उत्सव

shraddha-jagdale-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-grounded-pune-marathi-prem-katha-utsav

रोहितनं रागातच रूमचं दार उघडलं आणि अनयाला म्हणाला, “आय एम डन विथ यू! मी तुझ्यासोबत नाही राहू शकतं.” कॉम्प्यूटरवर काम करत असलेली अनया शांतपणे खुर्चीवरून उठली आणि त्याच्याकडं प्रेमळ कटाक्ष टाकून म्हणाली, “बट आय एम नॉट डन विथ यू! रिलेशनशिपमध्ये राहताना आपण दोघं एकत्र आलो; दोन ‘मी’ एकत्र आले. मग बघता बघता आपल्यातलं ‘मी’पण कुठं विरघळून गेलं कळलंसुद्धा नाही. मग आज अचानक तुझ्यातला ‘मी’ कुठून जागा झाला?”

रोहित चिडला आणि म्हणाला, “यु आर इम्पॉसिबल! तूच सांग, आपलं एकमेकांसोबत असणं, याला काय लॉजिक आहे? आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, असं मला तरी वाटतं.”

त्याच्यावर नजर फिरवत अनया म्हणाली, “एम.बी.ए.ची डिग्री शोभतीये तुला. मी लॉजिक फक्त प्रोग्रामिंग करताना आणि मॅथेमॅटीकल मॉडेल्स बनवताना वापरते. नात्यांसाठी अजूनतरी मी संवेदना आणि भावनाच वापरते. अगदी आमच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्समध्ये पण सांगितलंय, ह्यूमन बिहेविइयर्स हॅव नो लॉजिक.”

इतक्यात रोहित पुन्हा ओरडला, “त्या आर्टिफिशल इंटिलिजन्सच्या आई…” पुढचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अनया म्हणाली, ‘शिवी देऊ नकोस. तुझ्या व्हाईट कॉलर इमेजला शोभत नाहीत.”

मग रोहितनं तिचा हात ओढत तिला आरशासमोर उभं केलं आणि म्हणाला, “बघ जरा स्वःताला. हे विस्कटलेले केस, डोळ्यांभोवती आलेले डार्क सर्कल्स् आणि सुटत चाललेलं पोट आणि खोलीभर पसरलेली कागदं… फ** विथ युअर वर्क!”

अनया पुन्हा म्हणाली, “यार शिवी नको देऊस ना. मला नाही देता येत उलट्या शिव्या आणि तुझ्यासारखं ओरडता पण नाही येत मला. माहीत आहे, शिवी भडास काढण्याचं एक माध्यम आहे. पण तू…”

रोहित आणखी चिडला आणि म्हणाला, “तू, तू शेवटचं कधी या रूमच्या बाहेर पडली होतीस, आठवतंय का? आपण शेवटचं कधी भेटलो होतो, बोललो होतो, हे तरी आठवत आहे का तुला? आणि या कपाळावरच्या कधीच न जाणाऱ्या आठ्या? काय गं, तू सारखं रिसर्च रिसर्च करतेस ना, मग सायन्स पण असं सांगतं की, बॉडी मुव्हमेन्ट्स जास्त नाही केल्या तर डायबेटीस होतो. हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आहेस पंचवीशीतली; पण वाटते चाळीशीतली. काळजी वाटते, मला तुझी. नाही, पण मी का इमोशनल होतोय? आय एम डन विथ यू, मी नाही तुझ्यासोबत राहू शकतं अजून. मी तर थकलोय, तुला तेच तेच सांगून.”

अनया पुन्हा म्हणाली, “पण तू माझ्याशिवाय नाही राहू शकत. सवयींची सवय होत असते माणसाला.” रोहित पुन्हा म्हणाला, “हो, पण तिच सवय आपण तोडू पण शकतो आणि तुटलेल्या गोष्टींची पण सवय होऊन जाते.”

अनया पुन्हा म्हणाली, “पण तुझं प्रेम आहे माझ्यावर.” रोहित पुन्हा म्हणाला, “पण तुझं तुझ्या कामावर प्रेम आहे, माझ्यापेक्षाही जास्त.”

इतक्यात अनयाला एक फोन कॉल आला. अनाया फोनवर म्हणाली, “नेहा, मी तू पाठवलेल्या सगळा थीसिस वाचला. हे मिशन फारच चॅलेंजिंग आहे. आय वॉन्ट टू वर्क ऑन दिस प्रोजेक्ट…” तिचं फोनवर बोलणं सुरू असताना रोहित पुन्हा म्हणाला, “आय एम डन विथ यु!” अनया रोहितला फोनवर बोलत बोलता म्हणाली, “रोहित वी विल टॉक लेटर.” तिच्याकडं रागानं पाहून रोहित तिथून निघून गेला आणि अनया फोनवर बोलण्यात आणखी मग्न झाली.

मग तिनं कॉम्प्यूटरमध्ये लक्ष घातले. या वेळात रूममध्ये तिची मदतनीस रखमा कॉफी देऊन गेली. मग थोडा निवांत वेळ मिळाल्यावर तिनं रोहितला कॉल केला. पण त्यानं तिचा फोनच उचलला नाही. तिनं मग व्हाट्सअॅप चेक केलं आणि तिला आपलं ब्रेकअप झाल्याची जाणीव झाली. क्षणभर ती सैरभैर आणि अस्वस्थ झाली.

“माणसं सोडून गेली, तरी आपल्याला चालावं लागतं. आपण या प्रवाहासोबत चाललं पाहिजे,” म्हणत पुन्हा कॉम्प्यूटरमध्ये डोकं घालून बसली. पण तिचं आज काही लक्ष लागत नव्हतं. म्हणून तिनं कॉम्प्यूटर स्विच ऑफ केला. मग मोबाईल चेक केला. मग स्वत:शीच म्हणाली, “या प्रोफेशनल लाईफच्या गेममध्ये कितीतरी कॉन्टॅक्टस् रोज सेव्ह होत जातात, पण त्यातले सगळे कुठे हक्काचे राहतात? आपणच खूप मोठी दरी निर्माण केली आहे, आपल्या आणि सगळ्यांमध्ये. कॉल कोणाला करू? तेच समजत नाहीये.” ती पुन्हा वैतागली. फोन फेकून देऊन रूमच्या बाहेर निघाली. बाहेर रखमा साफसफाई करत होती. टाईमटेबलवर चालणाऱ्या अनयाला अवेळी पाहून रखमा चकित झाली. “मी बाहेर जाऊन येते”, असं अनया म्हणाली आणि चालू लागली.

तिच्या घराच्या एका बाजूला शेत, मध्ये मस्त काँक्रीटचा रस्ता आणि रस्त्यानं छोटी छोटी दुकानं होती. एका हळुवार वाऱ्याच्या झुळकेनं तिला छेडलं. मग अनया स्वत:शीच म्हणाली, “व्वा! ही वाऱ्याची झुळूक किती छान आहे. रोहितवर माझं असंच प्रेम आहे. जाणवतं, पण त्याला ते दिसतच नाही. बट नाऊ ही इज डन विथ मी”, असं म्हणत ती रडवेली झाली आणि चालू लागली. रस्त्याच्या कडेला एक कार थांबलेली तिला दिसली. तिची नजर त्या कारपाशी थबकली. कारजवळ तिची मैत्रिण रिया थांबलेली होती.

तिला पाहून अनया खूश झाली. “ए रिया, रिया”, म्हणत अनया थोडीशी पळत पळत रियाजवळ गेली. दोघी एकमेकींना बघून खूश झाल्या. रियानं विचारलं “आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं? मिळाला का वेळ बाईसाहेबांना आपल्या कामातून?”

“हो गं, छान वाटतंय आज. कितीतरी दिवसांनी मोकळं वाटतंय. आज तीन महिन्यांनी रस्त्यानं  चालताना एक वेगळंच थ्रिल जाणवतंय.” रिया हसली आणि म्हणाली, “तू पण ना…”

इतक्यात रियाला फोन आला आणि फोनवर तिचं संभाषण सुरू झालं, “अरे यार गिरीश, हो केला मी शेकहॅन्ड काय बिघडलं एवढं? तू एफबीवर नवीन नवीन मुलींना अॅड करतोस, तेव्हा मी काहीच बोलत नाही आणि तू किती इनसेक्युअर होतोस, माझ्याबद्दल लगेच. तुझा विश्वासच नाही माझ्यावर. रोजची कटकट झालीये. हे घालू नकोस, याच्याशी बोलू नकोस, यु आर सिक, रिअली सिक! काय तर मुलं कशी असतात, तुला माहीत नाही. फ्लर्टींगची सुरुवात शेकहँडनं होते म्हणे. कोणीही उठसूट घोळात घ्यायला, मी बावळट वाटले का तुला?”

हे चित्र बघून अनयाला रोहितची आठवण आली. काही महिन्यांपुर्वीची गोष्ट होती, अनयाचा एक टीम पार्टनर खूप फ्लर्टी होता. रात्री तासन् तास ती त्याच्याशी कामानिमित्त बोलायची आणि सिरियस मोडमध्ये असताना तो तिला खूप हसवायचासुध्दा. एकदा सहज तिनं रोहितला प्रश्न विचारला, “तुला इनसेक्युअर वाटत नाही का माझ्याबद्दल? मला तो आवडू लागेल म्हणून…” त्यावेळेस रोहित म्हणालेला, “वेडाबाई, आपले हात आपण इतकेही घट्ट धरलेले नाहीत की घुसमट होईल आणि इतकेही सैल सोडलेले नाहीत की सुटून जातील. आपल्यात स्पेस आहे, विश्वास आहे, मग इनसेक्युअरिटीला कुठंय जागा?”

त्यावेळेस अनयाला खूप हसू आलं होतं. “तू खूप जड जड बोलतोस, मला काहीच कळत नाही”, असं ती म्हणाली होती.

“ए अनया, कुठं हरवलीस?” असे रियाचे शब्द तिला ऐकू आले. “हं… अगं काही नाही. ए रिया, ते बघ ती छोटी छोटी मुलं किती छान खेळताय. आपण लहानपणी असंच खेळायचो ना! प्रत्येक क्षण पुरेपूर जगायचो. एका क्षणात हसायचो, दुसऱ्या क्षणात भांडायचो.” रियाला पण हसू आलं. “हो ना, तसं आता पण कोणी अडवलंय तुला? पण तुझं खरंय, मी पण बांधून ठेवलंय स्वत:ला उगाचच”, रिया म्हणाली.

तिच्याकडं बघून अनया मिश्कील हसली आणि म्हणाली, “रिकामेपणातून पोकळी निर्माण होते. ती सलत असते, टोचत असते आपल्याला, म्हणून आपण स्वत:ला गुंतवून ठेवतो. पण कधीकधी आपण गुरफटत जातो आणि पुन्हा मोकळे होतो. माणसाला पुन्हा तेच रिकामेपण सलतं, टोचतं. म्हणजे बघ ना, समीर देवाघरी गेला मग रोहित आला,” असं म्हणताना अनयाला रडूच कोसळलं. इतक्यात रिया म्हणाली, “शांत हो आधी, शांत हो. काही भांडण झालंय का तुमच्यात?” अनया म्हणाली, “हो अगं, कदाचित सगळच संपलंय. जाताना म्हणाला, आय एम डन विथ यू. त्यानं पहिल्यांदाच मला व्हाट्सअॅपवर ब्लॉक केलंय.” रियाला आणखी हसू आलं आणि म्हणाली, “अगं जसं बॅकलॉगशिवाय इंजिनियरिंगमध्ये तसंच नात्यांमध्ये पण ब्लॉक, अनब्लॉकशिवाय मजा नाही. मी या गिरीशला १०० वेळा ब्लॉक आणि अनब्लॉक करते. खूप भांडतो गं आम्ही आणि जेवढे जास्त भांडतो ना, तेवढेच अधिक जवळ येतो. भावना नेमक्यापणे शब्दात व्यक्त करता आल्या नाही, तर माणसं एकमेकांवर चिडतात आणि मग शांत होतात.”

अनया शांत झाली आणि म्हणाली, “हो कदाचित. पण हे खरं आहे, प्रत्येक क्षण हा भरभरून जगता यायला हवा, अगदी त्या लहान मुलांसारखा.” तेवढ्यात त्यांना एक युगूल जाताना दिसलं. ती मुलगी म्हणत होती, “क्या वो वादे, कसमे, सगळं खोट, झूठ… तू बेंगलोरला गेल्यापासून खूप बदलला आहेस.” आणि तो म्हणत होता, “मला तर १५ दिवसांसाठीच जायचं होतं आणि तू तर 2 वर्षांसाठी दुबईला जाणार आहेस. आपलं ठरलं होतं ना, काहीही झालं तरी लांब जायचं नाही म्हणून… कुठून पडलो तुझ्या प्रेमात?”

हे ऐकून अनयाला पुन्हा रोहितची आठवण आली, “अगं शोना, फक्त ३ वर्षांचाच तर प्रश्न आहे. जा तू, त्या प्रोजेक्टसाठी. ही संधी तुला कधीच मिळणार नाही.” तेव्हा अनया म्हणाली होती, “रोहित असा कसा रे तू? तुला कधीकधी पश्चात्ताप होत असेल ना, माझ्या प्रेमात पडल्याचा?” त्यावेळेस रोहित हसला होता आणि म्हणाला होता, “प्रेमात पडायच नसतं राणी सरकार, प्रेमात उभं राहायचं असतं, एकमेकांसाठी जगायच असतं आणि आपण उभेच आहोत की एकमेकांसाठी, एकमेकांसोबत! माणसाला बांधून ठेवता येतं, भावनेला नाही ना…”

“अगं ए अनया, कहा खोई हुई हो? तशी तू खोई खोईच असते, कुठंच सापडत नाही. आज सापडली आहेस, तर तू तुझ्याच विश्वात हरवलेली आहेस.” असे रियाचे शब्द अनायाच्या कानी पडले आणि अनया भानावर आली. तेवढ्यात रिया पुन्हा म्हणाली, “ए, चल आपण घरी जाऊ. आज सयू, अभी, गिरीश, वैशू सगळे जमणार आहेत.  तू पण योगायोगानं भेटलीच आहेस तर चल…”

अनया म्हणाली, “ठीक आहे येते.” अनया रियाच्या कारमध्ये बसली. रियानं कार ड्राईव्ह केली आणि दोघी रियाच्या घरी पोहोचल्या. रियाच्या घरी पार्टी आधीच सुरू झाली होती. म्यूझिकचा व्हॉल्यूम मोठा होता आणि सगळे म्यूझिकच्या ठेक्यात नाचत होते.

अनयाला पण डान्स करण्याची इच्छा झाली. ती सगळ्यांना जॉईन होणार, इतक्यात तिला सँडी आणि वैशूची कुजबुज ऐकू आली. सँडी म्हणत होता, “देख वैशू, अगर तू मेरे साथ नहीं आयी, तो मैं किसी और को लेके जाऊंगा.” मग पुन्हा अनया फ्लॅशबँकमध्ये गेली. तिनं झिडकारलेली रोहितची मिठी तिला आठवली. रोहितचं ते संयमी वागणंही आठवलं. मग पुन्हा भानावर आली. सगळ्यांना जॉईन झाली. म्यूझिकच्या ठेक्यावर आपल्याला पूर्वीसारखं नाचताच येत नाही, हे तिला जाणवलं. मग रियाला म्हणाली, “यार किती रोबोटीक झाले आहे मी. तुला सांगू रिया, या या रोहितनंच लाडावून ठेवलंय मला. माझं थोडं थोडं वजन वाढत होतं, तेव्हा सगळे मला माझ्या वाढलेल्या वजनावरून खूप बोलायचे. तेव्हा हा म्हणायचा, ‘लायन्स लाईक फ्लेश अँड डॉग लाईक बोन्स…’ खूप भारी वाटायचं तेव्हा आणि आता, ही इज डन विथ मी”, असं म्हणत अनयानं हुंदका गिळला आणि हळूहळू त्या वातावरणाशी एकरूप झाली. रोहितला थोडा वेळ विसरली. खूप दिवसांनी गाणं गुणगुणत घरी आली. रखमा अनयाला बघून आश्चर्यचकित होऊन तिच्याकडं बघत होती. रखमा म्हणाली, “ताई आज सगळं ठीक आहे ना? तुम्ही हसताना किती छान दिसता. असंच छान हसत जा.”

