ट्विट ‘क्वीन’ कंगणा राणावत

मागील आठवड्यात कंगणा राणावतनं काही ट्विट्स शेअर करून धुरळा उडवून दिला होता. त्यात ती म्हणते की अभिनयामध्ये तिनं जी रेंज दाखवली आहे ती जगात कुणीच दाखवू शकणार नाही. तिच्यात जे रॉ टॅलेंट ते मेरील स्ट्रीप या हॉलीवूड अभिनेत्रीप्रमाणे आहे. तिनं जे स्टंट्स केले आहेत त्यासाठी स्वतःची तुलना तिनं टॉम क्रूझसोबत केली. तसेच मार्लिन ब्रान्डो यांनी ऑस्कर नाकारलं तसा मी फिल्मफेअरचा पुरस्कार नाकारला अशी दर्पोक्ती केली. एकुणात तिच्या म्हणण्यानुसार सध्या ती एकमेव अशी भारतीय अभिनेत्री आहे जी कुठल्याही भूमिका लीलया करू शकते. यासाठी तिनं जयललितांवरील चरित्रपट ‘थलैवी’ व ‘धाकड’ या तिच्या येऊ घातलेल्या दोन सिनेमांची उदाहरणं देऊन सांगितलं.

तसं बघायला गेलं तर तिच्या बोलण्यात तथ्य आहे. सकृतदर्शनी एका राजकीय व्यक्तीच्या जीवनावरील चरित्रपट करणं सोबतच एका अॅक्शनपटात प्रमुख भूमिका करणं कौतुकास्पद. कंगणाचं वय फक्त ३३ आहे. इतक्या लहान वयात जयललितांसारख्या प्रदीर्घ व यशस्वी राजकीय कारकीर्द असणाऱ्या स्त्रीची भूमिका करणं स्तुत्य गोष्ट. त्यांच्या जीवनातील चढउतार व वयातील बदल तिनं लीलया दाखवले असतील असं गृहीत धरूया. त्याच बरोबर धाकड या पूर्णतः अॅक्शनपटात स्वतः स्टंट्स करणं म्हणजे प्रेक्षकांनी तोंडात बोटं घालायला हवीत. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर ते घालतीलच अशी आशा करूया, नपेक्षा तिचे निस्सीम चाहते नक्कीच तोंडात बोटं घालतील यात शंका नाही.

तिनं स्वतःचं असं कौतुक करून घेणं इथं फारसा मोठा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की तिनं ते तसं का केलं असावं? तिला तसं करण्याची का गरज पडली असावी? इतकी मोठी, लोकप्रिय अभिनेत्री, तिला कशाला हवंय स्वतःच स्वतःचं कौतुक? तिनं नुसती हाक मारली असती तर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर स्तुतिसुमनं वाहायला जीवाचं रान केलं असतं. पण इथंच हमारी फिल्म ऑफ-बीट हो जाती है. कारण कंगणा ज्या भारतीय मानसिकतेचं दर्शन घडवते त्याबद्दल इथं बोलणं गरजेचं आहे.

ती मानसिकता काय आहे, हे विषद करण्यापूर्वी एक कथा इथं सांगणं क्रमप्राप्त आहे. एक तळं होतं. त्यात काही बेडकांची कुटुंबं रहायची. त्यात एक नर बेडूक इतरांपेक्षा स्वतःला वेगळा समजायचा. एके दिवशी त्याचा मुलगा त्याला एक अजस्त्र प्राणी पाहिल्याचं सांगतो. तो प्राणी बैल असतो. तो म्हणतो, त्याच्यासारखा प्राणी जगात नसेल. नर बेडकाला त्याचा अपमान वाटतो. तो स्वतःला फुगवत त्याला म्हणतो एवढा मोठा होता का? मुलगा म्हणतो, यापेक्षा मोठा. नर बेडूक अजून फुगतो. असं करता करता, तो प्रमाणाबाहेर फुगल्यामुळं फुटून जातो. कथेचं तात्पर्य असं की आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात उडी घ्यायला गेलात तर तुमचा अंत निश्चित आहे. आपली मर्यादा ओळखणं महत्त्वाचं आहे.

ही कथा आठवण्याचं कारण, सर्वसामान्य भारतीयांची मानसिकता नर बेडकाप्रमाणं असल्याचं बऱ्याचदा दिसून येतं. त्याची असंख्य कारणं आहेत. मुख्य कारण, आपली जडणघडण. भारतीयांची जडणघडण ही व्यक्तिकेंद्री व जात-धर्म या अंगानं जाते. शाळकरी वयात भरपूर गुण घेऊन वर्गात नेहमीच पहिला येणाऱ्या पाल्याचं अतोनात कौतुक त्याचे पालक, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रगोत्र करत असतात. त्यामुळे त्याला वाटतं तोच जगात एकमेव असा हुशार माणूस आहे. पुढं वय वाढल्यावर जसं जसं यश मिळत जातं तसं तसं तो शेफारल्याचं दिसतं, कारण तोपर्यंत त्याच्या वागण्यातल्या चुका कुणी दाखवून दिलेल्या नसतात किंवा त्यानं अपयश कधी पाहिलेलं नसतं. त्यामुळे लहान वयातच पाल्य आत्मप्रौढी गाजवायला लागतात. पुढं कर्तृत्व गाजवताना त्याला फुशारकीची जोड मिळते. त्याच्या चुका, वैगुण्य, विक्षिप्तपणाकडे डोळेझाक केली जाते. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचं कौतुक केलं जातं. त्यामुळे त्याला विरोध केलेला आवडत नाही. चुका दाखवून दिलेल्या आवडत नाहीत. प्रत्येक चुकीच्या गोष्टीचं स्वतःचं एक तार्किक समर्थन करण्याकडे कल असतो. परिणामस्वरूप आक्रस्ताळेपणा वाढलेला दिसतो. आपण करू ते शंभर टक्के बरोबरच करू, असा फाजील आत्मविश्वास त्याच्या ठायी तयार होतो. तो अनिर्बंध व्हायला लागतो. भारतीयांमध्ये, खासकरून पुरूषांमध्ये वरील लक्षणं नेहमीच दिसून येतात.

कंगणाचा गेल्या काही वर्षातला अविर्भाव पाहता वरील सर्व लक्षणं तिला पूर्णपणे लागू होतात असं दिसतं. तसेच तिनं ट्विट्समधून ज्या वल्गना केल्यात त्या राक्षसी कुपमंडूकतेचं दर्शन घडवतात. ज्या मेरील स्ट्रीपसोबत तिनं स्वतःची तुलना केली आहे त्या स्ट्रीपला आतापर्यंत ऑस्कर, बाफ्ता, गोल्डन ग्लोब व स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड या चार प्रमुख पुरस्कारांची मिळून ८७ नामांकनं मिळाली आहेत, तर कारकिर्दीत एकूण ४०७ नामांकनं व १७७ पुरस्कार प्राप्त आहेत. कंगणानं ही नुसती आकडेवारी बघितली तरी तिला भोवळ येईल.

ज्या फिल्मफेअर पुरस्काराला तिनं नाकारलं असं अभिमानानं म्हणते, त्याबद्दलचे दोन किस्से इथं शेअर करावेसे वाटतात. पहिला किस्सा. ‘गाईड’ सिनेमासाठी संगीतकार एस. डी. बर्मनना एकजण म्हणाला, पैसे देत असाल तर त्यावर्षीचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार तुम्हाला देऊ. स्वाभिमानी बर्मननी बाणेदारपणे पैसे द्यायचं नाकारून आपली कला अशी विक्रीला ठेवलेली नाही हे दाखवून दिलं. दुसरा किस्सा. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी काही वर्षांपूर्वी त्यांनी एके वर्षी पैसे देऊन फिल्मफेअर पुरस्कार घेतला होता, असं एका ट्विटद्वारे सांगितलं होतं. (हा किस्सा ‘मसान’ फेम वरुण ग्रोवरनं एका युट्युब चॅनलवरील चर्चेत सांगितला आहे.) यावरून फिल्मफेअर पुरस्काराच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बर्मनचा किस्सा सर्वश्रुत आहे, तर ट्विट ‘क्वीन’ कंगणाला ऋषी कपूरनी केलेलं ट्विट आठवत नसेल का? जर नसेल तर ती ताकाला जाऊन भांडं लपवतेय असं म्हणावं लागेल.

टॉम क्रूझसारखे स्टंट्स आपण करतो म्हणणं म्हणजे जरा अतीच झालं. एखाद्या सिनेमात स्वतःहून स्टंट्स केले तर त्यात मिरवण्यासारखं काय आहे? क्रूझसोबत तुलना करायची असल्यास स्वतः स्टंट्स केलेले सिनेमे तिनं सातत्यानं करावेत. एखादा सिनेमा करून त्याचं प्रदर्शन मांडण्यात काहीच अर्थ नसतो. ‘अॅक्शन स्टार’ म्हणून नावलौकिक मिळवणं वेगळं आणि ‘एखाद्या’ सिनेमात स्टंट्स करून अॅक्शन स्टार म्हणून मिरवणं वेगळं. त्यासाठी तशा पटकथासुद्धा निवडणं गरजेचं असतं. या निमित्तानं तिला विचारावसं वाटतं, ‘सिमरन’ सिनेमाचं असं नेमकं काय झालं की तो सिनेमा कुणालाच पसंत पडला नाही.

कंगणाला तुलना करण्याची घाईच असेल तर तिनं तापसी पन्नूशी स्वतःची तुलना करावी. दोघींचं वय एकच आहे. जर तेही होत नसेल तर शबाना आझमी, स्मिता पाटील, मधुबाला, नूतन, मीनाकुमारी किंवा तिच्या पूर्वीच्या कोणत्याही अभिनेत्रीशी तुलना करावी. तिला तिची जागा दिसून येईल. पण नर बेडकाप्रमाणे मानसिकता असलेल्या कंगणाला आपण कशा श्रेष्ठ अभिनेत्री आहोत हे दाखवून द्यायची घाई लागली आहे. एका अर्थानं स्वतःच स्वतःचा ढोल वाजवायचा आहे. समीक्षकांनी, चाहत्यांनी, चित्रपट अभ्यासकांनी तिच्या सर्व सिनेमांचा, पात्रांचा अभ्यास करून तिच्या मर्यादा दाखवून दिल्या तर त्या तिला नको असाव्यात, म्हणूनच ही घाई झाली असणार. तिच्या अभिनयाचं मूल्यमापन जेव्हा ती अभिनयातून निवृत्ती घेईल तेव्हा करणं योग्य ठरेल. ते मूल्यमापन समीक्षकांनी करावं, ना की तिनं स्वतः किंवा तिच्या निस्सीम चाहत्यांनी.

अभिनयोत्तम अमिताभ बच्चननी तिचं ‘क्वीन’ सिनेमातील काम बघून ‘तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे’ असं ट्विट केलं होतं. बच्चनकडून तिनं ही बाब शिकायला हवी, की ज्येष्ठ अभिनेता असूनदेखील ते तिच्याकडून अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणजेच त्यांची अभिनयातील न शोधता आलेले पैलू शिकण्याची भूक कायम आहे. पण कंगणाचा एकूण अवतार पाहता तिची शिकण्याची भूक कधीच मेलीय असं दिसून येतं. भाबडी आशा एवढीच आहे, की नर बेडकाप्रमाणे ती स्वतःची अवस्था करून घेणार नाही.

*

वाचा
विवेक कुलकर्णी यांचे साहित्य
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा


Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :