chitrakshare-Mitesh-Take-Samruddha-Cine-Chaukat-fandry-marathi-film-nagraj-majule-jabya-standing-out-of-the-gate-detail-shot-analysis-goshta-creations-saarad-majkur

नागराज मंजुळे यांचा फँड्री सिनेमा हा मला सर्वाधिक आवडलेल्या सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाची प्रत्येक सिने चौकट (फ्रेम) मला भुरळ घालत राहते. जसजशी मी ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तसतसा मी समृद्ध होत जातो. अशीच ही एक त्यातील दृश्य चौकट…

या प्रसंगाची पार्श्वभूमी अशी आहे की, चित्रपटाचा नायक जब्या दोन-तीन दिवसांपासून शाळा बुडवून कुटुंबाबरोबर मजुरीच्या कामावर जातो आहे. या काळात शाळेतील बुडालेला अभ्यास आणि गृहपाठ समजून घेण्यासाठी तो कुलकर्णी नावाच्या वर्गमित्राच्या घरी येतो.

हा सिनेमा जातव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. सिनेमाचा नायक जांबुवंत कचरू माने हा कैकाडी समाजाचा आहे आणि वेदांत कुलकर्णी ब्राम्हण समाजाचा आहे. या संदर्भातून आपल्याला ही सिने चौकट समजून घ्यावी लागेल.

या दृश्यात जब्या कुपंणाबाहेरच उभा राहून ‘वेदांत आहे का’, असे त्याच्या आईला विचारतो. आई ताटात धान्य निवडत आहे. ती वेदांतला आवाज देते आणि त्यावेळी जब्याचा उल्लेख ‘कैकाड्याचं पोरगं’ असा करते. वेदांत घरातून बाहेर येतो. त्याच्या मागोमाग त्याचा समवयस्क मित्र पण बाहेर येतो आणि म्हणतो की ‘वेद्या रिमोट दे.’

वेदांत कुंपणाच्या आत आणि जब्या बाहेर, असे ते बोलत उभे राहतात. दरम्यान वेदांतचे वडील कुंपणाबाहेरून आत येतात. त्यांचे जानवे ठळकपणे दिसते आहे. येताना जब्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकतात आणि घरात जातात.

या वरील सिने चौकटीत ‘जब्या कुंपणाच्या बाहेर उभा आहे आणि वेदांत कुंपणाच्या आत’  सिनेमाच्या भाषेत हे झाले टेक्स्ट. पण यातील गर्भितार्थ म्हणजेच सबटेक्स्ट काय आहे, तर जब्यासारख्या खालच्या जातीतील माणसाला उच्च जातीच्या घरातच काय पण कुंपणातदेखील प्रवेश नाही. इथे घर आणि त्या भोवतीची दोन कुंपणे ही मला मन आणि त्या भोवतीच्या मानसिक तटबंद्या वाटतात. वेदांतचा अजून एक मित्र कुंपणाच्या आत आहे, याचा अर्थ निवडक जातीच्या लोकांना मात्र प्रवेश आहे.

‘निवडक’ या शब्दाच्या संदर्भात निळ्या साडीतील वेदांतच्या आईकडे पहा. ती धान्य निवडत आहे म्हणजेच नको असलेल्या गोष्टी ताटातून उडवून लावत आहे. आईचे हे धान्य निवडणे प्रतीकात्मक आहे.

घर, घरातील व घराबाहेरील वस्तू या कुटुंब सुखवस्तू असल्याचे सांगतात. त्यांचे रंगीतपण आणि चमक त्यांच्या राहणीमानाचे प्रतिनिधित्व करतात. बाहेर ठेवलेले खूप हंडे समग्र सिनेमाचा विचार करता मोटिफचे काम करतात. सिनेमात वेळोवेळी पाण्याची भांडी दिसत राहतात. गावाचा पाणी प्रश्न गंभीर आहे, हे यातून तर लक्षात येतेच. पण मला हे एक रूपक वाटते.

वेदांत आणि त्याच्या कुटुंबियांचे कपडे स्वच्छ आणि चमकदार आहेत, तर जब्याचे कपडे मळकट, जुने व चमक गेलेले आहेत. त्यांचा रंग त्याच्या जिंदगीप्रमाणे काळपट आहे. यात जब्याच्या टी-शर्टवर लिहिलेले आहे, ‘क्रांतिवीर लहुजी वस्ताद ग्रुप’ म्हणजे हा शर्ट कुठल्या तरी संघटनेकडून फुकट मिळालेला आहे. कुणीतरी दिलेले कपडे जब्या वापरतो आहे. या शर्टद्वारे जब्याची आर्थिक परिस्थिती किंबहुना त्याच्या एकूणच जीवनमानाचा स्तर आपल्याला कळतो.

शर्टवर ग्रुपचे नाव दाखवून दिग्दर्शकाने खालील मार्मिक भाष्य केलेले आहे, असे मला वाटते.
१. महापुरुष आम्ही जाती-पातीत वाटून घेतलेले आहेत.
२. थेट जातीची लेबलं न लावता, आम्ही आमची जात महापुरुषांच्या नावाने मिरवतो.
३. जातीय अस्मितेचा ओघळ पार खालपर्यंत गेला आहे.
४. त्यांच्यात पण क्रांतिवीर, वस्ताद होते आणि आहेत. त्यापैकीच एक जब्या!

नागराज मंजुळे यांचा फँड्री सिनेमा अशा अनेक समृद्ध सिने चौकटींनी भरलेला असून अभ्यासू सिनेरसिकांसाठी तो मेजवानी ठरावा, असाच आहे.

*

वाचा
चित्रपटविषयक लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा


Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

+ posts

व्यवसायानं शेअर्स ट्रेडर व शेतकरी असलेले मितेश ताके हे चित्रपटाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी कोरोना लॉकडाऊन काळात घरातच मोबाईलवर बनविलेल्या 'दुर्गाज् लॉकडाऊन' या २ मिनिटांच्या लघुपटाची ३२ देशांमधील १६४ चित्रपट महोत्सवांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या या पहिल्याच लघुपटाला ५८ पुरस्कार मिळाले आहेत.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :