महाडचे दिवस २३: …आणि कापड्यात!

Mahadche-divas-chapter-23-chitrakshare-deepak-parkhi

काल जीपमधून येताना साहेब म्हणाले, ‘‘जोशी दोन दिवसांनी कापड्याला जाऊन लेबरचा बंदोबस्त करून या. पोलादपूरपासून आपल्याला फक्त डबल लेव्हलिंग करत जायचंय. त्यामुळं लेव्हलिंग स्टाफ (उंची मोजायची चार मीटर उंचीची लाकडी पट्टी) पकडायला दोघे, डंपी लेव्हल उचलायला दोघेजण आणि एखादा जादाचा अशी पाच माणसं तरी लागतील. तेवढी मिळवा. आणि शेवाळेंकडून मस्टर कसा भरायचा, त्याची मेजरमेंट बुकमध्ये कशी नोंद करायची, त्याबरोबर काय काय सर्टिफिकेट द्यायची, हे समजावून घ्या. मस्टर कसा भरायचा, हे समजलं आणि लेबर मिळाले की कामाला सुरुवात करा. आपल्याला पोलादपूरपासून सुरुवात करायचीय. तुमचा कॅम्प राहील कापड्याला. यामुळं कापडा पोलादपूर अंतर पायी जाणं मुश्किल होईल. तेव्हा सर्व्हे कापड्याच्या दिशेनं सरकत निम्म्यापर्यंत म्हणजे पाच किलोमीटरवर येईपर्यंत तुम्ही जीपनीच येजा करून महाडलाच मुक्काम ठेवा. लेबर मात्र कापड्यातून घ्या. त्यांना वाटेल तेवढं चालायची सवय असते.”

कोरा मस्टर घेऊन चव्हाण शेवाळेंच्या पुढ्यात बसायच्या अगोदर मी जिन्यानं वरखाली करत नंबर लावून टाकला. शेवाळेंनी सांगायला सुरुवात केली.
“पान क्रमांक १ – यावर मस्टर कधी, कुणाला आणि कुणी इश्यू केला हे नोंदवायचं. त्यानंतर कामाचं नाव आणि कामाचा उद्देश नमूद करायचा. पान क्रमांक २ – एका बाजूला अनुक्रमांक टाकून पुढं लेबरचं नाव लिहायचं. गावातल्या लोकांची आडनावं बऱ्याचदा एकच असतात. यासाठी आडनाव न लिहिता लेबरचं फक्त नाव आणि बापाचं नाव, गावाचं नाव इतकं लिहायचं. पुढं तारखा आणि हजेरी मांडण्यासाठी कोष्टक असतं. प्रत्येक उभ्या रकान्यात त्या दिवसाची तारीख लिहायची. ती व्यक्ती सकाळी कामावर आली असेल तर ‘\’ अशी रेघ मारायची. तीच व्यक्ती दुपारीपण आली असेल तर एक्स चिन्हासारखी ‘x’ अशी खूण करायची. त्यादिवशी ती व्यक्ती सकाळी गैरहजर असेल तर ‘0’ असा शून्य आकार लिहायचा. दुपारीही आली नसेल तर त्या शून्याच्या पोटात अजून एक ‘0’ असा गोल काढायचा. सकाळी आली पण दुपारी नाही आली तर ‘0’ च्या पोटात ‘/’ अशी रेघ मारायची… म्हणजे त्याचा अर्धा दिवस हजेरी पकडली जाईल. हा मस्टर एक किंवा दोन आठवड्यासाठी वापरायचा. सर्वात शेवटच्या आडव्या रकान्यात त्या व्यक्तीचे एकूण हजर दिवस लिहायचे. त्याचवेळी एका दिवसाची एकूण लेबर संख्या लिहिण्यासाठी उभ्या रकान्यात बेरीज मारायची. आडव्या रकान्याची आणि उभ्या रकान्याची बेरीज एकसारखी यायला हवी.

पान क्रमांक ३ – एकूण कालावधीमध्ये किती ‘लेबर दिवस’ (मॅन डेज) आले हे येतं. म्हणजे रोज दहाजण सात दिवस काम करतायत.. याचा अर्थ १० x ७ =७० लेबर दिवस आले. आता मजुरीच्या दरानं गुणलं की एकूण खर्च समजतो. आता लेबर रोज दर समजा पाच रुपये आहे तर एकूण खर्च ७० x ५ = ३५० रुपये येईल.

पान क्रमांक ४ – झालेल्या कामाचा आवाका (क्वांटिटी) सरकारी दरानं किती येतो, हे लिहायचं. आता आपला एकूण खर्च रुपये ३५० आलाय आणि सरकारी दराने तो समजा ४१५ रुपये आता प्रत्यक्षात आलेला खर्च कमी असल्यानं मस्टरला मान्यता लगेच मिळेल; परंतु सरकारी दरानं हा खर्च २५० रुपयेच येत असेल तर (३५० – २५० =) १०० रुपये खर्च का वाढला, याची कारणं द्यावी लागतात. उदाहरणार्थ, अचानक पाऊस आला किंवा तुमच्या सर्व्हे सामग्रीत बिघाड निर्माण झाला.

आता हा मस्टर पूर्ण भरून झाला की, यातील सर्व विवरण मेजरमेंट बुकात म्हणजे एमबीमध्ये लिहायचं. यावर मस्टर हाताळणारा, मोजमापं नोंदवणारा, मस्टर तांत्रिक आणि गणिती तपासणारा आणि शेवटी खर्चास मान्यता देणारा अधिकारी अशा सगळ्यांच्या सह्या शिक्के येतील.

प्रत्येक व्यक्तीच्या नावापुढच्या अगदी शेवटच्या रकान्यात रक्कम वीस रुपयांपेक्षा जास्त असेल तर पावती तिकीट लावून त्यांच्या सह्या किंवा अंगठे घेऊन रक्कम अदा करायची असते. सर्व लेबरची रक्कम अदा झाल्यावर त्या मस्टरचं काम पूर्ण होतं.”

मला शेवाळेंच्या सांगण्याचं खूप कौतुक वाटत राहिलं; पण राहून राहून त्यांच्या संशयी नजरेचं कुतुहूल होतं. ते शमवण्याची संधी शेवाळेंनीच मला दिली. माहिती सांगून त्यांचा घसा कोरडा पडला होता. त्यांना चहा हवा होता.

बाहेर चहा पिताना शेवाळे खुलत गेले. मी त्यांना खुलवत गेलो. शेवाळे सांगत होते,
“बाहत्तर सालच्या दुष्काळात आमच्या पुरंदर तालुक्यात दुष्काळी कामावर जेइ मस्टर भरायचे. त्यात बरेच गोंधळ असायचे. एकूण लेबर दिवस आणि चौथ्या पानावरच्या सरकारी दरात काढलेल्या कामाची क्वांटिटी कधीच टॅली व्हायची नाही. त्याच्याशी टॅली करण्यासाठी लेबर रेट फ्लोटिंग असायचा. म्हणजे सरकारी दरानं येणारी रक्कम भागिले लेबर दिवस हा भागाकार केला तर लेबल रेट दीड पावणेदोन रुपये यायचा. यात लेबर खाणार काय, हा प्रश्न पडायचा. मग त्यासाठी कामाची क्वांटिटी दिखाऊ वाढवायला लागायची. लेबरच पोट भरावं यासाठी ते करावं लागायचं. हे उघड गुपित होतं. पण व्हायचं काय या अलिखित समजुतीचा फायदा जेइ स्वतःच्या तुंबड्या भरून घेण्यासाठी करायचे. त्यावरदेखील लक्ष ठेवावं लागायचं. जेइ लोकांचाही नाईलाज आणि आम्हा परीक्षण करणाऱ्यांचाही नाईलाज. जोशी तुम्हाला सांगतो.. सगळ्या पुरंदर तालुक्यातील कामांवरील मस्टरची बेरीज मारली तर अख्ख्या तालुक्यावर दीडफूट माती पसरण्याइतकं काम दिसलं असतं. यामुळं मस्टर म्हणलं की माझा संशयी स्वभाव जागा होतो. तुम्ही काही तसलं करणार नाही आणि तशी लेबर संख्याही मर्यादित असणार आहे म्हणा. तरीही काळजी घ्यायला हवी.

आणखी एक सांगतो.. कुरेशी माझ्याशेजारी बसतो. त्याची नजर कावळ्याची आहे. थोडाफार त्याला पूर्वीचा अनुभवही आहे. त्याच्यापासून जपून रहायला हवं. समजा.. समजा हं तुम्ही असं काही केलं किंवा करावं लागलं तर मला अगोदर सांगून ठेवा. आपण निभावून नेऊ. पण कुरेशींपासून जपा.”

शेवाळे सांगतायत कुरेशींपासून जपा. शहापूरकर सांगतो कुरेशींपासून सावध रहा. मला तर तो चांगला सहकारी वाटतोय. त्याचे चांगले ढीगभर गुण बाजूला ठेवून मी त्याच्यातला वाईट गुण शोधत बसलो. मला पूर्वी तो गुण जाणवला होता; पण आता जास्तच छळायला लागला. त्याचं पगाराच्या मानानी विलासी रहाणं. विलासी राहण्यातून आणि रसिक व्यक्तिमत्त्वाचा आधार घेऊन मुलींना जाळ्यात ओढणं. खरंच त्याचा रूममेट होणं योग्य राहील का? पण त्याच्या वागण्याचं कुतूहल आणि ओढ दोन्ही वाटतंय. पुण्याला घरी तो आला तेव्हा त्याचं घरच्यांशी वागणं किती छान होतं. मानवी स्वभावाचा लेखक म्हणून दादांना अंदाज होता, तरीही ते कुरेशी हा चांगला मित्र आहे, हे अधोरेखित करून गेले होते.

मस्टर म्हणजे काय, हे शेवाळेंनी सांगितलं होतं. त्याचा विचार खोलीवर आल्यावर करत होतो. त्यावेळी साळीसाहेबांनी न सांगितलेली; पण नंतर बीएसनी समजावून दिलेली गोष्ट तरंगून वर आली. कॅम्पसाठी जागेचं भाडं मस्टरमधून द्यायचं.. म्हणजे काय करायचं? शेवाळेंनी सूचित केलेली आणि बीएसनी करायची म्हणून सांगितलेली गोष्ट आपण करायची. पहिला मस्टर लिहिताना आपल्याला भीती वाटेल का?

आज मात्र मी शहाणपणा केला महाड-वाई गाडीने थेट कापड्याला उतरलो. आमदारांच्या घरी गेलो. दार उघडं. दबकत आत न जाता सरळ खिडकीशी गेलो. तळ्यावर कुशाबा कपडे धूत होता. त्याला एक हाक मारली. तो आल्यावर त्याला विचारलं,
“आमदार आणि ताई कुठंयत?’’
त्यानी हात महाबळेश्वरच्या दिशेनी करून म्हटलं, “मुंबईला गेलेत. आमदारांच्या साडूकडे.”
कुशाबानं केलेला काळामिट्ट चहा पिऊन झाल्यावर त्याला म्हटलं,
“आपल्याला पाच-सहा गडी माणसं पाहिजेत.”
कुशाबानी विचारलं, ‘‘साफसफाई करायला का? त्याची गरज नाही. जंगमचं घर आरशावानी लख्ख हाय.”
“त्यासाठी नाही रे, मोजणी सुरू करायचीय.”
“पाच-सहा का धा-बारा आणतो की.”
“नको नको इतके नकोत. परवापासून हवेत. परवा सकाळी साडेसातला पोलादपूरच्या पुलापाशी हवेत. आम्ही महाडमधून येऊ. दुपारी एक वाजेपर्यंत काम करून परत महाडला जाऊ. साधारण पहिला आठवडा आम्ही महाडमधून येतजात राहू. नंतर मात्र जंगमच्या खोलीवर मुक्कामाला असू. मग सकाळी सगळे मिळून एकत्र जाऊ. तू येणार ना कामाला?”
कुशाबानी थोडा वेळ विचार केला.
“साहेब आता मी माणसं बघणार म्हंजी मी मुकादम की हो. मग मी कसं काम करावं? बरं साहेब एक सांगा.. लोकांना काय पगार देणार? आणि मला काय देणार?”
इतका व्यावहारिक विचार सुरुवातीला करावा लागेल, असं काही माझ्या मनात आलं नव्हतं. प्रत्येकवेळी प्रश्न सोडवायला ‘कुणाला तरी विचारून सांगतो’ ही सवय लावून घ्यायची नाही, हे मी मनाशी ठरवलं. सांगून टाकलं,
‘‘लोकांना चार रुपये पासष्ठ पैसे आणि तू काम केलंस तर सहा रुपये. काम नाही केलंस तर तुलाही त्यांच्या इतकेच.’’
कुशाबाला तसा व्यवहार कळत नव्हताच. पण आपली हजेरी वेगळी आणि जास्तीची आहे म्हटल्यावर तो म्हणाला,
“असं असलं तर मी बी काम करीन.”
कुशाबानी आत्ताच मुंडासं झाडलं.

