‘स्वॉन लेक’ या प्रसिद्ध बॅलेला नव्याने प्रेक्षकांसमोर आणायचे ठरते तेव्हा मुख्य डान्सर बदलून तिची जागी घेऊ शकणाऱ्या योग्य डान्सरचा शोध सुरु होतो. नीना (नॅटली पोर्टमन) या महत्वाकांक्षी डान्सरला ही भूमिका मिळवायची असते. या भूमिकेला असणाऱ्या ‘ब्लॅक स्वॉन’ आणि ‘व्हाईट स्वॉन’ या परस्परविरुद्ध अंगांपैकी निष्पाप आणि नाजूक अशा ‘व्हाईट स्वॉन’साठी नीना सुयोग्य आहेच; मात्र ‘ब्लॅक स्वॉन’च्या आक्रमक आणि गडदपणाला ती न्याय देऊ शकेल का याविषयी कंपनीच्या मालकाला – ‘थॉमस’ला शंका आहे.
सालस आणि आज्ञाधारक असलेली नीना हे खरोखरीच एक विलक्षण पात्र आहे. पांढऱ्या आणि काळ्या रंगा-छटांमध्ये झुलत राहणारं, मध्येच शुभ्र भासणारं, मध्येच गडद होऊ पाहणारं एक लोभस चित्रच जणू! तिची जगण्याची चौकट ठरलेली आहे. तिची रमण्याची चौकट ठरलेली आहे. एक दिवस या चौकटीला मोडू पाहणारे एक आवाहन तिच्या समोर येते आणि तिच्यामध्ये लपलेल्या बंडखोरीची तिला ओळख करून देते.
कधी काळी बॅले डान्सर असणारी आई हा नीनाच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारा सर्वात मोठा घटक आहे. ती जगत आली आहे ते आईने आखून दिलेल्या चौकटीत. ती चालत आली आहे ते आईने दाखवलेल्या वळणावर. परंतु आपल्यामध्ये दडलेल्या ‘ब्लॅक स्वॉन’चा शोध घेण्यासाठी नीना जरा वेगळं वळण घेते, ते मात्र आईला आवडत नाही. आपल्या निश्चयावर ठाम असलेली नीना यामुळे बंडाला पेटते. तिला कल्पनाच नसते की ज्या ‘ब्लॅक स्वॉन’चा शोध ती बाहेर घेत असते त्या ‘ब्लॅक स्वॉन’ची तिच्या आतमध्ये रुजण्याची ही नांदी असते.
सिनेमाचे छायांकन विशेष उल्लेखनीय आहे. नीनाच्या अंतर्मनात चालणाऱ्या द्वंद्वाचे रूपक म्हणून आरशांचा केलेला वापर सुंदर आहे. कला दिग्दर्शनात वापरलेला शुभ्र पांढरा रंग आणि मध्येच दिसणाऱ्या लाल रंग पडदा छान रंगवतात. परंतु ‘ब्लॅक स्वॉन’ची खरी जादू आपल्यावर चढत जाते ती दोन जादूगारांमुळे – पहिला दिग्दर्शक ‘डॅरन ऍरॉनस्की’ आणि दुसरी अभिनेत्री ‘नॅटली पोर्टमन’. दिग्दर्शक सिनेमाला सतत वास्तव आणि भास यांच्यामध्ये झुलत ठेवतो. आपण वास्तवातून भासामध्ये कधी जातो आणि भासातून पुन्हा वास्तवात कधी येतो याचे भान राहत नाही. भास-आभासांच्या कचाट्यात सापडलेले आपण एकटेच असतो का? तर नाही. यामध्ये खरी अडकलेली असते ती नीना. आपण नीनासोबत या खेळात अडकतो कारण आपण नीनामध्ये गुंतलेलो असतो. तिच्या नजरेतून उलगडत जाणारी कथा बघताना तिच्या मेंदूतल्या भीती, संभ्रम, असुरक्षितता यांच्या सारख्या अमूर्त भावना आपण मूर्त झालेल्या बघतो. आणि म्हणूनच तिच्या मनात उफाळून येत असलेला राग रक्तरूप घेताना दिसतो. नीनाच्या आत खोल दडून बसलेला ‘ब्लॅक स्वॉन’ तिला सापडतो तेव्हा काळ्या रंगात बुडत जाणाऱ्या तिच्या अंगाला फुटलेले पंखसुद्धा आपण बघतो. पंख फडफडत नाचताना तिच्या अंतरंगातले काळेपण अधिकाधिक देखणे होत जाते.
निरागसता, नैराश्य, असुरक्षितता, बंडखोरी अशी वेगवेगळी रूपं नॅटली लीलया उभी करते. तिला पडद्यावर बघणं हा केवळ न टाळता येणारा मोह आहे. मुग्ध करणारे संगीत आणि बॅलेचा परफॉर्मन्स हा सिनेमाचा आत्मा आहे. सिनेमा संपला तरी तो मनात रुंजी घालत राहतो…
***
Drama | 2010 | Psycho Thriller / Drama AWARDS: Oscar – Best Actress | Golden Globe – Best Actress | BAFTA Awards – Best Actress, Best Original Screenplay, Best Cinematography, Best Editing DIRECTOR | Darren Aronofsky ACTORS | Natalie Portman, Mila Kunis, Vincent Cassel |
कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.