शहर
शांत असतं
अबोल असतं…
तिथं ना आयाबाया असतात
ना असतात सुखदुःखाच्या गोंदणगप्पा…
पण म्हणून
शहरात नांदणारी गर्भवती
अगदीच एकटी असते
असंही नाही.
तिची सोबत करत असतो –
दिवसभर कामावर जाणारा
आणि तिच्या गर्भारपणानं
तिच्याइतकाच भांबावलेला
तिचा नवरा,
सतत धावणारी
कामाचा रगाडा उपासणारी
कामवाली,
महिन्यातून एकदा भेटणारी
पेशंट्समधे बिझी असणारी
डॉक्टर,
दुसऱ्याच शहरात राहणारी
थकलेली
सासू,
तिसऱ्याच शहरात राहणारी
इतर नातंवंडांचं करण्यात व्यस्त असलेली
आई
आणि
कुठल्याशा खेड्यात राहणारी
कधीमधी फोनवर बोलणारी
म्हातारी आजी.
दुखतं-खुपतं काही
आणि भांबावते बाई
तेव्हा
हाकेच्या अंतरावरची सगळीच दारं
हमखास असतात कुलुपबंद!
मग बाई
गरगरायला लागते
पोटातून बाहेर पडू पाहणाऱ्या बाळासारखी
पण
कितीही गरगरत राहिली ती
तरी
धावणारं शहर थांबणार नसतं
हाकहवाला विचारणार नसतं
तिनं
कितीही ढुशा मारल्या तरी
तिच्या मोडकळीला आलेल्या पाठीवरून
फिरणार नसतो
सुरकुतलेल्या हातांचा मायाळू स्पर्श…
अशावेळी
शहरावरच्या प्रेमाखातर
मान्य करते बाई
शहरानं लादलेलं एकटेपण
डोळे पुसते
खंबीर होते
आणि
भागवू लागते आपली भूक
स्वतःभोवती गुंडाळून घेतलेल्या
इंटरनेट-मोबाईलच्या नाळेमधून…
*
वाचा
कविता दातीर यांचे साहित्य
कविता
चित्रपटविषयक लेख
चित्रकथा
कथा
कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.
वा, खूप खूप सुंदर, खूप छान!!
छान