साळीसाहेब, बीएस, एनएम आणि मी बरोबर साडेसातला पोलादपूरला पोचलो. पुलापाशी गॅंग वाट पहात पुलाच्या कठड्यावर बसलेली. साहेबांनी माझ्याकडं समाधानानं पाहिलं. पुलासमोर मी लेव्हल लावली. बबल सेंटरला आणला. साहेबांनी लेव्हल फिक्सिंग ओके केलं. दुसरी लेव्हल थोडी लांब बीएसनं लावली. ती मात्र साहेबांनी स्वतःच ओके म्हणून न बघता ओके केली. पुलावरच्या जीटीएस बेंचमार्कवर एक स्टाफ धरायला लावला. मी दुर्बिणीतून पाहून रिडिंग घेतलं – वन पॉईंट टु फाईव्ह. फिल्डबुकमध्ये लिहिलं. आता त्याच स्टाफवर बीएसनं रिडिंग घेतलं. थ्री पॉईंट सेवन टू. आता स्टाफ पन्नास मीटरच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला उभा केला. साहेबांनी कडेला पडलेल्या फरशीच्या तुकड्याकडं बोट दाखवत म्हटलं,
‘‘त्या स्टाफखाली हा फरशीचा तुकडा ठेवा. याचे दोन फायदे. एक म्हणजे स्टाफ उचलल्यानंतर तो आधी कुठं धरला होता, हे लक्षात ठेवायची गरज नाही. आणि दुसरं मातीवर स्टाफ धरला की स्टाफच्या वजनानं माती खचते आणि रिडिंगमध्ये फरक येऊ शकतो. फरशीमुळं तसं होत नाही. आता बदललेल्या जागेचं स्टाफ रिडिंग दोघांना घ्यायला लावलं. ते घेतल्यावर पूर्वीच्या आपापल्या रिडिंगमधून आत्ताचं आपापलं रिडिंग यांची वजाबाकी केली. बीएसची वजाबाकी आली झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह. माझी आली झिरो पॉईंट सिक्स सिक्स. दोघांच्या वजाबाकीत एक सेंटीमीटरचा फरक. मग साहेबांनी माझी दोन्ही रिडिंग दुर्बिणीतून पाहून चेक केली. बरोबर आहे म्हणत बीएसच्या लेव्हलकडं गेले. एका ठिकाणी त्यांनी आय पिसमधून बघताना डोकं वर-खाली हलवलं आणि म्हणाले,
‘‘पाटील, तुम्ही पॅरॅलॅक्स रिमूव्ह नाही केलेला.”
मग दुर्बिणीचा स्क्रू पुढंमागं करून पुन्हा रिडिंग घेतलं. ते आता एक सेंटीमीटरनं कमी आलं. त्याच्या फिल्डबुकमध्ये पहिली नोंद खोडून नवं रिडिंग लिहिलं. आता दोघांची वजाबाकी तंतोतंत बरोबर. यावर साहेब म्हणाले, ‘‘याला डबल लेव्हलिंग म्हणतात. प्रत्येकवेळी वजाबाकी एकमेकांशी ताडून बघायची. फरक आला तर तो का आलाय हे समजावून घ्यायचं. कुणाच्या नोंदी बदलून घ्यायला हव्यात ते ठरवायचं. आणि मग पुढं जायचं. या पद्धतींनी पुढं जात राहायचं. असं करत करत आपल्याला साखरबोरजच्या धरणभिंतीपर्यंत जायचंय. दीड महिना लागेल असं वाटतंय. चला पुढं.”

दुपारचे साडेबारा वाजले. आम्ही कापड्याच्या दिशेनं एक किलोमीटर आलो होतो. कुशाबा आणि बाकी लोकांना मजा वाटत होती.. कारण यात कष्ट वाटत नव्हते. केवळ कान उघडे ठेवायचे होते.. आमच्या सूचना ऐकायला.
महाडला पोचलो तेव्हा दीड वाजला होता. कोकणेंच्या खानावळीत गेलो तर बाजूच्या बाकावर कुरेशी बसलेला.
त्याला जेवण झालं का म्हणून विचारलं. त्यावर तो एवढंच म्हणाला की, ‘तुझ्याशिवाय?’
कधी नव्हे ते मी सपासप जेवत होतो आणि कुरेशी रवंथ केल्यासारखा. आजच्या दोघांच्या भुकेत अंतर पडलं होतं.

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :