शेवाळेंनी सांगितलेल्या सगळ्या सूचना पाळून मस्टर भरला. मी काय करतोय, हे चव्हाण मन लावून पहात होता. माझ्याशेजारी बसून म्हणाला, ‘‘मी काही शेवाळेंकडं गेलो नाही. तो माणूस धड बोलत नाही, त्यापेक्षा असं कर ना तूच मला समजावून सांग मस्टर प्रकरण.’’
मला सिद्दीकी आठवला. माझा अभ्यास घेताना तो मला समजावून सांगत होता ते डोळ्यापुढं आणलं. मास्तरकी करायची पहिली संधी मी वाया घालवली नाही. चव्हाण समाधानानं उठला तेव्हा भरून पावलो. पण सिद्दिकीच्या पाठोपाठ परीक्षेच्या निकालाची दाबून ठेवलेली धास्ती परत उठून उभी राहिली. स्वतःला समजावलं, कशाची धास्ती नाही घ्यायची. कुरेशीसारखं वागायचं.. बिनधास्त.
संध्याकाळी कुरेशीबरोबर फिरताना मुस्लिम मोहल्याच्या टोकाला गांधारी पुलापाशी त्याच्या आग्रहासाठी गेलो. त्याचा हा आग्रह का आहे, याचं कोडं क्षणात उमगलं. पुलाच्या कठड्याला रेलून दोघीजणी उभ्या होत्या. एक मुलगी खरंच देखणी होती, तर दुसरी अशी तशी. पुलाच्या एका टोकाला कुरेशी आणि ती देखणी मुलगी बोलत होते, दुसऱ्या टोकाला मी आणि ती दुसरी. एका टोकाला खूप बडबड चाललेली दिसत होती. अलीकडच्या टोकाला ती आणि मी गप्प. ते बडबडीचं सेशन पंधरा मिनिटात संपलं. गप्प राहण्याचं सेशन संपलं याला काहीच अर्थ उरला नव्हता.
त्या दोघी गेल्या त्याच्या विरुद्ध दिशेला मी आणि कुरेशी चालत राहिलो. कुरेशी एकच गोष्ट मला वारंवार सांगत होता की, ही त्याची नवी मैत्रीण माझी जातवाली आहे. त्याचं हे पुन्हा पुन्हा सांगणं मला मुद्दाम बिंबवल्यासारखं वाटलं. काय प्रतिक्रिया देऊ? माझी अडचण कुरेशीनं निकालात काढली. तो माझी प्रतिक्रिया काय आहे, हे जाणून घ्यायला उत्सुक नव्हता. तसंच मी पंधरा मिनिटं पुलाजवळ का गप्प होतो, हेही विचारत नव्हता. मला तो इतकंच म्हणाला, ‘‘रात्री सुंदर टॉकीजला ‘खेल खेल मे’ बघायला आपण जायचंय. वेड्यासारखा एनएम आणि कोल्हे यांना सांगू नकोस. फक्त तू आणि मीच जायचंय.’’
सिनेमा बघायला कुरेशीला माझी कंपनी आवडतीय, याची मला मजाही वाटली आणि समाधानही. आपली सिनेमादृष्टी कुरेशीला आवडतीय म्हणजे मास्तरकी करायचा चान्स आहे. मी मनाशी म्हटलं. रात्री साडेआठला पहिल्यांदा मी एनएम आणि कोल्हेला कलटी मारून तांबट आळीतून ठकठक बंद झालेले आवाज ऐकत फिरत राहिलो. दहा मिनिटांनी कुरेशीनी नगरपरिषदेच्या इमारतीजवळून मला ये असा इशारा केला आणि तो सुंदर टॉकीजच्या दिशेनं निघून गेला. जेमतेम अडीच मिनिटात मी तिकीट विंडोपाशी गेलो. कुरेशीच्या हातात चार तिकिटं होती.
सुंदर टॉकीजची बाल्कनी बॉक्ससारखी होती. एका बॉक्समध्ये सहा खुर्च्या. आम्ही दोघं आत बसलो. तेव्हा बॉक्समध्ये आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. कारण आज आठवड्याचा शेवटचा सिनेमा दिवस होता. आज गुरुवार होता. जाहिराती आणि इंडियन न्यूज चालू होतं. कुरेशी उठला आणि बाहेर गेला. तू बसून रहा त्यानी मला बजावलं. तो परत आला तेव्हा त्याच्याबरोबर त्या दोघी होत्या.
कुरेशीनं मला मागच्या रांगेत बस म्हणून सांगितलं तेव्हा ती त्याच्याशेजारी बसली.. दुसरी माझ्या. ते दोघं सिनेमा पाहतायत आम्ही दोघं सिनेमा पाहतोय. त्याचा परफ्युमचा वास दरवळतोय, माझी छाती धडधडतीय. दहा-पंधरा मिनिटात सिनेमाची लिंक लागेल, इतपत गोष्ट आकाराला येत होती. पुढच्या ओळीत गोष्ट नसलेला सिनेमा सुरू झाला. कुरेशीनं त्याचा हात तिच्या मानेभोवती टाकला. दोघांची डोकी अंधारात ठो दिल्यासारखी एकमेकांवर आपटत होती. मध्यंतराला सिनेमाची गोष्ट मला काय समजलीय, हे मी कुरेशीला सांगायचा प्रयत्न करत होतो, तेव्हा पॉपकॉर्न खात त्या दोघी आमच्याकडं बघून कुजबुजत होत्या.
मध्यंतरानंतर सिनेमा सुरू होण्यापूर्वी आम्ही चौघं एकाचवेळी आत शिरलो. याचं कारण त्या दोघींना ओळखणारं कुणी नव्हतं. सिनेमा सुरू झाला. माझं लक्ष गेलं तेव्हा ती कुरेशीच्या मांडीवर खाली वाकलेली दिसली. ती काय करतीय, हे अंधारात बघायचा प्रयत्न केला. खाली वाकलेल्या तिच्या तोंडातून चुबुक चुबुक आवाज येत होता. मला सिनेमाची पुढची गोष्ट समजेना. कारण माझा हात त्या बयेनं घट्ट पकडणं मग सैल सोडणं सुरू केलं होतं. माझा हात घामानी भिजायला लागला होता, तेव्हा पुढच्या बाकावर ती ओलं तोंड रुमालानी पुसत होती.
माझ्याकडं ही बघत होती.. ते मी काही करावं या अपेक्षेनं. माझी सगळी गात्र जागी होती; पण मन गर्भगळीत झालं होतं.. भीतीच्या छायेत कावरंबावरं झालं होतं. आता तिनी माझा हात सोडला आणि रस संपलाय असं मान हलवून मला सूचित केलं. मला सुटल्यासारखं झालं. मला ती माझ्याबद्दल विचारत राहिली. मी पुण्याचा आहे इतकंच सांगून टाकलं; पण यापुढं जास्तीचं काही बोलायचं नाही, हे ठरवून टाकलं. संपूर्ण नारायणपेठ संस्कार मला ओळख देत होते. सिनेमा संपत आला तेव्हा ती म्हणाली,
‘‘पुण्याला जाल तेव्हा मला काय घेऊन याल?’’
मी नेलपॉलिश म्हटलं तेव्हा ती म्हणाली,
‘‘नेलपॉलिश, लिपस्टिक, पावडरी माझ्याकडं बऱ्याच गोळा केलेल्या आहेत. तुम्ही मला शेवंतीची वेणी आणा.”
माझ्याशेजारी ती बसली होती, मी काही करावं याची वाट पहात होती. मी ढिम्म बसून. तिच्या केसात माळलेली मी आणून दिलेली शेवंतीची वेणी कशी दिसेल, हे पाहण्यात वेळ घालवत होतो. तिच्या अंगावरच्या गोल साडीऐवजी चापून चोपून नेसलेली नऊवारी कल्पनेनं पहात होतो. सिनेमा आणि धडधड दोन्ही एकदाचे संपले. कुरेशी आणि ती आवरल्यासारखं.. सावरल्यासारखं उठून उभं राहिले.
बाहेर आलो. कुरेशी सिनेमातलं गाणं गुणगुणत होता. माझ्या खिशातली बर्कले त्यांनी पेटवली. माझ्या विझलेल्या चेहऱ्याकडं बघत म्हणाला,
‘‘पहली बार ऐसाच होता है.. जोशीभाऊ.’’
आम्ही दोघं खोलीवर आलो. कोल्हे आणि एनएम शांत झोपले होते. कॉटवरची गादी तशीच ठेवून मी आतल्या खोलीत सतरंजी टाकून झोपण्यासाठी मधलं दार लोटलं. माझ्या गादीवर कुरेशीला टेकून दोन मिनिटं नाही झाली तर त्याचा घोरण्याचा आवाज सुरू झाला. मी आतल्या खोलीत मोरीकडं पहात बसून राहिलो. इतका वेळ फक्त फुललेली गात्र पुन्हा उभारली होती. मी ती शांत केली. मोरीमध्ये अर्धी बादली पाणी टाकलं.
जाग आली तेव्हा पहाटेचे साडेपाच झाले होते. कोल्हे आणि एनएम उठले होते. कुरेशी झोपून होता. त्याला कुठं सर्व्हेला जायचं होतं. सर्व्हेला जाण्यासाठी कोल्हे, एनएम आणि मी तयार झालो. दाराशी जीपचा हॉर्न ऐकला. जीपमध्ये बसताना कोल्हे कानात म्हणाला, ‘‘रात्री आत झोपलास? मोकळा झालास ना?” मी लाजण्यापलीकडं काय करणार होतो.
पोलादपूरला पोचलो. कुशाबा आणि गॅंग हजर. आज आमच्या गँगमध्ये साहेब नव्हते. त्यांची शिकवणी काल झाली होती. अभ्यास आमचा आम्हाला करायचा होता. दुपारी साडेबारापर्यंत आम्ही आणखी एक किलोमीटर सर्व्हे करत सरकलो होतो. आज रस्ता चढ-उताराचा नव्हता, त्यामुळं लेव्हलच्या रेंजचा पूर्ण उपयोग करता आला. त्यामुळं दोघांच्या लेव्हलच्या रिडिंगच्या वजाबाकीत फरक पडत नव्हता. काम फटाफट होत होतं.
बीएसचं फिल्डबुक पाहिलं. कोऱ्या भागात त्यानी महत्त्वाच्या जागा आजूबाजूच्या संदर्भासहित रेखाटल्या होत्या. मला ते खूप आवडलं. काही कारणांनी परत त्याच ठिकाणी यायचं झालं तर जागा पटकन सापडणार होती. बीएसप्रमाणं आपलंही फिल्डबुक सर्व नोंदीयुक्त ठेवायचं, मी ठरवलं. बीएसकडून नीटनेटकं काम कसं करावं, हे शिकलो. कुरेशींकडून बिनधास्त कसं राहावं, वागावं हे शिकायची गरज नव्हती. कारण मला तसं वागायचं नव्हतं. सिनेमाचा अनुभव आत आक्रोश करत होता.
दुपारी ऑफिसला आलो. माझी चाहूल लागताच साहेबांनी हाक मारली आणि एक सुखद धक्का दिला.
“जोशी तुम्ही लोकं पहाटेपासून साईटवर जाताय. त्यामुळं सर्व्हे संपवून परत आल्यावर ऑफिसला यायची गरज नाही. घ्या.. विश्रांती घ्या.”
शेवाळे माझ्याकडं बघून हसत होते ते कपाटाच्या आडून.
रात्री जेवायला कोकणेंकडं गेलो. आमच्या गॅंगमधलं कुणीच नव्हतं. जेवताना समोर एकजण बसला होता. त्याच्याशी गप्पा मारत बसलो. तो म्हणाला,
‘‘मी मोटे. टेलिफोन खात्यात आहे. मी तुला इथं बऱ्याचदा बघितलंय; पण सतत कुणी ना कुणी तुझ्याबरोबर असायचं. त्यामुळं परिचय झाला नाही. एक-दोनदा तू कुणाशीतरी बोलताना ऐकलं तेव्हा तू बुद्धिबळाविषयी बोलत होतास. मलाही बुद्धिबळ खेळायला आवडतं. आज माझी नाईट शिफ्ट आहे. नाईटला फारसं काम नसतं. तुझी इच्छा असेल तर ये टेलिफोन सेंटरला. एखादा डाव टाकू. मला हरायला आवडेल तुझ्याबरोबर.’’
मला खूप आनंद झाला. विरंगुळा म्हणून चव्हाणच्या खोलीवर तीन पानी खेळायचो. मी नेहमी प्लसमध्ये असायचो; पण मन रमायचं नाही. त्यापेक्षा हे बरं आहे. मी लगेच ‘हो’ म्हटलं. बडीशेप चघळत त्याच्याबरोबर गेलो. जाताना खोलीतून बुद्धिबळ पट आणि सोंगट्या घेतल्या. डाव मांडला. तो हरला. बुद्धिबळाचं वैशिष्ट्य म्हणजे हरणारी व्यक्ती नेहमीच दुसरा डाव खेळायला उतावीळ असते. त्यांनी पुन्हा डाव मांडला. डावाच्या मध्यात माझी चूक झाली आणि मी घोड्याच्या बदल्यात वजीर गमावला. पंधरा मिनिटात डाव संपला. तो समाधानानं हसला. आता त्याची अपेक्षा होती की, मी हा डाव हरल्यानं तिसरा डाव सुरू करीन. मी तो मोह टाळला. कारण दोन डाव लागोपाठ खेळल्यानं शीण आला होता. मला सिगारेट ओढायची होती.
मोटेच्या परवानगीनं मी जिन्यात सिगारेट संपवली. तो बदलापूरचा होता.
‘‘कधी आलायस का बदलापूरला?’’ त्यानं विचारलं. मला हे बदलापूर कुठं आहे हेदेखील माहीत नव्हतं. माझं अज्ञान त्याला पर्वणी वाटली. कल्याण, अंबरनाथ याठिकाणी त्यानं मला गप्पातून फिरवून आणलं. मला त्यानं विचारलं,
‘‘पुण्याला तुमच्याकडं फोन आहे का?’’
मी नाही म्हणालो.
‘‘मग जवळपास कुणाकडं?’’
मी म्हटलं, ‘‘शेजारच्या वाड्यात एक वकील रहातात त्यांच्याकडं आहे.’’
‘‘देतात का ते फोन तुम्हाला?’’
‘‘देतीलही. त्यांच्या खिडकीतून आमची खिडकी दिसते.’’
‘‘हो का.. एक चान्स घेता येईल. उद्या नाही पण परवा माझी ड्युटी दुपारी आहे चार वाजेपर्यंत. आलास तर मी फोन लावून देऊ शकेन. नंबर घेऊन ये त्यांचा.’’
मोटेच्या इथून बाहेर पडलो, कधी परवाचा दिवस उजाडेल असं झालं होतं.
दोन दिवस आमचा सर्व्हे कापड्याच्या दिशेनी सरकला. आता यापुढच्या सर्व्हेला मुक्काम कापड्याला ठेवून जमणार होतं. दुपारी सर्व्हे संपताना कुशाबाला आम्ही सांगितल की जंगमना निरोप दे की, ‘उद्या आम्ही येतोय.’
कुशाबाला हायसं वाटलं. त्याच्या लोकांची पायपीट तेवढीच रहाणार होती पण आता दोन्हीवेळा या लोकांबरोबर चालायला आम्ही बरोबर असणार होतो. माझ्या सहवासात कुशाबा खुश होता. महाडपलिकडचं जग न पाहिलेल्या कुशाबाला मी गप्पात पुण्यापर्यंत नेऊन आणत होतो.
उद्या जीपनी मुक्कामाचं सामान घेऊन जायचं होतं. दुपारी मोटेच्या सेंटरवर गेलो. मोटे म्हणाला,
‘‘आणलास नंबर त्या वकिलांचा? चल देतो जोडून. पण एक अडचण आहे. कनेक्ट करण्यासाठी महाडमधला कुठला नंबर घेऊ?’’
ही अडचण मोटेच्याही लक्षात अगोदर आली नव्हती, तर माझ्या कुठून येणार? मी विचारात पडलो आणि त्याला म्हणालो, ‘‘ठोंबरे क्लॉथ शॉपच्या नंबरला जोडता येईल का?”
मोटे बरं म्हणाला. त्यांनी कॉर्ड ठोंबरे यांच्या सॉकेटमध्ये घातली.
ट्रिंग ट्रिंग.. फोन वाजला. वकिलांनी तो उचलला. खिडकीतून ओरडून हाक मारली. आई फोनवर आली. मला सगळं स्वप्नवत वाटत होतं. आयुष्यात प्रथमच एकट्या आईशी असं बोलत होतो. बोलणं संपताना म्हणाली,
‘‘विनय, हे म्हणत होते शुक्रवारी तुझ्या कॉलेजमध्ये रिझल्ट येणार आहे. जाऊन आणणार आहेत हे. एकदाचं गंगेत घोडं न्हाऊ देत म्हणाले. तू रागावू नकोस.. काळजी करतात रे ते. असाच फोन कर शुक्रवारी.’’
आईनं फोन ठेवला. माझी अपेक्षा होती फोन घ्यायला गौरी येईल. आईशी बोलताना काय वगळायचं आणि गौरीशी बोलताना काय जादाचं बोलायचं याची काहीच पूर्वतयारी केलेली नव्हती. त्यामुळं थोडी गडबड होतीय का, अशी शंका होती.
मी ठोंबरेंच्या दुकानात आलो. तक्क्याला टेकून बसलेल्या ठोंबरेंनी विचारलं,
‘‘काय दाखवू?’’
मी मानेनंच नाही म्हणत जवळ बोलावलं. दिलगिरीच्या सुरात त्यांच्या फोन नंबरचा मी केलेला वापर सांगितला. त्यांच्या काउंटरवरच्या काचेवर दीड रुपया ठेवला. ते बरं म्हणाले. मी जाताना इतकंच म्हणाले,
‘‘ते ठीक आहे पण बाकी कुणाला असं केलंय म्हणून सांगू नका. हा दीड रुपया फक्त तुम्हीच द्याल… जोशी.’’
दुकानातून बाहेर पडलो तेव्हा मला कळून चुकलं आपल्याला रिझल्ट पत्रातूनच समजणार. प्रामाणिकपणा याचा अर्थ अपराधीपणाच्या भावनेची सारवासारव.
(क्रमशः)
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)