अमित सोनावणे

लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा मला फिल्डिंग करायला जास्त आवडायचं. कारण खेळ लांबून पाहता यायचा. नजरेत साठवता यायचा. हा नजर संचय हीच माझी मुख्य आवड. भटकावं, कुठंही जावं आणि तासन्‌तास ती जागा अनुभवावी. बघत बसावं, ऐकत बसावं आणि नसते उपद्व्याप करत बसावे… 
मला आठवतं, एकदा शॉक बसतो म्हणजे नक्की काय होतं, ही उत्सुकता वाटली. म्हणून ठरवून बोटाला शॉक लावून घेतला. भीती वाटली आणि भीती गेलीही. विज्ञान-तंत्रज्ञान यावर तेव्हापासून जे प्रेम बसलं ते कायमसाठी. रेडिओ, मिक्सर, घड्याळ असं दिसेल ते उघडून बघायचा, काय कसं जोडलं आहे ते मोडतोड करून समजून घ्यायचा नवाच नाद लागला. ‘काहीही असो, आपण पाहिलं पाहिजे, पाहताना अनुभवलं पाहिजे, पाहण्याचाच भाग झालं पाहिजे’ असं वाटायला लागलं. या पाहण्याच्या आवडीनंच चित्रपट क्षेत्रात मला खेचून आणलं. 
‘फिल्म एडिटिंग’ हा माझ्या आवडीचा प्रांत. गोष्टी रचायच्या, त्यातल्या पात्रांच्या जगण्याचे तुकडे करायचे आणि एकेक तुकडा मन लावून जोडत बसायचा… हे तुकडे तोडताना, जोडताना मला नक्की काय दिसत असतं, हे मला शब्दात कधीच सांगता येणार नाही. खरंतर ते मला सांगायचं सुद्धा नाही. मला ते पाहायचंय, थेट प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये. 
‘बबई’ या आम्ही बनवलेल्या शॉर्ट फिल्मनं तो अनुभव आम्हाला दिला. प्रेक्षक आमची फिल्म बघत होते आणि मी त्यांचे डोळे. 
याच आवडीनं मला तीन फिचर फिल्म एडिट करण्याचं सुख दिलं. यातल्या तिसऱ्या फिल्मच्या लेखन आणि दिग्दर्शनातसुद्धा मी सहभागी झालो. नितांत सुंदर काळ होता तो आयुष्यातला. आता हाच अनुभव पुन्हा पुन्हा घेण्याची ओढ लागलीय.
आपल्याला जे कळलं आहे, ते अनेकांपर्यंत पोचवण्याच्या भावनेतून सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यापनाचं काम करतोय. 
कडेला बसून दिसेल ते पाहण्यापासून-अनुभवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास लोकांना पाहण्यासाठी-अनुभवण्यासाठी काही देता यावं, इथपर्यंत पोहोचलाय. आजूबाजूला पाहता पाहता स्वतःत पाहण्याचाही प्रवास सुरूच आहे. हे सारं असंच चालू राहील. शेवटपर्यंत.

संपर्क :
इमेल : [email protected]
समाज माध्यमांवर फॉलो करण्यासाठी:

Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :