आलेली तीनही पत्रं मी घाईघाईनी पिशवीत टाकली. कुरेशी हा काही चोंबडेपणा करणाऱ्यातला नव्हता. तरीही नकोच म्हणत मी पत्रं लपवली. कुरेशी कावळ्याच्या नजरेनी बघत नाही, याची खात्री पटताच लाकडी खुर्चीकडे न बघताच मी बाहेर पडलो. खोलीवर जावं का..? तेही नकोच. मी सरळ विरेश्वराचं देऊळ गाठलं. पत्रातील मजकूर वाचायला मी अधीर झालो होतो.
‘‘काय.. दर्शनाला आलाय वाटतं?” पाठीवर थाप पडत विचारणा झाली. मी मागं वळून बघितलं. गुजर होते. एरवी काहीही न बोलणारा गृहस्थ इथं कसा टपकला?
एक तिरसट उत्तर डोक्यात आलं, ‘हो, दर्शनालाच.. पण विरेश्वराच्या नाही तुमच्याच.’
पण तसं उत्तर द्यायला जीभ धजावली नाही. आज या माणसाला का कंठ फुटला होता? माहीत नाही. बोल बोल बोलत होता. त्यांच्या पोलादपूरच्या कामाचं टेंडर कसं मिळालं, याचं रसभरीत वर्णन करत राहिला.
माझा जीव टांगणीला.
“आता काय ऑफिस सुटलंच असेल; चला घरी चहा घेऊ”.
काहीतरी विचारायचं म्हणून म्हटलं,
“घरी वहिनी असतील ना?”
“नाही हो. तिचा मुक्काम हल्ली माहेरीच असतो. जयश्रीच्या लग्नाची तयारी. मीच चहा करतो चला.”
त्यांनी चहा करताना आणखी बोअर केलं. कसाबसा चहा घेतला. खोलीवर आलो. मुन्ना पाट्यावर बसलीय का नाही हेदेखील न पहाता हातात किल्ली घेऊन दाराशी उभा राहिलो. तर दार उघडं. आत कोल्हे आणि कुरेशी.
कोल्हे मिशाळ हसत म्हणाला, “आज काय विशेष, गुजरबरोबर बाजारात फिरत होता? पाहिलं आम्ही तुम्हाला. म्हटलं काहीतरी खाजगी दिसतंय. म्हणून मग आम्ही कल्टी मारली.”
बाहेरच्या खोलीत ते दोघे बोलतायत पाहून आतल्या खोलीत गेलो. दार लावून घेतलं. तीनही पत्रं पुढ्यात घेतली. पहिलं कुठलं वाचू? पत्ते पिसल्यासारखी तीनही पत्रं वरखाली केली. सगळ्यात वर दादांचं पत्र. मनाचा कौल मानत ते पत्र ठेऊन दिलं. नीलाचं पत्र वाचायला सुरुवात केली.
पुण्यातील भेटीत माझ्या ओठांचा उल्लेख करणाऱ्या नीलाच्या पत्रात अगदी बाळबोध मजकूर. तिची स्वतःची दिनचर्या. तिच्या आईचं दुखणं-खुपणं. वाईचा तिचा वर्गमित्र अनिल जोशींचं गुणगान. मी का वाचतोय हे पत्र? अगदी शेवटी एक ओळ – ‘विनय पुन्हा पुण्याला येणार असशील तेव्हा अगोदर कळव.’ इतकंच माझ्यासंबंधी वाक्य. पत्र उलटसुलट करून पाहिलं. तिचा पत्ता कुठंच नव्हता. कुठं कळवणार होतो मी तिला? खूप अपेक्षा वाढवलेलं निराश करणारं पत्र वाचून संपवलं. माझ्या आयुष्यातलं मुलीनी लिहिलेलं पहिलं पत्र. मी काही प्रेमपत्राची अपेक्षा केली नव्हती. तरीही अगदी गौरीनी लिहिलेल्या भाऊबहिणीच्या पत्रासारखं.. हे असलं पत्र?
आता दादांच पत्र. आश्चर्य म्हणजे कुठलाही हितोपदेश नाही. उलट यावेळी तुझी परीक्षा पार पडली की लिहायला सुरुवात कर, हा आशावादी स्वर होता. आणि शेवटी एक ओळ. तू एक कथा वाङ्मय ‘शोभा’साठी केळकरांना दिली होतीस, असं केळकर भेटले तेव्हा सांगत होते. ते कथा स्वीकारत नाहीत म्हणाले; पण चिरंजीवांना लिहायला सांगा. ‘बरं लिहू शकेल, असं म्हणाले,’ हे मात्र दादांनी नमूद केलं होतं. अपेक्षेपेक्षा वेगळं पत्र. आणि मला ती कथा वाचायला दे, बघू काही सुधारणा करता येतीय का, असला भंपकपणा नाही. कथा स्वीकारली नाही ही निराशा. लिहीत रहा, हे प्रोत्साहन. दोनही पत्रं वाचून मूड बदलला नाही.
अनिल करंदीकरचं पत्र उघडलं. याचं एक बरं असतं, मायना वगैरे सोपस्कार नाहीत. डायरेक्ट गप्पा मारल्याप्रमाणं लिहिणं. ‘साल्या…’ असं म्हणत त्याच्या पत्राची सुरुवात व्हायची.
माझं एक निरीक्षण होतं ज्यांची नावं देवाच्या नावावरून ठेवलेली असतात त्यांना लोकं टोपणनावांनी हाक मारतात. परंतु ज्यांची इतर नावं असतात त्यांना सहसा टोपण नावं नसतात. याचा खाक्याच वेगळा, हा मला कधीच विनय म्हणत नाही, पत्रात तर मुळीच नाही.
साल्या..
कसलं काम लावलंस रे बाबा मला? कोण तो तुझा मित्र कुरेशी आणि त्याची ती प्रवासात त्याला भेटलेली मैत्रीण सुनंदा वर्तक! एकदम फ्रॉड मामला आहे रे ती. त्या पोरीची कुंडली काढली. आपली नाक्यावरची पोरं लावली कामाला. एक नंबर ‘छू’ फॅमिली आहे.
पहिलं तिच्या आईबद्दल. या पोरीचा बाप म्हणजे या बाईचा नवरा एकदम शामळू, बावळट. आणि ही चवचाल. नवऱ्यात काही दम नाही, हे इतरांना माहीत असलेलं ओपन सिक्रेट ही चारचौघात उगाळत बसते. पोरं तर म्हणाली, ती सुनंदा त्याची मुलगीच नाही. वेगवेगळ्या देवांची आरती करताना हिच्या आईनं प्रसाद पाडून घेतलाय पदरात आणि हे नक्षत्र जन्माला आलंय. नवऱ्यावर सूड म्हणून आणि अनेक देवांच्या नादी लागल्यानं हिच्या अंगात येतं. अंगारे धुपारे हे दिवसभर आणि संध्याकाळी आरत्या. उरलेल्या वेळात गाव धुंडाळणं. हे झालं आईचं. पोरगी त्याच वळणाची. नाही पंधरा-सोळाची झाली तर छम्मक छल्लो बनली. हिनं कधी कुणाकडं सरळ नजरेनं बघितलंच नाही. कायम डोळ्याच्या कोपऱ्यातून बघणार. ही नजर, चाल कळतात रे नाक्यावरच्या पोरांना. आईच्या अंगाऱ्या धुपाऱ्यात वाढलेली ही बापाची बेइज्जत करायला आईच्या पुढं. एकदम फालतू पोरगी आहे रे ही. तुझा मित्र हिच्या प्रेमात पडलाय का? का वासनेनी बर्बटलाय? तो जर सरळ सज्जन असेल तर त्याला म्हणावं नाद सोड. हा मुसलमान, ही हिंदू.. हा तिढाच नाही! हा पुरुष आणि ही बाई.. असाच सरळ मामला आहे. तो जर छपरी असेल तर चालू दे. पण एक मात्र कर, तो सरळ नसेल तर तू त्याचा नाद सोड. आणि सरळ असेल तर माझं हे पत्र त्याला वाचायला दे. तुझ्या पत्रातून तुझ्या या मित्राबद्दलच्या भावना खूप छान वाटतायत. मी काही त्याला पाहिलेला नाही; पण मी तुला खूप जवळून पाहिलंय. म्हणूनच सांगतो त्याला, तिच्यापासून लांब रहायला सांग.
तू महाडसारख्या खेड्यात गेलायस, मी पुण्यातून मुंबईत गेलोय. आपली गावं बदलण्यात खूप फरक आहे. मुंबईत मी मजेत आहे, महाडमध्ये तू मजेत राहा. कोकणातली माणसं तऱ्हेवाईक असली तरी सच्ची असतात. त्यांचा पाहुणचार घेत समृद्ध राहा. बापासारखं लिहू नकोस, स्वतःसारखं आणि स्वतःसाठी लिही. मी जरी सायन्स ग्रॅज्युएट असलो तरी पत्रकारिता करावी म्हणतोय. काही स्टोरी असेल तर कळव. मी महाडात येऊन जाईन. पत्रकारितेसाठी स्टोरी खूप महत्त्वाची आणि लेखकाला स्टोरी घडण्याच्या अगोदरची आणि नंतरची परिस्थिती महत्त्वाची. बाकी नेहमीचं.. किंग्ज सर्कलपाशी पाणी तुंबलंय, काळ्या घोड्याजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला आणि मोसंबी पिऊन अमुकतमुक यांनी उपोषण सोडलं. लिहीत राहा.. दोन्ही, ललित लेखन आणि मला पत्र. बाय द वे, तुला नोकरी लागलीय म्हणजे तुझा डिप्लोमा पूर्ण झालेला दिसतोय. अनेकजण नंतर एएमआयई करतात.. तू काही त्या भानगडीत पडू नकोस. बाहेरून बीए करता आलं तर बघ, तुझा कल तिकडं आहे हे तुझ्या बापाला नाही कळलं; पण आम्हा मित्रांना समजतंय. थांबतो.
अ नि ल
कुरेशीला औरंगाबाद पुणे प्रवासात भेटलेली सुनंदा वर्तक. तिचं कमालीचं संयमित वागणं, वर्णन केलेलं कुरेशीचं बोलणं आठवलं. किती जीव जडलाय त्याचा तिच्यावर. आता अनिल करंदीकरचं हे पत्र. संगती लावली तर काय निष्कर्षाला यावं? त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी झालीय. गोकूळमध्ये असताना मी अनिलला लिहिलेलं सुनंदाची चौकशी कर, असं सांगणारं पत्र कुरेशीनी वाचलं नव्हतं; परंतु त्यातला मजकूर तर मी त्याच्याशी बोलून लिहिला होता. असं असूनही कुरेशीनी मला कधी अनिलचं काही उत्तर आलं का, असं विचारलं नव्हतं.
त्यानं हे पत्र पाठवलंय आणि अद्याप उत्तर आलेलं नाही, हे विसरलाय का? की सुनंदालाच विसरलाय. त्यानी प्रवासकथा बनवून सांगितली असती तर अनिलला काहीच संदर्भ मिळाले नसते. असं तर नाही.. सुनंदा कुरेशीच्या मनात मी समजतोय इतकी रुतून बसलेली नाही, जितकी माझ्या मनात!
दोन समीकरणं तयार झाली.
एक म्हणजे, दोन वर्षांपूर्वी भेटलेले कुरेशी आणि सुनंदा यांच्यात नातं निर्माण व्हायची शक्यता. नंतर कुरेशींनी तो विषय देखील न काढणं. त्याला नात्याचा विसर पडणं आणि मला मात्र ते नातं तयार व्हावं, असं वाटणं…
दुसरं म्हणजे मी आणि नीला. चार दिवसापूर्वी आमची भेट झाली. मला तिच्याबद्दल ‘ते’ आकर्षण न वाटणं; परंतु ती केवळ एक मुलगी आहे हेच आश्वासक वाटणं. मी तसल्या भावना मनात असल्याचा विचार करणं. त्यात भर पडणारं तिचं पत्र येणं. पण ते वाचून मी निराश होणं आणि त्या भावना मनातून काढून टाकणं. नातंच तयार न होणं…
विचार करत राहिलो या अनिलच्या पत्रांविषयी कुरेशीशी बोलावं का? निदान त्याच्या कानावर घालावं म्हणून मधलं दार उघडलं. बाहेरच्या खोलीत बसलेले कुरेशी आणि कोल्हे गायब. समोर मुन्ना पाट्यावर, शेजारी चाचा उभे. मी काही विचारण्याआधीच चाचा म्हणाले,
“कुरेशी बझार गया है. शायद मुर्गा लाने के लिये.”
आता कुरेशी मुर्गा आणेल, चाचा तो कापतील, मुन्ना त्याला वाटण लावेल. आणि मी सुनंदा नामक कापलेली मुर्गी कुरेशीला दाखवीन. तो फक्त तिची पिसं बघेल.. कारण आज त्याला मुर्गा हवाय.
(क्रमशः)
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
कविता