महाडचे दिवस २७ : वली हळद आणि पिवळी माती

सर्व्हे पोलादपूरहून सुरू करून आता कापड्यापासून दीड किलोमीटर राहिला तेव्हा जंगम यांच्याकडून आम्ही जागेची किल्ली घेतली. अजूनही स्वयंपाक करू शकणार कुणी मिळत नव्हता. कुशाबाच्या ‘बघतोय माणूस’ या आश्वासनाचा कंटाळा येत चालला होता. आज मी कुशाबाला फैलावर घेतला. तो रडायलाच लागला. पावणेसहा फूट उंचीचा, भरदार शरीरयष्टीचा आणि ओठांवर बक्कळ मिशा बाळगणारा माणूस.. कुणी जवळचं गेलं तरंच रडेल असं वाटणारा कुशाबा.

कुशाबाला रडताना पाहून मी हबकलोच. त्याला थोपटत झाडाच्यामागं नेलं. काही क्षणात त्यानं स्वतःला सावरलंय, हे बघताच ‘काय झालं’ म्हणून विचारलं. तो म्हणाला, ‘‘साहेब आज आमच्या मंडळींची तिथ आहे. दोन वर्स झाली सादं तापाचं दुखन झालं. लई सय येते तिची. तुम्ही मला देवाच्या जागी आणि आजच तुम्ही माझ्यावर डाफरलात. मी तरी काय करू.. सैपाकाचं कराया बाप्या मिळत नाही. बाया लई हायती.’’
मी त्याला म्हटलं,
‘‘तुला कुणी सांगितलं पुरुषच स्वयंपाक करणारा हवाय?’’
‘‘तसं न्हवं, पर तुम्ही समदी गडी माणसं तवा.. मी फकस्त बाप्या गावतोय का बघत होतो.’’
मी कपाळावर हात मारून घेतला.

सर्व्हे चालू असताना दोन विचार मनात होते. कुशाबासारख्या हळव्या माणसाशी बोलताना संयम पाळायला हवा. आणि जीपमधलं सगळं सामानसुमान कापड्यातल्या खोलीवर टाकता येईल; पण आज जेवण पोलादपूरलाच करावं लागेल.

जेवण पोलादपूर स्टॅन्डवरच्या एका खानावळीत उरकून आम्ही सामान खोलीवर आणून टाकलं. ही जागा टेकाडावरची होती. आत्ता आम्ही तात्पुरतं का होईना कापडावासी झालो होतो. आमची दिनचर्या कापड्याच्या इतर लोकांसारखी जमवून घ्यायची होती. संडास नव्हते. मोरी नव्हती. स्वयंपाकाला माणूस मिळालेला नव्हता. मी टॉवेल उचलला आणि नदीवर अंघोळीला गेलो. आयुष्यात प्रथमच नदीवर अंघोळ केली. एकदम छान वाटलं. एक गोष्ट लक्षात आली की, अभावाचं जगणं हे सोयीसुविधांपेक्षा जास्त नैसर्गिक आणि आनंददायक असतं.

अंघोळ आटपून खोलीकडं येत असताना भानूताईंनी हाक मारली.
‘‘अहो जोशीभाऊ, असं घरावरून जाताना माणसं बघायची नाहीत का? या जरा दोन गोष्टी बोला.’’
कॉट वरची भाजी संपत आल्यानं रिकाम्या झालेल्या जागेवर टेकलो. ताईंनी विचारलं,
‘‘भाऊ, जेवणाखाण्याचं काय करताय?’’
माझ्या चिंतेचा विषय काढण्यामुळं मला सांगावच लागलं. म्हटलं,
‘‘खोलीवर सामान आणि जिन्नस आणून ठेवलेत; पण स्वयंपाक करायला कुणीच नाही. कुशाबाला सांगितलं होतं कुणी बघायला तर तो फक्त गडी माणसं बघत राहिला. आज त्याला म्हटलंय की एखादं बाईमाणूस मिळालं तरी चालेल.’’
ताईंनी डोळे मोठे करत म्हटलं, ‘‘म्हणजे आज उपाशी आहात का?’’
मी खुलासा केला, ‘‘नाही नाही.. पोलादपूरला जेवण केलंय.’’
‘‘हो का. मग रात्रीच्या जेवणाची काय व्यवस्था? तुमची जीप तर परत गेलीय. तुमच्यापाशी काही गाडीघोडं नाही. एकवेळ जेवायचं व्रत घेतलंय? काय भाऊ.. मला नाही सांगायचंत. आता असं करा स्वयंपाक करणारा गडी, बाई राहू दे. तुम्ही कापड्यात आहात तोवर माझ्याकडं जेवा. काय तुम्ही इन मिन तीन माणसं. मला करायला जड नाही. पण एक सांगते माणशी पाच रुपये रोजचं घेईन. चटणी भाकरी देईन ती गुमान खायची. मासं, मटण, गोडधोड खावंसं वाटलं तर पुन्हा ताईलाच सांगायचं. पाचाच्या ठिकाणी आठ द्यायचे; पण पोट आणि मन मारायचं नाही. या रात्री नवापर्यंत.’’

