‘मरून्ड’ म्हणजे ‘एखाद्याला कुठल्याशा दुर्गम ठिकाणी एकटं सोडून निघून जाणं’!

ही कथा घडते चंद्रावर आणि कथेचं मुख्य पात्र आहे चंद्रावरच्या आऊटपोस्टवर सोडलेला एक रोबोट. तासनतास पृथ्वीकडे बघत राहणाऱ्या या रोबोटला पृथ्वीवर परतण्याची खूप इच्छा असते. अतिशय तळमळीनं तो दिवसरात्र परत जाण्याचा मार्ग शोधत असतो. 

आपण एकटेच इथं अडकलो आहोत असं त्याला वाटत असतानाच एक दिवस एक गम्मत घडते. एका मिनी रोबोटच्या रूपानं त्याला एक सोबती सापडतो. रोबोटसुद्धा त्याला मदत करायला लागतो. बघता बघता परत जाण्याच्या प्रयत्नांना चांगलाच वेग येतो. 

फिल्ममधल्या दोन प्रतिमा विलक्षण आहेत. यातली पहिली प्रतिमा आहे चंद्राची. वरवर पाहता या प्रतिमेत विशेष सौंदर्य नाही. पण तरी ही प्रतिमा भावते. याचं कारण प्रत्यक्ष प्रतिमेत कमी आणि आपल्या नजरेत जास्त आहे. आपल्या डोळ्यांना पृथ्वीवर बसून चंद्राकडे बघण्याची सवय आहे. चंद्र हे आपलं स्वप्न असतं. चंद्र ही आपली आस असते. आणि इथं घडतं नेमकं उलटं. जिथं जाण्याची माणसाला आस आहे तिथं पोहोचलेला हा रोबोट मात्र माघारी येण्यासाठी तडफडत असतो. पृथ्वी हे त्याचं स्वप्न असतं, तीच त्याची आस असते. त्यामुळे त्याच्या नजरेतून पृथ्वी बघणं हा निश्चितच एक वेगळा अनुभव आहे. 

आणि दुसरी प्रतिमा आहे – ‘दोघा रोबोट्सचे डोळे’. इथंसुद्धा डोळ्यांच्या प्रत्यक्ष प्रतिमेत फार काही गम्मत नसूनसुद्धा डोळे बोलके वाटतात. केविलवाणा रोबोट पृथ्वीकडे बघत असताना त्याच्या डोळ्यांमध्ये जेव्हा पृथ्वीचं प्रतिबिंब दिसतं तेव्हा हे एका यंत्राचे डोळे आहेत हे आपण साफ विसरतो. दोन्ही यंत्रं आपल्याला आपल्या एवढीच जिवंत वाटू लागतात. 

दोघा रोबोट्सच्या पृथ्वीवर पोहोचण्याच्या धडपडीची गोष्ट म्हणजे ‘मरून्ड’.

*

Film maker | + posts

कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.