जातीची दाहकता या विषयाभोवती फिरणाऱ्या या सिनेमात खालच्या जातीचा जब्या नावाचा मुलगा वरच्या जातीच्या मुलीच्या प्रेमात पडलेला असतो. तो एका अंधश्रद्धेपोटी काळ्या चिमणीचा शोध घेत असतो. या शोधाचा भाग म्हणून या प्रसंगात तो आणि त्याचा मित्र झाडावर चढून चिमणीच्या घरट्याकडे जात आहेत. तितक्यात तिथे एक आजीबाई पाण्याचे ‘रिकामे भांडे’ घेऊन येतात. झाडावर चिमणीच्या घरट्याकडे जात असलेल्या या मुलांना आजीबाई रागवतात, खाली बोलवतात आणि सांगतात, ‘चिमणीला शिवू नका, ती बामणीन असते! तिला शिवले तर इतर चिमण्या कळपात घेत नाही तिला. टोच्या मारून मारून जीव घेतात तिचा.’
म्हातारी माणसे परंपरा पक्की करतात याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे, असे म्हणायला हरकत नाही. यात या आजीबाई खालच्या पातळीवर आहेत, वरच्या पातळीवर जाऊ पाहणाऱ्या तरुण पिढीला त्या खालच्या पातळीवर बोलावत आहेत. काळ्या असो, गोऱ्या असो चिमण्या वरच्या पातळीलाच राहतील, हेही सांगतात. आपल्यातील जातपात, शिवाशिव आपण पशू-पक्षांवर पण लादली आहे. चिमणी बामन, डुक्कर अस्पृश्य असा भेद आपण करतो.
हा वरील प्रसंग कोणत्या प्रसंगनानंतर आलेला आहे हे पण महत्वाचे आहे. आधीच्या प्रसंगात शाळेत काही मुली मैदानात खेळत आहेत. खेळ चालू असताना त्यांच्यात एक डुक्कर शिरते आणि एका मुलीला शिवते. लगेच सगळ्या मुली तीला अस्पृश्याची वागणूक देतात. त्या मुलीला इतर मुली आपल्या कळपात घेत नाहीत. एवढेच नव्हे तर शिक्षकदेखील तिची खिल्ली उडवतात. या दरम्यान, ती डुक्कर शिवलेली मुलगी खालमानेने अपराध्यासारखी वागताना दिसते.
जब्या जर चिमणीला (नायिकेला) शिवला तर इतर चिमण्या (तिचे जातवाले) तिला आपल्या कळपात (जातीत) घेणार तर नाहीतच पण टोच्या मारून मारून जीव घेतील (ऑनर किलिंग) असा भयानक अर्थ या प्रसंगाचा आहे.
या दृश्यात आजीबाई ऐवजी तरुण स्त्री दाखवली असती तर? किंवा पुरुष दाखवला असता तर हे दृश्य इतके प्रभावी झाले असते का? याचा आपण विचार करायला हवा. आजीबाई येथे जुन्या विचाराचे प्रतिनिधित्व करतात. या पात्रासाठी कलाकाराची केलेली निवड पण एकदम परिपूर्ण आहे. त्यांचं असणं, दिसणं, संवादफेक, देहबोली प्रसंगाची रंगत वाढवते. त्यांच्या हातात दिलेले पाण्याचे रिकामे भांडे, प्रसंगाला अधिक अर्थगर्भ करते. दिग्दर्शकाने त्यांच्या हातात हे रिकामे भांडेच का दिले? या पाठीमागे त्याचा काय विचार असेल? याचा आपण विचार केला पाहिजे.
यातील दृश्यरचेनचा विचार केला असता या शॉटला ‘थ्री शॉट’ म्हणतात. यात तीन व्यक्ती आहेत. हे ट्रँग्यूलर काम्पोजिशन आहे. यातील तिन्ही पात्रांच्या चेहऱ्यांना रेषेने जोडले तर त्रिकोण तयार होतो. अशी त्रिकोणी रचना नेत्रसुखद असते. यातील जब्याचा मित्र जर फ्रेममधून कमी केला तर फ्रेम असंतुलित होईल. केवळ फ्रेम संतुलित दिसावी म्हणून त्याला जब्याच्या विरुद्ध बाजूला बसवलेला आहे, अन्यथा त्याचे चिमणीच्या घरट्याच्या विरुद्ध बाजूला काय काम आहे?
चांगल्या सिनेमातील चित्रचौकटीतील प्रत्येक घटक त्या चौकटीला समृद्ध करत असतो. त्यातील प्रत्येक गोष्टीला ‘का’ विचारत राहिले की आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी सापडत जातात आणि आपल्या जगण्याचा आनंद द्विगुणित करत जातात. या आनंदासाठीच तर अशा महान कलाकृतींचा आस्वाद घ्यायचा असतो.
– मितेश ताके
*
वाचा
मितेश ताके यांचे साहित्य
चित्रपटविषयक लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
व्यवसायानं शेअर्स ट्रेडर व शेतकरी असलेले मितेश ताके हे चित्रपटाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी कोरोना लॉकडाऊन काळात घरातच मोबाईलवर बनविलेल्या 'दुर्गाज् लॉकडाऊन' या २ मिनिटांच्या लघुपटाची ३२ देशांमधील १६४ चित्रपट महोत्सवांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या या पहिल्याच लघुपटाला ५८ पुरस्कार मिळाले आहेत.