रात्री जेवायला ताईकडं गेलो. ताट सजलेलं. पोळ्या, भाजी, वरण, भात, कोशिंबीर, चटणी, लिंबू आणि समोर ताकाचा गंज. जेवायला बसताना म्हटलं,
‘‘ताई एकच गोष्ट राहिलीय तुमची.. रांगोळी आणि उदबत्ती.’’
ताई मनापासून हसली. जेवण संपताच हातावर बडीशेप ठेवली. बीएस नि खिशातून पाकीट काढलं तेव्हा ताई म्हणाली,
‘‘राहू दे हो. आजच पहिलं जेवण माझ्याकडून. आणि पैसे रोजच्या रोज द्यायची गरज नाही. आठवड्याचा बाजारचा दिवस आपला हिशोबाचा राहील.’’

सकाळी सर्व्हेला जायला कुशाबा आला तेव्हा मी त्याला सांगितलं की, ‘आमची जेवणाची सोय ताईंनीच केलीय. आता नको गडी, नको बाईमाणूस.’ कुशाबा चिंतामुक्त झाल्यावर छान दिसला. कालचे त्याचे भरून आलेले डोळे आणि आत्ताचे हसरे. एका घटनेनं मी, कुशाबा आणि ताई एकमेकांचे झालो.

सर्व्हे करत करत उमरठ फाट्यावरून बोरजेच्या दिशेनी चाललो होतो. नदीवरचा एक छोटा पूल पार करून पुढं आलो. पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याच्या अलीकडचा आमदारांच्या घराचा भाग पहिला होता. आता रस्त्यापलीकडचं कापडं बघत होतो. डाव्या अंगाला काही घरं आणि शाळा होती. उजव्या बाजूला तुरळक एखादं घर दिसत होतं. वाटेत एका छोट्या चढणीवर खिंड लागली. खिंडीच्या अलीकडं एका मोठ्या शिळेवर कुशाबा लेव्हलिंग स्टाफ घेऊन उभा होता. मी त्याला म्हटलं, ‘‘आता तू जिथं पट्टी धरलीयस तिथं एक छोटा चौकोन आख म्हणजे उद्या तिथून सर्व्हे चालू करताना पुन्हा गोंधळ नको.’’
सर्व्हे बंद करताना ही आमची नेहमीची पद्धत होती. त्यावर कुशाबा म्हणाला,
‘‘साहेब इथं नको मोजणी थांबवूया. आणखी म्होरं जाऊ.’’
मला अर्थबोध होईना. पण तो म्हणतोय तर जाऊ पुढं. आणखी पंधरा-वीस मिनिटं जास्त लागतील. मी बरं म्हटलं. डंपी लेव्हल खिंडीच्या मध्यावर आणखी पुढं जाण्यासाठी लावली. लेव्हलिंग स्टाफ दुसऱ्याकडं देऊन कुशाबा जवळ आला आणि म्हणाला, ‘‘साहेब जरा पायाकडं बघा.’’
मी म्हटलं, ‘‘कुणाच्या?’’
त्यावर तो म्हणाला, ‘‘माझ्या आणि तुमच्याबी.”
मी पाहिलं. लाल नाही; पण पिवळसर मातीनं त्याचे अनवाणी पाय भरलेले. माझ्या चप्पलमधून फुफाट्यानं माझेही पाय भरलेले.
‘‘काय दिसतंय?’’
कुशाबा उत्सुकतेने विचारत होता. म्हटलं, ‘‘काय दिसतंय? धुळीनं सगळ्यांचे पाय भरलेत.’’
‘‘अंगास्स. फकस्त पाय धुळीनं भरल्यात का आणखी काही?’’
मी म्हटलं, ‘‘आणखी काय असणार?’’
माझ्या निरीक्षण शक्तीवरचा त्याचा विश्वास उडाला होता. स्वतःचे आणि माझे पाय शेजारी शेजारी उभे करून म्हणाला, ‘‘साहेब, पाय पिवळं दिसतायंत का नाही?’’
मी ‘हो’ म्हटलं. माझ्या हो म्हणण्यानं तो सुखावला.
‘‘साहेब एक गोष्ट सांगू का खिंडीची?’’
गोष्ट म्हणताच मी कान टवकारले. बीएस तसा दूरच होता. त्याची लेव्हल सेंटर करत होता. बहुतेक कुशाबाला बीएस जवळ यायच्या आत गोष्ट सांगून संपवायची असावी. कुशाबानी माझा ताबा घेत सांगायला सुरुवात केली.
‘‘लई वर्स झाली या गोष्टीला. तवा हे कापडा बुद्रुक वसलंबी नव्हतं. पोलादपूरहून लगीन लावून वऱ्हाड उमरठकडं निघालं व्हतं. नवरा-नवरीच्या अंगाची हळद वली होती. खिंडीतून समदं चाललं होतं आणि अचानक गोपाळवाडीतून दरोडेखोर आले. त्यांनी वऱ्हाड थांबवलं. समदी बायामानस अंगावर दागदागिनं ल्यायलेली. लई कालवा झाला. दरोडेखोरं अंगावरून ओरबाडायला लागली. वऱ्हाडातल्या दांगड्या गड्यांनी दरोडेखोरांशी झुंजायला सुरुवात केली. दरोडेखोरास्नी उमजलं की आता काहीतरी विपरीत घडाया हवं. एकानं कुऱ्हाड काढली. नवरा-नवरीची डोस्की फोडली. हळदीच्या त्या पोरांचं रगत मातीवर सांडलं. खिंडीवर हळद-कुंकवाचा सडा आणि रडारड. दरोडेखोरांनी समदं लुटलं आणि देवळ्याच्या दिशेनी पळालं. तवाधरनं अगदी आताही खिंडीत पाय पिवळं दिसत्यात. बघा आता ही कहाणी मी तुम्हाला सांगितलीय. पुन्हा एकवार पाय बघा..दिसतायत की नाही पिवळं?’’

कुशाबा थांबला. मला त्याच्या डोळ्यात भीती जाणवली. जणूकाही आताही दरोडेखोर समोरून येतायत. मी त्याच्या खांद्याला धरून ‘खरंच रे’ म्हटलं. तोपर्यंत बीएसनी इशारा केला. त्याची लेव्हल सेट झाली होती. दोघांनी रिडिंग घेतलं. आम्ही आजचा सर्व्हे संपवला.

सर्व्हे संपवून आम्ही खोलीवर येत होतो. मी कुशाबाच्या गोष्टीचा विचार करत राहिलो. कुशाबाचा हा गोष्टी सांगण्याचा गुण मला नवा होता. मला तर हा प्रकाश-सावल्यांचा खेळ वाटला. जसं ढगाकडं पाहताना मनात हत्ती आणला की ढगांचा आकार हत्तीसारखा भासायला लागतो. तसं पाय पिवळे दिसतायत असं म्हणून पायाकडं पाहिलं की या लोकांना ते पिवळे दिसतायत. पण आपली ही वैज्ञानिक दृष्टी आणि या लोकांची श्रद्धा नकोत एकमेकांना भिडायला. त्याचं प्रबोधन करण्याची उर्मी दाबून टाकली. कारण तसं केलं असतं तर अशा चित्तरकथा सांगायला तो धजला नसता.

मी एनएम आणि बीएस आमदारांच्या घरात आलो. आमदार येरझाऱ्या घालत होते. आमची चाहूल लागताच पुढं येऊन म्हणाले,
‘‘पाटील आज जास्त काम केलंत वाटतं’’
आतमध्ये पानं मांडल्याचा आवाज येत होता. ताई बाहेर येत म्हणाली,
‘‘आमदार, आता थांबवा तुमच्या फेऱ्या मारणं. पाटील, यांची साखर कमी झाली की भूक सहन होत नाही. मग बसतात फेऱ्या घालत. चला जेवायला बसू.’’
हे म्हणताना बाहेरच्या खोलीत आमदारांसाठी तिनी पान मांडलं. शेजारी आणखी एक पान. आतल्या स्वयंपाकाच्या खोलीत तीन पानं. एनएमनं तोंडातली तंबाखू बाहेर थुंकत विचारलं,
‘‘ताई ही अशी आतबाहेर पानं का?’’
ताई म्हणाली, ‘‘बाहेर पानं मांडलीत दोन. एक आमदारांचं आणि दुसरं तुमचं.. जैनाचं. आत पानं घेतलीत तीन. बिघडलेला बामण जोशीभाऊ, बीएस आणि माझं. आता का विचारू नका. जेवायला बसलं की समजेल.’’

बाहेर आमदार आणि एनएम दोडक्याची भाजी खात होते. आत मी, बीएस आणि ताई तळलेला बांगडा तव्यावरून उतरायची वाट पहात होतो.

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :