कळलंय तू ब्लॉक केलं आहेस मला
व्हॉट्सअप, फेसबुक, कॉल, इंस्टा..
कदाचित मनातूनही केलं असशील ब्लॉक
आठवणीत मात्र मी राहीन तुझ्या
तशीच अनब्लॉक… लख्ख!
तुझ्या आयुष्याच्या त्या काळात असेन मी… लख्ख
तळ्याकाठी हातात हात घेवून तासनतास बसलेलो असताना
हळूहळू उमलेलं ते फूल करता येईल तुला ब्लॉक?
गाडीतून सूर्यास्त बघताना केलेल्या
निशब्द स्पर्शाला करता येईल तुला ब्लॉक?
माझ्या मिठीतल्या बेधुंद आमंत्रणाला करता येईल तुला ब्लॉक?
तुझ्या खांद्यावर मी उमटवलेली ओठांची मोहोर करता येईल तुला ब्लॉक?
सूनसान घाटात टेकवलेले ओठावर ओठ करता येतील तुला ब्लॉक?
डोळ्यातून एकमेकांना केलेले अगणित स्पर्श करता येतील तुला ब्लॉक?
झुरलेले, वेचलेले, बेभान क्षण होत नसतात रे ब्लॉक
उसळी मारून येतात ते खोल मनाच्या डोहातून
वाजतच राहते एक धून… श्वासातून
इलेक्ट्रॉनिक पडदे होतातही ब्लॉक
प्रेम कधीच होत नाही ब्लॉक
जागं होतं ते
ऐकताच एक हाक…
*
वाचा
डॉ. प्रिया दंडगे यांच्या कविता
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कवयित्री प्रिया दंडगे या डॉक्टर असून वैद्यकीय व्यवसायाबरोबरच वृत्तपत्रं, नियतकालिकांमधून नियमितपणे लेखन करतात. विविध कथा स्पर्धांमधून त्यांना पारितोषिकं मिळाली आहेत. त्याचबरोबर 'स्वयंसिद्धा' या संस्थेच्या वतीनं त्या आरोग्य शिक्षणाचं कामसुद्धा करतात.