दिवसेंदिवस वाढणारा कोरोना आणि त्याच्या जोडीनं येणारं लॉकडाऊन हे जणू काही एक समीकरणच झालं आहे. मोठी माणसं त्यांच्या कामात व्यस्त असतात तर तरूण आपापल्यापरिनं त्यांचा जीव रमवतात. सगळी मंडळी घरात असली तरी लहान मुलं मात्र या एकूणच साऱ्या प्रकाराला कंटाळली. चार भिंतीत जीव रमवून वैतागली. यातून त्यांची करमणूक करण्यासाठी मी लहान मुलांसाठी एक उपक्रम घ्यायचा ठरवलं. चित्रकला हा लहान मुलांचा आवडता विषय. यातून त्यांच्यातल्या कल्पनाशक्तीला देखील वाव मिळतो. म्हणून मी हाच विषय निवडायचं ठरवलं. निसर्ग आणि साध्या पेन्सिलनं करता येतील असे शेडींग हा विषय ठरला. मनातला हा उपक्रम सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी, सविस्तर माहिती देणारं परिपत्रक बनवलं. या परिपत्रकातून जेमतेम जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंतच माहिती पोचली. दोन दिवसात फक्त पाच मुलांची नोंदणी झाली. याचा अर्थ माझा उपक्रम पालकांपर्यंत, मुलांपर्यंत म्हणावा तितका पोचला नव्हता. मला कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं होतं.
अशावेळी खऱ्या अर्थानं माझ्या मदतीला धावून आलं ते म्हणजे गोष्ट क्रिएशन्स! कविता, अमित आणि अभिजित यांच्या मदतीनं एक नवीन आकर्षक जाहिरात बनवली. त्या जाहिरातीचा अपेक्षित परिणाम झाला. मला अनेक फोन आले. एकतीस मुलांची नोंदणी झाली.
कार्यशाळेचा प्रत्यक्ष दिवस उजाडला. त्या दिवशीही आणखी सहा मुलांची नोंदणी झाली. वयोगटानुसार तीन गट तयार केले. त्यांचा कल लक्षात घेऊन सर्व मुलांना अगदी छोटे छोटे बारकावे शिकवण्याचा मी प्रयत्न केला. मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. माझंच चित्र उत्तम व्हावं ही प्रत्येकाची इच्छा होती. मुलांचा तो किलबिलाट, त्यांचे प्रश्न, शंका, त्यांना होणारा आनंद हे सगळं मलाही आनंद आणि समाधान देत होतं.
कार्यशाळा संपल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट ठरली ती म्हणजे, पालकांचा प्रतिसाद! सर्वच पालकांनी मनापासून तोंड भरून माझं कौतुक केलं. माझ्या उपक्रमाला दाद दिली. आमची मुलं खूश झालीत, तुमची शिकवण्याची पध्दत आवडली, मुलांना तुम्ही आवडलात अशा अनेक प्रतिक्रिया आल्या. या निरागस मुलांसोबतचा एक पूर्ण दिवस थकवा घालवणारा, आनंद देणारा आणि विशेषत: कोरोनाचा विसर पाडणारा ठरला. नवीन ऊर्जा देणारा ठरला.
गोष्ट क्रिएशन्स, कविता, अमित, अभिजित, सर्व पालक मंडळी आणि माझी चिमुकली निरागस मंडळी.. सर्वांचे मनापासून धन्यवाद !
– स्वाती महाले, नाशिक
*
वाचा
स्वाती महाले यांचे लेख
उपक्रम
कविता
चित्रकथा
कथा
स्वाती महाले या व्यवसायानं इंटिरियर डिझायनर आणि त्याच विषयाच्या लेक्चरर म्हणून पुण्यामध्ये काम करत आहेत. शिवाय, कॅनव्हास पेंटिंग्ज बनवणं, इंटिरियरमध्ये टेरेस-बाल्कनी डिझाईन करणं, त्यांचे मेकओव्हर करणं, अशी अनेक कामं वेळ मिळेल तशी करत असतात.