‘आयेशा’ असं गूगलवर टाकलं, तरी साबरमतीच्या आयेशाबद्दल संपूर्ण माहिती मिळते. जिनं नुकताच एक व्हिडीओ बनवून आत्महत्या केली. माझं काहीच अस्तित्व नाही, असं तिला वाटतं होतं म्हणून तिनं स्वतःचं आयुष्य संपवलं. याच मुलीला आज ‘गूगल’वर एक ओळख आहे. किती विचित्र आहे ना!
मला तिच्या केसबद्दल काही एक बोलायचं नाहीये. कारण मी कायद्याबद्दल बोलण्याइतकी मोठी नाहीये. हुंडाबळी वगैरे या गोष्टीवरही मला काही बोलायचं नाहीये. मला बस्स, तिचा व्हिडीओ आठवतोय. तिनं उच्चारलेल्या काही वाक्यांबद्दल मला मनापासून बोलावंसं वाटतंय.
खरंतर, आयेशाच असं नाही, पण कुठल्याही अशा मुलीची एका अशा व्यक्तीबद्दल भावना आहे.. जिच्यावर ती जिवापाड प्रेम करते, आणि जिच्यामुळेच तिच्यावर ही वेळ आली.. तिच्याविषयीच ती व्हिडीओमध्ये म्हणतेय की, “त्याला शिक्षा देऊ नका. मी स्वतःच्या मर्जीनं जीव देत आहे. त्याला सोडून द्या.” आज लोक तिला मूर्ख समजत आहेत. ती लोकांच्या दृष्टीनं खरंच मूर्ख आहे. पण तिचं मन काही गोष्टी नाही मानू शकलं. नाही समजू शकलं, त्या मुलाला चुकीचं. कारण, देवानं तिला तितकं भक्कम मनच दिलं नाही, जे खऱ्या आणि खोट्यामधला फरक करू शकेल. या जगात ही जाण असणं, श्वास घेण्याइतकंच गरजेचं झालंय हे मात्र नक्की! नाहीतर पावलोपावली फक्त निराशा आणि धोक्याची वळणं वाटेत येऊ शकतात. पण तरीही पुन्हा मला वाटतं, एखाद्याला नाही ती समज येत. ज्याच्या चुकीच्या वागणुकीमुळं ती आयुष्य संपवते; त्याला ती म्हणतेय, “माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझे डोळे आवडतात…”
मी तिला अजिबात चुकीची नाही म्हणणार, खरा कमनशिबी तो आहे. तिनं स्वतःला संपवणं, हा नक्कीच पर्याय नव्हता. पण तिला कदाचित हे वाटलं की, ‘मी पुन्हा या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवू शकत नाही किंवा मला हे प्रेम अजून कोणासोबत वाटायचं नाहीये किंवा या व्यक्तीबद्दल असलेल्या भावना मी विसरूच शकत नाही किंवा कायद्याच्या कचाट्यात न तिला अडकायचं होतं, न त्याला अडकू द्यायचं होतं..’
ती व्हिडीओमध्ये हेही म्हणते की, त्यानं तिच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले. त्या मूर्ख व्यक्तीला यापेक्षा मोठी काय साक्ष मिळाली असेल? पण तिनं जीव देऊन आता तिचं चारित्र्य निर्मळ आहे, हे सिद्ध झालंय का? ती म्हणतेय, “त्याला स्वातंत्र्य हवंय.” अरे अशा मुलांना कोणी समजावून सांगावं की स्वातंत्र्यच हवं आहे, तर मुळात कोणाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही लायकच नाही आहात.
तिनं वडिलांना केलेल्या शेवटच्या फोनमध्ये ती म्हणते, “मी नवऱ्याला सांगितलं, मी जीव देते तर तो म्हणालाय व्हिडीओ बनव आणि मग जीव दे.” खरंय, असंच घडतं. आपण समोरच्याला जीव तोडून सांगत असतो की ‘बाबा रे, तुझ्याशिवाय जगणं कठीण होतंय.’ आणि बऱ्याचदा हे ऐकूनही तो आपल्याला ब्लॉक करतो, नाहीतर व्हिडीओ काढून मर, हे उत्तर देतो. म्हणजे त्यानं कधी तिच्यावर प्रेम केलंच नव्हतं.. ना त्याला तिला गमावण्याचं गांभीर्य होतं.
वेडी, ती स्वतःला संपवून बसली…
का शक्य झालं नसेल तिला त्याचा राग करणं? त्याला म्हणणं की, ‘मूर्ख माणसा, देवानं मला एक सुंदर आयुष्य दिलंय, जे तुझ्याशिवाय मी जगूच शकते आणि त्या आयुष्याला अजून सुंदर बनवू शकते.’ पण तिला तो त्याचा राग करणं जमलंच नाही.
मी आज प्रत्येक मुलीला हेच सांगेन की, तुमच्या मनातल्या भावना चूक आहेत, तुम्ही मूर्ख आहात, चूक आहात, हा न्यूनगंड मनातून पहिला काढून टाका. आहे प्रेम, तर आहे म्हणा. त्या व्यक्तीची लायकी नाही तुमचं प्रेम मिळवण्याची, ते प्रेम जगण्याची. हो, मला हेही मान्य आहे की हेच प्रेम तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही, त्याला विसरू शकत नाही. मी म्हणेन ‘नका विसरू’, पण त्यासाठी स्वतःला संपवणं हा नक्कीच पर्याय नाही. जर त्याला आपल्या जगण्या-मरण्याचीही खंत नाही, तर याचा अर्थ आपलं अस्तित्व संपलंय असं होतं नाही. उलट स्वतःला हे सांगा की, ‘देवानं मला इतरांपेक्षा खूप वेगळं बनवलं आहे. मी मूर्ख किंवा समज नसलेली नाहीये; तर मला असं एक मोठं मन दिलंय, जे भरभरून फक्त प्रेम देत आलंय. देवानं मला असा एक स्वभाव दिलाय, ज्यात कोणासाठी द्वेष, राग नाहीये. याचा अर्थ मी वेगळी आहे, युनिक आहे. नक्कीच माझ्यात काहीतरी वेगळं आहे.’ बस्स, त्या परिस्थितीतून ‘मूव्ह ऑन’ व्हा. दिवस जाऊ द्या, वेळ जाऊ द्या. कदाचित १ महिना, १ वर्ष लागेल; पण एक दिवस, एक क्षण असा येईल जो नक्कीच आनंद देणारा असेल. आणि मग तेव्हा हे म्हणा, ‘आय लव्ह्ड यू लाईक हेल! पण तुझी लायकी नव्हती की, तुझ्या आयुष्यात माझ्यासारखी मुलगी यावी.’ बघा, नाही शरमेनं त्यानं मान झुकली तर काय…
आज त्या नवऱ्याला, ज्याच्या बायकोनं असा चुकीचा निर्णय घेतलाय आणि स्वतःला संपवलंय, त्याला काय शरम वाटली असेल? अजून एक वर्षानं ही मंडळी पुन्हा नव्यानं संसार करतील आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्यात सुखी होतील. आयेशा, गेलीस मात्र तू, सगळं सोडून! स्वतःला आणि अशा खूप मुलींना हरवून; ज्या तुझ्यासारख्याच परिस्थितीत आहेत.
*
वाचा
स्वाती महाले यांचे लेख
‘बाई’विषयीचे साहित्य
कविता
चित्रकथा
कथा
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!