आज साळीसाहेब कापड्याला आले. आमच्याबरोबर बराच काळ सर्व्हेसाठी थांबले. आम्ही आणि इन्स्ट्रुमेंट्स दोन्ही व्यवस्थित काम करतायंत याची खात्री करून घेतली. बीएसला म्हणाले, ‘‘छान चाललंय तुमचं काम.’’ खूप वेळ कामाचं बोलले. कोंझरला काम संथपणे चाललंय, असा तक्रारीचा थोडा सूर होता. माझ्या मनात आलं, असं तर नसेल की तिथं त्यांच्या कामाचं कौतुक करायचं आणि इथं येऊन तक्रार करायची. इथं आमचं कौतुक करायचं आणि तिथं जाऊन आमच्या कामाबद्दल नाराजी दाखवायची; परंतु नंतर साहेब जे बोलले त्यानं मी आणखीनच खूश झालो आणि स्वतःच्या कद्रू विचारांची लाज वाटायला लागली.
साहेबांनी मी लेव्हल सेंटर करत असताना विचारलं,
‘‘जोशी, दुपारपर्यंत तुम्ही काम करता, त्यानंतर उरलेल्या वेळात काय करता?’’
मी उत्तर द्यायच्या आधीच बीएस म्हणाला, ‘‘आम्ही पत्ते खेळतो.’’
त्यावर ते म्हणाले, ‘‘बीएस हा प्रश्न मी जोशींना विचारलाय.’’ असं साहेबांनी म्हणूनही बीएस बोलतच राहिला.
‘‘साहेब जोशी एकटाच संध्याकाळी आसपास फिरत राहतो. आम्ही बरोबर येऊ का, हे विचारायच्या आधीच बाहेर पडतो. असं का करतो हे कोडंच आहे आम्हाला.’’
साहेब मला म्हणाले, ‘‘बीएस तुमच्या प्रश्नाचं उत्तर कदाचित जोशी देणार नाहीत. पण मी देतो.’’
मी कान टवकारले. असं कोड्यात का बोलतायंत साहेब. हसत हसत साहेबांनी खुलासा केला,
‘‘जोशी तुम्ही एकटे फिरून काय करता ते माझ्या कानावर आलंय.’’
आता मात्र मी खूप साशंक झालो. त्यांनी हात पुढं केला तेव्हा मी संकोचून दोन पाऊल मागे सरकलो. अचानक माझ्या लक्षात आलं की साहेबांना मला स्पर्श करायचाय. मी पुन्हा दोन पाऊल पुढं येऊन त्यांच्या अधिक जवळ गेलो. तोवर त्यांनी पुढं केलेला हात मागं घेतला. आढ्याकडं पाहिलं आणि म्हणाले,
‘‘काल कोंझरच्या साईटवर गेलो होतो. जोशी.. चव्हाण तुमच्याबद्दल सांगत होते. मला हे माहीत नव्हतं. चव्हाण म्हणत होते की तुम्ही गोष्टी लिहिता. तुमचे वडील मोठे लेखक आहेत. हे का लपवून ठेवलं तुम्ही? मला तुम्हाला शिक्षा द्यायचीय. मी रात्री मुक्कामाला आहे. तुमच्याबरोबर पत्ते खेळणार आहे; पण त्याआधी जोशी तुम्ही तुमची कथा वाचून दाखवायचीय आणि रात्री जेवायला चिकन करायला सांगा तुमच्या ताईंना.’’
जेवण झाल्यावर आमदारांना साहेब म्हणाले,
‘‘आमदार चला आमच्याबरोबर खोलीवर. तुम्हाला आमचे जोशी कसे आहेत हे समजलंय का नाही माहीत नाही. त्यांची वेगळी ओळख करून द्यायचीय.’’
मी कथा वाचायला सुरुवात केली.
शहरातली एक मुलगी एकाच्या प्रेमात पडते. प्रेम वाढत जातं आणि शारीरिक जवळीक सुरू होते. तिला दिवस जातात. ती प्रियकराला लग्नाचं विचारते. तो टाळाटाळ करतो. ती अस्वस्थ होते. तिचं हे बदललेलं वागणं आणि रूप आईच्या लक्षात येतं. दिवस गेल्याचं तिला आईला सांगावंच लागतं आणि त्याचबरोबर या मुलाचे वडील लग्न लावून द्यायला तयार नाहीत, हेही सांगावं लागतं. ही मुलगी, तिची आई, तिचे वडील सामान्य कुटुंबातले. तर मुलगा तालेवार आणि पैसेवाला. अशा मुलाला जाब विचारायची हिम्मत या कुटुंबात कुणाचीच नसते. तो मुलगा नामानिराळा राहण्यात यशस्वी होतो. नाईलाजानं ते कुटुंब तिचा गर्भपात करवतं.
मी समोर पाहिलं. एनएम पेशन्सचा डाव लावत होता. बीएस साहेब बसलेत म्हणून बसून राहिलेला होता. साहेब मात्र गोष्ट मनापासून ऐकत होते. आमदार आपली देहबोली लपवायचा प्रयत्न करत होते. तरीही आमदारांवर गोष्टीचा गडद परिणाम होतोय, हे मला जाणवलं. माझं थांबणं, हे गोष्ट संपण्याचं लक्षण आहे, असं साहेबांना वाटलं तरीही मी माझी बैठक मोडलेली नाही, हे त्यांच्या चाणाक्ष नजरेनं टिपलेलं होतं. त्यांनी विचारलं,
‘‘जोशी ही गोष्ट अर्धवट सोडलीय असं नाही वाटत?’’
मला साहेबांचा प्रश्न लेखक म्हणून खूप आवडला. मी उत्साह ओढूनताणून आणायची गरज नाही, हे स्वतःला पटवलं आणि म्हटलं, ‘‘साहेब, मी कुठं म्हणालोय की गोष्ट संपलीय.’’
एनएमनी पत्ते बंद केले. बीएसला मनापासून उठावंसं वाटलं नाही. आमदारांनी कपाळीचा बुक्का नीट केला. मला त्यांची ही कृती सवाष्ण बाईसारखी वाटली. साहेबांनी तर उघडलेली मांडी केव्हाच घट्ट केली होती. मी वाचत राहिलो.
या मुलीची गर्भपात करवून सुटका केलीय, असं त्या आई-वडलांना वाटतं. आता हिचं लवकरात लवकर लग्न करून द्यायचा ते चंग बांधतात. मुलगी सुस्वरूप, शिक्षण चालू असलेली. एक गाव नाही आणि शहरही नाही अशा ठिकाणाहून तिला होकार येतो. ऐपतीप्रमाणं लग्न लागतं. मुलगी सासरी नांदायला लागते.
मी पुन्हा थांबलो. पण माझं हे असं थांबणं म्हणजे गोष्ट संपल्याचं निदर्शक आहे, असं समोर कुणालाच वाटलं नाही. तांब्याभांड्यातलं पाणी मी आणि सगळेच प्यायलो. आमदारांनी मला पुढं म्हणून विचारलं. मी वाचायला लागलो.
मुलगी समाधानानी नांदतेय. मागचं सगळं तिनं मागेच टाकलंय, याची खात्री आईवडिलांना पटते. तिचा संसार तीन वर्षांचा होतो. तिची सासू विहिणीला म्हणते, ‘‘विहीणबाई अजुनी पाळणा कसा हलेना?’’
संसार पाच वर्षांचा होतो. आता विहिणी एकमेकींशी धड वागेनाशा होतात. सासू, नवरा, दीर, जावा सगळे अस्वस्थ. मुलीला घालूनपाडून बोलायला लागतात. माहेरही अस्वस्थ. आता तिच्यावर वांझोटेपणाचे आरोप व्हायला लागतात. आमच्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं केलं, या कुलक्षणी मुलीनी असं सासू वारंवार बोलून दाखवायला लागते. मुलगी सासूला विचारू शकत नाही, असा प्रश्न स्वतःला विचारते. ‘मी खरंच वांझ आहे का? गर्भपात झाला तो माझ्या लेकराचं का माझ्या गर्भाशय असलेल्या स्त्रीत्वाचा?’
साहेब कथा संपलीय, असं मी जाहीर केलं. अचानक आमदार उठले. ‘जोशी छान आहे कथा’, म्हणत निघून गेले. टेकाड निम्मं उतरून खाली जात राहिलेला कंदील मी वरून पहात होतो. एक गोष्ट आता ध्यानात आली की ताईला मूलबाळ नाही. कंदील दिसेनासा झाला होता.
(क्रमशः)
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)