किरकिरणारी रात्र. कुणाची वाट बघत दारात बसलेली आई. आणि गवतात फिरणारं अस्वस्थ मूल… 

जड, सुस्तावलेली काळी कुट्ट रात्र. त्यावर नाचणारं हिरवं-पोपटी गवत. गवतावरून फिरणारा मुलाचा हात… मूल गवतातून डोकं वर काढतं. बघत राहतं एकटक. गवत बाजूला केल्यावर पलीकडे बसलेली आई दिसते. गवत पुन्हा पडदा धरतं. आई दिसेनाशी होते. गवत नाचत राहतं. शीर्षक येतं – ‘अँड देन द बेअर’! 

धूर सोडत एक गाडी येते तसे आई आणि मूल चपापतात. आई ज्याची वाट बघत असते तो पुरुष येतो. गाडीतून उतरतो. आई त्याला घट्ट मिठी मारते. मूल एकटं पडतं. 

कान्सला सर्वोत्तम ऍनिमेशनपटाचं नामांकन मिळालेला ‘अँड देन द बेअर’ म्हणजे आईच्या परपुरुषाशी असलेल्या संबंधांचा लहान पण कळत्या-सवरत्या मुलावर काय परिणाम होतो त्याचं चित्रण! होय, चित्रणच! ऍनिमेशन असल्या कारणानं प्रत्येक शॉट चित्र होऊन येतो. मोजक्या रंगांचा वापर करून बनवलेलं गूढ चित्र! 

समागम करणारे किडे… जळणारी घरं, अंगणांमध्ये बसलेली हातात पेटत्या काड्या धरलेली मुलं… काळ्या कुट्ट रात्रीत घरांभोवती फिरणारी काळी कुट्ट अस्वलं… पाठीवरच्या बंदुकीसह विशाल अस्वलाच्या पाठीवर बसलेलं इवलंसं मूल… पडदाभर दिसणारी कुठल्याशा प्रवासाला निघालेली अस्वलं आणि त्यांच्या पाठींवर बसलेली बंदूकधारी मुलं… अशा एक ना अनेक प्रतिमा एका पुढं एक येत राहतात. आणि सुरुवातीला साधी वाटणारी कथा पुढं गंभीर होत जाते. 

समजायला काहीशी क्लिष्ट वाटली तरी फिल्म कंटाळवाणी कुठंच होत नाही. एकाकी, अस्वस्थ आणि प्रसंगी हिंसक होऊ पाहणाऱ्या मुलाच्या भावविश्वात प्रवेश केला तर ‘अँड देन द बेअर’ एक अविस्मरणीय अनुभव देऊन जाते. 


Film maker | + posts

कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :