाई’ केला आणि लगोलग बारसंसुद्धा उरकून टाकलं.
पकडलेल्या खोपोली ट्रेननं आम्ही कर्जतला उतरलो. आणि पुण्यातील मित्रांकडून कळलं की ते दोन गाड्या घेऊन येतायेत. त्यामुळे आम्ही स्टेशनलाच थांबायचं आणि त्यांच्या गाडीतून खांडसला जायचं असं ठरलं. चला, टमटमचे पैसे वाचले..! मग काय? चाय आणि बिस्किट खाऊन घेतलं. आम्ही तयार होतो गाडीची वाट बघत. थोड्याच वेळात निखिल आणि आशिषदा आपल्या गाड्या घेऊन आले. ‘मुंबईकर’ आणि ‘पुणेकर’ अशी एकमेकांची ओळख करून घेऊन, आम्ही गाड्यांमध्ये बसलो ते ‘ट्रेकर’ होऊन. कर्जत ते खांडस हे एक तासाचं अंतर गप्पांच्या नादात केव्हा संपलं ते कळलंच नाही. डिसेंबरचा महिना असल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा होता. एका तासाच्या प्रवासानंतर आम्ही रात्री १:३० वाजता खांडसमधल्या ‘कोठ्याची वाडी’मध्ये पोहोचलो. गावातल्या मारुती मंदिराच्या समोर गाड्या लावून आम्ही मंदिरात झोपलो. सकाळी ४:३० वाजता उठायचं ठरवलं.
ठरल्याप्रमाणे उठलो. पहाटेच्या थंडीमुळे आम्ही सगळे अक्षरशः गारठून गेलो होतो. पटापट सर्व आटोपून आम्ही ५:३० वाजता ट्रेक सुरू केला. थंडीत कुडकुडत १ तासाची पायपीट केल्यावर आम्ही ‘शिडीच्या वाटे’वरच्या पहिल्या शिडीजवळ पोहोचलो. वेळ होती सकाळी ६.३० वाजताची. पदरगडाच्या पायथ्याशी पदरवाडी नावाचं लहानसं गाव आहे. तिथं पोहोचायच्या १० मिनिट अगोदर एक विहीर लागली. पाणी पिण्यायोग्य नव्हतं. त्यामुळे तिथं जास्त वेळ न थांबता आम्ही पुढं चालत पदरवाडीत पोहोचलो. तिथल्या एका गवताच्या झोपडीवजा घराजवळ आम्हाला गड फिरवून आणायला सोबत येणारे गणेशदादा भेटले. एव्हाना ७.३० वाजले होते. अर्ध्या तासात चहा-नास्ता करून आम्ही ८ वाजता पदरगडाच्या दिशेने कूच केला.
‘गणेश खिंडी’च्या दिशेनं चालत असताना मधेच लागलेल्या सपाटीच्या भागावर सोनम आणि मी ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ या गाण्यावर जगातला बेस्ट डान्स करून दाखवला. (आजही ती नाचाची स्टेप केली की हसू आवरत नाही.) थोड्याच वेळात आम्ही पदर गडच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथं डाव्या हाताला जंगलात घुसलो. छातीवर येणारी उभी चढण लागली, पण थकवा जाणवत नव्हता. कारण अजून ऊन आलं नव्हतं. त्यात पायवाटेच्या दुतर्फा झाडं असल्यामुळे अजून तरी गारवा जाणवत होता. छाती दडपणारी चढण चढायला सुरूवात केल्यावर आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जिथं आम्हाला ‘रोप’शिवाय पर्याय नव्हता. गणेशदादानं रोप लावला. आम्ही सर्वजण रोपचा आधार घेत हळू हळू आणि काळजीपुर्वक वर चढून आलो.
तो पॅच चढून आल्यावर आतापर्यंत ज्याची वाट बघत होतो ती ‘चिमणी क्लाईम्ब’ची जागा दिसली. दोन दगडांच्या मध्ये निर्माण झालेल्या दीड दोन फुटाच्या भेगेमुळे ‘चिमणी क्लाईम्ब’चा हा पॅच तयार झालेला होता. गणेश दादानं त्या चिमणीतून वर जाऊन रोप फिक्स केला आणि आम्हाला रोपला पकडून वर यायला सांगितलं. सुरुवातीला श्रीराम, निखिल, केतकी ही चिमणीसारखी माणसं त्या चिमणीतून ‘चिमणी क्लाईम्ब’ करत वरती गेली. खरी मज्जा तर पुढं होती; कारण या तिघांनंतर नंबर होता तो खात्यापित्या घरच्या ‘चिमण्या’चा, म्हणजे नांजी भाई अर्थात निलेश जोशीचा. भाईंच्या मोठ्या देहामुळे त्याला एवढयाशा जागेतून वर सरकताच येत नव्हतं. हातापायाला खरचटत होतं, पण नांजी भाई हार मानत नव्हता. उलट-सुलट प्रयत्न करून वर सरकू पाहत होता. गणेश दादानं मला आवाज दिला, ‘बाजूने बिना रोपचं येता येत असेल तर या वर’. मी बाजूनं वर चढून गेलो. आता नांजी भाई फुल जोशात आले आणि कसाबसा तो ‘चिमणी क्लाईम्ब’चा पॅच चढून वर आले. पाठोपाठ अमृता, सोनम आणि आशिषदासुद्धा वरती आले. या पॅचच्या वर तयार झालेल्या ‘व्ही’मध्ये बसून आम्ही पाणी वगैरे पिऊन फ्रेश झालो आणि किल्ल्यावरचा अमृतानुभव घेण्यासाठी वाटचाल सुरू केली.
इथून पुढच्या पॅचला गणेशदादानं सर्वांना सावधतेनं चालायची सूचना केली. कारण, उजव्या हाताला खोल दरी आणि डाव्या हाताला कातळकडांमधून जाणारी निमुळती पाऊलवाट! आम्ही काळजीपूर्वक त्या वाटेवरून चालत वर आलो. या पुढचा भाग सपाट होता. मनात थोडं हायसं वाटलं. दरीचा भाग आला की माझ्या तर पोटात गोळाच येतो. सपाटीच्या भागातून चालत आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो. या गुहेत फोटोसेशन करून घेतलं. अशा उंचावरच्या गुहेत फोटोसेशन करून घेतलंच पाहिजे, कारण अशा ठिकाणी फोटोसेशन करून घेणं हे एक शास्त्र आहे…!
आता किल्ल्याच्या माथ्यावर केव्हा एकदा पोहोचतो असं झालं होतं. गुहेपासून निघून आम्ही पायऱ्यांच्या मार्गाजवळ आलो. एका बाजूला दरी, त्यात त्या तुटलेल्या पायऱ्या… माझ्या पोटात गोळाच आला. नेहमीप्रमाणे भीतीनं छातीत धडकीच भरली. (ती धडकी नेहमीच भरते, पण अश्या ठिकाणी फिरायची हौस काही फिटत नाही माझी.) कशाबशा त्या खडतर पायऱ्या चढून आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्याच्या माथ्यावर पाण्याची ३ टाकी आणि २ चौथरे आहेत. आणि त्याच्या बाजूला एक छोटा हौद आहे. आजूबाजूच्या परिसराचं नयनसुख घेऊन आम्ही पुढच्या बाजूला असलेल्या गुहेत विसावलो. सोबत आणलेल्या शिदोऱ्या काढून पोटपूजा केली. जेवणानंतर स्वीट काहीतरी हवं (जेवणानंतर स्वीट खाणं हेसुद्धा शास्त्र आहे.. आणि ते स्वतः न आणता इतरांनी हे सर्वात मोठं शास्त्र आहे.) नेहमीप्रमाणे हर्षदानं द्राक्षं आणली होती. द्राक्षांचा फडशा पडल्यावर तिथंच त्या थंडगार गुहेत थोडा वेळ आम्ही सर्व विसावलो. गुहेतून समोर दिसणारा सिद्धगड ‘पुढच्या वर्षी इकडे या..’ असं आमंत्रण देत होता. मी याआधी सिद्धगड ट्रेक केलेला असूनसुद्धा पुढच्या वर्षी सिद्धगड करूया असा बेत झाला. परत याही गुहेत थोडं फोटोसेशन करून आम्ही उतरायला सुरुवात केली. ज्या रस्त्यानं आम्ही वर आलो त्याच वाटेनं चालू लागलो. ‘चिमणी क्लाईम्ब’जवळच्या ‘व्ही’जवळ आल्यावर मात्र आम्ही आल्या वाटेच्या विरुध्द बाजूनं उतरायला सुरुवात केली. रस्ता घसरणीचा होता. घसरत, आपटत-धोपटत खाली उतरताना खूप मजा येत होती.
या रस्त्यानं खाली उतरून आम्ही गणेश खिंडीला जाउन मिळालो. तिथल्या गणेश मंदिरात थोडं थांबून लिंबू सरबत प्यायला बसलो. गाड्या दुसऱ्या गावात होत्या, त्या या बाजूला आणायला आशिषदा आणि निखिलदा गणेशदासोबत न थांबताच निघाले. आम्ही मात्र मस्त थंडगार लिंबू सरबत प्यायलो. देवदर्शन करून गावाकडे चालायला सुरुवात केली. आम्ही खाली पोहोचेपर्यंत आशिषदा आणि निखिलदा गाड्या घेऊन आलेसुद्धा. गणेशदानं स्वतःच्या बाईकवरुन त्यांना गाड्यांपर्यंत घेऊन गेल्यामुळे ते वेळेत येऊ शकले. आता आम्हा मुंबईकारांची घाई सुरू झाली, कारण आम्हाला ३.२७ ची सीएसटी लोकल पकडायची होती. कर्जत स्टेशनला आम्ही पुण्यातील मित्रांना टाटा-बायबाय केला. नशीब त्या दिवशीची लोकल थोडी लेट होती. आम्ही धावतच ‘मुंबईच्या धमणी’त म्हणजे लोकल ट्रेनमध्ये बसलो, परत त्या गर्दीचा भाग व्हायला…
*
वाचा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
आज दिनांक
कथा
चित्रकथा
कविता
मी मुकुंद रतन मोरे. शाळेपासूनच नाटक आणि चित्रपटांची आवड असल्यामुळं एका खाजगी इन्स्टिट्यूटमधून चित्रपट संकलनाचं शिक्षण घेतलं. संकलक म्हणून काम करत असतानाच 'रॉम कॉम', 'दोस्तीगिरी', 'विडा', 'छत्रपती शासन', 'कलाकेंद्र' अशा काही मराठी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणूनही कामाला सुरुवात केली. 'ओ ला ला', 'निर्मोण' हे गोयेंन या कोकणी चित्रपटांचंसुद्धा कलादिग्दर्शन केलं आहे.
व्वा, खूपच सुंदर ट्रेक ! वाचतानाच दृश्य दिसत होते!! फारच सुंदर!!
भरपूर फिरा, जास्तीत जास्त बघा
पाखराच्या वृत्तीने , प्रवासाला निघा
खूप शुभेच्छा!
Nice treck. Chimana chimni chan
All the best mukund. Waiting for siddhgarh.