अचानक अलेक्सा ‘गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग’ असं सुरेल आवाजात बोलू लागली आणि अनया झोपेतून जागी झाली. आपल्याला स्वप्न पडल्याचं तिला लक्षात आलं, पण तिचा चेहरा आनंदात दिसत होता. तिनं सगळे गॅजेट्स ऑफ केले. खोलीभर पसरलेले कागद आवरले. केस मोकळे सोडले. थोडासा मेकअप केला. टाईमटेबल सेट केलं. आजपासून मी फक्त दिवसरात्र काम नाही करणार, असं स्वतःशीच ठरवलं. सगळं आवरून अनया रूमच्या बाहेर पडली आणि थेट रोहितच घरच गाठलं.

रोहितच्या आईनं दार उघडलं. अनयाला पाहून हसतमुखानं म्हणाली, “ये, आत ये.” अनया आत गेली. सोफ्यावर बसली. इतक्यात रोहितच्या आईनं अनयाला विचारलं, “कशी आहेस?” अनया म्हणाली, “मी छान आहे काकू, तुम्ही कशा आहात? तब्येत कशी आहे तुमची?” “सगळं ठीक आहे”, असं रोहितची आई म्हणाली .

इतक्यात गिटार वाजवल्याचा आवाज आला. अनया म्हणाली, “किती छान गिटार वाजवतो हा!” आणि तिची पावलं “काकू मी आलेच हा”, म्हणत रोहितच्या खोलीच्या दिशेनं वळली. तिला पाहताच रोहितनं गिटार वाजवणं थांबवलं. रोहित म्हणाला, “अनया तू? तुला इथे बघून आणि खूश बघून किती छान वाटतंय मला आज.” इतक्यात रोहितला एक फोन आला. अनयानं तो कट केला. “अगं अनया, काय बालिशपणा लावलाय हा?” असं रोहित म्हणाला.

एवढ्यात अनया म्हणाली, “तूच तर म्हणत असतोस, मी बाईसारखी वागते म्हणून.” त्यावर रोहित म्हणाला, “मी? मी असं मी कधी म्हणालो?” अनया हसून म्हणाली, “तेच ना… तू कधी काही बोलतंच नाही. तू सगळ्या भावना या म्यूझिकमधूनच व्यक्त करतोस. मी काय म्हणते, तू या मॅनेजरच्या जॉबवरून रिजाईन करून फुलटाईम म्यूझिशियन का नाही बनत?”

“एकटं पडल्यावर म्यूझिक असतं. दुकटं असल्यावर म्यूझिक असतं. मला तर अख्खाच्या अख्खा म्यूझिशियनच मिळालाय. हे आयुष्य, या आयुष्यातला प्रत्येक क्षण म्हणजे माझ्यासाठी उत्सवच आहे. मग प्रत्येक क्षण साजरा व्हायला हवा.” असं म्हणत तिनं रोहितच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्या शांततेत दोघांनाही समाधानाचं बॅकग्राऊंड म्यूझिक ऐकू येत होतं.

*

वाचा
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कविता


Website | + posts

श्रद्धा जगदाळे या व्यवसायानं फ्रिलान्स कंटेंट रायटर आणि वेब कॉपीराईटर आहेत. सोबतच त्या मोफत सायबर कन्सल्टिंगदेखील करतात. अवतीभोवती जे चांगलं आहे त्याला प्रोत्साहन द्यायला आवडतं व तेच काम त्या आपल्या www.groundtoearth.in या वेबसाईटच्या माध्यमातून करतात. त्याचबरोबर, त्या मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रांतदेखील काम करतात.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :