दल सरोवरातली मोहक गोष्ट!
काश्मिरी माणसांच्या जगण्यातला निसर्ग आणि मानवी भावभावनांचा गुंता एका गोष्टीतून सांगणारी कादंबरी म्हणजे ‘गुल गुलशन गुलफाम’. मल्ला खालिक हा दल सरोवरात त्यांचा पारंपारिक हाउसबोटी भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारा एक अतिशय तत्त्वनिष्ठ माणूस. त्याच्या कुटुंबात होणाऱ्या घडामोडी, पर्यटन व्यवसायात येणारी आव्हाने, त्यांच्या कुटुंबाच्या जगण्याचा संघर्ष सांगणारी ही कथा आहे.
माणूस नाती जोडतो ते कशासाठी? रक्ताची नाती तर जन्मतःच मिळतात, पण मानलेल्या नात्यांचा माणसाच्या आयुष्यात असलेला पसारा त्याला कसा आवरतो, सावरतो हे या कादंबरीतून उलगडत जाते. मग मानलेला मुलगा असो, किंवा भाऊ, मित्र. यांच्या स्नेहबंधातून येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद माणसाला मिळत जाते. मल्ला खालिक आणि नारायण जू या दोघांचे नाते इतके घट्ट आणि दीर्घ मैत्रीचे, विश्वासाचे आहे. सध्याच्या जगात अशा नात्यांची किती वानवा आहे हे जाणवत राहते.
परंपरा, नैतिकता, एकनिष्ठता, प्रेम, कुटुंबभावना, समजूतदारपणा या मूल्यांचा उलगडा मूळ लेखक प्राण किशोर यांनी अतिशय सखोल केला आहे. या कादंबरीचा अनुवाद प्रशांत तळणीकर यांनी तितक्याच ताकदीने केला आहे.
काश्मीर प्रदेशाचे वर्णन, तिथल्या लोकांचे राहणीमान, त्यांच्यातला करारीपणा, साधेपणा आणि काश्मिरी माणसाची सौंदर्य दृष्टी यातून समजते. जणू काही दल सरोवरात आपण फेरफटकाच मारत आहे असे वाटत राहते. मग शिकारा, हाऊस बोटी, होडी, पाण्यात असणारी घरे, दल परिसर, पाम वृक्ष, सफरचंदाच्या बागा, गालिचे, मोरेल, सुलैमान पर्वत या सगळ्या गोष्टी वाचकाला आपल्याश्या वाटायला लागतात. त्यांच्याशी एक वेगळे नाते तयार होते.
मल्ला खालिकांची मुलगी परवीन आणि सून झेब या दोघी म्हणजे भारतीय स्त्री-मनाच्या तळाशी असलेल्या जाणीवा विशद करणारी पात्रे आहेत. मानवी प्रेम, त्यातला अनुराग आणि विफलता यांचा विस्तार त्यांच्या संवादातून झालेला दिसून येतो. रझाकबद्दल वाटणारी भावना परवीन खूप वेगळ्या पद्धतीने व्यक्त करते. आणि अबोल राहणारी झेब तिची वाट बदलत स्वतःला कशी सावरते हे पण वाचण्यासारखे आहे.
खालिकांच्या तिन्ही मुलांची मोठे होण्याची धडपड त्यांना कुठे नेते, त्यातून ते काय साध्य करतात हे वाचकाला नक्कीच बांधून ठेवते आणि मनात उत्सुकता निर्माण करते.
दमणमध्ये राहणारी रिनी काश्मीरच्या या कुटुंबाशी कशी जोडली जाते ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची वाटते. स्वतःच्या कुटुंबाची प्रतिष्ठा टिकवून कुटुंबातल्या सगळ्या माणसांनी एकत्र राहणे आणि परंपरेने चालत आलेला बोटींचा व्यवसाय करणे हे एकमेव स्वप्न उराशी बाळगणारा मल्ला खालिक हा एका भारतीय कश्मिरी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो. आणि माणसाच्या आतला स्नेह, प्रेम, स्निग्धता, साधेपणा या गुणांची आठवण करून देतो.
ही कादंबरी एकेकाळी मालिका म्हणून दूरदर्शनवर प्रचंड गाजली होती. मालिका कधी पाहिली नसली तरी, अतिशय सरळ असूनही एका काश्मिरी पारंपारिक कुटुंबाची ही गोष्ट नक्कीच मनात घुटमळत राहते आणि त्या अर्थाने ती अतिशय वेगळी वाटते.
नक्की वाचा.
कादंबरी – गुल, गुलशन गुलफाम
लेखक – प्राण किशोर
अनुवाद – प्रशांत तळणीकर
प्रकाशक – सरहद, पुणे
*
वाचा
पुस्तक परिचय
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.
👌👌👌